जीवबादादा बक्षी: महादजींची तळपती तलवार
गोवा सरकारचे 'खेलरत्न' पुरस्कार दरवर्षी देण्यात येतात. हे पुरस्कार राज्यातील खेळाडूंना त्यांच्या खेळातील प्रावीण्याबद्दल व त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील एकूणच वैशिष्ट्यपूर्ण योगदानासाठी सरकारच्या क्रीडा प्राधिकरणातर्फे देण्यात येतात. या पुरस्काराचे नामकरण "बक्षी बहाद्दर जीवबादादा केरकर पुरस्कार" असे करण्यात आलेले आहे. गोव्यातील जनतेला हे जीवबादादा केरकर कोण आहेत याची ओळख असण्याची शक्यता आहे पण देशातील इतर जनतेला जीवबादादा केरकर कोण आहेत याची ओळख असण्याची सुतराम शक्यता नाही. तर मित्र हो,या लेखात आपण बक्षी बहाद्दर जीवबादादा केरकरची ओळख करून घेऊ. या जीवबादादा बक्षी यांची एका वाक्यात ओळख करून द्यायची म्हणजे एक शूर मराठा सेनापती व मुत्सद्दी, महादजीं शिंदे यांचा सावलीप्रमाणे साथ देणारा जवळचा सहकारी व शिंदे घराण्याची तीन दशकाहून अधिक काळ सेवा करणारा असा एक प्रसिद्धी परान्मुख व्यक्ति अशी करून द्यावी लागेल!!सन १७६१ ते १७९६ पर्यंत म्हणजे सुमारे ३५ वर्षे जीवबा दादा नि शिंद्यांच्या मुख्य सेनापतीचे व प्रमुख सल्लागारांचे काम केले.
बालपण व पूर्वचरित्र :(१७४०ते१७५६पर्यंतचा काळ)जीवबादादांचे वंशज गोमंतकातील केरी गावी राहत. केरी हे गांव पणजीपासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर आहे. मोरज गाव पासून आठ दहा मैलावर हरमल व केरी असे एकास एक लागून गावे आहेत. जीवबांचा पूर्वज केरी येथे स्थायिक झाला. त्याच्या वंशजांनी तेथे जमीन जुमला संपादन केला होता. केरी गाव तेरेखोलच्या खाडीवर आहे. खाडीच्या तोंडाशी तेरेखोलचा किल्ला आहे.जीवबाच्या आजोबांचे नाव विठ्ठल पंत. त्यांना तीन मुलगे होते. त्यांची नावे गणपतराव, बळवंतराव आणि रामकृष्णराव. जीवबाचे वडील म्हणजे गणपतराव, परंतु बळवंतराव याना मुलगा नसल्याने त्यांनी जीवबाला दत्तक घेतले. त्यामुळे त्यांचे नाव जीवबा बल्लाळ (बळवंतराव) असे झाले. जीवबाचा जन्म सन १७४० मध्ये झाला. तो लहान असताना , त्याच्या घरातल्या लोकांना मळगाव , सावंतवाडी येथे एक बैरागी भेटला , त्याने जीवाबाकडे पाहून त्याच्या वडिलांना भविष्य सांगितले, ' ये लडका मुसाफिर को निकल जावे तो उसको रोकना मत. ये बडा भाग्यशाली निकलगा. वो जहाँ जावे, वहा उसकी फत्ते होगी. ये मेरा बोलना ध्यान मे रखना . "
उमेदवारीची वर्षे (१७५६ ते १७६०): जीवबाचा उमेदवारीच्या वयात त्यांचा मुक्काम कोल्हापूर व पुणे इथे झाला. सन १७५६ मध्ये साधू महाराजांच्या आदेशानुसार जीवबाने घर सोडले व आपले नशीब अजमावण्यासाठी तो बाहेर पडला. सुरुवातीला तो कोल्हापूरला पोचला, तेव्हा त्याची परिस्थिती बिकट होती. तेथील देवीच्या देवळातील ब्राम्हणाने त्याला काही दिवस आश्रय दिला. कोल्हापूरला ज्यांच्याकडे उतरला होता, त्यांनी पुण्याच्या सरदार बर्वे यांच्या नवे एक पत्र दिले होते. ते पत्र घेऊन जीवबा पुण्यात सरदार बर्वे यांच्याकडे सन १७५७ साली आला. बर्व्यांच्याकडे असताना त्यांच्या घोड्याच्या पागेची जबाबदारी जीवबादादावर सोपविण्यात आली होती.बर्व्यांच्याकडे नोकरी करत असताना त्यांच्या बरोबर पेशव्यांच्या वाड्यात त्याचे जाणे येणे होऊ लागले. जीवबादादांची हुशारी, चातुर्य पाहून पेशव्यांनी त्यांची वाकनीस म्हणून दरबारी नेमणूक केली.
