भोसले कुळाची कुळगाथा सांगणारी तीनमजली भव्य बारव - ऐतिहासिक नगरी श्रीगोंदा
संशोधन व लेखन
प्रा.राजेश बाराते
भव्य वाड्याचे व प्राचीन मंदिराचे मध्ययुगीन नगर म्हणून श्रीगोंद्याची ओळख आहे.संशोधकांना ऐतिहासिक संशोधनासाठी या नगराचे अनन्य साधारण महत्व आहे.
श्रीगोंदा हे नगर जिल्ह्यातील ऐतिहासिक व पौराणिक संपन्न वारसा लाभलेले शहर होय. या शहराला ' श्रीपूर ' असे नाव होते. या श्रीपुरचे ' चाम्भारगोंदे' हेच आजचे श्रीगोंदा अशी विविध नामभिधाने प्राप्त झाली आहेत. श्रीगोंदा शहराला दक्षिण काशी असे म्हटले जाते कारण विठ्ठल मंदिरात प्रति पंढरपूर असा शिलालेख आहे,तसेच ११३ प्राचीन मंदिर हि या ठिकाणी आहे. पुरातन मंदिरे त्यात यादव,मराठापूर्व,मराठाकालीन मंदिरे पाहिल्यास श्रीगोंदा शहराच्या वैभवाची साक्ष नक्की पटते. शिंदेकालीन राजवटीतील ऐतिहासिक व भव्य वाडे हेही श्रीगोंद्याचे एक महत्वाचे वैशिष्ट्य होत. श्रीगोंद्यातील वाडा कारागीर हे मध्यकालखंडात महाराष्ट्रात नावाजलेले होते.येथे अनेक मंदिरे, वाडे व त्यासोबतच विविध साधू संतांच्या वास्तव्याने हि नगरी पुनीत झाली आहे. श्रीपूर हे नाव श्रीलक्ष्मीच्या येथील वास्तव्यावरून पडल्याचे श्रीपूर महात्म्य ग्रंथात म्हटले आहे . पांडू विप्र नावाच्या भक्तासाठी श्री विष्णुंनीही या ठिकाणी बालरूपात अवतार घेतला म्हणून त्यांची श्री लक्ष्मी व श्री पांडुरंगाची स्वतंत्र मंदिरे येथे पहावयास मिळतात. पंढरपुरचे श्री विठ्ठल व श्रीगोंद्याचे श्री पांडुरंग हि दोन स्वतंत्र दैवते असल्याचेही या ग्रंथात दिले आहे.सदर श्रीपूर नगरीचे वर्णन ' स्कंद पुराणात ' सापडते. १२ महादेव( ३ अन्य ), अष्टविनायक ( अन्य ३) , अष्टभैरव,नवदुर्गा, ११ मारुती याशिवाय श्री बालाजी, लक्ष्मी नारायण, एकमुखी दत्त, विठ्ठल रुक्मिणी, श्रीराम, श्रीकृष्ण, शनी महाराज, श्री भगवान कार्तिकेय, खंडोबा अशी अन्य मंदिरेही आहेत. याशिवाय भारतात अत्यंत थोड्या ठिकाणी असणारे सूर्य मंदिरही होते पण सध्या ते अस्तित्वात नाही. त्याच बरोबर श्रीगोंदा नगरीत होऊन गेलेल्या विविध संताची मंदिरेही आहेत त्यात श्री संत शेख महम्मद महाराज, संत प्रल्हाद महाराज, संत गोधडे महाराज, संत राउळ महाराज, संत गोविंद महाराज, संत वामनराव पै यांचे गुरु संत नानामहाराज श्रीगोंदेकर, संत मोदोबा महाराज अलीकडील काळातील संत तात्या महाराज महापुरुष असे विविध जाती- धर्मातील संत या भूमीत होऊन गेले त्या सर्वांची मंदिरेही शहरात आहेत. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पदस्पर्शही येथे झाला असून दांडेकर मळा येथे त्यांचे मंदिर आहे. संत शेख महम्मद महाराजांच्या घराण्याचा खाटकाचा व्यवसाय होता. पण त्यांना ईश्वरभक्तीची ओढ लागली व वारकरी संप्रदायाचा त्यांनी पुरस्कार केला.
छत्रपती शिवाजी महाराजांचे पणजोबा बाबाजीराजे भोसले हे वेरुळवरून देऊळगाव येथे येऊन राहिले.मालोजीराजे व विठोजीराजे यांनी त्यांचे स्नेही वंनगपाल निंबाळकर यांबरोबरच कर्तबगारी केली.त्यामुळे निजामशहाने वस्त्रे व सरंजाम दिला.भोसले कुळाची कर्तबगारीला सुरवात येथूनच झाली.
