मित्रानो, महाराष्ट्रातील बरेच गड आपल्या पाहण्यात येतात व त्यांचा इतिहास वाचल्यावर आपला ऊर अभिमानाने भरून येतो यात शंका नाही. पण उत्तरेतील हरियाणासारख्या सपाट प्रदेशात एक जॉर्जगड नावाचा गड आहे हे बहुतेकांना माहिती नसेल. हा गड उभारला होता एका फिरंग्याने! हा फिरंगी महादजी शिंदे यांचा उत्तरेतील विश्वासू सरदार अप्पा खंडेराव याजकडे नोकरीस होता.मराठ्यांच्या संगतीत राहून व दक्षिणेतील गडांच्या सुरस कहाण्या ऐकून या फिरंग्याने सुद्धा आपल्यासाठी एक गड बांधून घेतला आणि त्याचे नाव ठेवले 'जॉर्जगड'. म्हणून या लेखाचे शीर्षक आपला तो राजगड, फिरंग्यांचा मात्र जॉर्जगड असे केले आहे. गंमतीचा भाग म्हणजे काही काळानी स्थानिक लोकांनी त्या जॉर्जगडचे नाव अपभ्रंशित करून 'जहाजगड' केले. अशा या फिरंगी माणसाची ही कथा, ज्याचे नाव होते जॉर्ज टॉमस !
जॉर्जगड किंवा जहाजगड हे गांव हरियाणामधील झझ्झरपासून १० किलोमीटर तर दिल्ली सीमेपासून सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर आहे.
पार्श्वभूमी: जॉर्ज टॉमस याचा जन्म रोस्क्रीया, टिपरारी ,आयर्लंडमध्ये सन १७५६ मध्ये झाला. त्याच्या लहानपणीच त्याचे वडील वारले, त्यामुळे त्याला गोदीवर कामगार म्हणून काम करावे लागले. सन १७८२ मध्ये तो एका इंग्रज जहाजातून हिंदुस्थानात चेन्नईमध्ये उतरला. हिंदुस्थानात पदार्पण केल्यावर त्याने सुरुवातीची ५ वर्षे कर्नाटकमध्ये काढली. त्या नंतर काही दिवस तो हैदराबादच्या नबाबाकडे नोकरीस होता. योग्य नोकरीच्या शोधार्थ हिंदुस्थानात तो असाच बराच काळ भटकला. शेवटी सन १७८७ मध्ये तो दिल्लीला झेबुनिसा उर्फ बेगम समरूकडे नोकरीस गेला. याठिकाणी मात्र त्याचे नशीब फळफळून आले. १७८८ मध्ये गोकुळगडच्या वेढ्यात नजफ कुलीखान याच्या बरोबरच्या एका लढाईत जॉर्ज टॉमस याने बादशहाचे प्राण वाचवले होते त्या योगे बेगम समरु बद्दल बादशहाच्या मनात आदरभाव निर्माण झाला होता. परंतु या घटने मागे खरे तर जॉर्ज टॉमसचे शौर्य व प्रसंगावधान होते.
उत्तर हिंदुस्थानातील कारकीर्द: बेगम समरूकडे त्याने अनेक वर्षे कर्नलच्या हुद्द्यावर इमाने इतबारे नोकरी केली. त्यांच्या दोघांचे चांगले सुत जमले होते असे दिसते. परंतु पुढे बेगमच्या पहिल्या पतीचे म्हणजे रेनहार्ड याचे निधन झाले. त्यानंतर काही दिवसांनी पुढे बेगम आणि तिच्याकडे नवा आलेला फ्रेंच सेनापती ली वसौल्ट मेसो (Le Vassoult) यांचे १७९३मध्ये लग्न झाले. ही घटना बेगमकडील कर्तबगार लष्करी अधिकारी जॉर्ज टॉमस यास पसंत न पडल्याने त्याचा हिरमोड झाला व तो राजीनामा देऊन बेगम समरूची चाकरी सोडून निघून गेला व त्याने महादजी शिंदे यांच्या लष्करात शिंद्यांचा उत्तरेतील सरदार अप्पा खंडेरावकडे नोकरी धरली. सन १७९३ ते १७९७ अशी चार वर्षे त्याने मराठ्यांच्याकडे नोकरी केली. हरियाणातील झझ्झर, दादरी व नारनॉल या प्रदेशात मराठ्यांच्या बाजूने अप्पा खंडेराव याचे प्राबल्य होते. तेथे जॉर्ज याने मराठ्यांची युरोपिअन धर्तीवर उत्कृष्ट कवायती फौज तयार केली. त्या कामाच्या बदल्यात त्याला झझ्झर हा जिल्हा जहागिरी म्हणून मिळाला. १७९४ मध्ये पंजाबातील काही परगणे जिंकून देण्याची त्याच्यावर कामगिरी सोपवण्यात आली. ती त्याने यशस्वीरित्या पूर्ण केली. या कामगिरीत त्याने लूट करून काही संपत्ती जमवली आणि त्याचा विनियोग करून आपले सैन्य अजून वाढवले. पानिपतच्या पश्चिमेकडील हंसी किल्ल्यापासून हरयाणातील काही प्रदेश त्याने आपल्या कब्जात आणला. १८०१ मध्ये त्याच्याकडे १० पलटणे व ६० तोफा एव्हढा सरंजाम जमा झाला होता. सन १७९७मध्ये अप्पा खंडेराव याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा वामनराव याने पित्याच्या सैन्याची सूत्रे हातात घेतली.
