मित्रानो,आज आपण एका मनोरंजक व चित्तवेधक विषयाकडे वळणार आहोत. मी माझ्या या पूर्वीच्या “महादजी शिंदेच्या बखरींची खबर” या लेखामध्ये म्हंटल्याप्रमाणे "वकाये आलमशाही" या बखरीचा आधार घेऊन हा लेख लिहीत आहे. ‘ये दोस्ती हम नही छोडेंगे’ हे शोले मधील प्रसिद्ध गाणे आपल्याला आठवत असेलच. या आख्यानाचे शीर्षक त्या गाण्याचे दिले आहे. या मागचा हेतू म्हणजे या लेखात आपण महादजी शिंदे व दिल्लीचा बादशहा शहा आलम २ यांच्यातील मैत्रीच्या संबंधाबद्दल बोलणार आहोत. या इतिहासकालीन दोन मातब्बर पुरुषांची मैत्रीपूर्ण आणि परस्परावलंबी संबंध दाखविणारे काही प्रसंग, घटना व वेचक किस्से आपण येथे पाहणार आहोत.
कथालेखक प्रेमकिशोर फिराकी यांच्याबद्दल दोन शब्द: १४ नोव्हेंबर १७८४ रोजी अलिजाबहाद्दर महादजी शिंदे यांची व शहा आलम २ यांची भेट झाली होती. १ डिसेम्बर १७८४ या तारखेला बादशहांनी पेशव्यांना आपला प्रतिनिधी नायब आणि सेनापती बक्षी उल्मुमलिक हा सर्वोच्च किताब दिला आणि प्रत्यक्ष कारभार महादजी शिंदे यांनी करावा अशी सूचना केली. त्यानंतर शहाआलम व शिंदे यांच्या फौजा जयपूरकरांकडे खंडणी गोळा करण्यासाठी जात असताना हलेना या गावी थांबल्या होत्या. या मुक्कामी ४ डिसेंबर या दिनी शहाआलम यांनी मोंगल साम्राज्यातील सर्वात प्रतिष्ठेचा असा 'वकील मुतलक' हा बहुमान महादजी शिंदे याना बहाल केला. या काळात प्रेमकिशोर फिराकी हा गृहस्थ शहा आलम यांच्या छावणीत हजर होता. बंगालच्या सुभेदाराच्या दरबारातील वकील राजा जुगलकिशोर यांचा हा नातू होय. नोकरीच्या निमित्ताने हा शहा आलम यांच्या छावणीत प्रथम ५ जुलै १७८४ रोजी तलपत मुक्कामी दाखल झाला. प्रेमकिशोर फिराकी हा १५ जानेवारी १७८५ पर्यंत शहा आलम बरोबर होता. शहा आलम यांच्या छावणीत असताना प्रेमकिशोर याने छावणीतील हकीकत दैनंदिनीच्या स्वरूपात लिहून काढली. २५ नोव्हेंबर १७८४पासून त्याने दैनंदिनी लिहायला सुरुवात केली. या काळात महादजी शिंदे यांच्या ताब्यात दिल्लीचा सर्वाधिकार आला होता. दैनंदिनीच्या एकूण पानांची संख्या एकशे सोळा पाने आहे. प्रेमकिशोर याने आपल्या दैनंदिनीचे नाव 'वकाये आलमशाही' असे ठेवले आहे.
