*युवराज्ञी येसूबाई*
एकोणतीस वर्षे ! एकोणतीस वर्षे ज्या माऊलीने स्वतःला मोगलांच्या कैदेत ठेऊन शिवछत्रपतींचे स्वराज्य अबाधित ठेवले त्या युवराज्ञी येसूबाईबद्दल इतिहासाला अधिक माहिती नाही हे दुर्दैव कोणाचे ? आपले की इतिहासाचे ? केवळ नऊ वर्षांचा संसार....तोही छत्रपती संभाजी महारांजांसारख्या सिंहाच्या छाव्याबरोबर केलेला, पती जिवंत असतानासुद्धा या पतिव्रतेला काही दिवस विधवेचे सोंग आणावे लागले ! होय, आग्र्याहून सुटल्यावर शिवछत्रपतींनी छोट्या संभाजीला दडवून ठेऊन अफवा पसरवली की युवराजांचा काळ आला ! त्यामुळे संभाजीराजे सुखरूप स्वराज्यात येईपर्यंत त्यांना विधवा म्हणून जगावे लागले ! मनाची केवढी प्रगल्भता ! त्यानंतर कपटाने आणि फितुरांच्या मदतीने औरंगजेबाने पतीला पकडल्यानंतरही धीरोदात्तपणे परिस्थितीला सामोरे जाणारी, पतीला हाल हाल करून ठार मारल्यावरही स्वराज्याचा गाडा चालविण्यासाठी स्वतःचे आभाळाएव्हढे व्यक्तिगत दुःख बाजूला सारून शिवछत्रपतींनी उभारलेले स्वराज्य वाचवण्यासाठी स्वतःला आणि पोटच्या गोळ्याला शत्रूकडे तब्बल तीस वर्षे ओलीस ठेऊन घेणारी ही हिमालयाइतकी उंच स्त्री पहिली की राष्ट्रसेवा म्हणजे काय हे आपोआप लक्षात येते.
छत्रपती शिवरायांच्या महानिर्वाणानंतर स्वराज्याचे लचके तोडण्यासाठी दस्तुरखुद्द औरंगजेब महाराष्ट्रात आला होता. शिवाजी महाराज जिवंत नसल्यामुळे आता आपल्याला सहजपणे स्वराज्य ताब्यात घेता येईल हा त्याचा मनसुबा होता. पण संभाजी महाराजांनी तो मनसुबा आपल्या पराक्रमाने उधळला. अखेर कपटाने आणि घरभेद्यांची मदत घेऊन त्याने छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले आणि अखेर ११ मार्च १६८९ रोजी त्यांनी महाराजांना अत्यंत क्रूरपणे ठार मारले. महाराणी येसूबाई यांच्या कर्तृत्वाला आणि त्यागाला इथेच सुरुवात झाली. आपल्या पतीच्या मृत्यूचे दुःख बाजूला ठेऊन त्यांनी स्वराज्याची विसकटलेली घडी सरळ करायला सुरुवात केली. त्यांचे मन किती मोठे होते याची चुणूक त्यांच्या पहिल्याच निर्णयात दिसते. नियमाप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा शाहू राज्यावर बसावयास हवा होता. महाराणी येसूबाई यांनी आग्रह केला असता तर छोट्या शाहूला राज्याभिषेकही झाला असता. पण तत्कालीन परिस्थिती पाहता त्यांच्या लक्षात आले की स्वराज्य टिकवायचे असेल तर मुलाच्या प्रेमापेक्षा कर्तव्याला जास्त महत्व दिले पाहिजे. त्या काळात रायगडावर छत्रपती संभाजी महाराजांचे धाकटे बंधू राजाराम महाराज यांना मानणा-या सरदारांची संख्या मोठी होती. त्यामुळे नियमाप्रमाणे शाहू महाराजांना जर राज्यावर बसवले तर काही सरदार बंड करतील, सैन्याचे दोन भाग पडतील आणि हे अंतर्गत बंड औरंगजेबाला स्वराज्याचा घास मिळवून देण्यास मदत करेल अशी त्यांना भीती वाटली. त्यामुळे त्यांनी पुत्रप्रेम बाजूला सारून आपले दीर राजाराम महाराज यांना गादीवर बसवले व स्वतः त्यांच्या वतीने काम करण्यास सुरुवात केली. आज लोकशाहीच्या नावाखाली आपल्याच मुला-नातवंडांना पुढे आणणारे नेते पाहिले की येसूबाईंची महानता लगेच लक्षात येते.