महादजी शिंदे यांची भेट: जीवबा दादांची व महादजी यांच्या प्रथम भेटीबद्दलची एक आख्यायिका सांगितली जाते.एकदा महादजी शिंदे यांना पेशव्यांनी मेजवानी दिली. महादजीला तिळाची चटणी फार प्रिय. ती नेमकी त्या दिवशी जेवण्यात नव्हती. हे जीवबास आधीपासूनच माहित होते. जेवताना ताटात वाढलेले सर्व पदार्थ निरखून महादजीने जीवाबाकडे पहिले. महादजीच्या मनातील विचार ओळखून 'आज सोमवार आहे म्हणून केली नाही ' असे त्यांनी तत्परतेने महादजींना सांगितले. याचे महादजीस कौतुकास्पद आश्चर्य वाटले. त्यांच्या मनातील गोष्ट जीवबास समजली होती. त्याच्या चतुरतेचे आणि समय सूचकतेचे महादजींना न वाटल्यास नवल! (या प्रसंगाची हकीकत असलेले त्यावेळचे पत्र जिवाजीराव यशवंत केरकर म्हणजे जीवबादादाचे नातू, यास सापडले होते. ते त्यांनी केरी येथे पाठवले होते. हल्ली ते पत्र मिळत नाही. राजश्री भास्करराव सुभेदार ग्वाल्हेरहुन केरीस आले त्यांनी जीवबादादाची बखर लिहायला सुरुवात केली त्यात हा मजकूर आहे.) पुढे काही दिवसांनी दुर्दैवाने सरदार बर्वे अचानक वारले तेव्हा त्यांच्या सरदारकीची वहिवाट पेशव्यांनी जीवबाला दिली. जीवबाने प्राप्त परिस्थितीत हाताखालील निवडक फौजेची तसेच शिपाई, घोडे व इतर सरंजाम याची व्यवस्था नीट ठेवली.