कथानकातील पात्रे व पार्श्वभूमी: वकाये आलमशाही वरून महादजी शिंदे व बादशहा शहा आलम यांचा संबंध, महादजी शिंदे यांचे बादशहाच्या दरबारातील वर्तन आणि त्यांचा दिलदार स्वभाव यावर प्रकाश पडतो. या काळात शहा आलम बादशहा यांची दैन्यावस्था पराकोटीला पोचली होती. अशा परावलंबी परिस्थितीतसुद्धा आपला पोकळ डौल कायम ठेवण्याची केविलवाणी धडपड या कथेत दिसते.विशेष म्हणजे सर्व सत्ता महादजी यांच्या हातात असून सुद्धा रोजच्या वर्तनात महादजी बादशहाचा योग्य तो मान राखीत.महादजी यांनी बादशहाला वरचेवर पैसे पुरवावे तेव्हा कुठे बादशहाचे दैनंदिन काम चालायचे. त्यामुळेच बादशहा वेळोवेळी महादजी शिंदे यांची मनधरणी करीत असे. याचे एक नमुनादाखल उदाहरण म्हणजे महादजी शिंदे यांनी बादशहाला मूल्यवान वस्त्रे पाठवली होती. यावेळी बादशहाची एक आवडती मुलगी होती तिच्या पसंतीची वस्त्रे त्यांत नव्हती. मग बादशहाने महादजी यांच्या वकिलाला अप्रत्यक्षरीत्या सुचवून म्हंटले की 'पटेलांना माहिती आहे की माझी मुलगी मिंयासाहेब हिच्यावर माझे किती प्रेम आहे. ते तिच्याकरिता चांगली वस्त्रे वेगळी पाठवतील असे दिसते.' महादजी शिंदे यांच्या कानावर हे बोलणे जाताच शहा आलम बादशहाचा गर्भित इशारा उमजून त्यांनी बादशहाच्या आवडत्या कन्येसाठी उंची वस्त्रे तात्काळ पाठवली.(महादजी शिंदे यांना प्रेमाने 'पाटीलबोवा' असे संबोधले जात असे).
कथानकाचा कालखंड : 'वकाये आलमशाही या दैनंदिनीतील कथानकाचा कालखंड आहे २५ नोव्हेंबर १७८४ ते १५ जानेवारी १७८५ पर्यंत. स्थळ: महादजी शिंदे ज्या ज्या ठिकाणी मुक्काम करीत ती स्थाने.
कथेतील वेचक प्रसंग, निवडक घटना व किस्से:
१.शुक्रवार(नोव्हेंबर)१७८४:माधवराव बहादूर शिंदे उर्फ पटेल हे दक्षिणी सरदारांचे प्रमुख आहेत आणि माळव्याहून बादशाही कारभाराचा बंदोबस्त करण्याकरिता आले आहेत. सेनापती अफराबासियाखान याच्या वधाची भीती सर्वांच्याच मनावर असल्याने त्यांनी विचारपूर्वक धोरणाने व सावधगिरीपूर्वक आपली माणसे पाठवली. हेतू हा की ,शाही छावणीचे रक्षण व्हावे आणि परवानगीवाचून कुणाचीही ये जा चालू राहू नये. यानंतर (समक्ष जातीने) हजर होऊन त्यांनी बादशहाना मुजरा केला. युद्धामध्ये त्यांच्या पायाला जखम झाली होती.त्यामुळे त्यांना उभे राहणे जमत नव्हते म्हणून बादशहाने त्यांना आसनावर बसायची सूचना केली.नंतर त्यांच्यात दोन घटिका खलबते झाली.
२.मंगळवार१७८४: आज थंडी कडाक्याची होती. पटेलांनी काही रजया व गरम कपडे पाठविले होते,ते साहित्य सेवकांमध्ये वाटून टाकण्यात आले.मुक्कामावरून कूच करावे असे त्यांचे प्रथम ठरले होते, पण पटेलातर्फे विनंती करण्यात आली की, अंबाजीची(इंगळे) बायको बाळंत होऊन तिला मुलगा झाला आहे.तिला प्रवासाचे श्रम होतील,काही दिवस कूच थांबवावे. तेंव्हा बादशाहने म्हंटले उत्तम. अखबारवरून (बातम्यातून)बादशहाना कळले की,पाटीलबावांनी अफराबासियाखानचा कारभारी नारायणदास यांजकडून हिशेबाचे कागद मागवले आहेत.भरतपूरचा राजा रणजितसिंह याच्या वकिलास बजावण्यात आले की,वचन दिल्याप्रमाणे खंडणी भरली नाही तर भरतपूरचा किल्ला जमीनदोस्त करण्यात येईल.जयपूरकरांनाही तशी तंबी देण्यात आली.दिल्लीच्या बातम्यांवरून असे कळते की,शिखांनी शहराची नाकेबंदी केली आहे. धान्याची नेआण बंद झाल्याने शहरात अन्नाची दुर्दशा आहे. नवाब नाझर आणि सैफुदुल्ला हे परिस्थितीला तोंड देत आहेत. हे सारे ऐकल्यावर बादशहा उद्गारला,'परमेश्वराची मर्जी अशीच दिसते .मग (आपण) तरतूद आणि काळजी करणे व्यर्थ आहे.’
