विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 30 July 2021

अहिल्याबाई होळकर !!

 

पेशवेकालीन हिंदवीस्वराज्याचे आधारस्तंभ - इंदोरचे होळकर घराणे
---------------------------------------------
मराठेशाहीच्या इतिहासातील एक मानाचे व्यक्तीमत्व म्हणजे इंदूर संस्थानच्या महाराणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर . राजमाता जिजाऊसाहेब , येसूबाईसाहेब , ताराराणीसाहेब , ग्वाल्हेरच्या बायजाबाई शिंदेसाहेब आणि इंदूरच्या अहिल्याबाई होळकरसाहेब या मराठेशाहीतील कर्तृत्ववान राज्यकर्त्या स्त्रिया गणल्या जातात .
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -





अहिल्याबाई होळकर !!
जसे श्वशुर मल्हारराव होळकर हे देखील मूळचे महाराष्ट्रातील तद्वत अहिल्याबाई पण मूळच्या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील " चौंढी " गावच्या . त्यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी झाला . एका आख्यायिकेनुसार मल्हारबाबांनी जे माळवा प्रांताचे सुभेदार होते त्यांनी पुण्यास जात असताना छोट्या अहिल्याबाईंना बघितलं आणि त्यांस आपली सून करावी या हेतूने आपले चिरंजीव खंडेराव याच्यासोबत लग्नबंधनात बांधले . मात्र अत्यंत अल्पकाळात खंडेराव होळकर १७५४ मध्ये कुंभेरच्या लढाईत दुर्दैवाने मृत्यू पावले . मल्हारबाबांनी अहिल्याबाईंस तत्कालीन प्रथेनुसार पतीनिधनानंतर चितेवर सहगमन करण्यापासून महत्प्रयासाने रोखले . खंडेराव आणि अहिल्याबाईंच्या मुलाचे नाव होते
" मालेराव " . मात्र पुढे पानिपतच्या संग्रामानंतर इसवीसन १७६६ ला मल्हारराव देखील इहलोक सोडून गेले . मल्हारबाबांनंतर होळकरशाहीची धुरा त्यांचे नातू मालेराव बघू लागले होते परंतु दुर्दैवाने ते देखील अल्पायुषी ठरले आणि अत्यंत अल्पकाळ राज्यकारभार करून ५ एप्रिल १७६७ ला मृत्यू पावले . मालेरावांच्या या अल्पशा कालावधीत नाणी पाडली गेली नसावीत असाच तज्ञांचा अंदाज आहे . आता होळकरशाहीची धुरा सांभाळण्याची जबाबदारी अहिल्याबाईंच्या खांद्यावर आली . त्याही धीरोदात्त वृत्तीने समर्थपणे माळवा प्रांतात मराठेशाहीची धुरा वाहू लागल्या . श्वशुर मल्हाररावांचे दत्तकपुत्र आणि आपले दीर तुकोजीराव पहिले यांची त्यांनी सेनापती म्हणून नेमणूक केली आणि त्या स्वतः सुयोग्यपणे प्रशासकीय भाग पाहू लागल्या . इकडे या घडामोडींमुळे होळकरांचे दिवाण गंगाधर यशवंत चंद्रचूड हे गादीला पुरुष वारस हवा म्हणून अहिल्याबाईंवर दबाव टाकू लागले , जेणेकरून गंगाधरपंतांचा राज्यकारभारातील दबदबा वाढेल . याहीपुढे जाऊन त्यांनी राघोबादादांशी संधान बांधून त्यांच्या फौजा माळव्याच्या प्रदेशात आणायला लावल्या . अहिल्याबाईंना या कारस्थानाची माहिती कळताच त्यांनी चाणाक्षपणे आजूबाजूच्या राज्यकर्त्यांकडे मदतीचा हात मागितला आणि त्यांनीही तो तातडीने देऊ केला . अहिल्याबाईंनी तातडीने उदयपूरला असलेल्या तुकोजीरावांना पण माघारी बोलावले . त्याचबरोबर अहिल्याबाईंनी एकीकडे थोरल्या माधवराव पेशव्यांशी संधान बांधताना राघोबादादांनाही चतुराईने आणि धीटपणे " एका स्त्री सोबतच्या युद्धात पराभूत झालात तर सर्वत्र छी-थू होईल " असा गर्भित इशारा दिला . आता राघोबादादांनाही आपली चूक कळली आणि त्यांनी मी सांत्वन करायला आलो होतो , युद्धाकरिता नव्हे असे उत्तर देऊन यशस्वी माघार घेतली .
