मराठेशाहीतील वाठार निंबाळकर घराणे
वाठार निंबाळकर
(इतिहासवाटा -७४ )
ऐतिहासिक कालखंडात सातारा प्रांतातील फलटण संस्थानच्या नाईक निंबाळकर घराण्याचा मूळ पुरुष निंबराज पवार हे अस्सल रजपुतकुलांपैकी एक घराणे आहे. निंबराज हे उत्तरहिदुस्थानांतील प्रख्यात असलेल्या धारानगरीतील पवार आडनावाचे मान्यवर व्यक्तीमत्व होते. उत्तर हिंदुस्थानात यवन सत्ता प्रबळ झाल्यामुळे उत्तर हिंदुस्थानात असलेल्या निंबराजने धारानगरीचा ( धार संस्थान ) त्याग करून काही वर्षे दक्षिण हिंदुस्थानातील जंगलात वास्तव्य केले. तेथे असताना त्यांना " तुमच्या घराण्याला उज्वल भविष्य "असल्याचे दैवी संकेत मिळाले व ते दक्षिण हिंदुस्थानात कायमचे स्थायिक झाले. सातारा प्रांतातील फलटणच्या पूर्वेस असलेल्या एका ठिकाणी काही लोक जमवून एक नवीन गावच निर्माण केले, त्यास "निंबळक" ही संज्ञा मिळाली. काही दिवसांतच निंबराज यांस याच गावातील एका निंबवृक्षाखाली एक स्वंयभू देवीची मूर्ती असल्याचा दृष्टान्त होऊन त्याप्रमाणे ती मूर्ती मिळाली. त्या देवीच्या मूर्तीला निंबजाई हे नाव देऊन त्याच ठिकाणी एक दगडी बांधकामातील सुंदर मंदिर निर्माण करण्यात आले. निंबजाई हे नाईक निंबाळकरांचे कुलदैवत मानले जाते. या शिवाय टाकळवाडी येथील देवी, राजाळे येथील जानाईदेवी व जावळी मधील जावळ सिद्धनाथ ही देखील त्याची कुलदैवते मानली जातात. निंबराज पवार यांनी स्वकर्तृत्वाने बरेच द्रव्य संपादिले होते. असे हे नाईक निंबाळकर घराण्याचे मूळ पुरुष इ.स.१२९१ मधे मृत्यू पावले. त्यांच्यानंतर त्यांच्या वंशात १) धारराव, २) निंबराज दुसरे, ३) वणंग भूपाळ, ४) वणंग पाळ, ५) वणंगोजीराव, ६) मालोजीराव, ७) बाजी साहेब, ८) पोवार नाईक ९) बाजी दुसरा १०) मुधोजी नाईक ११) बाजी धारराव व मालोजी दुसरे असे कर्तबगार पुरुष या घराण्यात होऊन गेले.
मालोजीरावांची कारकीर्द इ.स.१५६० ते १५७० पर्यंत होती. मालोजीरावांच्या धर्मपत्निचे नाव रूपाबाई असे होते व तिजपासून म्हाकोजी व अरजोजी असे दोन पुत्र आणि दीपाबाई नामक एक कन्या होती. ह्या दीपाबाईचा विवाह वेरुळच्या मालोजीराजे भोसले यांच्याशी झाला होता व तिच्या पोटी स्वराज्यसंस्थापक छत्रपति शिवाजी महाराजांच्या वडिलांचा म्हणजेच शाहजी महाराजांचा जन्म झाला होता. मालोजीराव नाईक निंबाळकरांच्या मृत्यूनंतर त्यांची दोन्ही मुले म्हणजेच म्हाकोजी व अरजोजी हे विभक्त होऊन राहू लागले तेव्हा त्यांच्या मातोश्री रूपाबाईने आपल्या दोन्ही मुलांना आपल्या जाहगिरीचे वाटप स्वतः करून दिले. मालोजीरावांचे जेष्ठ पुत्र म्हाकोजीराव हे वाठारकर नाईक निंबाळकर घराण्याचे मूळ पुरुष तर फलटणची जहागीर अरजोजीराव यांच्या वाट्याला आली. म्हाकोजीराव हे काहीसे वेडसर असल्याने व महादजी नाईक निंबाळकर हे छत्रपति शिवाजी महाराजांचे जावई असल्याने त्यांच्या प्रभावामुळे म्हाकोजींना मूळ जहागीरीचा व मिळकतीचा निम्मा हिस्सा पूर्णपणे उपभोगता आला नाही. ते फक्त वाठार गावचे इनामी वतन, शे-या, देशमुखी, पाटीलकी इत्यादीं उत्पन्नाचा उपभोग घेत राहिले.
No comments:
Post a Comment