३.रविवार तारीख१४नोव्हेंबर१७८४:पाटीलबोवांना मुख्त्यारीची वस्त्रे द्यावी असे ठरले होते पण शिंद्यांचे वकील आप्पाजी खंडो आणि आनंदराव नरसा यांनी विनंती केली की,आजचा मुहूर्त बरा नाही. त्यावर बादशहा म्हणाले,'आमची इच्छा त्यांना लवकर वस्त्रे द्यावीत अशी आहे.पण हरकत नाही. आणखी एखादी वेळ ठरवावी. '
पाटीलबोवांच्या पदरी असलेला सुप्रसिद्ध बिनकार महंमद जमान याने बादशहाच्या दरबारात येऊन तंबोरा,सतार,बीन,सारंगी इत्यादी वाद्ये उत्कृष्टपणे वाजविली. त्यामुळे बादशहा खुश झाले आणि त्यांनी त्याला दुशाला बक्षीस दिला.
४.बुधवार,तारीख१७नोव्हेंबर१७८४:आज पाटीलबोवा,राजा प्रतापसिंह माचेरीवाला (अलवार),हिम्मतबहाद्दर,राजा नारायणदास इत्यादी मंडळी शहा आलम पातशाहाच्या भेटीस आली होती.बादशहांनी सवाई माधवराव (पेशवे) करीता कंठा,शिरपेच,ढाल तलवार, माहीमतराब,डंका,निशाण इत्यादी देऊन ‘मुख्त्यारउल्मुल्क’ हा किताब दिला. (किताबाचे) सर्व सामान (वस्तू )पाटीलबोवांच्या हवाली करण्यात आल्या.पाटीलबोवानी आनंदात आपल्या मुक्कामावर पोचल्यावर तोफांचे आवाज काढले.(प्रथेनुसार) या समयी हिम्मतबहादूर आणि नारायणदास यांनी पाटीलबोवाला नजराणे दिले.
५.शनिवार,४ डिसेंबर१७८४: आज संध्याकाळी बादशहांनी पाटीलबोवांच्या कागदपत्रावर (हुकूमनाम्यावर ) सही केली. त्यानुसार शहा आलम यांनी आज्ञा केली की ,आम्ही पाटीलबुवांना सल्तनतीचे मुखत्यार केले आहे. त्यावेळी (तेथे उपस्थित असलेल्या) महादजी शिंदे, राणेखान भाई, मिर्झा रहीम बेग, हिम्मतबहादूर, राजा नारायणदास इत्यादींनी (मान्यवरांनी) बादशहाला मुजरा केला. (त्या सर्वांची) बराच वेळ खलबते झाली. पाटीलबुवाना बादशहाने म्हंटले, 'आम्हाला परगणे ,महाल इत्यादींशी काहीं कर्तव्य नाही. अवर्षण आणि बंड याजमुळे त्यांचे उत्पन्न व्यवस्थित येत नाही. तुम्ही जाणे व मुलुख जाणे. मला नक्त रक्कम मात्र देत चला.' या प्रसंगी शहा आलमकडून महादजी शिंदे यांना पुढील पदव्या देण्यात आल्या:- “मुख्तारुलमुक वकीले मुतलक, उमदातुल्मरा फर्जंद आलीजाह, महाराजाधिराज श्रीनाथ माधवराव सिंधिया बहादूर मन्सुरजमान'. दिल्लीच्या सम्राटाकडून असे किताब या पूर्वी हिंदुस्थानात कोणालाच मिळाले नव्हते.
