मित्रानो, आता आपण या वर्षीच्या अखेरच्या आठवड्यात प्रवेश करीत आहोत आणि लवकरच नवीन वर्षाच्या घटनाक्रमाना वेग येऊ लागेल. त्यातीलच आपल्या देशाच्या दृष्टीने महत्वाची घटना म्हणजे आपला गणतंत्र दिवसाचा समारंभ. या दिवशी आपल्या सैन्यातील सैनिकांना व अधिकाऱ्यांना त्यांनी गाजविलेल्या पराक्रमाबद्दल वेगवेगळी शौर्यचक्रे देण्यात येतील. त्यांनी देशाच्या रक्षणार्थ केलेल्या पराक्रमाची ही एक पावतीच असते असे म्हणायला हरकत नाही. यावेळी आपल्या डोक्यात विचार येऊ शकतो की आपल्या सतराव्या व अठराव्या शतकात मराठ्यांनी केलेल्या लढाईमध्ये त्यांचा पराक्रम बघून त्यांना काही अशा प्रकारची पदके व सन्मान दिला जात असेल का? आणि याचे उत्तर 'होय' असेच आहे. या सैनिकांना व सरदारांना लढाई संपल्यावर लागलीच रोख पैशाचा स्वरूपात किंवा एखादी जमीन वा महाल भेट म्हणून दिला जात असे. तसेच काही जणांना इतर स्वरूपात मान म्हणून डोक्यावर अब्दागिरी किंवा एखादे मानपत्र पण दिले जात असे.
फाकडा (Gallant & Heroic):आज आपण उत्तर मराठेशाहीतील एका आगळ्या वेगळ्या सैनिकी सन्मानाची ओळख करून घेणार आहोत. त्या सन्मानाचे नाव आहे "फाकडा" ही पदवी. फाकडा हा शब्द आजच्या काळात समजायला कठीण वाटेल परंतु आजचा मराठीतील ‘फक्कड’ हा शब्द हा त्यावेळच्या फाकडा शब्दाचे ते अपभ्रंशित स्वरूप असावे. अठराव्या शतकातील मराठ्यांच्या ज्या लढाया झाल्या तेव्हा लढाईत उत्तम कामगिरी करणाऱ्या सैनिकास वा अधिकाऱ्यास फाकडा म्हणून संबोधले जात असे व त्यांचा एक प्रकारचा मानसन्मान केला जात असे.
फाकडा या शब्दाचा शब्दशः अर्थ आहे, जो शिलेदार वा घोडेस्वार ज्याला आपल्या घोडयाचा पुढच्या उजव्या पायात "चांदीचे कडे" घालण्याचा सन्मान प्राप्त झाला आहे असा. मराठेशाहीत त्या काळात असा मान मिळणारे फक्त तिघेच होऊन गेले. आणि गंमतीचा गोष्ट अशी की त्यापैकी शेवटचा एक जण हा ईस्ट इंडिया कंपनीचा इंग्रज लष्करी अधिकारी होता. मित्रानो, यातून एक गोष्ट प्रकर्षाने दिसून येते ती म्हणजे मराठे हे केवळ लढवय्येच नव्हते, तर आपल्या शत्रूच्या शौर्याचे पण कोडकौतुक करताना ते मागे रहात नव्हते.एखाद्या कसलेल्या गवयाने जुगलबंदीमध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्याला दाद द्यावी तसाच काहीसा हा प्रकार होता.
मराठेशाहीतील फाकडा सन्मान मिळवणारे लोक: उत्तर मराठेशाहीत ज्या तीन वीरांना ‘फाकडा’ ही पदवी प्राप्त झाली होती, त्यांची नावे अशी: कान्हेरेराव त्रिंबक एकबोटे, दुसरे म्हणजे मानाजी शिंदे व तिसरे म्हणजे इंग्रज कॅप्टन जेम्स स्टुअर्ट,ज्याला मराठे लोक ‘इष्टुर फाकडा’ असे संबोधित. घोडनदीच्या निझामाच्या विरुद्धच्या लढाईत कान्हेरेराव त्रिंबक एकबोटे यांनी भाग घेतला होता. या लढाईत गाजवलेल्या शौर्याबद्दल कान्हेरेराव एकबोटे यांस 'फाकडा’ ही पदवी पेशव्यांनी त्यांना बहाल केली होती. मानाजी शिंदे हे साबाजी शिंदे यांचे नातू होते व त्यांनी लाहोरच्या युद्धात मोठा पराक्रम गाजविला होता. मानाजी फाकडा हे देहाने धट्टेकट्टे,शूर आणि आपल्या देहावरील अनेक लढाईतील झालेल्या जखमांच्या खुणा ते गर्वाने मिरवणारे होते.
इष्टुर फाकडा: हा ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यातील एक कॅप्टन होता. सन १७८८ च्या अखेरीस मुंबईकर इंग्रजांनी मराठ्यांच्यावर आक्रमण करून पुणे ताब्यात घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. त्या वेळच्या सैन्यामध्ये कॅप्टन स्टुअर्ट सामील होता. तो अतिशय शूर व धाडशी होता असे दिसते. मराठ्यांच्या तुलनेत संख्येने कमी असलेल्या इंग्रज फौजेला सतत प्रोत्साहित करून त्यांनी बोरघाट चढून तळेगावपर्यंत मजल मारली होती.
पेशवे बखरमध्ये या लढाईचे वर्णन असे आले आहे.”तोफांशी तोफा चालू लागल्या. पायदळाच्या बंदुकीचा
मार, त्याने धुराची मोठी गर्दी झाली. कोणी कोणास ओळखेनासे झाले, सरकारचे फौजेच्या पाठीशी वारा,इंग्रजांचे तोंडावर वारा, या वाऱ्याच्या गर्दीत लढाईची गर्दी. आज लढाईचा मोठा आकांत वर्तला.” मराठ्यांची लढाईची तयारी कशी आहे व कोणत्या बाजूने त्यांचा मारा सुरु आहे याचा अंदाज घेण्यासाठी म्हणून इंग्रजांकडील एक गोरा अधिकारी इष्टुर (फाकडा) झाडावर चढून दुर्बीण लावून मराठी फौजेची पाहणी करू लागला.' तेव्हा या संधीचा फायदा घेण्यासाठी गोलंदाजास (हरिपंत फडके)तात्यांची आज्ञा झाली की, हाच मोक्याचा समय आहे. आता शिस्तबी (नेम) धरून निशाण लावून तोफ डागावी.' गोलंदाजाने त्याप्रमाणे आज्ञेचे पालन करताच इंग्रज अधिकाऱ्यास तोफेचा गोळा लागून इष्टुर (स्टुअर्ट) ठार झाला. त्यामुळे इंग्रजी सेनेचे खच्चीकरण झाले. ही गोष्ट कारले येथे ४ जानेवारी १७७९ रोजी घडली. अशा या इष्टुर फाकड्याची समाधी आज ही तळेगावच्या परिसरात आढळते. मराठे हे लढवैय्ये होतेच परंतु त्याच बरोबर समोरच्या लढवैय्याच्या शौर्याचे पण चाहते होते यात शंका नाही. संदर्भ: मराठी रियासत, पेशवे बखर, नातूकृत महादजी शिंदे यांचे चरित्र.,Ishtur Fakada- The Story of Captain James Stuart by Uday Kulkarni संकलन व लेखन: प्रमोद करजगी
No comments:
Post a Comment