महादजीच्या मृत्यूनंतर जॉर्ज टॉमसने बेगम समरु विरुद्ध कारवाया चालू केल्या. तेव्हा बेगमने इंग्रजांशी लाडीगोडी लावून त्यांच्या आश्रयार्थ ती लेव्हेंसो या दुसऱ्या नवऱ्या बरोबर पळून गेली. वाटेत बंडखोरांनी तिच्या पालखीवर हल्ला केला तेव्हा ती जखमी झाली, परंतु सोबत असलेल्या लेव्हेंसो यास ती ठार मेल्याचे वाटून त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. बंडखोरांनी बेगम समरु हिला सारधाना येथे नेऊन कैदेत ठेवले.
सन १७९६ मध्ये पंजाबमध्ये स्वतःच्या सुरक्षित मुक्कामासाठी त्याने जॉर्जगड नावाचा किल्ला स्थापन केला. नंतर हंसी हिस्सार सिरसा येथे त्याने आपला जम बसवला. हरियाणा मधील हिस्सार आणि हांसी आणि अजून काही प्रदेश ताब्यात घेऊन त्याने आपले संस्थान बसविले. त्याच्या तीन चार वर्षाच्या लहानशा कारकिर्दीत त्याने आपल्या राज्यात टांकसाळ उघडली आणि आपल्या नावाचे चलनी रुपयाचे नाणे काढले.सन १७९७ ते १८०२ च्या दरम्यान या भागात त्याचे वर्चस्व राहिले. त्याने आपले राज्य चार परगण्यात विभागले होते. स्थानिक सैनिकांना आपल्या कडे आकर्षित करण्यासाठी त्याने निवृत्ती वेतन देण्यास सुरुवात केली. सन १८०१ मध्ये शेखावतांच्या बाजूने त्याने फतेहपूरच्या लढाईत भाग घेतला. त्या लढाईत त्याच्याकडे १२०० शिपायांच्या ३ पलटणी,९०० घोडेस्वार, ३०० रोहिला, २०० हरियाणवी सैनिक आणि १४ तोफा होत्या. जॉर्ज याच्या शिस्तबद्ध कवायती फौजेपुढे राजपूत सैन्यांनी नांगी टाकली आणि सुरुवातीपासूनच त्यांनी काढता पाय काढायला सुरुवात केली. जॉर्जने राजपुतांच्या तोफदलावर कब्जा मिळवला आणि त्यामुळे शेवटी राजपुतांचा पराभव झाला. इतिहासात त्याला ‘जहराई जंग’ आणि ‘जहाजी साहेब’ या टोपण नावाने सुद्धा ओळखले जाते.
वामनरावच्या काळात १७९२ मध्ये जॉर्ज टॉमस स्वतंत्र झाला आणि त्याने झझ्झर, हिस्सार व नारनॉल या प्रदेशावर ताबा मिळवला. नंतर त्याने शेजारच्या प्रांतावर कब्जा करण्याचा प्रयत्न सुरु केला. त्याने हंसी येथील जुन्या किल्ल्याची डागडुजी करून आपले स्थान बळकट करण्याचा प्रयत्न केला. १७९७मध्ये त्याने शीख संस्थानिकाशी मदतीचा हात पुढे केला आणि एकत्रिपणे मराठ्यांशी लढाई करण्याचा बेत केला. परंतु पूर्वानुभवावर आधारित शिखांचा त्याच्यावर विश्वास नव्हता तेव्हा त्यांनी मैत्री करून आपला नाश करून घेण्यास नकार दिला.
