मित्रानो, आजच्या लेखाचे शीर्षक “अखंड सावधान असावेI दुश्चित्त कदापि नसावेII” असे दिले आहे. श्री समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती संभाजीराजे यांना केलेल्या उपदेशातील या सुरुवातीच्या ओळी आहेत हे इतिहासप्रेमींच्या लक्षात आले असेलच. सत्तेत असंणाऱ्या व लढाईच्या मैदानात वावरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने सतत लक्षात ठेवावेत असे हे उद्बोधक व कालातीत विचार आहेत. आणि मित्र हो ज्यावेळी अशा उपदेशाचा विसर पडतो किंवा याकडे जाणूनबुजून वा चुकून दुर्लक्ष होते तेव्हा साक्षात मृत्यूशी गाठ पडते हे आपण इतिहासात अनेक वेळेला पहिलेले आहे. आज आपण याच उपदेशाच्या अनुषंगाने एकाच घराण्यात घडलेल्या दोन घटनांचा आढावा घेणार आहोत, यापैकी पहिल्या हकीकतीत एक शूर सेनापतीला समर्थ्यांच्या उपदेशाचे विस्मरण झाल्याने आपला प्राण गमवावा लागला तर दुसऱ्या घटनेत त्याच घराण्यातील व्यक्तीला उपदेशाचे तंतोतंत अनुपालन केल्याने आपले प्राण वाचवता आले.
थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या काळातील शूर सेनापती व शिंदे घराण्याचे अर्ध्वयु राणोजींचे थोरले पुत्र जयाप्पा शिंदे बंधू यांच्यावर राजस्थानातील एका मसलतीमध्ये ते बेसावध असताना हल्लेखोरांनी अचानक हल्ला केला होता आणि त्यात त्यांना आपले प्राण गमवावे लागले होते. काही वर्षांनी जयाप्पा शिंदे यांचे धाकटे बंधू महादजींच्यावर सुद्धा असाच एक प्रसंग गुदरला होता, पण त्यावेळी अखंड सावधपणे वागणाऱ्या महादजींनी हुशारीने आपले रक्षण केले होते. जयाप्पा शिंदे याजवरील प्राणघातक हल्ला तसेच कालांतराने महादजी शिंदेवरील अयशस्वी हल्ला या दोन घटनांची माहिती आपण येथे घेणार आहोत. या घटना अभ्यासण्याचा मतितार्थ एव्हढाच की आपण आपल्या पूर्वजापासुन वा इतिहासातून काही शिकणार नसू व बेसावधपणे वागून त्याच चुका वारंवार करीत राहणार असू, तर आपल्या विनाशाला आपणच कारणीभूत ठरू .
घटना क्रमांक एक: मारवाडच्या मोहिमेत जयाप्पा शिंदे यांचा कपटाने खून
मारवाडच्या लढाईची पार्श्वभूमी: मारवाड प्रांती जोधपूरचा राजा अभयसिंग १७५४ मध्ये मरण पावला. तेंव्हा त्याचा पुत्र बिजयसिंग व त्याचा पुतण्या रामसिंग या दोघात जोधपूरच्या गादीसाठी कलह पेटला.पूर्वी रामसिंगचा बाप ज्यावेळी मरण पावला होता,त्यावेळी त्याचा पुत्र हा रामसिंग यास गादी प्राप्त व्हायची,पण तो दुर्व्यसनी होता. त्यामुळे त्याचा चुलता अभयसिंग हा जोधपूरची गादी बळकावून बसला होता. त्यामुळे अभयसिंग मरण पावताच आपले हक्काचे राज्य आपणास परत मिळावे अशी रामसिंगास ईच्छा उत्पन्न होऊन त्याने पेशव्यांचा उत्तर हिंदुस्थानातील शूर मुत्सद्दी सरदार जयाप्पा शिंदे याची मदत मागितली. त्यामुळे जयाप्पाने कुंभेरी येथील आपली कामगिरी आटोपताच ३०जून १७५४ रोजी मारवाडकडे आपले मोर्चे वळवले. मारवाडच्या या राजकारणात होळकरांचा कल विजयसिंगाकडे होता.त्यामुळे साहजिकच रामसिंगने होळकरांना मदतीला बोलावले नाही. अशा रीतीने जयाप्पा शिंदे आपल्या फौजेनिशी कोट्यामार्गे अजमेरला पोचले.