महादजी शिंदे यांना शिंद्यांची गादी मिळण्यासाठी जीवबादादा यांची कामगिरी:महादजीला शिंद्यांची जागिरी देण्यासंदर्भात अजून एक हकीकत आढळते.जनकोजीच्या मागे राणोजीच्या औरस संततीचा नष्टांश झाला असे मानले गेले होते. तेव्हा आता शिंद्यांच्या सरदाराची वस्त्रे कोणाला द्यावी या विषयी पेशव्यांच्या दरबारात वाटाघाटी सुरु झाल्या. त्या वेळी मराठी साम्राज्याची स्थिती अत्यंत शोचनीय झाली होती. पानिपतच्या भयानक आघातानंतर नानासाहेब पेशवे जरी जिवंत होते तरी ते शोक सागरात बुडाले होते. त्यामुळे राज्यकारभार रघुनाथ राव उर्फ राघोबादादा बघत होते. पेशवे दरबारी योग्य सल्ला देण्यास मुत्सद्दी मंडळी उरली नव्हती. राघोबादादाचे महादजी बरोबर नीट पटत नव्हते व नारो शंकरावर त्यांची मर्जी होती. त्यामुळे शिंद्यांची गादी महादाजीस न देता ती नारो शंकर यास द्यावी असे दादासाहेबांनी सुचविले. नारो शंकर यांनी पेशव्यांची उत्तर हिंदुस्थानातील मुलुखाच्या बंदोबस्ताची व वसुलीची कामगिरी बजावून राघोबादादाची मर्जी संपादन केली होती. महादजी पानिपतच्या संग्रामात प्रत्यक्ष हजार असताना, आपल्या बापाची गादी मागण्यास ते पेशव्याकडे गेल्यावर राघोबादादानी सारासार विचार न करता नारो शंकर यास शिंद्यांची गादी देण्याचा बेत केला. अशावेळी शूरपुरुष राम राघो पागे आणि जीवबादादा बक्षी यांनी महादजीचा पक्ष अभिमानाने उचलून त्यांना शिंद्यांची जहागिरी मिळण्याच्या दृष्टीने त्या अनुषंगाने खटपट चालू केली.त्यांनी नानासाहेबांची गाठ घेऊन या जहागिरी संबंधाने अन्याय होत होता तो नाहीसा केला. 'शेणवी वीर व मुत्सद्दी 'या बखरीत या अर्थाचा मजकूर आढळतो: एके दिवशी राघो राम पागे श्रीमंतांच्या दरबारात येत होते, मार्गात त्यांची व जीवबादादा यांची भेट झाली असता जीवबादादा बोलले की शिंद्यांची गादीचा विषय श्रीमंतांशी बोलून योग्य तो निर्णय घेऊ.लगेचच ते पेशव्यांच्याकडे जाऊन श्रीमंत नानासाहेब याना विनंती केली की शिंद्यांची वस्त्रे महादजी शिंदे राणोजींचा पुत्र यास द्यावी. यावर नानासाहेब पेशवे यांनी शंका व्यक्त केली की त्याजकडून एवढे मोठे काम कसे होईल?तुम्ही जबाबदारी घेत असाल तर तुम्हास सुभा सांगतो. त्यावरून जीवबादादा आणि राघो राम पागे 'हिंदुस्थान सुभ्याची जहागिरी महादजीच्या नावे करून द्यावी.बाकी सर्व बंदोबस्त आम्ही करू. सरकारांनी या विषयी काळजी करू नये.' दोघा सरदारांनी महादजीच्या वतीने असा विश्वास दिल्यावर नानासाहेब पेशव्यांनी शिंदे घराण्याची वस्त्रे महादजी शिंदे याना दिली.१७६१च्या मध्यास ही घटना घडली. महादजी शिंदे याना जहागिरी मिळाल्यावर जीवबादादा बक्षी व राघोराम पागे यांनी त्यांना राज्यकारभारात सुसूत्रता आणण्यासाठी सक्रिय साहाय्य केले. जीवबादादा हे शिंद्यांचे सेनापती होते व राज्यकारभारात इतर सेवेत देखील त्यांचा सहभाग असे. महादजींच्या गैरहजेरीमध्ये शिंद्यांच्या राज्याची धुरा ते सांभाळत असत.
जीवबादादा बक्षी यांनी केलेल्या महत्वाच्या लढाया: जीवबादादा हे शिंद्यांचे प्रमुख सेनापती असल्याने शिंद्यांच्या प्रत्येक लढाईत त्यांचा सक्रिय सहभाग असे. अशा प्रकारे त्यांनी केलेल्या काही वेचक व महत्वाच्या लढायांची संक्षिप्त माहिती आढावा स्वरूपात दिलेली आहे.
