विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 29 July 2021

सेवोयचा सिंदबाद(उत्तरार्ध)

 

सेवोयचा सिंदबाद(उत्तरार्ध)
मित्रानो, सेवोयचा सिंदबाद या पूर्वीच्या लेखावरून आपण पुढे सुरु करू. मागच्या लेखात सांगितल्याप्रमाणे अनेक अडचणींना तोंड देत आपल्या कथेचा नायक डी बॉयन हिंदुस्थानात येऊन पोचला. मद्रास (चेन्नई)च्या किनाऱ्यावर त्याने पाऊल

ठेवले त्याची अवस्था अतिशय कफल्लक झाली होती. या डी बॉयनची उर्वरित आयुष्याची चित्तथरारक कहाणी आता पाहू या.
हिंदुस्थानातील लष्करी प्रवास: जानेवारी १७७८ मध्ये हिंदुस्थानात उतरल्यावर पैशाची चणचण असल्याने इंग्रजांच्या मद्रास नेटिव्ह इन्फन्ट्री (Madras Native Infantry)च्या सहाव्या रेजिमेंटमध्ये तो भरती झाला परंतु इंग्रज फौजेतील बेशिस्तपणाला कंटाळून १७८० च्या अखेरीस त्याने नोकरीचा राजीनामा दिला. डी बॉयन याला ना फ्रेंचांच्याबद्दल प्रेम होते ना इंग्रजाबद्दल आत्मीयता होती. तो एक पूर्णवेळ व्यावसायिक लढवय्या होता. इंग्रजांच्या नोकरीचा राजीनामा दिल्यावर १७८१ च्या आरंभी तो चेन्नईहुन निघाला व नोकरीच्या शोधार्थ कलकत्त्यास पोचला कारण त्यावेळी कलकत्ता हे ईस्ट इंडिया कंपनीचे भारतातील मुख्य ठिकाण होते. १७८२ मध्ये कलकत्यास इस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग्जची भेट घेतली. कलकत्त्यास त्याला साजेशी नोकरी न मिळाल्याने तो दिल्लीस जायला निघाला. त्यामागचे कारण म्हणजे दिल्लीचा पातशहा शहा आलम याच्या दरबारी मराठ्यांचे बस्तान खरोखरी किती बसले आहे व तेथे आपला शिरकाव करण्यास कितपत वाव आहे याचा गुप्तपणे तपास करण्यास वॉरेन हेस्टिंग्जच्या सांगण्यावरून इंग्रज अधिकारी मेजर ब्राऊन दिल्ली दरबारात निघाला होता. त्याच्या सोबत डी बॉयन देखील कोलकोत्याहून दिल्लीस आला व तेथून आग्रा येथे आला. त्या वेळेस आग्रा येथे महादजी शिंदे यांची सत्ता होती. आपल्या आसपास भटकणाऱ्या गोऱ्या लोकांवर महादजींची बारीक नजर असे. त्यावेळेस महादजीचे व गोहदच्या राण्यांचे युद्ध सुरु होते.महादजीच्या दरबारी अँडरसन नावाचा इंग्रज वकील रुजू झाला होता, त्याच्या सल्ल्यावरून डी बॉयन गोहदच्या राण्याकडे नोकरी मागण्यास गेला. डी बॉयन याने ५ हजार सैनिकांची कवायती फौज उभारण्यासाठी करण्यासाठी १लाख रुपये गोहदच्या राण्याकडे सुरुवातीसच मागितले. काम करण्याधीच एव्हढे पैसे देण्याचे गोहदच्या राण्याने त्यावेळेस नाकारले. तेव्हा निराश होऊन डी बॉयन याने जयपूरचा रस्ता धरला व तेथील राजाच्या पदरी २ हजार रुपये पगारावर राहिला. पुढे १७८४मध्ये झालेल्या मराठे व इंग्रज यांच्यातील सालबाईच्या तहाने उत्तर हिंदुस्थानात आपापसात भांडणाऱ्या राजे लोकांच्यात तात्पुरते सलोख्याचे वातावरण निर्माण झाले. तेव्हा जयपूरच्या राजाने त्याची गरज न उरल्याने डी बॉयन याची आपल्या नोकरीतून काढून टाकले व एक वेळची बिदागी म्हणून १०हजार रुपये हातावर टिकवले. डी बॉयन याच्या आयुष्याची नौका दुर्दैवाच्या प्रत्येक लाटेबरोबर हेलकांडत होती.
