विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday 21 July 2021

सेखोजी आंगरे

 


सेखोजी आंगरे—

सेखोजी हा कान्होजीची स्त्री मथुराबाई हिचा वडील मुलगा. सन १७२९ त कान्होजी मरण पावल्यावर सेखोजी सरखेलीचा कारभार पाहूं लागला तो राजनिष्ठ व इमानी सेवक असून हवशांचें प्राबल्य मोडून मराठी राज्याच्या अभिवृद्धीसाठी मनापासून झटणारा होता. शौर्य, कर्तृत्वाची आवड, भारदस्तपणा व शालीनता हे गुण सेखोजीच्या अंगीं विशेष होते. त्याची आई मथुराबाई ही कर्तृत्ववान व मराठी राज्याची अभिमानी होती.
कान्होजीच्या पश्चात् हबशांनीं कोंकणांत बराच उपसर्ग मांडिला. तथापि सेखोजीच्या शहाणपणानें हबशांचें विशेष कांहीं चाललें नाहीं. ता. १ मे स. १७३३ रोजी मानाजी आरमार घेऊन जंजिर्यावर आला व त्यानें सिद्दीच्या आरमाराचा पाडाव केला. १७३३ च्या जंजिर्यावरील मोहिमेंत जूनच्या अखेरीपावेतों मुंबईजवळचा थळचा मोठा किल्ला व पेणनदीमधील रावळीचा किल्ला सेखोजी आंगर्यानें सीद्दीपासून सर केला, त्यामुळें मुंबईस इंग्रजांस मोठी धास्ती पडली. पोर्तुगीज लोक हबशांस मदत करीत, सबब त्यांचा चौल शहराचा भाग आंगर्यानें हस्तगत करण्याचा प्रयत्न चालविला. इंग्रजांचें 'रोझ' नांवाचें जहाज त्यानें पाडाव केलें होतें, तें ७६०३ रुपये दंड घेऊन आंगर्यानें इंग्रजांस परत दिलें.
हबशी नाहींसा झाल्यास आंगर्याचा जोर वाढून आपला निभाव लागणार नाहीं अशी इंग्रजांस धास्ती पडल्यामुळें ते हबशास फौज, दारूगोळा, अन्नसामुग्री वगैरेंचा पुरवठा करीत होते. तें पाहून सेखोजीनें मुंबईवर स्वारी करण्याची तयारी केली, परंतु पर्जन्यकाळ असल्यामुळें त्याचा इलाज चालला नाहीं. इंग्रजांस शह देण्याकरितां आंगर्यानें उंदेरीवर हल्ला चढविला. उंदेरी किल्ला हबशाच्या कबजांत होता त्या प्रसंगीं हबशास मदत करण्याकरितां इंग्रजांनीं टॉमस होल्डन यास 'मेरी' नांवाचें लढाऊ जहाज व सर्व साहित्य देऊन रवाना केलें. परंतु इंग्रजांचा समाचार घेण्यास सेखोजी फार दिवस जगला नाहीं. तो लवकरच पुढें सप्टेंबर महिन्यांत एकाएकीं मरण पावला. बाजीराव, संभाजी आंगरे वगैरे सर्वांशीं सेखोजींचें वर्तन गोड व अष्टपैलू होतें. कुटुंबातील सर्व बायामाणसांशीं त्याचें प्रेम सलोखा असे.

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...