तेथे त्यांच्यात व रामसिंगात बोलणी होऊन एक करारपत्र झाले.त्यावेळी शिंद्याकडे अनंत दाभोलकर हे कारभारी होते ज्यांनी या चर्चेत पुढाकार घेतला. त्यावेळेस मारवाड प्रांती जयाप्पाबरोबर त्यांचा शूरवीर बंधू दत्ताजी शिंदे तसेच पुत्र जनकोजी शिंदे वगैरे खाशी मंडळी आणि राघो राम पागे, दत्तोजी पाटील वगैरे पदरचे बलिष्ठ सरदार होते. रामसिंगच्या मदतीस शिंदे आपली फौज घेऊन आले आहेत अशी बातमी बिजयसिंग याला कळताच त्यानेही आपली लढाईची कडेकोट तयारी चालवली. मारवाड,बिकानेर,किसनगड वगैरे संस्थानिक हे बिजयसिंगाच्या पक्षाकडे वळले व ते देखील आपापले सैन्य घेऊन बिजयसिंगास मदत करायला आले. अशा तऱ्हेने बिजयसिंगाकडे एकंदरीत सुमारे दोन लक्ष सैन्य एकत्र झाले. शिंद्याकडे सगळी मिळून सुमारे तीस हजार फौज होती. शूर राजपुतांची बलाढ्य सेना समोर असताना जयाप्पा जर कच्च्या दिलाचा असता तर तो शत्रूचा अवाढव्य सैन्य पसारा पाहून रामसिंगाचा पक्ष सोडून माघारी निघून गेला असता. पण जयाप्पा हा सच्चा शूर मराठा होता आणि राणोजींचे रक्त त्यांच्या धमन्यांतून वहात होते. या लढाईच्या प्रसंगी त्याने एखाद्या कसलेल्या सेनापतीप्रमाणे आपल्या सर्व सरदारांची सभा बोलावली व त्यांना उद्देशून प्रोत्साहनात्मक आवेशपूर्ण असे उद्गार काढले व विजयश्री आपलीच आहे याची ग्वाही दिली. या प्रमाणे त्याने आपल्या सैन्याला वीरश्री देणारे भाषण करून सर्वाना प्रोत्साहित केले.
जयाप्पाचा विजय: १५सप्टेंबर१७५४ रोजी मारवाडचे सैन्य व शिंद्यांचे सैन्य यांची लढाई सुरु झाली.जयाप्पाने लढाई सुरु होताच सलामीलाच शत्रुपक्षावर तोफखान्याची सरबत्ती दिली. त्यावेळी आगीचा एकच डोंब उसळला. त्याबरोबर बिजयसिंगाने देखील आपल्याकडील तोफांची सरबत्ती करून मराठ्यांस उलट जबाब दिला. याप्रमाणे दोन्हीकडील तोफखाने सुरु झाल्यावर उभय पक्षाकडील शेकडो लोक जायबंदी होऊ लागले. नंतर दोन्हीकडील सैनिक घुसून एकमेकांवर तलवार चालवू लागले. यावेळेस दोन्ही सेनेमध्ये भीषण लढाई झाली. राजपुतांकडे सैनिकांची संख्या बऱ्यापैकी असल्याने त्यांचे किती लोक मारले गेले याची त्यांना गणती वा फिकीर नव्हती. मराठ्यांनी सुद्धा पराक्रमाची शर्थ केली. ही लढाई सलग दोन दिवस चालली. त्यात बिजयसिंगाच्या बऱ्याच सैनिकाचा फडशा पडला व बाकीचे जीव वाचायला पळू लागले. जोधपूर, बिकानेर व किशनगंज येथील राणे लढाईतून पळून गेले. स्वतः विजयसिंग एका शेतकऱ्याचे खटाऱ्यात बसून जीव वाचवून नागोरला पळून गेला. या लढाईत मराठ्यांना मोठा विजय मिळाला. मराठ्यांनी हा जो विजय मिळवला त्याची गाणी मारवाड येथील भाट लोक अजून गातात असे इतिहासात म्हंटले आहे. त्यातील एक ओळ अशी आहे: "याद पणा दीन आवशी आप्पा वाला हेल! भागे तींनो भूपती माल खजाना मेल !!" या ओळीचा भावार्थ असा की जयाप्पाच्या लढाईची आठवण ठेवा जेंव्हा तीन भूपती (म्हणजे मारवाड, बिकानेर व किसनगड येथील राजे) आपले शस्त्र व मालमत्ता टाकून पळून गेले होते. बिजयसिंगसुद्धा पळून जाऊन रातोरात नागोरच्या किल्ल्यात जाऊन लपून बसला व त्याने त्या किल्ल्याभोवती कडेकोट बंदोबस्त केला.