महादजी शिंद्याकडे नोकरी व स्वस्थता: जयपूरहून डी बॉयन निघाला व पुन्हा आग्र्यास आला. डी बॉयन परत आल्याची वार्ता लागताच शिंद्यानी त्याला भेटीस बोलावून घेतले व त्याला लगेच आपल्या नोकरीत घेतले. अशा प्रकारे १७८४मध्ये महादजी शिंदे यांच्याकडे एक सामान्य सरदार म्हणून सेवेत लागलेला डी बॉयन पुढील १५-१६ वर्षे शिंद्याच्याकडे राहिला व १७८९च्या सुमारास शिंद्यांच्या कवायती फौजेच्या सर्वात उच्च अशा ‘जनरल’ पदावर पोचला. डी बॉयन याला आपल्याकडे नोकरी देण्याआधी महादजी शिंद्यानी बॉयनच्या घरात गुपचूप घुसून त्याच्या कागदपत्रांची शहानिशा केली होती असे म्हणतात.
फ्रांस,रशिया, तुर्कस्तान यासारख्या अनेक देशातील लष्करी लढ्यात भाग घेतल्याने डी बॉयन याच्या अंगी युद्धनीती व लष्करी डावपेच पूर्णपणे भिनले होते. त्याला १७८४च्या आरंभी महादजी शिंदे यांनी दोन कवायती पलटणी ( प्रत्येक पलटणीत ८५० सैनिक) तयार करण्यास सांगितले. डी बॉयन याला दरमहा एक हजार रुपये व प्रत्येक सैनिकास दरमहा आठ रुपये पगार देण्याचे महादजी यांनी मान्य केले. डी बॉयन याने रात्रंदिवस खपून दोन पलटणी इतक्या झटपट तयार केल्या की त्याच्या कामाचा वेग बघून महादजी स्वतः चकित झाले. असा हा भटक्या डी बॉयन महादजी शिंद्याकडे इतकी वर्षे कसा टिकला? तर त्यांनी डी बॉयन यास पुढील चार महत्वाच्या गोष्टी दिल्या ज्या आजच्या प्रत्येक कंपनीच्या संचालकाने (CEO) लक्षात ठेवाव्यात अशाच आहेत. एक म्हणजे त्याला नोकरीत स्थैर्य दिले, दुसरे म्हणजे त्याच्या सुप्त गुणांना पुरेपूर वाव दिला, तिसरे म्हणजे त्याला पैशाचे पाठबळ दिले व शेवटची गोष्ट म्हणजे त्याला कामामध्ये पूर्ण मुक्तहस्त (Freehand) दिला. डी बॉयन यानी संधीचे सोने केले व अनेक समर्थ व कार्यक्षम युरोपिअन (स्कॉच ,डच, फ्रेंच इत्यादी ) माणसे आपल्या हाताखाली नेमून एक कार्यक्षम सैन्य उभे केले.
डी बॉयन यांच्या शिंद्यांना दोन अटी: डी बॉयन याने महादजी शिंदे यांना त्यांच्यासाठी लष्करी पलटणे तयार करण्यापूर्वी त्यांना दोनच अटी घातल्या होता. पहिली अट म्हणजे पलटणीतील सैनिकांचा पगार दर महिन्याच्या एक तारखेला दिला जाईल व दुसरी अट म्हणजे इंग्रजाविरुद्ध लढाईत त्याला भाग घेता येणार नाही.