शीख संस्थानिकांनी मैत्रीला नकार दिला म्ह्णून जॉर्जला राग आला आणि त्याने शिखांना धडा शिकवण्याचे ठरवले व १७९८ मध्ये शेजारच्या जिंद संस्थानांवर हल्ला चढवला. जिंद हे हांसी गावाच्या ईशान्येस २० मैलावर होते. त्यावेळी शिखांचा प्रमुख राजा लाहोर येथे काबूलमधून होणाऱ्या शहा जमान दुराणी याच्या स्वारीला तोंड देण्यासाठी गेलेला होता. याचा फायदा जॉर्जने उचलला. जिंद शहराला वेढा पडला आहे हे समजताच अनेक संस्थानिक लाहोरची मोहीम अर्धवट सोडून परतले आणि त्यांनी जॉर्ज टॉमसच्या सैन्यावर हल्ले चालू केले. परंतु जॉर्जच्या शिस्तबद्ध कवायती सेनेपुढे त्यांचे काही चालेना. शेवटी पतियाळा येथून शिखांची एक तुकडी शूरवीर महिला सेनापती साहेब कौर हिच्या हाताखाली जमा झाली. अशा प्रकारे शिखांचे सुमारे २५ हजार सैनिक एकत्र आले, काहींच्या अंदाजाप्रमाणे ही संख्या ४० हजार झाली होती. तेव्हा जॉर्जला कळून चुकले आता एव्हढ्या मोठ्या फौजेसमोर आपला टिकाव लागणार नाही. तेव्हा त्याने माघार घेतली. तेव्हा शिखांनी त्याचा पाठलाग केला. जॉर्जने घेतलेली माघार ही एक शिखांना फसवण्यासाठी केलेली धूळफेक होती, जॉर्ज टॉमस याने त्यांच्यावर पुन्हा हल्ला करणाऱ्या शीख फौजेला रात्री छापा घालून त्याने चांगला हात दाखविला आणि त्यांची दाणादाण उडवली. यावेळी मात्र शिखांनी जॉर्ज बरोबर तहाची बोलणी केली, जॉर्ज देखील तहाला उत्सुक होता कारण त्याचे स्वतःचे अनेक शत्रू होते. त्याच्यामुळे तह करणे त्याला योग्य वाटले.
शिखांशी झालेला तह फार दिवस टिकला नाही कारण जॉर्जकडे सैनिकांना पगार देणे त्याला जड जाऊ लागले. त्यासाठी त्याला शेजारच्या जिंद व इतर भागावर धाडी घालून पैसे गोळा करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. आपल्या फौजेला तो नुसते बसवून ठेवणे पण त्याला शक्य नव्हते. त्यामुळे जॉर्जने शिखांच्या पतियाळा वगैरे भागात बराच धुमाकूळ घातला व लूट जमा केली. या काळात त्याच्या शिखाबरोबर लहानमोठ्या चकमकी चालूच राहिल्या.