जयाप्पाने लगेच त्या किल्ल्यासभोवार आपल्या फौजेचा गराडा देऊन आत रसद नेण्यावर बंदी आणली. हा नागोरचा वेढा सात आठ महिने चालला. मराठ्यांच्या इतिहासातील भोपाळ,श्रीरंगपट्टण,कुंभेर,वसई वगैरे लढाईतील वेढयासारखाच हा एक प्रसिद्ध वेढा म्हणून गणला जातो. नागोरच्या रेताड प्रदेशामुळे तेथे सुरुंगाचा उपयोग होईना. किल्ल्याला वेढा असून सुद्धा बिजयसिंगाने बरेच दिवस तग धरला. अशा स्थितीत लढाईत यश येत नाही बघून बिजयसिंगाने मल्हारराव होळकराकडे मदतीसाठी गुप्त बोलणी सुरु करण्यास आपला वकील पाठवला पण ती चाल व्यर्थ ठरली. सरळ मार्गाने इलाज चालत नाही असे दिसल्यावर बिजयसिंगाने मोगलाई मसलत करण्याचा बेत केला.(संदर्भ:राजाध्यक्षकृत जीवबादादाचे चरित्र). तेव्हा बिजयसिंगाने त्या दृष्टीने मसलतीची तयारी सुरु केली.
बिजयसिंगाचे कपटकारस्थान व जयाप्पाचा अंत:२५ जुलै १७५५, शुक्रवार दिवशी प्रातःकाळी जयाप्पा मुखमार्जनादी विधी उरकून स्नानासाठी चौरंगावर उभे असताना अकस्मात तिघे मारेकरी शस्त्रे दडवून वेष पालटून घोड्यापुढील दाणे वेचून खाण्याच्या बहाण्याने भिकाऱ्याच्या वेशात जयाप्पानजीक आले. शिंद्यांच्या फौजेत एक प्रकारचा ढिलेपणा आला होता की काय कुणास ठाऊक कारण त्यावेळेस जयाप्पाचे कोणीही अंगरक्षक जवळपास नव्हते असे वाटते. तिकडे त्यांचे खिजमतगार पाण्याचा हंडा व वस्त्र सांभाळण्यात गुंतले होते.आब्दागिऱ्या मात्र डोक्यावर छाया धरून उभा होता. जयाप्पा शिंदे यास सवय होती की स्नानानंतर तोंडावर धोतर घेऊन क्षणभर डोळे चोळीत उभे राहावे. अशा रीतीने जयाप्पा डोळे चोळीत उभा असताना त्या मारेकऱ्यांनी अचानक येऊन चोहोकडून जयाप्पाच्या कुशीत सुऱ्याने हल्ला चढवला. जयाप्पावर असा अचानक हल्ला होताच जयाप्पा चौरंगावरून खाली कोसळले.जवळ केवल एक आब्दागिऱ्या होता, त्याने धैर्याने मारेकऱ्यांपैकी एकास पकडले तर दुसरे दोघे पळून गेले. मारेकऱ्यांच्या हल्ल्याने जखमी झालेल्या जयाप्पाचा अती रक्तस्रावाने २५ जुलै १७५५ या दिवशी दुःखद अंत झाला. तसे बघायला गेले तर राजपूत लोक त्यांच्या शौर्याबद्दल व इमानदारीबद्दल इतिहासात प्रसिद्ध आहेत. त्यांनी अशा प्रकारे कपट करून आपल्याच एका शूर हिंदवी बांधवांचा प्राण घ्यावा हे अनुचितच झाले. इकडे बिजयसिंग जयाप्पाचा मृत्यू झाल्याच्या मोठ्या आनंदात राजपूत फौज घेऊन लढाईला आला. अशा बिकट प्रसंगी जयाप्पावरील कपटी हल्ल्याने चिडलेल्या शूर दत्ताजी आणि त्यांच्या सैनिकांनी आपले दुःख तात्पुरते विसरून शत्रूवर जोराचा हल्ला चढवला व नेटाने टक्कर देऊन शत्रूला मागे हटविले.
