विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday 20 July 2021

मानाजी आंग्रे

 




मानाजी आंग्रे

- कान्होजी आंग्र्यास गहिनीबाई नांवाच्या उपस्त्रीपासून झालेला मुलगा. सेखोजीच्या कारकीर्दीत जंजिर्‍यावर मोहीम झाली (१७३३) तींत मानाजी आरमार घेऊन जंजिर्‍यावर गेला व तेथें त्यानें सिद्दीच्या आरमाराचा पूर्ण पाडाव केला. सेखोजीच्या मरणानंतर याचा सावत्र भाऊ संभाजी, हा येसाजीकडे कुलाब्याचा व याच्याकडे आरमाराचा अधिकार सोंपवून सिद्दीवरील मोहिमेस गेला (१७३४). परंतु यांनां कारभार पहावयास लागून फार दिवस झाले नाहींत तोंच, मानाजीचें त्याच्या वडील भावाशीं भांडण होऊन त्यानें पोर्तुगीजांच्या मदतीनें कुलाबा हस्तगत केला, व येसाजीचे डोळे काढून त्यास बंदींत टाकलें. मानाजीच्या या कृत्याबद्दल त्याचें शासन करण्याकरितां, संभाजी कुलाब्यावर चालून आला, पण मानाजीनें राजमाची किल्ला बाजीरावास देऊन त्याची मदत मिळविली व संभाजीस परतवून लाविलें. तथापि संभाजीच्या भीतीमुळें कुलाब्यास रहाण्याचा मानाजीस धीर झाला नाहीं. तो स. १७३४ तच रेवदंडयास पोर्तुगीज हद्दींत जाऊन राहिला, व तेथून पेशव्याची व सातारच्या कारभारी मंडळाची मदत मिळविण्याची खटपट चालविली. स. १७३५ त बाजीराव मानाजीच्या मदतीस आला व वजारतमान असा नवीन किताब देऊन त्याची कुलाब्यास स्थापना केली. संभाजीनें त्याविरुध्द सातारच्या दरबारी खटपट केली परंतु तिचा कांहीं उपयोग झाला नाहीं. १७३५ सालीं बाजीराव पेशव्यानें जंजिर्‍याच्या सिद्दयावर स्वारी केली. तेव्हां मानाजी आपलें आरमार घेऊन त्याच्या मदतीस गेला होता.

पुढें १७३९ सालीं मानाजीनें समुद्राच्या बाजूकडून पोर्तुगीज लोकांचें दळणवळण बंद पाडून चिमणाजी आप्पास वसई काबीज करून घेण्याच्या कामी साहाय्य केलें. इ. स. १७४० त संभाजी आंग्र्यानें चौल, अलीबाग, थळ व सागरगड हीं मानाजीचीं ठिकाणें हस्तगत करून, कुलाब्यास वेढा दिला. तेव्हां मानाजीनें बाळाजी बाजीरावाजवळ स्वयंरक्षणार्थ मदत मागितली. बाळाजी व चिमणाजी आप्पा यांनीं मुंबईकर इंग्रजांच्या मदतीनें संभाजीस सुवर्णदुर्गास परतवून लावलें.

आंग्रे हे पेशव्यांपेक्षां स्वतःस श्रेष्ठ समजून राज्यकारभारांत व्यत्यय आणीत, त्यामुळें त्यांस नरम करणें पेशव्यांनां भाग होतें. त्यासाठीं पेशव्यांनीं मानाजीस हातीं धरलें होतें. स. १७५२ त मानाजीनें रेवदंडयाच्या बंदरांत फिरंग्यांस अडविलें असतां कोंकणचा मामलेदार रामाजी महादेव हा सागरगडावर बारा-पंधराशें लोकांनिशीं चालून आला होता, पण त्याला परतावें लागलें. मात्र मानाजीचा बिकटगड नांवाचा एक किल्ला होता, तो रामाजीनें भेदानें घेतला. त्याखालील मुलुख बहुतेक गेला. तेव्हां कुलाबासंस्थानच्या खर्चास अडचण पडून मानाजीनें पेशव्यांस विनंति केली. तेव्हां नानासाहेबांनीं चाळीस हजार रूपये दरसाल खर्चास द्यावयाची मखलाशी करून दिली. त्यावेळींच कुलाबा किल्ला दग्ध झाला. किल्ल्याचा सरंजाम, भात वगैरे सर्व जळालें, लोकांचे खाण्याचे हाल बहुत. दौलतींत पैका नाहीं. बोढीस बहुत पडले. त्या संधीत हबशांचा सरदार हजार आठशें माणूस घेऊन एक लढाई मातबर दिली. तेव्हां मानाजीचे मांडीस गोळी लागली. तेसमयीं सर्वांनीं विचार करून तुळाजी आंग्र्‍यास कुमकेस आणावयाचा ठराव केला. तेव्हां मानाजीनें तुळाजीस पत्रें लिहिलीं. पण तुळाजीनें मानाजीस शिव्या दिल्या त्यामुळें मानाजीनें संस्थान पेशव्यांच्या घरांत घालीन, परंतु तुम्हांस कुलाब्यांत घेणार नाहीं, असें तुळाजीस कळविलें, आणि रामाजी महादेवाची मदत मागितली. लोकांची तयारी करून दोन हजार माणसांसह रामाजीपंत आला. त्याच्या पूर्वीच मानाजीनें हबशाच्या फौजेचा पराभव करून त्यांचा सरदार आनंदराव घाटगे मारला. नंतर रामाजीपंतांची व मानाजीची भेट रेवदंडयास रामेश्वराच्या देवळांत झाली. त्यानंतर रामाजीपंतानें तुळाजीविरुद्ध मानाजीस आपल्याकडे ओढून घेतलें.

स. १७५८ मध्यें पेशव्यांनीं मानाजीस जंजिर्‍याच्या स्वारींत रामाजी महादेवास कुमक करण्याविषयीं लिहिलें. त्यावरून मानाजीनें आरमार पाठवून हबशास जेर केलें व उंदेरी किल्ला घेतला आणि जलमार्गानें जाऊन राजपुरी लुटून जंजिर्‍याजवळ मोर्चा दिला. चार महिने मानाजी तेथेंच होता. नंतर प्रकृति बिघडली म्हणून तो कुलाब्यास आला, व पांचव्या सहाव्या दिवशीं मरण पावला (सप्टेंबर १७५८). मानाजीस औरस पुत्र १० व रखेलीचे चार होते. त्यांत रघूजी आंग्रे यास वजारतमान व सरखेल किताब व वस्त्रें मिळालीं.

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...