मराठेशाहीतील मराठा आरमार
म रा ठयां चे आ र मा र. - मराठेशाहींत आरमाराची चांगली जोपासना होत असून तें अत्यंत वरिष्ठ होतें हें आतां बहुतेकांनां विदितच आहे. मराठयांच्या आरमाराचा इतिहास आंग्रे, घुळप, सांवतवाडीकर वगैरे घराण्याखाली येणार असल्यानें या ठिकाणीं फार त्रोटक असा इतिहास घेतला आहे. तथापि त्यावरून या युध्दांगाची नीटशी कल्पना येण्यास व जिज्ञासा वाढण्यास अडचण येणार नाहीं.
इ. स. १६६१ मध्यें छत्रपति शिवाजी महाराज यांनीं मराठयांच्या आरमाराची प्रथम स्थापना केली. हबशी लोकांचा पाण्यांतील किल्ला जो जंजिरा तो जिंकून घेण्याकरितां या आरमाराची आवश्यकता मराठयांस उत्पन्न झाली, व त्यांनीं त्यावेळीं ते उभारलें असें दिसून येतें. त्यांनीं प्रथम गुराबा, तरांडी, गलबतें, शिबाडें, पगार, मचवे अशीं निरनिराळया प्रकारचीं जलवाहनें तयार केलीं. नंतर शिवाजी महाराजांनीं कोंकणवर चाल करून वाडीकर सांवतांपैकीं तानाजी सांबत व रामदळवी यांस आपल्या आरमारावर अधिकारी नेमलें. इ. स. १६६४ मध्यें सिंधुदुर्ग जंजिरा बांधला व कुलाबा, सुवर्णदुर्ग व विजयदुर्ग हे किल्ले सुधारून तेथें जहाजें बांधण्यास सुरुवात केली. इ. स. १६६५ मध्यें शिवरायांनी कारवारपर्यंत कोंकण किनारा आपल्या आरमाराच्या ''जोरावर जिंकून घेतला. या वेळीं शिवरायांच्या आरमारांत फ्रिगेट्स'' म्हणजे ३० पासून १५० टन वजनाचीं व एक डोलकाठीचीं जहाजें ८५ होती. तीन डोलकाठयांची मोठालीं जहाजें तीन होती. ह्यानंतर १६७३ मध्यें मोठीं लढाऊ गलबतें ५७ झालीं व इ. स. १६७९ मध्यें ती ८६ पर्यंत वाढलीं. ह्याप्रमाणें शिवरायांचे आरमार वाढत गेलें. त्या आरमारावर शिवाजीचे मुख्य अधिकारी इब्राहिमखान, दौलतखान, दर्यासारंग, मायनाक भंडारी वगैरे होते. त्यांनीं आरमाराचें काम उत्तम प्रकारें करून मराठयांचें नांव दर्यायुध्दामध्यें गाजवून सोडिलें. या सालीं खांदेरी बेटावर शिवाजीचें आरमार चालून गेलें. त्याच्या आरमाराचा मुख्य हेतु कोंकण किनारा परशत्रूंपासून रक्षण करण्याचा असे. आरमाराच्या सोयीसाठीं त्यानें १३ जंजिरे बांधिले. कोणत्याहि राजकीय आरमारास मराठयांचें या वेळचें आरमार भारी होतें, असें इंग्रज इतिहासकारांनींहि कबूल केलें आहे. शिवाजी महाराजांच्या मागून संभाजीनें आपल्या आरमारानिशीं जंजिऱ्यावर स्वारी केली पण त्यांत त्यास यश आलें नाहीं. राजारामाच्या कारकीर्दीत सिधोजी गुजर हा मराठयांच्या आरमारास अधिपति झाला. त्याच्या हाताखालीं कान्होजी आंगरे हा दर्यावर्दी युध्दामध्यें पुरा कुशल सरदार पुढें प्रसिध्दीस आला. राजारामानें त्यास 'सरखेल' हें पद