महाराणी येसूबाई यांचा त्याग इथेच संपत नाही. उलट तो त्याग इथे सुरू होतो. त्यांच्या असीम त्यागाचे दुसरे उदाहरण तर एकमेवाद्वितीय असेच म्हणावे लागेल. छत्रपती संभाजी महाराजांना ठार मारल्यावर औरंगजेबाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. त्याने स्वराज्याचा घास घेण्यासाठी रायगडाला वेढा दिला. पण स्वराज्याचा धनी त्या वेढ्यात अडकून पडला असता तर सैन्याला एकत्र आणणार कोण हा प्रश्न होता. तसेच बाहेर मोकाट असलेल्या औरंगजेबाच्या सैन्याने चहूबाजुनी आक्रमण करून स्वराज्याचे लचके तोडले असते. आणि राजाच बंदीवान असल्याने राज्यकारभार हाकणे हे अवघड झाले असते. येसूबाईंची त्यावर उपाय काढला. त्यांनी राजाराम महाराजांना सुचवले की त्यांनी रायगडच्या वेढ्यातून बाहेर पडून जिंजीच्या किल्यात तळ ठोकावा व रायगड वेढ्यात अडकल्याने संपूर्ण राजधानीच जिंजीला हलवावी. असे केल्याने रायगडाचे महत्व कमी होऊन या वेढ्यातून औरंगजेबाला फारसे काही गवसणार नाही आणि स्वराज्याचा कारभार व्यवस्थित हाकता येईल. म्हणजे स्वराज्य राखण्यासाठी त्या स्वतःला तोफेच्या तोंडी द्यायला तयार होत्या. कल्पना बिनतोड होती पण आपल्या मातेसमान वहिनीला आणि छोट्या शाहूला वेढ्यात एकटे सोडून निघून जाणे हे राजाराम महाराजांना पटेना. पण येसूबाईंनी राजाने नात्यांपेक्षा कर्तव्याला जास्त महत्व दिले पाहिजे तरच राज्य चालते हे त्यांना पटवून दिले. अखेर जड अंत:करणाने राजाराम महाराजांनी रायगड सोडला आणि येसूबाईंच्या सत्वपरिक्षेला सुरुवात झाली. राजाराम महाराज रायगडावरून यशस्वीपणे निसटल्यावर येसूबाईंनी आठ महिने रायगड झुंजवला. खूप प्रयत्न करूनही गड ताब्यात येत नाही असे पाहून औरंगजेबाने कपटाने रायगडावरील भगवे निशाण उतरवले व येसूबाईना शाहू महाराजांसहीत अटक केली. येसूबाईंना शिवरायांची शिकवणच होती की प्रसंगी गड किल्ले शत्रूला द्यावेत पण स्वराज्य राखावे. दिलेले किल्ले लढून परत मिळवता येतात पण गेलेले स्वराज्य परत मिळवता येत नाही. शत्रूने बंदी बनवले तरी सुटता येते हा इतिहासही शिवरायांनी घडवून येसूबाईंसमोर आदर्शासारखा ठेवला होता. पण दुर्दैवाने येसूबाईना त्यांच्यासारख्या युक्तीने स्वतःची सुटका करून घेता आली नाही. त्यामुळे त्यांना आणि शाहूंराजाना आपली उमेदीची एकोणतीस वर्षे स्वराज्यासाठी कैदेत व्यतीत करावी लागली. एकोणतीस वर्षांपैकी सतरा वर्षे महाराष्ट्रात औरंगजेबाच्या छावणीत नजरकैदेत त्यांना रहावे लागले. जिथे छावणीचा तळ पडेल तिथे त्या दुर्दैवी मायलेकरांची फरपट होई. स्वराज्यात राहूनही त्यांना स्वातंत्र्य उपभोगणे नशिबात नव्हते. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्या दोघांची रवानगी दिल्लीला करण्यात आली आणि त्यानंतरची बारा वर्षे परमुलाखत वनवास सहन करावा लागला. प्रभू रामचंद्रना किंवा पांडवांना चौदा वर्षेच वनवास होता. त्या वनवासातही ते स्वतंत्रपणे श्वास घेऊ शकत होते पण येसूबाईना आणि शाहूराजेंना एकोणतीस वर्षे पारतंत्र्याच्या वनवासात घालवावी लागली. खरोखरच त्या दोघांच्या स्वराज्यनिष्ठेला तोड नाही.