श्रीगोंदा शहरात मोठ्या सराफी व व्यापारी पेठा होत्या वेरुळच्या घ्रुश्नेश्वरचे बांधकामासाठी येथीलच शेशाप्पा नाईक पुंडे यांच्या पेढीतून रक्कम नेत असल्याचीही नोंद सापडते.मालोजीराजें वेरूळ मुक्काम असता त्यांना शंभू घृष्णेश्वर दृष्टांत दिला.दि.३० सप्टेंबर १५९५ रोजी द्रावलाभ झाला त्याप्रमाणे ते द्रव्य शेषप्पा नाईक श्रीगोंदेकर यांच्या घरी ठेविले.त्या द्रावलाभातून काही धर्म केला.त्यांनी शिखर शिंगणापूर येथील तळे खोदण्यास शके १५२१ विकारी नाम संवत्सरे (सन १५९९) सुरवात केली.तसेच तिथे मठ बांधला.
श्रीगोंदयाचा खूप अगोदरपासून भोसले कुळाचा स्नेह होता.१२ डिसेंबर १५९६ च्या पत्रावरून मालोजीराजे पांडे पेडगाव परगण्याचा कारभार पहात होते.चांभारगोंदे परगणे व पांडे पेडगाव परगणे यांचा सरंजाम मालोजीराजे यांकडे आला होता.त्यामुळे मालोजी राजेंनी आपल्या अधीवासासाठी श्रीगोंदा निवडले.त्याकामी मालोजीराजे यांनी दिवाण बालाजी कोन्हेरे यांना श्रीगोंदयात जमीन खरेदी करण्यास सांगितले.त्याप्रमाणे ३ ll चावर जमीन खरेदी केली.तेथे मकरंदपूरा नावाची पेठ निर्माण करण्यास सुरवात झाली.सन १००५ हिजरी (ऑगस्ट १५९६ ते जून १५९७)मकरंदपूर पेठेची हद्द पश्चिमेस नाला,पूर्वेस नगरची वाट राजमार्ग,दक्षिणेस कबरस्थान,उत्तरेस थळ चेलेकरांचे होय.मालोजीस मकरंद म्हणत असे त्यावरून मकरंदपूर पेठ नाव ठेविले.येथे अनेक बांधकामे करऊन घेतली.सन.१५९७ ला मालोजीराजे श्रीगोंदयातील नवीन वाड्यात येऊन राहिले.सन १५९१ ते सन १५९५ पर्यंत निजामशहास सहाय केले होते.त्यामुळे मालोजीराजे यांस दीडहजार सरंजाम ऐवजी पंचाहजार सरंजाम व त्यासाठी सुपा परगणा हवाली केला होता.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे यांनी महाराजांना गुरु मानले होते.या मकरंदपूर पेठेच्या पश्चिम बाजूस म्हणजे मालोजीराजे यांच्या वाड्याच्या पश्चिम लगत एक भव्य मठ बांधला.
श्री संत महंमद महाराज हे संत तुकाराम महाराजांचे समकालीन होते त्यांनी तुकाराम महाराजांचे कीर्तन सुरु असताना आग लागली. त्यांनी हाताने येथूनच देहूचा मंडप विझविल्याची आख्यायिका सांगितली जाते. संत शेख महम्मद महाराज यांनी येथेच अनेक ग्रंथाचे विपुल लेखन केले असून ' योगसंग्राम व पवन विजय ' हे त्यांचे प्रमुख ग्रंथ आहेत. शेख महम्मद अविंध / त्याचे हृदयी गोविंद // असे ते एका अभंगात म्हणतात.