देऊन मराठयांच्या आरमाराचें मुख्य आधिपत्य सांगितलें. कान्होजी आंगऱ्यानें मराठयांच्या आरमाराची अतिशय सुधारणा केली व इंग्रज, फिरंगी, फरासीस्ट आदिवरून सर्व परराष्ट्रीय लोकांस आरमाराच्या जोरानें नतिजा देऊन मराठयांची सत्ता समुद्रांत फार वाढविली. आंग्रयांच्या आरमारांत ह्यावेळीं ३०० टन वजन वाहण्याइतकीं मोठीं जहाजें असून त्यावर १६ पासून ३० पर्यंत लढाऊ तोफा होत्या. मोठया गुराबा १०, व लहान गलबतें ५० इतकें कान्होजीचें आरमार होतें. या आरमाराच्या जोरावर त्यानें परराष्ट्रीय जहाजांस हिंदुस्थानच्या पश्चिम किनाऱ्यावर मुंबईपासून कालिकतपर्यंत अगदीं फिरकूं दिलें नाहीं. भूमध्य समुद्रांतील 'अल्जेराईन्स' नामक चांच्याचें नांव ऐकतांच ज्याप्रमाणें तिकडील जहाजांचा थरकाप होतो, त्याप्रमाणें आग्रयांचें नांव ऐकतांच इकडील जहाजांचा थरकाप होत असे असे लो नांवाच्या इतिहासकारानें म्हटलें आहे. कान्होजी आंग्रयाच्या आरमाराची माहिती फार मनोरंजक आहे. त्याचा व इंग्रज गव्हर्नरांचा जो पत्रव्यवहार झाला होता, त्यावरून कान्होजी आंग्रे किती धूर्त व चतुर होता हें चांगलें दिसून येतें [कान्होजी आंग्रे पहा]. कान्होजींच्या मागून त्याचे पुत्र संभाजी, मानाजी व तुळाजी यांच्या कारकीर्दीत आंगऱ्यांच्या आरमाराला उतरती कळा लागली. या बंधूंमध्यें आपपसांत भांडणें झालीं त्यामुळें परकीयांस या भांडणाचा फायदा घेऊन पश्चिम किनाऱ्यावर चंचुप्रवेश करण्यास संधि मिळाली. कान्होजीचा मुलगा संभाजी ह्यानें ४०० टन वहनशक्तीचीं जहाजें केलीं. आपल्या खंबीर आरमाराच्या जोरावर त्यानें सर्व यूरोपियन राष्ट्रांस अगदीं जेरीस आणिलें; परंतु त्यांच्या गृहकलाहामुळें मराठयांच्या आरमाराचा नाश झाला. संभाजीच्या मागून तुळाजी हा विजयदुर्गाच्या आरमाराचा अधिपति झाला. त्यानें इंग्रजांचीं जहाजें पाडाव केलीं व त्यांस मनस्वी त्रास दिला. ह्याप्रमाणें तो पेशव्यांसहि जुमाननीसा झाला. तेव्हा पेशवे व इंग्रज एक होऊन त्यांनीं विजयदुर्गावर चाल करून तुळाजीच्या आरमाराचा फडशा पाडिला. इ. स. १७५६ मध्यें 'घेरियाची लढाई' म्हणून इतिहासांत जी लढाई प्रसिध्द आहे तीच ही होय. ह्या वेळीं तुळाजी आंग्रयांजवळ ७४ तोफांचें एक मोठें पाल, २० पासून ३० तोफांच्या ८ गुराबा आणि लहानमोठीं साठ गलबतें एवढें मोठें आरमार होतें. हिंदीमहासागरांतील तीन्ही यूरोपियन राष्ट्रास पराक्रमाच्या कामांत आंगरे यांनीं खालीं पहावयांस लाविलें असें खुद्द इंग्रज इतिहासकार डग्लस लिहितो. परंतु खुद्द पेशवेच विरुध्द झाल्यामुळें त्याच्या आरमाराचा फार नाश झाला ['आंगरे' पहा].
