पेशवेकालीन हिंदवीस्वराज्याचे आधारस्तंभ - इंदोरचे होळकर घराणे
---------------------------------------------
होळकरशाहीचे संस्थापक मल्हारराव होळकर पहिले आणि होळकरशाहीचा मानमरातब अखंड हिंदुस्थानात चंदनाप्रमाणे पसरवणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई यांच्यानंतर अल्पकाळ राज्यकर्ते असलेले परंतु लढवय्ये सेनानी असलेले तुकोजीराव होळकर - पहिले यांनी देखील होळकरांच्या सैन्याचे प्रमुख - कमांडर इन चीफ - असताना अनेकवार बुलंद पराक्रम गाजवलेले आहेत .
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
मल्हारराव होळकर यांचे पुत्र असलेले तुकोजीराव प्रथम यांचाही जन्म खंडेराव होळकर ज्यावर्षी जन्मले म्हणजे इसवीसन १७२३ मध्ये , त्याचवर्षी झाला . मल्हारबाबा पुत्र खंडेरावांच्या अकाली मृत्यूनंतर राजकीय हालचालींबाबत , होळकरशाहीच्या वृद्धीबाबत स्नुषा अहिल्याबाईंशी चर्चा करीत असत . मल्हाररावांच्या निधनानंतर होळकर राजवटीची धुरा त्यांचे नातू आणि अहिल्याबाईंचे पुत्र मालेराव महाराज यांच्याकडे आली . मात्र असे आढळून येते की ते राज्यशकट हाकण्यास तितकेसे सक्षम नव्हते . अखेरीस लवकरच ते अवघ्या ८ महिन्यांच्या कारभारानंतर दि.५ एप्रिल १७६७ ला मृत्यू पावले . यानंतर अहिल्याबाईंनी होळकरशाहीची सूत्रे हाती घेतली . त्यांना त्यावेळी जोरदार अंतर्गत विरोधही झाला परंतु पंतप्रधानपेशवे थोरले माधवराव यांच्या त्यांच्यावरील असलेल्या विश्वासामुळे अहिल्याबाईंच्या विरोधकांना अखेर नमते घ्यावे लागले . यावेळी सर्वसाधारणपणे असे धोरण ठरले की राज्यकारभार आणि महसूल विनियोग हा अहिल्याबाई करतील आणि होळकरांच्या संपूर्ण सैन्याचे नेतृत्व तुकोजीराव पहिले हे करतील . तुकोजीरावांनी पुण्याला माधवराव पेशव्यांची भेट घेऊन त्यांना सुमारे साडेसोळा लक्ष रुपयांचा महसूल / नजराणा दिला आणि सुभेदारीची वस्त्रे तसेच होळकरशाहीचे अधिकृत नेतृत्व म्हणून ही मान्यता मिळवली . इकडे अहिल्याबाईंनी आपली राजधानी " महेश्वर " येथे केली आणि त्या तिथून त्यांच्या मृत्यूपर्यंत संपूर्ण राज्याचा कारभार बघत होत्या . त्यांनीच होळकरशाहीच्या सर्व सैन्याचे अधिपती अर्थात commander in chief म्हणून निवडलेले तुकोजीराव पहिले हे त्यासमयी इंदोर येथून सारी सूत्रे हलवीत असत . याप्रकारे होळकरशाहीच्या कारभाराचा ही दुहेरी वाटणी केलेला प्रयोग अहिल्याबाई असेपर्यंत तब्बल २९ वर्षे सुव्यवस्थितपणे सुरु होता हे विशेष .