१.म्हैसूरची मोहीम: सन १७६९. म्हैसूरच्या राजाने पेशव्यांची खंडणीसाठी देण्यास नकार दिला. तेव्हा पेशव्यांचे सरदार गोपाळराव हरी पटवर्धन याना फौजेसहित जीवबादादांनी मदत केली.या मोहिमेत जीवबादादा यांनी नजरेत भरावी अशी कामगिरी केली होती. २.चितोडची लढाई: सन १७९१ उदयपूरचा गादीवर राणा भीमसिंग बसला होता. त्याने पूर्वापार चालत आलेली खंडणी देण्यास नकार दिला. तेव्हा महादजी शिंदे सोबत बाळोबा तात्या दिवाण, नारायण राव बक्षी, सदाशिव मल्हार, कंपू व जीवबादादा होते. या लढाईत शेवटी राणा भीमसिंग शरण आला. या लढाईचे वैशिष्ट्य म्हणजे शक्तिशाली मोंगल सम्राट अकबराला चितोड जिंकायला १२ महिन्यापेक्षा अधिक काळ लागला होता, तोच गड महादजींनी आपल्या युद्ध कौशल्याने व मुत्सद्देगिरीने काही आठवड्यात जिंकला. ३.बदामीची लढाई व बदामीच्या किल्ल्यावर भगवे निशाण: १७८५पासून टिपूविरुद्ध सुरु झालेली सुरु झालेली लढाई सन १७८६ मध्ये निर्णायक अवस्थेत आली तेव्हा पेशव्याजवळ निझाम, भोसले, होळकर, जाधव, निंबाळकर, घाटगे, शितोळे, आंग्रे, पाटणकर, थोरात वगैरे राजे व सरदार व त्यांच्या सेना होत्या.१ मे१७८६रोजी मराठयांचे सैन्य बदामीवर चालून गेले. या लढाईत जीवबादादा आपल्या ३५०० सैनिकांसह चालून गेले व त्यांनी आपल्या पराक्रमाने विजयश्री खेचून आणली. ४.इस्माईल बेगचे बंड व जीवबादादाचे कर्तृत्व: सन १७९२. शिंद्यांचा एकमेव शत्रू इस्माईल बेग त्याने बंड उभारून शिंद्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. इस्माईल बेगने गुलाम कादिरच्या शूर बहिणीच्या साहाय्याने कानोड येथे किल्ल्याच्या आश्रयाने शिंद्यांना विरोध सुरु केला. इस्माईल बेगची ही तयारी सुरु असताना जीवबादादांनी जगोबा बापू, लखबादादा, व पेरन हे सरदार बंदोबस्तावर पाठवले. त्यांच्या हातून मोहीम फत्ते होईना. ही वार्ता ऐकून जीवबादादाने पतियाळा येथील खंडणीचे काम आटोपून धाव घेतली. जीवबानी तेथे आल्यावर कानोदच्या किल्ल्यावर एव्हढा जोरदार मारा केला की शत्रूचे हाल झाले. शेवटी जीवबादादांनी किल्ला जिंकून इस्माईलबेग याला कैद केले. ५. गुलाम कादिरचा वध: डिसेंबर सन १७८८. गुलाम कादिर याने पातशाहाचा घोर अपमान व बेइज्जती केली होती. त्यांना शिक्षा करणे महादजी शिंद्यांना प्राप्त होते. जीवबादादा बक्षी याने इतर सरदारांच्या मदतीने गुलाम कादिर यास मेरठमध्ये पकडले व कैद करून शिंद्यांच्या हवाली केले. ६. राघोगडाची लढाई: सन १७८६: ही मसलत जवळपास १-१.५ वर्षे चालली. शेवटी जीवबादादा यांनी यात संपूर्ण विजय मिळवला.