६.बुधवार,तारीख २४डिसेंबर१७८४: बादशहास कळविण्यात आले की, हुजुरांच्या खर्चाकरिता पाटीलबुवानी आज एक लाख रुपये खजिन्यात जमा केले आहेत. यावर बादशहाने संतोष होऊन उद्गार काढले की,इतके पुरे,यापेक्षा जास्त (पैशाची मागणी करणे) म्हणजे हावरटपणा होईल.त्याच दिवशी संध्याकाळी महादजीकडील वरिष्ठ अधिकारी अप्पाजी खंडोजी व आनंदराव नरसी बादशहाच्या दरबारी हजर झाले. त्या दिवशी पाटीलबुवांच्या गुणगौरवार्थ बादशहांनी स्वतः कविता रचल्या होत्या. त्या कविता पाटीलबुवांपाशी पोहोचवण्याकरिता पातशाहांनी अप्पाजी खंडोकडे दिल्या. पातशाहांनी केलेल्या काव्यातील एक ओळ होती:-"माधो, ऐसी किजियो, सब की तुझको लाज"
७.तारीख नक्की माहित नाही. आज पाटीलबुवा (महादजी शिंदे) शहा आलम २ यांच्या दरबारात आले. बादशहाच्या स्तुतीपर त्यांनी रचलेल्या कविता त्या शहा आलम यांना वाचून दाखविल्या. दिल्लीतील उपद्रव शांत करण्यासंबंधी बादशहांनी पाटीलबोवाना सांगितले. त्यावर पाटीलबावा म्हणाले ,"जयपूरचे राजकारण आटोपल्यावर आम्ही त्याची व्यवस्था करतो."
८.साल १७८४,शहा आलम यांचा मुक्काम रामगढ:बादशहाची मुलगी मिंयासाहेबा हिची तब्येत बरोबर नसल्यामुळे ते काळजीत आहेत. अशा वेळी मेंढासिंग नावाचा शिंद्यांचा एक अधिकारी होता. धर्माभिमाने प्रेरित होऊन त्याने बादशाही लष्करातील कसायांना गोवध करू दिला नाही आणि कसायांना मारहाण करविली. त्यावेळी शहा निजामुद्दीन हा बाद्शाहातर्फे तक्रार घेऊन पाटीलबुवांच्याकडे गेला आणि त्यांच्याकडे मेंढासिंग याने केलेल्या मारहाणीबद्दल तक्रार केली. पाटीलबुवानी मेंढासिंग याला तंबी दिली आणि बादशहांना विनोदाने सांगितले की,"बोलून चालून त्याचे नाव मेंढासिंग आहे, कसायांच्याबद्दल त्याला भीती असणे साहजिकच आहे कारण त्याला वाटले असेल की ते आपल्याला कदाचित वधस्थानाकडे नेतील म्हणून त्याने अशी वागणूक केली असेल." ही शिंद्यानी या प्रसंगी केलेली कोटी ऐकून बादशहा खुश झाले आणि त्यांनी सुफी सरमदची पुढील ओळ म्हंटली :-'प्रेमाच्या कत्तलखान्यात सज्जनांचा बळी जातो.' त्या दिवशी दरबारी लोकांनी तक्रार स्वरूपात (चहाडी )बादशहाला सांगितले की पाटीलबोवांच्या पदरी असलेल्या गवयांनी दरबारात रुबाईचे गाणे म्हंटले आहे. "नाकूस शवि बुलंद आवाजा शुदा, सद शुक्र के दिने हिंदियाना ताजा शुदा!! दर वारगहे पटेल आलम परवर, सरहाये म्लेंछ ताजे दरवाजा शुदा !!" याचा भावार्थ असा की 'धन्य परमेश्वराची! पाटीलबोवांच्या काळात हिंदूंचा धर्म पुन्हा जिवंत झाला आहे. शंखाचा ध्वनी पुन्हा गर्जत आहे. '
९.दिल्लीहून बातमी आली की,दिल्लीचा अधिकारी सैफद्दौल्ला यांनी शिखांना राखी (चौथाईसारखा एक शेतसाऱ्याचा प्रकार) देवविण्याचे कबुल केले आहे.त्यामुळे दिल्लीत धान्य स्वस्त झाले आहे. यावर (बादशहाची) आज्ञा झाली की,'युद्धाचा जो निर्णय करतो तो (खरा) मर्द म्हणावा. सैफद्दौल्ला या शब्दाचाच अर्थ म्हणजे दौलतीची समशेर! ती त्याने म्यानात ठेऊन दिलेली दिसते.पाटीलबुवांची दक्षिणी पथके पाठवून मी बंडखोरांचा निकाल लावीन.मला माहिती आहे की, वारा येईल तशी पाठ फिरविण्याची वागणूक सैफद्दौल्ला करीत आहे. हरकत नाही. परमेश्वराची कृपा माझ्यावर,माझे नशीब माझ्याबरोबर (आहे) व पाटील (महादजी शिंदे) माझ्या साथीला आहेत. मग जग (माझ्या)विरुद्ध असले तरी काय (मला भीती कसली)?'
