विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 4 July 2021

#अपरिचित_पिलाजी_जाधवराव_वाघोलीकर...

 #अपरिचित_पिलाजी_जाधवराव_वाघोलीकर...

माहिती संकलन ::


मधुकर हाक्के
आज पिलाजीराव जाधवराव यांचा स्मृती दिन यानिमित्ताने सकाळ पासून काही अनऐतिहासिक व जुन्या बखरीच्या माहिती वर आधारित पोस्ट फिरत होत्या. परंतु नवीन संशोधनामधून आलेले गोष्टीमुळे बखरी मधील काही गोष्टींना छेद गेला आहे. नवीन अद्यावत संशोधनानुसार दमाजी थोरात व पिलाजी जाधवराव यांचे सहसबंध नव्याने उजेडात आले आहेत. त्याचा हा थोडक्यात घेतलेला परामर्श..
जाधव घराण्याच्या अनेक शाखा स्वराज्यात निष्ठेने राबत होत्या. त्यातीलच एक शाखा म्हणजे वाघोलीकर जाधवराव घराणे . आपल्या मनगटाच्या व हुशारीच्या जोरावर ह्या घराण्यातील मुख्य पुरुष पिलाजी जाधवराव हा खासा परिचयास येतो.
पिलाजी जाधवराव हे छ शाहु महाराज यांची संपूर्ण कारकीर्द बघितलेल्या थोड्या सरदारांपैकी एक आहेत. त्यांनी मराठा साम्राज्य वाढवण्याच्या प्रक्रियेत आपले अमुल्य असे योगदान दिले आहे. त्यांनी वसई , दिल्ली व जंजिरा तसेच निजामाच्या विरोधात झालेल्या लढाईत चांगलीच मर्दमुकी दाखवली.
त्याबरोबरच त्यांनी मुत्सद्दीपनाने अनेक प्रकरणे आपल्या हुशारीच्या बळावर देखील आपल्या बाजुने वळवून घेतली आहेत. त्या मध्ये हिंगणगाव च्या दमाजी थोरात यांचे प्रकरण महत्वपूर्ण आहे.
हिंगणगावचे रूस्तुमराव दमाजी थोरात हे छ राजाराम महाराजांच्या काळापासूनचे निष्ठावंत घराणे. पुढे छ शाहु च्या काळात मराठी साम्राज्याचे दोन भाग झाले व दमाजी थोरातांनी सुरवातीच्या काळात छ शाहूचां पक्ष घेतला परंतु काही कारणास्तव पुन्हा ते महाराणी ताराबाईसाहेब ह्यांच्या पक्षाला मिळाले. व त्यांनी करवीरकर रियासतीच्या वतीने आपल्या कारवाया आरंभ केल्या. त्यांच्या सारखेच चंद्रसेन जाधव , उदाजी चव्हाण हे देखील करवीर रियासतीच्या बाजूने ठाम पणे उभे राहिले.
तर बाळाजी विश्वनाथ पेशवे ह्यांनी छ शाहूंचा पक्ष घेतला. त्या वेळी शिताफीने दमाजी थोरात यांनी बाळाजी विश्वनाथ व त्यांचा कुटुंबकबीला हिंगणगावच्या गढी मध्ये कैद केला. त्यावेळेस बाळाजी विश्वनाथ यांना ओलीस ठेऊन पीलाजी जाधवराव व अंबाजीपंत पुरंदरे गढी मधून बाहेर पडले. पुढे छ शाहु यांच्या कडे जाऊन मोठी रक्कम दमाजी थोरात यांच्या कडे देण्यात आली होती. ह्या प्रकरणात पिलाजी नेमके कुणाच्या बाजूने होते समजत नाही. परंतु ह्याच्या अगोदर पासूनच पिलाजी जाधवराव व दमाजी थोरात यांचे सबंध असल्याचे दिसून येते.
दमाजी थोरात शाहु छत्रपती च्या पक्षात होते तेंव्हाच पिलाजी जाधवराव यांची नेमणूक दमाजी थोरात यांच्या हाताखाली केल्याचे दिसून येते. ( पहा शाहू दफ्तर पत्र क्रं. 25332-35)
