विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 29 July 2021

अलिजा बहादूर महादजीं शिंदे

 


अलिजा बहादूर महादजीं शिंदे हे एक मराठ्यांच्या इतिहासातील उत्तुंग पण तितकेच गूढ असे व्यक्तिमत्व होऊन गेले. त्यांचा कर्तृत्वाची १७५१मध्ये घोडनदीच्या लढाईपासून सुरु झालेली घोडदौड ही शेवटी फेब्रुवारी १७९४मध्ये त्यांच्या आकस्मिक झालेल्या देहान्ताने समाप्त होते. मराठेशाहीतील या दीर्घ कारकिर्दीत त्यांच्या पराक्रमाची चढती कमान दिसून येते. त्यांनी आपल्या पराक्रमाने आणि लष्करी सामर्थ्याने अवघ्या हिंदुस्थानात मराठ्यांचा दबदबा पुनर्निर्माण केला. त्यांच्या दैदिप्यमान कारकिर्दीत त्यांनी जसे वैभवशाली विजय मिळवले तसेच काही हृदय भंग करणारे पराजय पण पचवले. मराठेशाहीतील त्यांचे योगदान एका वाक्यात सांगायचे तर पानिपतच्या युद्धात विनाश पावलेले मराठयांचे हिंदुस्थानातील वर्चस्व व मराठ्यांचे राज्य त्याने आपल्या कर्तृत्वाने आणि मुत्सद्देगिरीने पुन्हा उभे केले असे म्हणता येईल. पानिपतच्या युद्धात पराभवाच्या धक्क्याने हतबल झालेल्या मराठ्यांचा हरवलेला आत्मविश्वास व त्यांची भंग पावलेली अस्मिता त्यांनी मराठ्यांना परत मिळवून दिली.

महादजीं शिंदे याना दिल्लीच्या पातशहाकडून मिळालेल्या एकूण पदव्या व किताब कोणाही हिंदुस्थानातील राजाला व संस्थानिकाला खचितच मिळाल्या असतील. दिल्लीच्या पातशाहाने त्याच्यावर "मुख्तरुलमुल्क वकीले मुतलक, उमदतुलमरा फर्जंद अलिजाह, महाराजाधिराज श्रीनाथ माधवराव सिंदीया बहादूर मन्सूरजमान " अशा अनेक भारदस्त पदव्यांचा वर्षाव केला होता.

महादजी शिंदे यांची हिंदुस्थानच्या सैन्यात नव्या सुधारणा घडवून आणल्या ज्या योगे त्यांचे सैन्य हे सपूर्ण जगात एक 'अपराजित' (Invincible army) सैन्य म्ह्णून ओळखले जाऊ लागले. हिंदुस्थानातील फौजेत ज्या काही सुधारणा पहिल्यांदा करणारा महादजी हा एक दुरसृष्टीचा सेनापती होता यात शंका नाही. त्यांनी घडवून आणलेल्या सुधारणा अशा होत्या. १. हिंदुस्थानात कवायती फौजेचा मोठ्या प्रमाणात उपयोग महादजीने सुरु केला. या पूर्वी हिंदुस्थानातील राजे राजवाडे यांच्याकडे किरकोळ प्रमाणात कवायती फौज होती, पण महादजीकडे सुमारे तीस हजार एव्हढी प्रचंड कवायती सैन्य होते.२. मराठ्यांचा प्रसिद्ध असा गनिमी कावा आणि युरोपिअन पद्धतीची फौज यांचे अप्रतिम मिश्रण महादजीने केले होते. एका बाजूला मराठ्यांचे चपळ असे घोडदळ, दुसरीकडे शिस्तबद्ध कवायती सैन्य आणि तिसरीकडे सुधारित तोफखाना यांच्या जोरावर त्यांनी हिंदुस्थानात मराठ्यांचे वर्चस्व निर्माण केले. ३. आत्मनिर्भर होण्यासाठी त्यानी स्वतः बंदुका व तोफा बनवायचा कारखाना आग्र्याच्या किल्ल्यात सुरु केला. या किल्ल्यात तयार होणारी सामुग्री ही युरोपिअन हत्याऱ्याच्या तोडीस तोड होती. ४. बंदुकीला संगिनी लावून लढायची कला त्यांनी आत्मसात केली होती. जगात एव्हढ्या मोठ्या प्रमाणात संगिनी लावून केलेल्या लढाया या विरळच म्हंटल्या पाहिजेत. ५. एकाच वेळी पाच पाच गोळ्या सोडणाऱ्या खास बंदुका त्यांनी तयार करून घेतल्या. ता बंदुकांतून एकाच वेळी पाच गोळ्या सुटत. जवळच्या लढाईत (close battle) बंदुकांचा त्यांनी खुबीने उपयोग करून घेतल्या व हातातून निसटून चाललेल्या महादजीने लढाया जिंकल्या. अशा अनेक नव्या गोष्टींची भर घालणारा महादजी एक अद्वितीय असा सेनानी होऊन गेला.