शिंद्यांशी तह: नागोरच्या किल्ल्यात अठरा महिने रसद पुरवठा बंद झाल्याने शेवटी बिजयसिंग हतबल झाला. त्याने मराठयांशी सलोख्याचे बोलणे लावले तेंव्हा जानेवारी १७५६च्या शेवटी उभयपक्षी तह ठरला. त्यात एक कोटी रुपये खंडणी व अजमेर ,मेडते व बिकानेर अशी ठाणी बिजयसिंगाने मराठ्यांना दिली. त्यापैकी निम्मी ठाणी मराठ्यांनी रामसिंगास दिली व उर्वरित आपल्याकडे ठेवून त्याचा बंदोबस्त केला. मराठी फौजेतील हा बेसावधपणा व सेनापतीच्या रक्षणाकडे झालेले दुर्लक्ष त्यांना नडले ज्या योगे त्यांच्या शूर समर्थ सेनापतीला आपले प्राण गमवावे लागले.
घटना क्रमांक दोन :“अखंड सावधान असावे” या उपदेशाचे तंतोतंत पालन करणारी शिंदे घराण्यातील व्यक्ती म्हणजे जयाप्पाचे धाकटे बंधू महादजी होत. पुढे जाऊन एका प्रसंगात या महादजींवर मारेकऱ्यांनी अचानक हल्ला केला होता परंतु अखंड सावध असणाऱ्या महादजींनी तो यशस्वीपणे परतून लावला होता. एव्हढेच नव्हे तर त्या हल्लेखोरांना पकडून शिक्षा ठोठावल्या होत्या. या घटनेची माहिती इतिहासातील एका पत्रलेखनात सापडते.
जगन्नाथ विश्वनाथ (जुन्नरकर) हे महादजी शिंदे यांच्याकडील कारभारी म्हणून काम पाहत होते. १७ फेब्रवारी १७९१च्या जगन्नाथ विश्वनाथ यांनी लिहिलेल्या एका पत्रात ते लिहितात की तिसरे प्रहरी महादजींनी जयपूर राज्याचा कारभारी यास भेटण्यासाठी बोलावणे पाठवले. हे कारभारी शिंदे सरकारच्या निमंत्रणावरून मेजवानीस गेले होते. भोजन संपवल्यावर त्यांनी परतण्याची तयारी केली होती. परत येताना जयपूरचे दुसरे एक कारभारी राजश्री सदाशिव मल्हार याचे डेऱ्यास निरोप घेण्यास गेले. तेथून ते भेटण्यास येणार इतक्यात राजश्री कृष्णो बाबा चिटणीस व माईसाहेब उभयता महादजींच्या दरबारात आले. त्यावेळी महादजींच्या कचेरीच्या छावणीत काही लष्करातील शिलेदार (बहुतेक करून ते सर्व उत्तर हिंदुस्थानातील असावेत कारण ही घटना उत्तर हिंदुस्थानातील आहे) थांबले होते. त्यांच्यापैकी काही जण गेले दोनचार दिवस दररोज आपल्या काही दिवस थकलेल्या पगाराची सातत्याने मागणी करीत होते. बरेच दिवस पगार न मिळाल्याने ते सर्व घाईला आले होते. महादजी शिंदे तेथे आले असता त्यांनी महादजीना थांबायची गळ घालून तेथे बसण्याचा आग्रह केला. तेव्हा त्यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष करून महादजी तसेच पुढे निघाले. महादजी आपले ऐकत नाहीत असे पाहून चिडून जाऊन तेथे वाट बघणाऱ्या शिलेदारापैकी पाच सात जणांनी अचानकपणे महादजीस धरले आणि महादजींना काही कळायच्या आत त्यापैकी दोघांनी तलवार काढून महादजीवर तलवारीचे वार केले. तेथे जमलेल्या चार पाच लोकांनी त्यावेळेस जोरजोरात हाणामारीच्या घोषणा दिल्या. अशा कठीण प्रसंगी