विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday 21 July 2021

प्राचीन बौद्ध केंद्र व सांस्कृतिक स्थळ - पवनी (जिल्हा - भंडारा)

 








प्राचीन बौद्ध केंद्र व सांस्कृतिक स्थळ - पवनी (जिल्हा - भंडारा)

नागपूरच्या आग्नेयेस ८५ किमी अंतरावर वैनगंगा नदीच्या उजव्या तीरावर पवनी हे प्राचीन नगर वसले आहे. शुंग-सातवाहन काळातील बौद्ध धर्माचे केंद्र व वाकाटक काळातील एक महत्त्वपूर्ण सांस्कृतिक स्थळ म्हणून पवनी प्रसिद्ध आहे. सर अलेक्झांडर कनिंगहॅम (१८७३-७४), हेन्री कझिन्स (१८७९), सर जॉन मार्शल (१९२६), एच. हरग्रीव्ह्ज (१९२७) यांनी येथील पुरावशेषांबद्दल विस्ताराने लिहिल्याचे आढळते. या स्थळाचे पुरातत्वीय महत्व लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने पवनी किल्ला व आसपासचे पुरावशेष संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले. भारतीय पुरातत्त्व विभागाचे मध्य भारतातील सहाय्यक पर्यवेक्षक जे. सी. चंद्रा यांनी पवनी येथे मोठ्या प्रमाणावर पुरावशेष, विशेषत: स्तूपाचे अवशेष असावेत असे आपल्या पत्रव्यवहारांत नमूद केले होते (१९३६). विदर्भातील पवनीची प्राचीनता तेथे आढळणाऱ्या पुरावशेषांव्यतिरिक्त तेथील क्षत्रप रुपिअम्म याचा लेखयुक्त छायास्तंभ आणि वाकाटक राजवंशातील दुसरा प्रवरसेन याच्या ताम्रपटामुळे अधोरेखित झाली. प्राच्यविद्यासंशोधक वा. वि. मिराशी यांनी येथील छायास्तंभ उजेडात आणला (१९५७), तर ज्येष्ठ संशोधक वि. भि. कोलते यांनी येथील ताम्रपट प्रकाशित केला (१९६९).
पवनी येथील जगन्नाथ टेकाडाच्या भोवती नांगरटीमध्ये एका प्रचंड यक्षप्रतिमेचा अर्धा भाग, मौर्यकालीन अक्षरवटिकांचा उत्कीर्ण लेख असलेली स्तूपाच्या कठड्याची शीर्षशीला इ. प्राचीन बौद्धस्तूपाचे अवशेष अचानकपणे निदर्शनास आले. भारतीय पुरातत्त्व खाते व नागपूर विद्यापीठ यांनी संयुक्तपणे पुरातत्त्वज्ञ जगतपति जोशी व शांताराम भालचंद्र देव यांच्या मार्गदर्शनाखाली येथे उत्खनन केले (१९६९-७०). उत्खननाकरिता जगन्नाथ मंदिर टेकडी, चांडकापूर (सुलेमान टेकडी) व हरदोलाला अशा तीन टेकाडांची निवड करण्यात आली.
जगन्नाथ मंदिर टेकाडाच्या उत्खननात विटांमध्ये बांधलेल्या एका प्रचंड स्तूपाचे (४१. २ मीटर व्यास) अवशेष उपलब्ध झाले. येथील अष्टकोनी स्तंभांच्या तीन बाजूंवर बौद्धधर्माची प्रतीके (स्तूप, बोधिवृक्ष, चैत्य व भद्रासन), भक्तगण, नाग मुचुलिंदाची कथा व फुलांची नक्षी कोरलेली शिल्पे व आडव्या सूचीवर प्रदानलेख आढळून आले. सांची येथील स्तूपापेक्षा या स्तूपाचा परीघ मोठा असून तोरणावर शुंगकालीन शिल्पे कोरलेली आहेत. या स्तूपाचा काळ शुंगशैली, लेख व शिल्पे यांनुसार इ. स. पू. तिसरे शतक ते इ. स. तिसरे शतक असा ठरतो. या स्थानाला तत्कालीन समाजातील सर्व स्तरांतील समुदायाकडून आश्रय लाभला होता, असे वेदिकेवरील प्राकृत भाषेतील ब्राह्मी लिपीत कोरलेल्या अभिलेखांवरून ज्ञात झाले. चांडकापूर (सुलेमान टेकडी) येथे सुद्धा सातवाहन काळातील स्तूपसमूहाचे अवशेष आढळून आले. पुरातत्त्वज्ञ अमरेंद्र नाथ यांनी भारतीय पुरातत्त्व विभागातर्फे पवनी येथील प्राचीन निवासी वसाहतींचा शोध घेण्यासाठी १९९४ मध्ये उत्खनन केले आणि इ. स. पू सहावे शतक (मौर्यपूर्व काळ) ते इ. स. सहावे शतक (वाकाटक काळ) यादरम्यान तेथे समृद्ध नागरी वसाहतीचे अवशेष आढळल्याचे नमूद केले आहे.
(लेखन व संपादन - अमित भगत)

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...