इ. स. १७५६ मध्यें आंगऱ्यांची आरमारी सत्ता नाहीशीं केल्यावर पेशव्यांनी विजयदुर्ग येथें स्वतःचे आरमार उभारलें. ह्या आरमारावर आनंदराव धुळप नामक एक रणशूर दर्यावर्दी सरदार मुख्य नेमिला होता. इ. स. १७६५ त आनंदराव धुळप यास जी पुढील प्रमाणें सनद दिली आहे तींत (थोरले माधवराव पेशवे यांची रोजनिशी) 'सुभा आरमार येथील बंदोबस्त एक हातीं जरूर जहाला पाहिजे. सरदारीचा बंदोबस्त तुम्हांकडे आहे. परंतु कारभाराचा बंदोबस्त एक हातीं नाहीं. दर्यामध्यें टोपीकरांची बदनजर; तेव्हां गहाळ माणसू दूर होऊन चांगल्या माणसांची जगजोड होऊन शिलशिला शिलेपोस असावा. आरमार जर्जर जहालें ओ, त्याची मरामत झाडून जहाली पाहिजे, '' इत्यादि मजकूर आहे. यावरून पेशव्यांचें आरमाराकडे किती लक्ष होतें हें दिसून येईल. आनंदराव धुळपानें इ. स. १७६४ पासून इ. स. १७९४ पर्यंत म्हणजे सुमारें तीसवर्षे मराठयांच्या आरमाराच्या सेनापतीचें काम केलें. ह्याच्या ताब्यांत लढाऊ सुमारें ५० मोठीं जहाजें असून त्यावर दोनतीन हजार सैन्य व तीनशें पर्यंत तोफा होत्या. ह्या लढाऊ जहाजांमध्यें जी जी प्रमुख जहाजें होतीं त्यांची नांवें अशीः- नारायणपाल, महादेवपाल, दत्तप्रसाद, आनंदीप्रसाद, शिवप्रसाद, गणेशप्रसाद, गंगाप्रसाद, दर्यादौलत, समशेरजंग, फत्तेजंग इत्यादि होतीं. ह्या प्रत्येक जहाजावर ३००-४०० पर्यंत हशम म्हणजे लढाऊ लोक होते. नारायणपालावर २८ तोफा व चार जुंबरे असत. ह्या आरमाराचा सालीना खर्च दीड दोन लाख रुपये पर्यंत होता. आरमार सुभ्याकडे एक स्वतंत्र महाल तोडून दिलेला असे. ह्या आरमाराचे सेनापति आनंदराव धुळप व त्यांचे बंधु हरबाजी धुळप जानोजी धुळप वगैरे शूर धुळप मंडळीं ह्यांनी दर्यायुध्दमध्यें फार वाहवा मिळविली व आपला दरारा समुद्रावर उत्कृष्ट प्रकारचा ठेविला. ह्या धुळपाप्रमाणेंच विचारे, सुर्वे, कुवेसकर, जावकर इत्यादि आरमारी सरदारांनीं फार शौर्य गाजविलें. आनंदराव धुळपाच्या शौर्याची हकीकत ग्रांटडफच्या इतिहासांत विशेष नाहीं. इ. स. १६८३ आनंदराव धुळपाचें आरमार व इंग्रज आरमार यांमध्यें लढाई होऊन इंग्रज आरमाराला हार खावी लागली. [आनंदराव धुळप पहा].
मराठयांच्या आरमाराची व्यवस्था व समुद्रांतील परकीय जहाजांवरील व व्यापारी जहाजांवरील कौलावण, मोहोरणावळ, वलवा, नजर, मिठारू, शिबाड व पैदास्त वगैरे अनेक बाबी लक्षांत घेण्या जोग्या आहेत. त्यांचा अभ्यास स्वतंत्रच झाला पाहिजे.
मराठयांचें आरमार असतांना कोकण पट्टीवर आपला अंमल बसविण्याची इंग्रजांनां छाती झाली नाहीं. मराठयांचें आरमार त्या वेळच्या स्थितीप्रमाणें उत्तमस्थितीप्रत पोंहोचलें असून मराठयाचें राष्ट्र दर्यावर्दी युध्दांत निष्णात होतें व त्या दृष्ट्रीनें त्यांच्यामध्यें काहीं उणीव नव्हती.
[वाङ्मय -मराठे व इंग्रज. पेशव्यांच्या रोजनिशीं. भा. इ. सं. मं. वार्षिक अहवाल. (शके १८३३) च्या अहवालांत धुळप यांच्या आरमाराची माहिती आहे.] आंगरे यांची हकीकत इतिहाससंग्रह पु. १ व मराठी रियासत, मध्यविभाग २ यांत सांपडेल. पारसतीस-मराठयाचे आरमार. केसरी ता. ९ फेब्रुवारी १९०४ ग्राँटडफ, भुं. गॅ - कुलाबा व जजिंरा.
No comments:
Post a Comment