महादजी शिंदे यांनी दिल्लीची बादशाही आपल्या छत्राखाली आणली होती. दिल्लीचा बादशहा त्यांच्यावर सर्वस्वी अवलंबून होता व प्रसंग मिळेल तेव्हा महादजीचे गुणगान करण्यात स्वतःला धन्य समजत होता. दिल्लीचा पातशाहा त्यांच्यावर एव्हढा फिदा होता की खुद्द पातशाहाने तो काही दिवस तुरुंगात असताना त्यांच्यावर कविता रचल्या होत्या ! दिल्लीच्या पातशाहाने आपल्या पालनकर्त्यावर काव्य करावे अशा घटना हिंदुस्थानच्या इतिहासात शोधून देखील सापडणार नाहीत.या काव्यामध्ये पातशहा म्हणतो, "माधो, ऐसी किजियो, सब की तुझको लाज”! याचा भावार्थ असा की माधवा, तू असं काहीतरी (उत्तुंग कार्य)कर, (कारण) सर्वांची लज्जा आता तुझ्या हातात आहे! दुसऱ्या एका काव्यात पातशहा म्हणतो, "मुल्कमाल सब खोयेकर, पडे तुम्हारे बस ,माधव ऐसी किजीये , आवो तुमको जस !" याचा अर्थ असा होतो की देश आणि संपत्ती गमावून आम्ही तुमच्या आश्रयाला आलो आहोत, माधो (महादजी), जेणेकरून तुम्हाला लौकिक लाभेल असे (काही तरी महान कार्य तुम्ही) करा!

महादजीने बादशहाकडून पेशव्याकरिता 'वकील मुतलक ' ही पदवी मिळवली व स्वतःला 'मुख्त्यार उल्मुल्ख ' हा 'किताब मिळवला. ज्याच्या बळावर बादशहा दिल्लीच्या तख्तावर अढळ स्वरूपात बसू पाहतो, त्याला वजिरापेक्षा मोठो पदवी असणे गरजेचे व स्वाभाविक पण होते. शिंद्यांच्या हाती एव्हढा कारभार येणे ही इंग्रजांना न पटणारी गोष्ट होती. पण त्यावेळी इंग्रज स्वतः दिल्लीच्या राजकारणात पडू इच्छित नव्हते. महादजीस मिळालेल्या पदवीचे इंग्रज इतिकासकार मिल असे करतो:-“An authority which superseded that of Vazir and consolidated in the hands of the Marathas all the legal sovereignty of India.”

महादजींची कृष्णभक्ती आणि त्यायोगे रचलेल्या विविध भाषेतील काव्यरचना याबद्दल पुस्तके लिहलेली आहेत. उत्तर हिंदुथानातील कपटी व बेभरवशाच्या राजकारणात ते विदुराच्या अलिप्तपणे वागले असे त्यांच्याबद्दल इतिकासकारानी लिहून ठेवले आहे ते सार्थ वाटते. अशा या महान वीराला आजच्या दिनी मानाचा व मनःपूर्वक मुजरा !!
संकलन: प्रमोद करजगी

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...