महादजींनी प्रसंगावधान दाखवीत उलटे फिरून शेजारचा शिलेदार बाजीबा दाभाडा याची तलवार घेऊन हल्ला करणाऱ्या शिलेदारावर विद्युतवेगाने दोनचार उलट वार केले. त्या हाणामारीत हल्लेखोरांपैकी एकाचा हात तुटला तर दुसऱ्यास बरगडीत जखमा झाल्या. तेंव्हा तेथील गडबड गोंधळ ऐकून आसपासची काही माणसे व चौकीदार जमा झाले. अशा संधीचा फायदा घेऊन महादजी लगोलग आपले वाड्यात सुखरूपपणे निघून गेले. त्यावेळेस महादजीचे इतर सैनिक धावत आल्याने हल्ला करणारे अकरा शिलेदार कचेरीच्या डेऱ्यातच कैद झाले. तथापि त्यातून दोघे पळाले त्यापैकी एकाला देवडीवर धरण्यात आले. बाकीच्यांना महादजीच्या लोकांनी धरून ठेवले. त्यांच्याकडील तलवारी काढून त्यांना निःशस्त्र केले गेले. नंतर त्यांना दम भरून त्यांच्या मुसक्या बांधल्या गेल्या व तसेच नेऊन मारून टाकण्यात आले.अशा रीतीने शिंद्यांच्या लष्करातील तंबूत त्यांच्यावर तलवार चालवली गेली पण सावध असणारे महादजी या हल्ल्यातून वाचले. आपल्या पत्रात जगन्नाथ विश्वनाथ पुढे लिहितो श्रीने मोठी खैर केली ज्यामुळे पाटीलबावांचे (महादजींचे) प्राण वाचले. प्राणावर बेतले होते ते किरकोळ जखमांवर निभावले. हल्लेखोर हरामखोरानी जलदी केली असती तर अनर्थ होता. महादजीच्या अखंड सावधपणे त्यांनी हल्लेखोरांवर प्रतिहल्ला करून त्यांचे दुष्ट व घातक मनसुबे त्यांनी उधळून लावले.
तात्पर्य: घटना क्रमांक एकमध्ये दिल्याप्रमाणे जयाप्पावर झालेल्या कपटी जीवघेण्या हल्ल्यामुळे त्यांचा प्राण गेला होता. ही घटना महादजीच्या मनावर अगदी कोरली गेली होतो. अशा होणाऱ्या भेकड हल्ल्यापासून महादजी शिंदे यांनी धडा घेतला होता. त्यायोगे आपल्या सर्वच मसलतीमध्ये विशेष करून उत्तर हिंदुस्थानातील स्वाऱ्यांमध्ये ते आपली पुरेपूर खबरदारी घेत असत. शत्रूकडून कुठल्याही क्षणी दगाबाजीने आपल्यावर हल्ला होऊ शकतो हे ध्यानात ठेऊन ते नेहमीच सतर्क असत.
‘अखंड सावधान असावेI दुश्चित्त कदापि नसावेII’या श्री समर्थ रामदास स्वामींच्या उपदेशप्रमाणे वागून अनेक वर्षे उत्तर हिंदुस्थानात राहून अखंड सावध असणाऱ्या महादजींनी दहशतवादी लोकांपासून स्वतःचे संरक्षण केले होते. या घटनाक्रमांच्या अभ्यासाचा सारांश एव्हढाच की आपण आपल्या इतिहासातील घटनांपासून काहीतरी शिकले पाहिजे आणि अशा रीतीने इतिहासाचा जे डोळसपणे अभ्यास करतात त्यांचा भविष्यकाळ निश्चितच उज्ज्वल असतो यात शंका नाही !!
_______________________________________________________________________
संदर्भ : शिंदेशाहीच्या इतिहासाची साधने भाग १०, पत्र क्रमांक ११ व १२, मराठी रियासत लेखक सरदेसाई गो. स. जीवबादादाचे चरित्र लेखक राजाध्यक्ष संकलन: प्रमोद करजगी
No comments:
Post a Comment