कवायती सैन्याच्या खर्चाची तरतूद:डी बॉयन याच्या खर्चासाठी महादजी यांनी डी बॉयन याला गंगा यमुनेच्या दोन्ही तीरावरील दोआबातील काही प्रदेश दिला. या प्रदेशाचे सुरुवातीचे वार्षिक उत्पन्न सोळा लाख रुपये होते. दि बॉयन यांनी करवसुलीच्या कामात सुसूत्रता आणून त्याच प्रदेशाचा वार्षिक सारा तीस लाखापर्यंत वाढवला. या शेतसारा वसूलीच्या कामासाठी डी बॉयन याला शेकडा दोन टक्के कमिशन मिळत असे. डी बॉयन याने अलिगढ येथे त्याने आपले ठाणे वसवले व आर्थिक स्थैर्य आल्यावर तेथे आपल्यासाठी 'मोतीमहल' नावाचा वाडा बांधला.
महादजी शिंद्यासाठी त्याने कवायती फौजेच्या एकूण ३ब्रिगेड तयार करून दिल्या व त्यांचे नेतृत्व केले. महादजीसाठी डी बॉयन याने अनेक महत्वाच्या लढायात भाग घेतला व आपल्या धन्याला अलौकिक असे यश संपादन करून दिले. यापैकी काही महत्वाच्या लढाया म्हणजे लालसोटची लढाई, आग्र्याची लढाई, तसेच राजपूतनामधील मेडत्याची व पाटणची लढाई होत. त्या काळात शिंद्यांचा कवायती फौजेची कीर्ती हिदुस्थानातच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडात “एक अपराजित (invincible force)सेना” म्हणून पसरली होती.
हिंदुस्थानचा निरोप व निवृत्त आयुष्य: १७९४मध्ये महादजी शिंदे यांचा मृत्यू झाला व मराठेशाहीला उतरती कळा लागली. तेव्हा त्याने स्वदेशात परतण्याचा निर्णय घेतला.त्याने जमविलेल्या संपत्तीपैकी काही त्याने हिंदुस्थानातील नीळ पदार्थाचा व्यापार करणाऱ्या उद्योगपती क्लाऊडे मार्टिन यांच्या युरोपिअन कंपनीत गुंतवली होती. हिंदुस्थानातील त्याच्या वास्तव्यात त्याचे हेलेन नावाच्या पर्शियन मुलीशी विवाह केला होता व तिच्यापासून त्याला दोन अपत्ये झाली होती. २५डिसेंबर१७९५ रोजी त्याने युरोपला जाण्यासाठी म्हणून आपले ठाणे अलिगढ सोडले, लखनौवरून कलकत्त्यास जाऊन त्याने इंग्लंडला जाणारे जहाज पकडले. १७९७च्या आरंभी तो इंग्लंडला पोचला व १७९७मध्ये फ्रांस मधील परिस्थिती तेथील क्रांतीमुळे स्फोटक बनली होती, तेव्हा लंडनमध्येच काही वेळ वास्तव्य केले. त्याने हिंदुस्थानात असताना मिळवलेल्या विविध वस्तू, पारितोषिक, विजयचिन्हे तसेच इतर नजराणे इत्यादी ‘क्रोनबर्ग’ नावाच्या जहाजातून इंग्लंडला मागविले होते दुर्दैवाने ते जहाज डेन्मार्कच्या किनाऱ्यावर समुद्रात बुडाले. तेव्हा त्याने पाणबुड्यांच्या मदतीने त्यातील बहुतेक सर्व वस्तू परत मिळवल्या होत्या. इंग्लंडमध्ये असताना एका पार्टीमध्ये त्याची नजर ओडेली ओस्मानड या एका फ्रेंच उमरावाच्या मुलीवर पडली व तो तिच्या प्रेमात पडला. सहा महिन्यातच त्याने तिच्याशी दुसरे लग्न केले. अशा प्रकारे त्याचे झालेले दुसरे लग्न जेमतेम तीन वर्ष टिकले. त्यापासून त्याला काही मुलबाळ मात्र झाले नाही. फ्रांसमध्ये शांतता झाल्यावर सन १८०२ मध्ये तो फ्रांसला आपल्या गावी चेम्बरी येथे गेला. फ्रान्समध्ये आल्यावर त्याची दुसरी पत्नी ओडली बरोबर त्याचे संबंध दुरावलेले राहिले, परंतु ती मात्र फ्रान्समधील उच्चभ्रू समाजात वावरून प्रसिद्ध पावली.
