विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 4 July 2021

मराठेशाहीतील प्रसिद्ध लष्करी अधिकारी जॉन विल्यम हेसिंग (John William Hessing)

 




मराठेशाहीतील प्रसिद्ध लष्करी अधिकारी जॉन विल्यम हेसिंग (John William Hessing)

पोस्तसांभार :: निखिल बेल्लारीकर

हेसिंग, जॉन विल्यम : (५ नोव्हेंबर १७३९ – २१ जुलै १८०३). मराठेशाहीतील प्रसिद्ध लष्करी अधिकारी आणि आग्र्याचा किल्लेदार. हा मूळचा डच असून नेदरलँड्समधील उत्रेख्त या शहरात जन्मला. १७५७ साली डच ईस्ट इंडिया कंपनीची नोकरी पतकरून तो श्रीलंकेत आला. तेथे काही लढायांत भाग घेऊन पाच वर्षे काढल्यावर नेदरलँड्सला परत गेला. त्यानंतर १७६३ साली भारतात आला. सुरुवातीला हैदराबादच्या निजामाकडे नोकरी केली. पुढे वीस वर्षांनी उत्तर पेशवाईतील पराक्रमी सेनानी महादजी शिंदे (१७२७–१७९४) यांच्याकडे बनवॉ डी बॉइन या प्रसिद्ध फ्रेंच अधिकाऱ्याच्या हाताखाली तो रुजू झाला (१७८४).
हेसिंग याचे स्मारक, लाल ताजमहाल, आग्रा.
महादजींच्या फौजांनी आग्र्यावर कब्जा केल्यानंतर (१७८५) लगेचच दोन वर्षांत शिंद्यांचे शत्रू इस्माईल बेग व नजीबखानाचा नातू गुलाम कादिर यांनी आग्र्यावर हल्ला केला. आग्र्याचा किल्ला लखबादादा लाड यांनी अनेक महिने यशस्वी रीत्या झुंजवला, परंतु आग्रा शहर मात्र शत्रूपक्षाकडे गेले. अखेरीस महादजींच्या सैन्याने आग्रा शहरही पुन्हा ताब्यात घेतले (जून १७८८). या दरम्यानच्या आग्र्याजवळील ‘भोंदागावʼ (सध्याचे भंदै, उत्तर प्रदेश) येथे झालेल्या लढाईत हेसिंगने विशेष पराक्रम गाजवल्याची व त्यात तो जबर जखमी झाल्याची नोंद मिळते. या काळात त्याला डी बॉइनने दोन बटालियन्सवरचा प्रमुख नेमले होते. त्यानंतर डी बॉइनसोबत बेबनाव झाल्यामुळे हेसिंगने महादजींची नोकरी सोडली; परंतु महादजींनी त्याला पुन्हा आपल्याकडे घेतले आणि एक ‘खास रिसालाʼ अर्थात खास घोडदळाचा प्रमुख बनवले.
महादजींच्या निधनानंतर त्यांचे वारसदार दौलतराव शिंदे यांच्या कारकिर्दीतही हेसिंगची नोकरी कायम चालू राहिली. या दरम्यान त्याने ॲन डेरिडन नामक मिश्रवंशीय स्त्रीशी लग्न केले. तिच्यापासून त्याला जॉर्ज, थॉमस हे मुलगे व मॅडेलाईन ही मुलगी झाली. १७९८ पासून महादजींच्या विधवांनी दौलतराव शिंद्यांविरुद्ध उभारलेल्या बंडात आग्र्याचा तत्कालीन किल्लेदार आबाजी यानेही दौलतरावांविरुद्ध बाजू घेतल्यामुळे दौलतरावांनी पेराँ या फ्रेंच सरदाराला आग्र्याचा किल्ला घेण्याकरिता पाठवले. हातघाईची लढाई होऊन अखेरीस पेराँने किल्ला काबीज केला. त्यानंतर हेसिंगला आग्र्याचा किल्लेदार नेमण्यात आले. सैन्यप्रमुख म्हणून त्याच्या जागी त्याचा थोरला मुलगा जॉर्ज हा रुजू झाला. त्या वेळी त्याच्या हाताखालील चार बटालियन्सची संख्या त्याने पुढे आठपर्यंत वाढवली.