पिलाजी जाधवराव व दमाजी थोरात यांच्या अनुषंगाने येणारी आणखी एक गोष्ट म्हणजे मराठी रियासत मध्ये रियासतकार लिहतात , दमाजी थोराताने दंगा चालविला तेंव्हा , त्याचा पराभव करून पिलाजी जाधवराव यांनी त्यांस छ शाहु पुढे हजर केले. त्यावरून जाधवराव यांस मौजे दिवे व नांदेड येथील इनाम शाहुंणी नेमून दिला व तेंव्हा पासून पिलाजी जाधवराव स्वतंत्र सरंजामदार बनले असे रियासतकार सांगतात. परंतु वस्तुस्थिती पूर्णतः भिन्न असून दमाजी थोरात यांच्या पाडावाशी पिलाजी जाधवराव यांच्या सरंजाम देण्याचा काही एक सबंध असल्याचे दिसून येत नाही. पुढे दमाजी यांच्या पाडवा नंतर हाच सरंजाम चिमणाजी बल्लाळ यांचे कडे चालू असल्याचे दिसते.
पिलाजी जाधवराव यांना महाराणी ताराराणी यांच्या काळापासूनच स्वतंत्र सरंजाम होते. ( पहा पत्र क्रं 26834-36) हे सरंजाम पाहता पिलाजी जाधवराव हे पूर्वीही दमाजी थोरात यांच्याच हाताखाली असावे अशी शक्यता आहे. कारण पिलाजीराव यांच्या सरंजामात आलेले महाल मोकासे हे थोरातांच्या लष्कराला नेमलेले सरंजाम यांच्यात साम्य दर्शवितात. तसेच दमाजी थोरात यांची सरदारकी मोडल्या नंतर जे सरंजाम पिलाजी जाधवराव यांच्या कडे चालू होते ते ही पुर्वीचे राजजी व दमाजी थोरात यांच्याच जुन्या सरंजामाचा भाग होती. तसेच पुण्याजवळील जाधवरावांची गढी व हिंगणगाव च्या थोरातांची गढी ही देखील जवळ जवळच आहेत. त्यामुळे पिलाजीराव व दमाजी यांचे सबंध आले असणार ह्यात शंका उरत नाही.
पिलाजी जाधवराव यांचा सुरवातीचा कालावधी दमाजी थोरात यांच्या सोबत राहिला असल्याने त्यांना त्याचा खूप सहवास लाभला होता. दमाजी हा मराठा स्वातंत्र्यसंग्रामातील महत्वपूर्ण व आघाडीचा सेनानायक असल्याने त्यांच्या कडून बऱ्याच लष्करी डावपेच पिलाजी जाधवराव यांना शिकायला मिळाले असणार यात शंका नाही. आपल्या कार्यकिर्दि चा सुरवातीचा काळ म्हणजे मराठा सरदारांच्या साठी भविष्यातील उत्तुंग भरारी घेण्याची रंगीत तालीमच होती. शाहू छत्रपतींच्या काळातील अनेक नामी सरदार हे संताजी घोरपडे , नेमाजी शिंदे , धनाजी जाधवराव , दमाजी थोरात , पदाजी बंडगर , हैबतराव निंबाळकर यांच्यासारख्या स्वातंत्र्यसमरातील नामांकित सेनानायकांच्या तालमीत तयार झालेले वीर होते. अश्याच प्रकारे पिलाजी हे दमाजी थोरात यांच्याच तालमीत तयार झालेले रणवीर होते. ह्यात कोणतेही शंका नाही.
अश्या या पराक्रमी पिलाजी जाधवराव यांना होळकर रियासत समूहाच्यावतीने विनम्र आदरांजली ..
संदर्भ
1) मराठी रियासत खंड 3
2) शाहू दफ्तर
3) वाडिकर जाधव वृत्तांत
4) सरंजामी मरहट्टे .
माहिती संकलन
मधुकर हाक्के
सदस्य मरहट्टी इतिहास संशोधन मंडळ .
धन्यवाद.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...