१०.१७८४ मधील ही घटना असावी. महादजी शिंदे यांचा महेंबाच्या (?)किल्ल्याच्या वेढ्याचे काम चालू होते. बालाहेडीवर(?) हल्ला चालू होता. त्या सुमारास महादजी शिंदे शहा आलम २ यांच्या तळावर आले. त्या वेळेस बादशहांनी स्वतः महादजींच्या वर एक हिंदी दोहा रचला होता. तो त्यांनी सुवर्ण अक्षरांनी लिहून घेऊन पाटीलबोवांच्या पागोट्यावर खोचवला. तो दोहा पुढील प्रमाणे होता. "मुल्क माल सब खोयेकर, पडे तुम्हारे बस! माधो ऐसी किजीये, आवो तुमको जस !!" या ओळींचा मतितार्थ असा की ‘देश आणि संपत्ती गमावून आम्ही तुमच्या आश्रयार्थ आलो आहोत. माधो (महादजी) तुम्ही असे काही महान कार्य करा जेणेकरून तुम्हाला लौकिक लाभेल.’ यानंतर सदाशंकर नागर मुन्शी, तसेच पाटीलबुवांचा पुतण्या इत्यादींनी बादशहाच्या प्रशस्तिपर कवने म्हंटली. त्यात महादजीच्या गौरवार्थ पण कवने होती.
११.बादशहाचा राजपुत्र अमीनुद्दौल्ला जलिलुद्दीनखान बहादूर उर्फ मिर्झा मेंढु हा त्याच्या तोफखान्याचा मुख्य होता, लष्करातील तंबू कोठे उभा करावा याबद्दल त्याच्यात आणि शिंद्यांचा एक अधिकारी मेंढासिंग यांच्यात मतभेद झाले. या प्रसंगी बादशहाने दोघांची समजूत काढली आणि त्या वेळेस विनोदाने म्हंटले की, एकाचे नाव मेंढु तर दुसऱ्याचे मेंढा. मी मनात आणले असते तर दोन मेंढ्यांचे युद्ध पाहावयास मिळाले असते
१२.(राजस्थानातील भरतपूर जवळील) डिगचा किल्ला जिंकून घेतल्यावर तो पाटीलबुवाना द्यावा असे बादशहाच्या दरबारात ठरले. धन्य त्या बादशहाची! आपले अवघे राज्य देऊन टाकले. स्वतःच्या अंगावर वस्त्रे बादशहाची पण हातात मात्र भिक्षापात्र, असा प्रकार आहे.
१३.१७८५च्या जानेवारी महिन्यातील संक्रांतीच्या सणादिवशी पाटीलबुवानी संक्रांतीनिमित्त (बादशहाकडे) तिळगुळ पाठविला. जनानखान्यात जाऊन बादशहांनी स्वतः तिळगुळ खाल्ला आणि आपल्या बेगमांना वाटला.त्या समयी एका बेगमेने म्हंटले," (खावंद) अपराधाची क्षमा असावी. हिंदुस्थानात अशी रूढी आहे की गुलाम किंवा दासी किंवा एखादा घोडा कोणी विकत घेतला तर त्यांना तिळगुळ खाऊ घालतात. त्याच्यामागे हेतू असा की त्यांनी आपल्या मालकाशी निष्ठापूर्वक वागावे. आज जहाँपन्हानी पाटीलबुवांचा तिळगुळ खाल्ला म्हणजे याचा अर्थच असा होतो की पाटीलबुवांशी तुम्ही यापुढे निष्ठेने वागणे अध्याहृत आहे." यावर बादशहा त्या बेगमेची समजूत घालण्याच्या सुरात म्हणाले," होय खाल्ला. आम्ही तिळगुळ खाल्ला. आता निष्ठेबद्दल म्हणाल तर हदीस (पैगंबराच्या आठवणी आणि आख्यायिका याबद्दलचा एक धार्मिक ग्रंथ)मध्ये म्हंटले आहे की दास आणि गुलाम यांच्याकडून निष्ठेची कधी अपेक्षा बाळगू नये. म्हणून तुम्ही केलेला निष्ठेचा उल्लेख या ठिकाणी व्यर्थ आहे."