अखेर बाळाजी विश्वनाथ पेशवे म्हणजेच पहिले पेशवे यांनी त्यांची सुटका केली. मोगलांच्या कैदैतून छत्रपती शाहूंची सुटका व्हावी, यासाठी ते १७०५ पासून मध्यस्थी करीत होते. बाळाजी विश्वनाथ पेशवे यांनी कर्जे काढून फौजा उभारल्या आणि छत्रपतींच्या सर्व शत्रूंचा पराभव केला. १६८१पासून मोगलांशी चाललेल्या लढ्यात धनाजी जाधव, संताजी घोरपडे, सरदार भोसले, सरदार दाभाडे, सरदार आंग्रे आदी सरदारांना त्यांनी एकत्र आणले व मोंगलांशी लढा दिला. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दिल्ली दरबारात झगडे सुरू झाले होते. बादशाह फरूख सियर आणि त्याला गादीवर आणणारे सय्यद बंधू यांच्यात वितुष्ट आले. सय्यदांचा नाश करण्यासाठी बादशाहच्या खटपटी सुरू झाल्या. आत्मरक्षणार्थ सय्यदबंधूंना मित्र शोधावे लागले. आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी मराठ्यांशी मैत्री करणे त्यांना भाग होते. त्यामुळे दक्षिणेचा सुभेदार सय्यद हूसेन अली याने पेशव्याचे मार्फत मराठी राज्याशी नवा तह केला. त्यात शिवाजी महाराजांचे स्वराज्य बिनशर्तपणे शाहू महाराजांना देण्याचे ठरले. शिवाय दख्खनच्या सहा सुभ्यांचा चौथ आणि सरदेशमुखी हे हक्कही मान्य करण्यात आले. मोबदला म्हणून शाहू महाराजांनी पंधरा हजार फौजेनिशी दख्खनच्या सुभेदारास मदत करावी आणि चोरचिलटांचा बंदोबस्त करून मुलखाची आबादी राखावी, या अटी करारनाम्यात ठरल्या. या करारनाम्यावर बादशाहकडून शिक्का-मोर्तब व्हावयाचे होते. बाळाजी विश्वनाथ फौजा घेऊन सय्यद बंधूंच्या साहाय्यास नोव्हेंबर १७१८ मध्ये दिल्लीस गले . दिल्लीत सत्तांतरण झाले. फरुख सियरची इतिश्री होऊन महमूदशाह गादीवर आला. १७१९च्या मार्च महिन्यात सनदांवर नव्याने बादशाहचे शिक्कामोर्तब होऊन बाळाजी पेशवे येसुबाई, शाहूराजे व इतर मराठी सैनिक यांची सुटका करवून साताऱ्यास येऊन छत्रपतींस भेटले आणि मायलेकांनी एकोणतीस वर्षांनतर मोकळा श्वास घेतला.
अशा रीतीने मराठ्यांच्यातील कपट व आपापसातील बेबनाव यांच्यामुळे एकोणतीस वर्षे कैदेत असलेले हे मायलेक दिल्लीतील मुगल सरदारांच्यातील कपट आणि आपापसातील बेबनाव यांचा फायदा घेऊन सुटले आणि एक वर्तुळ पूर्ण झाले.
१६९० ते १७१९ अशी एकोणतीस वर्षे त्यांनी कैदेत कशी काढली असतील याची नुसती कल्पना जरी केली तरी अंगावर काटा येतो. आजूबाजूला परधर्मीय पुरुष माणसे, संपूर्ण वातावरण परकीय, खाणे पिणे, रीतिरिवाज, पोशाख सारे, सारेच अनाकलनीय आणि अबोध असताना त्या प्राप्त परिस्थितीशी कशाकाय सामो-या गेल्या असतील ? मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांवर जुलूम करणारा औरंगजेब महाराणी येसूबाईंशी कसा वागला असेल ? त्याच्या क्रूर वृत्तीशी त्यांनी कसा सामना केला असेल ? धर्मांतराच्या आणि अब्रूच्या भीतीच्या सावटात त्या एकोणतीस वर्षे कशा राहिल्या असतील ? आपला धर्म आणि अब्रू त्यांनी कशी सांभाळून ठेवली असेल ? या इतक्या वर्षात त्यांचे मानसिक संतुलन ढळले कसे नसेल ? महाराष्टातील सतरा वर्षांच्या कैदेत मुलगा जवळ तरी होता पण दिल्लीला गेल्यावर दोघांची बारा वर्षे जाणीवपूर्वक ताटातूट करण्यात आली. त्यावेळी त्यांच्या मनाची अवस्था काय असेल ? या आणि अशा असंख्य प्रश्नांच्या विचारांनी मनात काहूर माजते. औरंगजेबाच्या तंबूचे सोन्याचे कळस कापून नेल्यामुळे आणि गनिमीकाव्याने मोगलांना ज्या धनाजी संताजी यांनी सळो की पळो करून सोडले त्या धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे याना येसूबाईंची सुटका करणे का शक्य झाले नाही ? त्यांच्या सुटकेस एकोणतीस वर्षे का लागली याचा शोध इतिहासात शिरून घेतला पाहिजे.
कोणत्या मातीत जन्मलेली आणि तयार झालेली माणसे ही ? स्वराज्यासाठी तन मन धन देणे म्हणजे काय हे यांच्याकडून किती वेळा शिकायचे ? कितीही प्रयत्न केला तरी येसूबाईंइतके पराकोटीचे उच्च त्यागजीवन जगणे आपल्याला जमेल का ? राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण करणे हेच त्यांच्या जीवनाचे सार होते ते अंगी बाणवणे हे आपल्याला कितीसे जमेल हा प्रश्नच आहे. स्वराज्यासाठी त्यांनी केलेला आयुष्यभराचा त्याग ही त्यागाची परिसीमाच म्हणावी लागेल.
आज कैदेतून झालेल्या त्यांच्या सुटकेला ३०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या त्यागाचा आणि बलिदानाचा इतिहास सर्वोतोमुखी करणे आणि त्यांच्या असीम त्यागाला वंदन करणे इतके तर आपण नक्कीच करू शकतो.
******************************
No comments:
Post a Comment