विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 21 July 2021

संभाजी आंगरे

 





संभाजी आंगरे-

संभाजी हा कान्होजी आंग-याची स्त्री मथुराबाई हिचा धाकटा मुलगा. सेखोजी व संभाजी यांचें बनत नव्हतें. सन १७३३ च्या सप्टेंबर महिन्यांत सेखोजी मरण पावला व संभाजी विजयदुर्गास होता तो सरखेलीच्या पदावर दाखल झाला. संभाजी तिरसट, उतावळा व त-हेवाईक होता. भावांशीं व पेशव्यांशीं त्याचें बरें नव्हतें.
बाजीराव निघून गेल्यावर संभाजी आंग-यानें जंजि-याची मोहीम शाहूच्या हुकुमानें तशीच पुढें चालविली. सन १७३४ च्या आरंभीं तुळाजीस बरोबर घेऊन संभाजी सीद्दीच्या हातून अंजनवेल काबीज करण्यासाठीं चालून गेला. परंतु अंजनवेल व गोवळकोट हीं स्थळें काबीज करण्याचा संभाजीचा उद्योग चालू असतां इंग्रजांनीं हबशांस मदत केली व त्यामुळें संभाजीचा उद्योग फसला. इकडे मानाजीनें कपट करून फिरंगी लोक कुलाब्यांत आणिले. संभाजी व मानाजी यांच्या तंटयामुळें जंजिरा जिंकण्याचें काम मागें पडलें. या दोघां भावांची बरेच दिवस झटापट चालू होती. संभाजीचा स्वभाव उतावळा व रागीट असल्यामुळें तो पुष्कळांस अप्रिय झाला होता (पे. ब. खंड ४, पृ. ४१, का. सं. प. या. ले. ११९ व ग्रँ. पु. १ पा. ४३२). शाहूच्या दरबारांतील नारोराम शेणवी वगैरे मंडळी संभाजीला अनुकूल होती तर इकडे मानाजीला पेशव्यांचा पाठिंबा होता.
याप्रमाणें आंगरे बंधूंचें भांडण उत्तरोत्तर विकोपास जाऊन मानाजीनें बाजीरावास ताबडतोब आपल्या मदतीस बोलाविलें. त्यानें येऊन खांदेरी व कोथळा हे किल्ले काबीज केले. नंतर बाजीरावानें मानाजीस 'वजारतमाव' असा नवीन किताब देऊन त्याची स्थापना कुलाब्यास केली आणि संभाजीने 'सरखेल' हा किताब घेऊन सुवर्णदुर्गास रहावें असें ठरवून, या दोघां भावांचा तंटा तात्पुरता तोडिला. पण बाजीरावानें केलेल्या व्यवस्थेनें संभाजीमानाजीचें ऐक्य झालें नाहीं, उलट कायमचेंच वांकडें आलें. पुढें संभाजी उलटपणें पेशव्यांच्या विरुद्ध पक्षास सामील होऊन नानाप्रकारची कारस्थाने रचूं लागला. आंगरे हा बलाढ्य सरदार मुख्य सरकारशीं फटकून वागत असल्यामुळें, त्यास निर्बल करण्याचे प्रयत्न बाळाजी विश्वनाथापासून चालले होते. आंग-याच्या घराण्याचे दोन भाग केल्यानें त्यांची शक्ति अर्थात कमी झाली. पेशव्यांनीं मानाजीस हाताशीं धरून संभाजीस दुर्बल केलें. पेशव्यांच्या विचारें मानाजी इंग्रजांशीं सख्य ठेवून घरगुती तंटयात त्यांची मदत आणूं लागला.
१७४० सालीं बाजीरावाचें सैन्य नासिरजंगाशीं लढण्यांत गुंतलें आहे अशी संधी साधून संभाजी आंगरे यानें एकाएकीं अलीबागेंत उतरून हिराकोट, थलचाकोट, राजगड, सागरगड व चौलचा कोट हीं स्थळें घेतलीं व अलीबागेंत कुलाब्याचें पाणी बंद केलें, तेव्हां मानाजीनें, ताबडतोब येऊन आपलें रक्षण करावें अशी पेशव्यांस विनंति केली. पेशव्यांनीं मानाजीच्या कुमकेस जाण्याविषयीं इंग्रजांकडे पत्रें रवाना केलीं व बाळाजी बाजीराव व चिमाजी आप्पा हें स्वतः संभाजीवर चाल करून गेले. इकडे इंग्रजांनीं बाळाजीपंत येण्यापूर्वीच कुलाब्यास येऊन पाणी सामान जें पाहिजेत तें कुलाब्यास पोंचविलें होतें (का. सं. प. या. ५८.) मानाजीच्या मदतीस पेशवे व इंग्रज या दोघांच्या कडूनहि कुमक आली तेव्हां संभाजीचा जोर चालेना. पण इतक्यांत मे महिन्याच्या आरंभास बाळाजी व चिमाजी आप्पा यांस बाजीराव मरण पावल्याची खबर कळली. त्यामुळें त्यांनीं सुतकाच्या दिवसांतच व आंग-याचें प्रकरण मिटविलें (मराठी रियासत मध्यविभाग २ पृ. १). यानंतर संभाजी आंगरे फार दिवस जगला नाहीं. तो ता. १२ डिसेंबर सन १७४१ रोजीं मृत्यु पावला (खं. ३ ले. ३४५). (मराठी रियासत मध्यविभाग १ व २)

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...