विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 13 July 2021

सदाशिवराव भाऊ (३ ऑगस्ट १७३० – १४ जानेवारी १७६१)

 कविता चव्हाणMaratha Empire🚩

मराठा रियासत

सदाशिवराव भाऊ
(३ ऑगस्ट १७३० – १४ जानेवारी १७६१)
सदाशिव राव भाऊ. चिमाजी अप्पा यांचे‌ सुपुत्र. पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठ्यांचे नेतृत्व केले. नानासाहेब पेशवे यांचे चुलतभाऊ. त्यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांचे नाव सदाशिव भट. परंतु ‘सदाशिवराव भाऊʼ म्हणून ते सर्व परिचित होते.
पहिल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू अनंत बाळाजी भट तथा चिमाजी आप्पा यांचा हा मुलगा. त्यांच्या आईचे नाव रखमाबाई. सदाशिवराव २५ दिवसांचे असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. त्यामुळे आजी राधाबाईसाहेब यांनीच त्यांचे संगोपन केले. पहिल्या बाजीराव पेशव्यांसोबत चिमाजी आप्पा नेहमीच मोहिमेवर असत. त्यामुळे लहानग्या सदशिवाकडे लक्ष द्यायला त्यांना पुरेसा वेळ मिळत नसे. दौलतीचे शिक्षण घेण्यासाठी ते शाहू महाराजांकडे दाखल झाले होते. तलवारबाजीमध्ये ते अतिशय तरबेज होते. २० मार्च १७३६ मध्ये त्यांचे मौंजीबंधन झाले, तर २५ जानेवारी १७४० मध्ये त्यांचे लग्न उमाबाई यांच्याशी झाले. त्यांचे दुसरे लग्न भिकाजी नाईक कोल्हटकर (पेण) यांच्या पार्वतीबाई नावाच्या मुलीशी झाले.
१७५२ मध्ये दिल्लीच्या बादशहाने अब्दाली व रोहिले यांच्यापासून मराठ्यांनी बादशाहीचे संरक्षण करावे म्हणून मराठ्यांशी करार केला. यामुळेच रघुनाथरावासारखे लोक अटक, पेशावरपर्यंत जाऊन अफगाणांचा बंदोबस्त करून आले होते. रघुनाथराव तेथून माघारी फिरताच अब्दाली पुन्हा हिंदुस्थानवर चालून आला.
शिंदे व होळकर यांच्या आपसांतील वैरामुळे अब्दालीने मराठ्यांचा पराभव केला. यामध्ये दिल्लीजवळ बुराडी घाटावर दत्ताजी शिंदे धारातिर्थी पडले. ती बातमी महाराष्ट्रात येण्यास महिना लागला. याच दरम्यान भाऊंनी उदगीरच्या लढाईत निजाम अलीचा पराभव करून साठ लाख उत्पन्नाचा मुलूख मराठी राज्याला जोडला.
या युद्धातील यशामुळे नानासाहेब पेशवे यांनी अब्दालीचा बिमोड करण्यासाठी उत्तर हिंदुस्थानावरच्या मोहिमेस सदाशिवराव भाऊंची रवानगी केली. मराठी सैन्य पटदूरास एकत्र आले. तेथूनच १४ मार्च १७६० मध्ये मराठी फौजा उत्तरेकडे निघाल्या. भाऊंच्या सैन्यात यात्रेकरू, बाजारबुणगे यांचा भरणा होता. भाऊंना उत्तरेतील काही संस्थानिकांना आपल्या बाजूने वळवण्यात अपयश आले. मथुरेत भाऊंना सुरजमल येऊन मिळाला. पुढे मात्र सुरजमलने तटस्थ भूमिका घेतली.
पानिपतच्या तिसऱ्या लढाईत अफगाणिस्तानच्या अहमद शाह अब्दालीने मराठा सैन्याचा पराभव केला. या युद्धात मराठा सैन्याची अपरिमित जीवितहानी झाली. या पराभवाने मराठ्यांच्या वर्चस्वावर, राजकीय वाटचालीवरही परिणाम झाला आणि सदाशिवराव भाऊ या पराजयाचे धनी ठरले.
©maratha_riyasat ©

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...