पेरनशी लढाई व मृत्यू: या अशा अनेक लढायांमुळे शीख तसेच जॉर्जचे सैनिक कंटाळून गेले होते आणि शेवटी १८०१ मध्ये त्यांच्यात पुन्हा एक तह करण्यात आला. यावेळी मराठ्यांचा फ्रेंच सेनापती पेरन (General Pierre Cuillier-Perron)आपली कवायती फौज घेऊन दिल्लीत आला होता. पेरन सन १७८५ पासून महादजींच्या नोकरीत होता. पेरन हा डी बॉयन त्याच्या हाताखाली शिकलेला होता आणि सन १७९६मध्ये डी बॉयन मायदेशी परतल्यानंतर शिंद्यांचा सेनापती झाला होता. तेव्हा बऱ्याच शीख संस्थानिकांनी पेरणला भेटायला आपले वकील पाठवले व त्याला जॉर्ज विरुद्द साहाय्य करण्याचे आश्वासन दिले. पेरन याने शिखांना दोन कारणासाठी मदत करण्याचे ठरवले एक म्हणजे जॉर्जची सतत वाढणारी ताकद त्याच्या डोळ्यात खुपत होती आणि दुसरे कारण म्हणजे अशी त्रयस्थाची ताकद मराठ्यांच्या वर्चस्वासाठी धोकादायक होती. १८०१ मध्ये पेरन याने जॉर्ज टॉमस याला दिल्लीला भेटायला बोलावले, परंतु टॉमसने नकार दिला. तेव्हा वाटाघाटी होऊन दोंघांची भेट दिल्लीजवळ सुमारे ३० किलोमीटर अंतरावरील बहादूरगड येथे झाली. तेथे त्यांच्यातील बोलणी फिसकटली व दोघांनी एकमेकांशी दुश्मनी पत्करली. अशा प्रकारे पेरन याने आपल्या हाताखालील लेफ्टनंट लुईस बौरक्वीन आणि स्मिथ बरोबर सैन्य देऊन जॉर्ज टॉमस वर रवाना केले. पेरनच्या साहाय्याला जिंद आणि कटियाल संस्थानातील काही शीख फौजेच्या तुकड्या मदतीला पोचल्या. हंसीच्या ठाण्यातून जॉर्ज टॉमस याने स्मिथ बरोबर झालेल्या लढाईत त्याचा पराभव केला आणि नंतर जॉर्जगडजवळ झालेल्या लढाईत लुईस बौरक्वीन याचा पराभव केला. तेंव्हा बौरक्वीन याने पेरनकडे सैन्याची कुमक पाठवणायची मागणी केली. ती कूमक पोचल्यावर पुन्हा लढाईला तोंड फुटले आणि यावेळी मात्र जॉर्ज टॉमसला माघार घ्यावी लागली. प्राणावर बेतणार असे दिसल्यावर नाईलाजाने हांसी सोडून त्याने आपल्या खाजगी ऐवजांसह जीव वाचवून कलकत्याला प्रयाण केले. अशा प्रकारे अंतिमतः पेरनकडून पराभूत होऊन कलकत्ता येथे जाताना जॉर्ज टॉमस २२ ऑगस्ट १८०२ रोजी मुर्शिदाबाद जवळ बेहरामपूर येथे मरण पावला. बेहरामपूर शहरात बाबुलबोना येथे त्याचे थडगे आज ही अस्तित्वात आहे.त्याच्या मृत्यूनंतर जॉर्ज टॉमसच्या बायकामुलांचा समेरू बेगमने तिच्या अखेरपर्यंत चांगला सांभाळ केला.
त्या काळात जॉर्जगडचा उपयोग झझ्झर व बेरी प्रांतावर नजर ठेवण्यासाठी केला जात असे. या किल्ल्याची तटबंदी आणि बुरुज पडक्या अवस्थेत आज आढळतात.
मित्रानो, अठराव्या शतकात हिंदुस्थान म्हणजे एक सोन्याची चिडिया होती. युरोपातून अनेक जण आपले नशीब अजमावण्यासाठी व माया जमवण्यासाठी हिंदुस्थानात येत. हिंदुस्थानातील वेगवेगळ्या राजांकडे कवायती फौज तयार करून ते संपत्ती एकत्र करून आपली संपत्तीची हाव पुरी करून घेत. जॉर्ज टॉमस हा त्यापैकीच एक होता.आज हरियाणातील या सपाट भूमीवर ना जहाज आहे ना गड, आता आहे फक्त 'पडझड' !! तथापि ‘जहाजगड’ नावाचे गाव मात्र जॉर्ज टॉमसची स्मृती म्हणून अजून उभे आहे !!
_______________________________________________________________________
संदर्भ: नाथवातोंका इतिहास लेखक हनुमान शर्मा, मुघल साम्राज्य की जीवनसंध्या लेखक राजेश्वरप्रसाद नारायणसिंह, मराठी रियासत भाग ७ लेखक गो. स. सरदेसाई, मराठी सत्तेचा उत्तरेकडील विस्तार लेखक शंकर पुरुषोत्तम जोशी, The Rajas of Punjab: Lepel H.Graffin संकलन व लेखन: प्रमोद करजगी
No comments:
Post a Comment