आयुष्यभर दरदर भटकणाऱ्या दि बॉयन याने आपल्या कष्टाने व कर्तृत्वाने मराठेशाहीची सेवा केली. त्याचे फळ म्हणून परत जाताना डी बॉयनने हिंदुस्तानात राहून सुमारे चाळीस लाख रुपयांची माया गोळा केली होती.
चेम्बरीतील वास्तव्य व शहराची सुधारणा: आपल्या गावी आल्यावर त्याने गावाच्या बाहेर आल्प्स पर्वतांच्या नितांत सुंदर शिखरांचे दर्शन होईल असा भव्य प्रासाद आपल्यासाठी बांधला. त्याच्याकडील संपत्तीमुळे त्याला गावात प्रतिष्ठा मिळाली व योग्य तो मानमतराब मिळू लागला. हिंदुस्थानातून आणलेल्या विविध कलात्मक गोष्टी ज्यामध्ये दोन ताजमहालाच्या प्रतिकृतींचा समावेश होता, आपल्या प्रासादात जतन करून ठेवल्या होत्या. १८१५ पर्यंत तो फ्रेन्च नागरिक म्हणून राहिला व नंतर सत्ता पालटल्याने पुन्हा सार्डीन प्रांताचा नागरिक झाला. १८२२ मध्ये राजा चार्लस फेलिक्स याने डी बॉयन यास सन्मानाचे ' लष्करी जनरल' पद दिले जे त्याला हिंदुस्थानात मिळालेले होते. १मार्च १८२२ मध्ये त्याने आपल्या गावाच्या लोक प्रतिनिधींची बैठक बोलावून आपल्या गावाच्या विकासाची इच्छा व कल्पना बोलून दाखवली. त्यांचे विचार घेऊन त्याने गावाचा कायापालट स्वखर्चाने घडवून आणला. त्याने कमावलेल्या संपत्तीपैकी एक त्रितीयांश संपत्ती त्याने या कामासाठी बहाल केली. त्याने केलेल्या समाज उपयोगी कार्यामध्ये त्याने बांधलेली शाळा, भव्य रस्ते, दवाखाना व इस्पितळ, गरीब लोंकासाठी बांधलेले निवासस्थान यांचा विशेष करून समावेश होतो.
चेम्बरी येथील स्मारक: असा हा "सेवोयचा नबाब" १८३०साली ख्रिस्तवासी झाला.सेवोय येथे इग्लिसे दि लेमोन्क (Eglise de Lémenc) या ठिकाणी बांधलेले थडगे आज ही चांगल्या स्वरूपात पाहावयाला मिळते. त्याच्या मृत्यू पश्चात या शूर सेनानींची स्मृती म्हणून त्याचा पुतळा त्याच गावात नागरिकांच्या वर्गणीतून उभारण्यात आला. भारताची आठवण म्हणून चार हत्तीवर एक मनोरा करून त्यावर डी बॉयनचा एक भव्य असा पुतळा बसविला आहे. हत्तींचा कारंजा(Fountain of Elephants) असलेले हे स्मारक आज ही प्रवाश्याना भुरळ पाडते. आपण भारतीय जसे पॅरिस शहराकडे त्याचे ऐकीव सौंदर्याने भाबडेपणाने आकर्षिले जातो, त्याच प्रमाणे वाट वाकडी करून सेवोय या शहराला भेट देऊन मराठी साम्राज्य उभारण्यास हातभार लावणाऱ्या या जनरलच्या स्मृती स्थळाकडे सुद्धा अवश्य गेले पाहिजे. आजच्या वैश्विक जागतिकारणाच्या युगात आशिया व युरोप या खंडांचे बेमालूम संकरण दाखविणारा हा हत्तींनी सजवलेला कारंजा डी बॉयन याची आठवण नेहमीच ताजी ठेवेल यात शंका नाही.
संदर्भ: A History of Maratha people by C.A.Kincid & D.B.Parasnis, मराठी रियासत खंड ७: गो.स.सरदेसाई, FROM SAVOY TO AGRA: THE CROSS-CULTURAL NARRATIVE OF BENOÎT DE BOIGNE by Christopher Rollason संकलन व लेखन:प्रमोद करजगी

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...