विनोद जाधव एक संग्राहक

Thursday 22 July 2021

उत्तरहिंद मराठे भाग - ०१

 Post by

निशांत कापसे

उत्तरहिंद मराठे
भाग - ०१
१८ व्या शतकातील अफगाणिस्तान. अरबी , दारी , पश्तो बोलणाऱ्या पठाणांचा , आणि टोळधाडी करणाऱ्या लुटारूंचा भरणा असलेला प्रदेश
नादिरशहाच्या नेतृत्वाखाली या पठाणांनी पुर्वेकडील सुबत्ता पहिल्यांदा पाहिली होती. वेळ मिळेल तेव्हा ती ओरबाडली होती.
पाच नद्यांच्या ईश्वरी आशिर्वादाने सधन झालेला पंजाब आणि त्याच्या शेजारी असलेल्या सरहिंदच्या प्रांताला जणू एखादा शाप मिळावा तशा या टोळ्या मनमुरादपणे येऊन लूट करू लागल्या. नादिरशहाच्या मृत्यूनंतर अब्दालीने सर्व पठाणांना एकत्र करून काबुल येथे स्वतःला राज्याभिषेक करवून घेतला. मुळात पंजाब व सरहिंदच्या प्रांतातले शिख हे कडवे शिपाई. तलवारीला देव माननारे. पण या रोजच्या जाचाला तेही कंटाळले होते. याचा काहीतरी बंदोबस्त करणे आवश्यक होते.
"अहत तंजावर ते तहत पेशावर"
१७५८ साली मराठे अटकेपार पोहोचले होते. रघुनाथरावांच्या नेतृत्वाखाली मराठी सीमा थेट अफगाणिस्तानाच्या सिमेपर्यंत जाऊन भिडल्या होत्या. " हर हर महादेव " चा जयघोष अफगाणिस्तानापर्यंत जाऊन भिडला. अफगाणिस्तान चा वृक्ष प्रदेश पाहून मराठी मनगटं शिवशिवली. पण या सर्वांची सुरुवात खूप अधी झाली.
शुक्रवार दि. २० फेब्रुवारी १७०७. औरंगाबादजवळील भिंगार या गावी औरंगजेबचा मृत्यू झाला. त्याचे प्रेत खुल्ताबाद जवळील गुरुच्या कबरीजवळ दफन करण्यात आले. परंपरेप्रमाणे त्याच्या मुलांमध्ये यादवी निर्माण झाली. या सर्वात मुहम्मद मुअज्जम याची सरशी झाली. त्याने त्याचे दोन भाऊ आझमशहा आणि कामबक्ष यांना ठार करून दिल्लीच्या गादीवर बसला आणि त्याने स्वतःला बाहादुरशहा असा किताब धारण केला. मराठ्यांमध्ये अंतर्गत कलह निर्माण व्हावे म्हणून त्याने छत्रपती संभाजी महाराज पुत्र शाहू यांना कैदेतून मुक्त केले. शाहूंनी महाराष्ट्रात येण्याआधी महाराणी ताराबाईंना पत्र लिहिले की " आम्ही येत आहोत ". येथून ताराराणींनी पुढचे राजकारण खेळण्यास सुरुवात केली. त्यांनी शाहूंना तोतया ठरविले. इ.स. १७०८ साली खेड या गावी शाहू व ताराबाईंच्या पक्षात तुंबळ लढाई झाली ज्यात शाहूंचा विजय झाला. शाहूंनी स्वतःला राज्याभिषेक करवून घेतला. याच सुमारास दिल्ली दरबारात एक राजकारण कलाटणी घेत होते.सय्यद अब्दुल्ला आणि सय्यद हुसैन अली या दोघा सय्यद बंधुंचा प्रभाव दिल्ली दरबारात वाढू लागला , बादशहा फक्त नामधारी प्रमुख राहिला. इकडे दक्षिणेत शाहू आपले राज्य स्थिर करत असतानाच एक वाईट घटना घडली. मराठ्यांचे सेनापती धनाजी जाधवराव यांचे निधन झाले. पुढचे सेनापती पद त्यांचेच पुत्र चंद्रसेन जाधवराव यांना मिळाले. शाहू महाराज बाळाजी विश्वनाथ यांची हुशारी जाणून होते. त्यांच्या याच हुशारी आणि मुसद्दीपणामुळे त्यांना शाहूंनी ' सेनाकर्ते ' हा किताब देऊ केला.
१७१२ साली मुअज्जम चा मृत्यू झाला. जहांदर शहा पुढचा बादशहा बनला पण फक्त नावाला. याच काळात या राजकारणात एका कलीचा प्रवेश होत होता , चिन किलीच खान उर्फ निजाम - उल - मुल्क.
१७१३ साली बाळाजी विश्वनाथांना शाहू महाराजांनी पेशवाईची वस्त्रे देऊ केली. शाहूंचे आधीचे पेशवे होते बहिरो पंत. पण कान्होजी आंग्रे यांनी आपला नुर पालटला. त्यांनी ताराबाईंचा पक्ष स्वीकारला. त्यांना शाहूंच्या पक्षात आणण्यासाठी बहिरो पंत गेले होते पण कान्होजींनी त्यांनाच कैद केले. त्यामुळे शाहूंनी बाळाजी विश्वनाथ यांना पेशवे केले. १७१८ साली जहांदर शहा मेला आणि फार्रखसियार नवा बादशहा बनला. सन १७१९ साली बाळाजी पंत दिल्लीला गेले. या मोहिमेत बाळाजी विश्वनाथांनी मराठ्यांच्या स्वराज्याला बादशहाची मान्यता मिळवली , शिवाय दक्षिणेतील सहा सुभ्यातून सनदा मिळवण्याची परवानगी बादशहाकडून मिळवली. दि. ०२ एप्रिल १७२० या दिवशी सासवड येथे बाळाजी विश्वनाथ यांचे निधन झाले. दि. १७ एप्रिल १७२० या दिवशी महसुर्ला या गावी शाहू महाराजांनी बाजीरावांना पेशवाईची वस्त्रे दिली.
ऑक्टोबर १७२४ साली साखरखेडा येथे एक लढाई झाली. ज्या लढाईत निजामाने बाजीरावांना शहामतपनाह असे म्हटले. बाजीरावांची किर्ती सर्वदूर पसरली ती पालखेड पासून. इतिहास एका प्रतापसुर्याची वाट पाहत होता , आणि निजाम आपला लाजीरवाणा पराभव स्वीकारण्यासाठी पुण्याच्या दिशेने पाऊल टाकत होता
क्रमशः
संदर्भ
१) The Era Of Baji Rao - an account of the empire of the Deccan - Uday kulkarni
२) पेशवाई - महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सुवर्णपान - कौस्तुभ कस्तुरे
३) पेशव्यांची बखर
४) मराठी रियासत - गो.स. सरदेसाई
५) इतिहासाच्या पाऊलखुणा - भाग - ०१
१८ व्या शतकातील अफगाणिस्तान
( फोटो स्त्रोत - गुगल )

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...