तुकोजीरावांनी या कालावधीत होळकरशाहीच्या सैन्याचे अतिशय सक्षमपणे आणि तडफदारपणे नेतृत्व केले होते . राघोबादादांच्या फौजा इंदोरवर चालून आल्या तेव्हा अहिल्याबाईंनी लगोलग आजूबाजूच्या राज्यकर्त्यांना मदतीसाठी बोलावले होते तसेच त्यावेळी उदयपूर येथे असलेल्या तुकोजीरावांना पण सांगावा धाडला होता . जलदीने हालचाल करून ते आपल्या सैन्यासह क्षिप्रा नदीच्या काठी तळ ठोकून बसले . राघोबादादांना आतापर्यंत सहकार्य करणारे महादजी शिंदे आणि जानोजी भोसले हे अहिल्याबाईंनी माधवराव पेशव्यांशी केलेल्या पत्रव्यवहाराने आणि माधवरावांनी अहिल्याबाईंना दिलेल्या पाठिंब्यामुळे चलबिचल होऊन माघारीची हालचाल करू लागले होते . ते ससैन्य क्षिप्रेच्या काठी आले असता दुसऱ्या बाजूला असलेल्या तुकोजीरावांनी त्यांना खडसावले की आपण नदी पार करून होळकरशाहीत प्रवेश करू पाहाल तर आमच्या सामर्थ्यवान सैन्याशी तुमची गाठ आहे . अर्थात शिंदेभोसल्यांच्या संयुक्त फौजा आणि अखेर राघोबादादांच्या फौजा यांनी काळवेळ ओळखून यशस्वी माघार घेतली हे सांगणे नकोच . तुकोजीरावांनी इ.स. १७६९ मध्ये गोवर्धन येथे तसेच पुनःश्च १७७३ मध्ये भरतपूर येथे जाटांच्या सैन्याला जोरदार मात दिली . या विजयामुळे अर्थातच त्यांना भरपूर साधन-संपत्ती मिळाली जी त्यांनी मराठेशाहीच्या चारही प्रतिनिधींत वाटली . तुकोजीरावांनी सुरुवातीला काहीकाळ राघोबादादांचा पक्ष घेतला होता परंतु नंतर बारभाईंच्या घडामोडींमुळे राघोबादादांना पेशवेपदावरून हटवण्याच्या मोहिमेअंतर्गत तुकोजीरावांनी मराठा सैन्यासह माही नदीच्या काठी राघोबादादांचा पराभव ही केला . माधवरावांच्या निधनानंतर सुरु झालेली पेशवेपदाची अंतर्गत लढाई ही पुरंदरच्या तहापर्यंत दहा एक वर्षे सुरूच होती . या दीर्घ कालावधीत आपल्या सैन्याच्या कराव्या लागलेल्या हालचालींमुळे तुकोजीरावांना आर्थिक झळ देखील मोठ्या प्रमाणात सोसावी लागली . इ.स. १७७७ मध्ये तुकोजीरावांनी सहा हजाराच्या सैन्यासह ब्रिटिशांचा बोरघाटात पराभव केला . याकारणाने पेशव्यांनी त्यांना ५ लाखांचा नवा सरंजाम तसेच बुंदेलखंड आणि खानदेश ची सुभेदारी दिली .
असे अनेक जय-पराजय स्वीकारत असताना महादजी शिंद्यांचा सरदार गोपाळरावांनी अनपेक्षितपणे तुकोजीरावांच्या सैन्यावर हल्ला करून त्यांचे मोठे नुकसान केले . यावेळी महादजी शिंदे देवदर्शनासाठी दक्षिणेकडे रवाना झालेले होते . हे वृत्त कळताच अहिल्याबाईंनी तातडीने मदत म्हणून ५ लक्ष रुपये तुकोजीरावांकडे पाठवले होते . यानंतरच्या लेखारी या ठिकाणी ही शिंदे आणि होळकरांच्या सैन्यात झडप झाली . यानंतर तुकोजीराव मोठ्या आर्थिक नुकसानीसह इंदोरला स्वगृही परतले . त्यांचे पुत्र काशिराव यांच्या सांगण्यावरून अहिल्याबाईंनी पुन्हा तुकोजीरावांकरिता ५ लक्ष रुपयांची तरतूद केली . यानंतर अहिल्याबाई दि. १३ अॉगस्ट १७९५ रोजी मृत्यू पावल्या . अहिल्याबाईंच्या मृत्यूसमयी तुकोजीराव आणि पुत्र काशिराव हे पुणे दरबारी रुजू होते . आता पंतप्रधानपेशव्यांच्या पाठिंब्याने तुकोजीराव हे संपूर्ण होळकरशाहीचे अधिपती झाले . तुकोजीरावांनी तातडीने पुत्र काशिरावांना महेश्वर ला पाठवले आणि प्रशासकीय बाबी सांभाळण्याची तसेच खजिन्याची मोजदाद करण्याची आज्ञा केली . या अत्यंत थोडक्या कालावधीत म्हणजे जेमतेम दीडएक वर्षे तुकोजीराव पहिले हे इंदोरचे अधिपती राहिले , आणि लवकरच म्हणजे दि. १५ अॉगस्ट १७९७ ला त्यांचे पुणे येथे निधन झाले . त्यांच्या अतिशय अल्पस्वल्प राजवटीत महेश्वर आणि मल्हारनगर येथे चांदीची नाणी पाडली गेलेली आढळतात . या नाण्यांवर शिवलिंग , बिल्वपत्र तसेच सूर्य / मार्तंड छापलेले आढळतात . तुकोजीरावांनी सोन्याची अथवा तांब्याची नाणी पाडल्याचे अजून तरी आढळून आलेले नाहीये . महेश्वर मिंट चा हिजरीसन १२११ आणि मल्हारनगर मिंट चे हिजरीसन १२१० आणि १२११ या वर्षांचा उल्लेख असलेले रुपये आढळून येतात .
प्रशांत सुमति भालचंद्र ठोसर , ठाणे .
मराठा नाणी संग्राहक , अभ्यासक , लेखक , व्याख्याते .
No comments:
Post a Comment