विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 27 July 2021

मराठाशाहीतील पेशवेकालीन इतिहासातील 'तोतयाचे बंड'

 

मराठाशाहीतील पेशवेकालीन इतिहासातील 'तोतयाचे बंड'
पोस्त सांभार ::प्रशांत रा. पाटील
पानिपताच्या भयंकर युद्धाने मराठ्यांची भरून न येणारी हानी झाली.विश्वासरावांना लढाईत फार मोठी जखम झाली हे लक्षात येताच सदाशिवराव भाऊ हत्तीवरून खाली उतरले आणि घोड्यावर बसून युद्धाच्या गर्दीत शिरले आणि दिसेनासे झाले.
लढाईनंतर विश्वासरावांचे प्रेत अब्दालीला सापडले पण सदाशिवराव भाऊंचे प्रेत सापडले नाही.शुजा उद्दोलाचा कारभारी काशीराज याने पेशव्यांना पाठविलेल्या पत्रात भाऊंच्या मृत्यूचा उल्लेख केला आहे पण अंत्यसंस्कार झाले याचा काही उल्लेख नाही पण इतिहासकार त्यास ठोस पुरावा मानत नाहीत.कारण ते मूळ साधनांवर आधारित नाही.
इ.स.१७६५
युद्धानंतर काही वर्षांनी सदोबा (काहीजण सुखलाल असेही म्हणतात) ह्या कनौजी ब्राह्मणाने मी सदाशिवराव पेशवा आहे असे सोंग केले.सदाशिवराव भाऊंच्या पत्नी पार्वताबाई ह्यांची मनस्थिती काहीशी ठीक नव्हती त्यामुळे त्यांना हे खरे असावे असे वाटले.आपल्या पतीचा युद्धात मृत्यू झालाय हे मानायला त्या तयार नव्हत्या.पार्वताबाईंच्या ह्याच विश्वासाचा फायदा काही कारभाऱ्यांनी घेण्याचे ठरविले. त्यावेळेस आजच्यासारखी फोटो,चित्र इत्यादी ओळख पटविण्याची साधने नव्हती आणि भाऊंसोबतचे बरेचसे समकालीन व्यक्ती युद्धात नाहीशा झाल्या होत्या.
लवकरच माधवरावांनी त्याची चौकशी केली आणि काही असंबद्ध उत्तरांमुळे सदोबाची लबाडी उघडकीस आली.पार्वताबाईंनीही चिकाच्या पडद्याआडून तोतया भाऊंना काही खाजगीतले प्रश्न विचारले त्यातही खोटेपणा आढळला तेव्हा मात्र माधवरावांनी त्यास खोटे ठरवून बंदीत घातले. त्या तोतयाने कुणाला फूस लावू नये म्हणून त्याची रवानगी वेगवेगळ्या ठिकाणी केली जात असे.१७६५ ते १७७६ पर्यंत तोतयाचे ठिकाण बदलले जात होते.
तोतया रत्नागिरीच्या तुरुंगात असतांना त्याची ओळख तेथे रामचंद्र नाईक परांजपे ह्या कोकणस्थ ब्राह्मण सुभेदाराशी झाली.ह्या सुभेदाराला पुण्याच्या दरबारात असलेली अंदाधुंदी ठाऊक होती.आपण ह्या परिस्थितीचा फायदा उचलू शकतो असे त्याला वाटले.सुभेदाराने त्या तोतया ला मुक्त केले आणि लोकांना हाच सदाशिवराव पेशवा असून त्यावर कसा जुलूम चालला आहे आणि कैदेत टाकले आहे तुम्हीच बघा असे भरवून दिले.बऱ्याच सहृदय लोकांना ते खरे वाटले खऱ्या सदाशिवराव भाऊस मदत करणे आपले कर्तव्य आहे असे त्यांना वाटले.
लोकांचा विश्वास संपादन करून तोतयाने फार कमी श्रमात २०,००० लोकांची फौज जमा केली आणि कोकणातले वीस बावीस किल्ले घेतले.
इतकेच नाही तर मुंबई सरकारलाही तो खरा सदाशिवराव भाऊ वाटला आणि त्यांनी त्याचा सन्मान करण्यासाठी वकील पाठवला .
सदोबाची हिम्मत वाढली आणि तो बोरघाट चढून आला आणि राजमाची किल्ला त्याने ताब्यात घेतला.
हे वर्तमान कळल्यावर शिंद्यांचे सरदार रामजी पाटील व भिवराव पानशे ह्यांनी ससैन्य त्याच्यावर हल्ला केला तेव्हा तो तोतया आपल्या लोकांसोबत तेथून पळाला. आणि इंग्रजांची मदत घ्यावी म्हणून मुंबईला आला परंतु तेथे मुख्य साहेब हजर नव्हता.नाईलाजाने तो कुलाब्याला पळाला तेथे राघोजी आंग्र्याने त्याला पकडले आणि पुण्यास पाठविले.पेशव्यांनी त्याला हत्तीच्या पायी बांधून ठार मारले.
अशा प्रकारे तोतया आणि त्याच्या बंडाचा शेवट झाला.
संदर्भ:
१.हिंदुस्थान कथारस:विनायक कोंडदेव ओक
२.न.चिं. केळकर लिखित ‘तोतयाचे बंड’

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...