अहिल्याबाईंनी आपली राजधानी महेश्वर ही केली . या महेश्वरच्या रुपयांवर , नाण्यांवर शिवलिंग आणि बिल्वपत्र छापलेलं असतं . अहिल्याबाई आपल्या मृत्यूपर्यंत म्हणजे इसवीसन १७९५ पर्यंत महेश्वर येथेच राहिल्या . अहिल्याबाईंनी मल्हारनगर येथे ही स्वतःची नाणी पाडली . या मल्हारनगरच्या नाण्यांवर सूर्य छापलेला असतो . मल्हारनगर येथे हिजरीसन [ A.H. 1182 - 1183 ] यावर्षी आणि [ A.H. 1195 - 1196 ] यावर्षी देखील नाणी पाडल्याचे आढळून येत नाही . त्यावर्षी नाणी का पाडली गेली नसावीत हे सुयोग्य पुराव्यांअभावी , नोंदी अभावी कळू शकत नाहीये . समजा ती त्यावर्षी पाडली गेली असतील तरीही त्या वर्षांचे एकही नाणे आजतागायत उपलब्ध झालेले नाहीये . मल्हारनगर नाण्यांवरील छापलेला सूर्य म्हणजेच " मार्तंड " स्वरूप . मल्हारनगरचे प्रथम पाडले गेलेले / आढळून येणारे नाणे म्हणजे A.H. 1184 या हिजरी वर्षाचे आहे . महेश्वर मिंट / टांकसाळीत प्रथम पाडले गेलेले नाणे हे हिजरीसन 1180 चे सापडते . महेश्वर आणि मल्हारनगर ( इंदोर ) या दोन्हीही टांकसाळीच्या तुलनेत मल्हारनगरची नाणी जास्त छापलेली आढळतात . अहिल्याबाईंनी तांब्याची नाणी पण छापली होती . मात्र ती चांदीची नाणी छापायला सुरुवात केल्यानंतर तब्बल २० - २२ वर्षांनी . यातील काही नाण्यांवर कट्यार तसेच " चवरी " हे राजचिन्हं आढळून येते . महेश्वर हून राज्यकारभार करत असताना अहिल्याबाईंजवळ एक अनमोल अशी चंदनाची चवरी होती असे स्पष्ट उल्लेख आहेत , कदाचित तीच या नाण्यांवर छापली असावी असा अभ्यासकांचा एक तर्क आहे .
अहिल्याबाईंच्या कारकीर्दीत माळव्याच्या जनतेला एक न्यायाचे , समृद्धीचे , भरभराटीचे राज्य अनुभवायला मिळाले . अहिल्याबाईंनी अतिशय चोखपणे , दूरदृष्टी राखून जवळजवळ ३० वर्षे राज्यकारभार केला . त्या सात्विक , धार्मिक वृत्तीच्या असल्याकारणाने त्यांनी अनेक देवालयांचा , मंदिरांचा जीर्णोद्धार केला . पांथस्थ , प्रवाशांसाठी जागोजागी धर्मशाळा उभारल्या . नद्यांवर घाट बांधून मुबलक पाणीपुरवठा होत राहील याकडे लक्ष दिले . मंदिरांमध्ये नित्यनेमाने पूजाअर्चा सुरू रहाव्यात यासाठी अनेक दाने दिली . माळव्यात रस्ते , किल्ले बांधले , अनेक उत्सव सुरू केले . सतीची कुप्रथा बंद करण्यासाठी सातत्याने लोकजागृती केली , यासाठी रामायण , महाभारताचे दाखले ही दिले . पुढे ब्रिटिशांच्या राजवटीत राजा राममोहन रॉय यांनी पुढाकार घेऊन ही अनिष्ट प्रथा कायद्याने बंद केली . यावरून अहिल्यादेवींची दूरदृष्टी लक्षात येते . हस्तलिखितं लिहवून घेणाऱ्यांसाठी भरभक्कम पैसे मोजून त्यांच्याकरवी विविध महत्वपूर्ण दुर्मिळ ग्रंथ हस्तलिखित स्वरूपात करवून घेतले . अशा जीवनातील विविध बाबींवर उत्तमोत्तम कार्य करून , करवून घेऊन , समाजातील शेवटचा घटक देखील सुखी व्हावा यासाठी अवघे आयुष्य घालवून या महाराष्ट्रकन्येने , होळकर राजवटीच्या सम्राज्ञीने आणि माळव्याच्या जनतेच्या मनातील अहिल्यादेवींनी अखेर ७० व्या वर्षी हा नश्वर पृथ्वीलोक त्यागला . नंदादीपाप्रमाणे आपल्या लोककल्याणकारी कार्याने त्यांनी आपले आणि सामान्यांचे जीवन उजळून टाकले , म्हणूनच आजही लोक त्यांना
" पुण्यश्लोक अहिल्यादेवी " असे अत्यंत आदरपूर्वक आणि कृतज्ञतापूर्वक म्हणतात .
प्रशांत सुमति भालचंद्र ठोसर , ठाणे .
मराठा नाणी संग्राहक , अभ्यासक , लेखक , व्याख्याते .



No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...