हेसिंगने सु. तीन वर्षे आग्र्याचा किल्लेदार म्हणून काम पाहिले. याच काळात आग्र्याहून शिंद्यांच्या आधिपत्याखाली जी नाणी पाडली जात, त्यांपैकी तांब्याच्या पैशावर हेसिंगचे नाव आहे. काही अपवाद वगळता उत्तरेतील कोणाही मराठेशाही सत्ताधीशाचे किंवा त्यांच्या पदरच्या सरदाराचे प्रत्यक्ष नाव तत्कालीन नाण्यांवर दिसत नाही. या पार्श्वभूमीवर हेसिंगचे नाव असलेली नाणी उल्लेखनीय आहेत. १७९९-१८०२ या काळात JWH (John Willem Hessing) अशी आद्याक्षरे लिहिलेली तांब्याची नाणी पाडली गेली. यांपैकी १८०२ सालच्या नाण्यांवर मात्र त्याचे नाव नसून त्याऐवजी पिस्तुलीचे चिन्ह तेवढे दिसते. कदाचित त्याच्या लष्करी पेशाला अनुसरून ते चिन्ह दिले गेले असावे.
वयाच्या चौसष्टाव्या वर्षी प्रदीर्घ आजाराने हेसिंग आग्रा येथे मरण पावला. त्याला आग्र्यातील रोमन कॅथलिक स्मशानभूमीत पुरण्यात आले. त्याची पत्नी ॲनने तत्कालीन जवळपास एक लाख रुपये खर्च करून त्याचे स्मारक उभारले, असे सांगितले जाते. लाल वालुकाश्म (सँडस्टोन) मध्ये हे स्मारक उभारण्यात आले असून, एकूण धाटणी ताजमहालाप्रमाणेच आहे. त्याच्या चार बाजूंना असलेले मिनार मात्र येथे नाहीत. ३.३५ मी. उंच व १७.६७ मी. लांबी रुंदीच्या चौरसाकृती पायावर मुख्य स्मारक उभे आहे. इस्लामी पद्धतीप्रमाणे खरी कबर ही जमिनीवर नसून तळघरात आहे. वरचा घुमट आणि छत्र्यांची नक्षी सुबक असून ते मोगल शैलीचे उत्तम उदाहरण आहे. आतील भिंतीवर एक विस्तृत इंग्लिश शिलालेख असून, ती पूर्ण वास्तूमधील एकमेव पाश्चात्त्य खूण आहे. प्रवेशद्वारावर दोन फार्सी शिलालेखही आहेत. त्यांतही आलंकारिक पद्धतीने हेसिंगच्या आयुष्याबद्दल त्रोटक माहिती दिलेली आहे.
हेसिंगनंतर त्याचा थोरला मुलगा जॉर्ज हा आग्र्याचा किल्लेदार बनला. त्यानंतर तीन महिन्यांतच जनरल लेक याने आग्र्यावर निकराचा हल्ला करून शहर व किल्ला दोन्हीही ताब्यात घेतले व त्याबरोबरच आग्र्यावरील उण्यापुऱ्या दोन दशकांचा मराठी अंमल संपला. यानंतर जॉर्ज हेसिंग बंगालमधील चिन्सुरा या डच अंमलाखालील शहरात स्थायिक झाला. त्याची आई ॲन, धाकटा भाऊ थॉमस आणि बहीण मॅडेलाईन हेही बंगालमधील दीघा येथे आले. त्यांचे पुढील वास्तव्य व वंशजही बंगालमध्येच होते.
संदर्भ :
Lingen, Jan & Garg, Sanjay, ‘The Dutch Mercenary John William Hessing and his coinsʼ, Numismatic Digest, Vol. 20, Mumbai, 1998.
Sachdeva, Krishan Lal, Agra during the Mahratta regime, Proceedings of the Indian History Congress, Vol. 19, New Delhi, 1956.
‘The Hessings, Father and Son: Killahdars of Agraʼ, The Calcutta Review, No. 267, Calcutta, India, 1912.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...