शिंद्यांचे सेनापती जीवबादादा यांच्या हाताखालील सैन्य: जीवबादादा बक्षी यांच्या हाताखाली एके काळी असलेले सैन्य पुढे दिल्याप्रमाणे होते. १ लक्ष स्वार (घोडेस्वार, मोतद्दार, स्वार ),५०००० पायदळ कंपू ५ (एका कंपूत १०००० सैनिक),५०० तोफा ,२०० जिनशी (मोठ्या तोफा),६०००० पेंढारी (हे गरजे प्रमाणे कमी जास्त होते),१५००० शिंदे सरकारचे खाजगी हुकूमत ,३००० जनानखान्याचे खाजगी सैन्य (यात बायका पण असत),४०० हत्ती ,४०० रथ (बैल जुंपलेले),३०० सांडणीस्वार ,११००० ओझे वाहणारे व ओढणारे उंट,१३००० बैल (तोफा ओढणारे),शिवाय प्रांतोप्रांती व किल्ल्यावर सैन्य होते ते वेगळेच.
शिंद्यांची जीवबावरील इतराजी व त्याकाळात मराठेशाहीचे झालेले नुकसान: सन १७८५च्या सुमारास जीवबादादास महादजीच्या रोषास पात्र व्हावे लागले आणि त्यामुळे त्यांची पुढील तीन वर्षे कठीण गेली. तरी पण स्वामीनिष्ठेने त्यांनी पाटीलबावांची सेवा केली व शेवटी त्याला त्याचे योग्य ते फळ मिळाले. महादजीने त्याची काढून घेतलेली बक्षीगिरी त्यास परत दिली. जीवबादादावर पाटीलबावांची इतराजी मागे आपमतलबी व कावेबाज राजपूत सरदारांचा म्हणजे रांगड्यांचा हात होता. मराठ्यांचे खच्चीकरण व्हावे व त्यांचे बळ कमी व्हावे म्हणून राजपुतांनी खेळलेली ही एक राजकीय खेळी होती. पाटीलबावा व जीवबादादा यांच्यात राजपुताकडून जाणीवपूर्वक अविश्वासाचे वातावरण निर्माण केले गेले. रांगडे (राजपूत) हे वरून महादजीच्या हिताच्या गोष्टी बोलत व संधी मिळेल तेव्हा जीवबादादाच्या विरुद्ध चहाड्या करत.पाटीलबावांची जीवबादादावर असणारी मर्जी व इतर शेणवी मंडळींच्यावरील असलेली कृपा ही इतरांच्या डोळ्यात खुपणे साहजिकच होते. शेवटी गंभीर प्रकृतीच्या पाटीलबावांची बुद्धी भ्रष्ट होऊ लागली. त्यांचे मन कलुषित झाल्याने जीवबादादाच्या प्रत्येक गोष्टीत ते संशय घेऊ लागले व त्याच्या कारभारावर बारीक नजर ठेऊ लागले. त्याची बक्षीगिरी काढून नौबतराय नावाच्या राजपुतांस देण्याचा मनसुबा केला गेला. शेवटी जीवबादादांनी पाटीलबावांचा खेदपूर्वक निरोप घेतला. परिणाम स्वरूप पाटीलबावांनी जीवबास लहान लहान स्वाऱ्याची कामे देण्यास सुरुवात केली. काही काळानंतर रांगड्यानी आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली. पाटीलबावांना वारंवार त्यांच्या चुकीची फळे भोगायला लागली. रांगड्यांचे हेतू काय होते, त्यांनी जीवाबाबद्दल कसे कुंभांड रचले याची यच्चयावत माहिती सरतेशेवटी पाटीलबावास समजली. निष्कारण आपण जीवाबाचा अपमान केला हे समजून ते दुःखी झाले. शेवटी त्यांच्यातील संशयाचे धुके विरले आणि त्यांच्यातील अबोला संपला. जीवबादादा पुन्हा सेनापती बनले. या प्रकारात शिंदेशाहीचा तीन वर्षाचा काळ व्यर्थ गेला.