१४.जानेवारी १७८५ मधील एक प्रसंग: भरतपूरपासून काही अंतरावर असलेला डिगचा किल्ला महादजी शिंद्यांच्या हाती १६ जानेवारी १७८५ रोजी आला. त्या विजयाप्रीत्यर्थ त्या किल्ल्याच्या मुख्य दरवाज्याची एक सोन्याची किल्ली आणि एकशे एक मोहरा महादजींनी बादशहाला नजर केल्या. बादशहाने आनंदाने मोहरा स्वीकारल्या आणि सोन्याची किल्ली व सोबत शेला,पागोटे,तुरा इत्यादी मानाच्या गोष्टी पाटीलबुवाना बहाल केल्या.
१५.दुसऱ्या एका प्रसंगाचे वर्णन करताना प्रेमकिशोर लिहितो; शहाआलम बादशहा काही कारणावरून भयंकर रागावले आणि कालवेळचे भान न राहून दरबारातील एक अमीर हाफिज अब्दुल रहमानकडे पाहून गरजले,"आता तुम्ही पहाच. दक्षिणेकडील मराठ्यांकडून मी तुमची हाडे कशी नरम करवितो ते." यावर हाफिज रहमान प्रत्युत्तरार्थ बादशहाला म्हणाला ," आपण जे म्हणता ते ठीक आहे,पण आपण जे करू इच्छिता ते स्वतः का करत नाही? शेवटी ते लोक परके आहेत आणि आम्ही आपले आहोत. आपण त्यांच्या इतक्या आहारी गेला आहात की तुम्हाला दुसऱ्यास रागवायचे असेल तरी त्यांचा आधार घ्यावा लागतो. त्यांच्या जोरावर आपले राज्य चालू आहे."
सारांश: प्रेमकिशोरच्या दैनंदिनीवरून मोंगल बादशहा शहा आलम याची स्थिती त्यावेळेस किती केविलवाणी झाली होती व तो महादजी शिंदे यांच्या आहारी गेला होता हे दिसून येते. प्रेमकिशोर त्या सुमारास बादशहाच्या दरबारात स्वतः उपस्थित होता त्यामुळे वरील घटना चक्षुर्वै सत्यम असाव्यात असे समजायला हरकत नाही. त्याच्या नोंदीवरून महादजीचे व मराठ्यांचे दिल्ली दरबारातील पूर्ण वर्चस्व दिसून येते. अशाही परिस्थितीत बादशहाच्या दरबारी अनेक कवी आणि विद्वान साहित्यिक जमा झालेले दिसतात. शहाआलम भोगलोलुप होता, वय वाढले तरी नवीन बेगमा करण्याचा त्याला शौक कमी झाला नव्हता.१७७५ पर्यंत त्याला सत्तावीस मुले झाली होती व त्यांच्या संख्येत सारखी भर पडत होती. तात्पर्य काय तर ही कथा आहे दिल्लीचा बादशहा आणि मराठ्यांचे सेनापती महादजी शिंदे यांच्यातील परस्परातील मैत्रीच्या ओलाव्याची, ही गोष्ट आहे एका केवळ नशिबाचा वरदहस्त म्हणून सम्राट झालेल्याची तर दुसरा आपल्या मनगटाच्या बळावर अवघा हिंदुस्थान पादाक्रांत करायला निघालेल्या एका निधड्या शूराची, ही कहाणी आहे एक राजा जो स्वभावाने अत्यंत लहरी आणि भौतिक विलासात रममाण झालेल्याची तर दुसरा रात्रंदिन सतत राजकारणातील डावपेचात बुडून गेलेल्याची, हे संबंध आहेत एक पूर्णतः परावलंबी व हतबल पुरुषाची तर दुसरा महत्वाकांक्षी व दिलदार सेनानींची! एकाच काळातील हे दोन वेगळे पुरुष परंतु परस्पर विरोधी व्यक्तिमत्वे. तर मित्रानो, असा मैत्रीचा घटनाक्रम पाहिल्यावर शोलेतील गाण्याचा ओळी पुन्हा आठवतात. ''ये दोस्ती हम नही छोडेंगे".
_____________________________________________________________________
संदर्भ: समग्र सेतूमाधव पगडी- भाग २ संपादन: प्रमोद करजगी
No comments:
Post a Comment