मराठेशाहीचे झालेले नुकसान: खरे पाहता पाटीलबावांचा सन १७८५ते१७८८ मधील काळ खूप खडतर गेला. त्या पाटीलबुवाना सोसाव्या लागलेल्या नुकसानीचा गोषवारा असा:१.राज्यातील व्यवस्थेची घडी बिघडली २.सभोताली बंडे उद्भवली आणि त्यांचा प्रतिकार करणे कठीण गेले ३.त्यावेळच्या झालेल्या काही लढाईत अपयश आले (उदा. लालसोटची लढाई) ४.राज्याचा काही भाग हातातून गेला ५.राजपूत व मुसलमान एकत्र आले त्यायोगे इंग्रज,शीख,अफगाण याना बळ मिळाले ६. लष्कराची तयारी कमी झाली इत्यादी.
सारांश: जीवबादादांनी १७६१ ते १७९६ पर्यंत सुमारे ३५ वर्षे शिंद्यांची अविरत, अचल इमानदारपणे सेवा केली. शौर्य,धैर्य, उद्योगशीलता, योजकता, स्वामीनिष्ठा, दृढनिश्चय , सद्वर्तन, भूतदया, इत्यादी गुण जीवबादादा कडे दिसतात. जीवबाने गरिबीच्या परिस्थितीतून व सामान्य प्रतीच्या जनसमुदायातून उठून केवळ उद्योगाच्या व दृढनिश्चयाच्या बळावर केव्हढी कामे केली. तो काळ तरवारी चालवण्याचा होता हे खरे. पण त्याची उद्योगरती , स्वामीनिष्ठा , पितृभक्ती, देशप्रेम इत्यादी अंगाचे गुण स्पृहणीय आहेत. घरातून निघाल्यापासून धन्याच्या अनेक महत्वाच्या कार्यामुळे ज्याला पुनः आपल्या घरी सुद्धा जाता आले नाही त्याच्या ठिकाणी स्वामी तत्परता किती प्रबळ होती याची सहज अटकळ होईल. जीवबादादाच्या अतुल यशाने पेशव्यांचा दरबारी खालील श्लोक म्हणण्यात येत असे असे म्हणतात.“माधवो म्हादजीबाबा जीवबादादाssर्जुन पर:I क्षत्रिना श्रीमंतां स्वार्थे युद्धं भारत संपंन्न II अशी ही महादजी शिंदे व जीवबादादा बक्षी यांची जोडी महाभारतातील कृष्णार्जुनासारखी उत्तर मराठेशाहीत शोभून दिसते.जीवबादादांचे अवघे घराणे शिंद्यांच्या सेवेत रमलेले दिसते. जिवाजी बल्लाळ बक्षी व बंधू शिवबांना व मुलगे नारायण जिवाजी व यशवंत जिवाजी, तसेच जीवबादादाचे चुलत बंधू जगन्नाथ राम उर्फ जगोबा बापू, व बाळाजीराम इत्यादींची नांवे शिंद्यांच्या इतिहासात वारंवार दिसतात. महादजीचा कारभारच एव्हढा होता की तो एकट्या माणसाला आवरता आला नसता. त्यासाठी प्रामाणिक, शूर असे मुत्सद्दी पुरुष भोवताली असणे आवश्यकच होते. असे शेकडो सक्षम व समर्थ माणसे महादजी शिंद्यांना मिळाली. अशा या शूर, मुत्सद्दी व प्रसिद्धी परान्मुख जीवबादादांच्या नावाने खेळ पुरस्कार जाहीर करून गोमन्तक सरकारने त्यांचा यथोचित सन्मानच केला यात शंका नाही.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
संदर्भ: शिंदेशाहीचा इतिहास अथवा बक्षी बहाद्दर मुजाफरदौल जिवाजी बल्लाळ तथा जीवबादादा बहाद्दर फत्तेजंग उर्फ जीवबादादा केरकर बहाद्दर फत्तेजंग चरित्र : नरहर व्यंकाजी राजाध्यक्ष, मराठा रियासत: गो. स. सरदेसाई, अलिजाबहाद्दूर महादजी शिंदे: विष्णू रघुनाथ नातू संकलन: प्रमोद करजगी
No comments:
Post a Comment