आध्यात्मिक गुरू शेख महंमद महाराजांना श्रीगोंदयात रहिवास करण्यास तो मठ होता.त्यासाठी काही जमीन इनाम दिली होती.तसेच एक गुफाही निर्माण केली.या मठाच्या उत्तर प्रवेशद्वारपाशी (इ.स.१५९६) एक भव्य बारव खोदली व तिचे बांधकामही पूर्ण केले.ही बारव खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. बारवेचा आकार लहान आहे परंतु खोली जास्त आहे.पाण्यापर्यंत जाण्यासाठी पायऱ्यांची रचना खूप छान आहे.या पायऱ्या जमिनी अंतर्गत असून तळापर्यंत जाण्याची व्यवस्था पाहण्यासारखी आहे. पूर्वेकडे उतरत जाणाऱ्या पायऱ्यांना वळण देऊन दक्षिणेकडे पाण्यापर्यंत जाता येते.दक्षिणेकडील पायऱ्यांची रचना पूर्णपणे जमिनीच्या आतमधून आहे.त्यावरती तीन प्रवेशद्वारे टप्या टप्यानी निर्माण केली आहेत.वरील दोन प्रवेशद्वारांपर्यंत जाण्याची व्यवस्था नाही.ते छोटी खोली वजा बांधकाम आहे.त्याचे प्रयोजन काहीतरी वेगळं असावं.या बारवेमध्ये प्रवेश करणारे मुख्य प्रवेशद्वार हे खूप लहान आहे.जसा किल्यात गुप्त दरवाजा असतो.त्यामुळे ते लवकर दिसत नाही.पायऱ्यांवरून खाली उतरले तर तळघरात गेल्यासारखे जाणवते तसेच आतमध्ये खूप शांतता व सुखद गारवा आहे..हे सर्व बांधकाम चिरेबंद दगडामध्ये बांधलेलं आहे.बारवेची खोली जास्त असल्याने पाणी चांगले व मुबलक आहे.बारवेचे वरून निरीक्षण केल्यास तीन पाण्यापर्यंत जाणारी गृहवजा प्रवेशद्वारे खूप छान दिसतात तसेच ही प्रवेशद्वार टप्पा करून बांधलेली आहेत.कदाचित गुंफा अथवा मन चित्तेसाठी याचा उपयोग होत असावा.या बरावेचे बांधकाम चौकोनी आहे.तळापासून वरती रहाटापर्यंत पूर्ण बांधकाम केलेले आहे.पूर्वेला रहाटाचे दोन दगड आहेत. त्यामुळे रहाट अथवा मोट ही येथे चालवत असावीत.या परिसरात भव्य बांधकामे आहेत परंतु त्यातून ही बारव आपली वैशिष्ट्ये प्रतिबिंबित करत संशोधकांना बारवेकडे खेचत असते.जशी बारामोटेची विहीर आहे त्याची ही प्रतिकृती आहे.कदाचित असेच बांधकाम भोसले कुळात करत असावेत, कारण बारामोटेची विहीर यानंतर खोदली आहे. पण तिची रचना या बारवेसारखीच आहे. फक्त आकाराचा विचार करता लहान मोठा आहे.
शिवाजी महाराजांचे आजोबा मालिजीराजे यांनी ही बारव मठाच्या आवश्यकतेनुसार पाणी उपलब्धतेसाठी बनवली.आपल्या पूर्वजांनी या बारवेचे पाणी प्राशन करून आपली तृष्णा शमवली होती.आजही ही बारव स्वच्छ असून पाणी हे रोहित्राद्वारे परिसराची तहान भागवत आहे.
थोर मराठा सेनानी महादजी शिंदे, दत्ताजी शिंदे,राणोजी शिंदे यांच्या वास्तव्याच्या व शिन्देकालीन इतिहासाची साक्ष देणाऱ्या अनेक इमारती आजही भग्नावस्थेत का होईना उभ्या आहेत. शिंदे घराण्यातील सती गेलेल्या काही स्त्रियांच्या छत्र्या तसेच महादजी शिंदे यांच्या पादुकाही पहावयास मिळतात .खर्ड्याच्या लढाईचा विजयोत्सव भगवा झेंडा फडकावून केला होता त्या स्थानाला "विजय चौक झेंडा" असे नाव दिले आहे.ज्या वेशीतून शिंदे घराण्यातील वीरपुरुष बाहेर पडले व परत आलेच नाहीत त्या "दिल्ली वेशीला" आजही अपशकुनी समजले जाते लोक चांगल्या कामासाठी व गावाबाहेर जाण्यासाठी या वेशीचा वापर आजही करीत नाहीत. अनेक बारवा,पेव,प्राचीन भव्य वाडे त्यावरील काष्ठशिल्प,वेशी,घाट,चिंचबन,मंदिरे,समाध्या,विरगळ-स्मारक शिला अशी अनेक साधने गतकाळीं सोनेरी इतिहासाची साक्ष देतात.
मध्ययुगीन कालखंडामध्ये प्रत्येक मंदिरे,घाट,महत्वाचे धार्मिक ठिकाण,प्रत्येक गाव-कसबा, महत्वाचे व्यापारी राज मार्ग,वेशी लगत,वाड्याच्या अंतर्गत अनेक छोट्या - मोठ्या बारवा आहेत.जिथे पाणी नाही तिथे मानव वस्ती नाही.मानवाच्या,राजसंस्थेच्या विकासासाठी पाणी उपलब्धता खूप आवश्यक आहे.श्रीगोंदा नजीक इनामगाव येथे ताम्रपाषाणयुगीन कृत्रिम बांध आहे.सिंधू,इजिप्त,ग्रीस,मेसोपोटेमिया अथवा चीन या सर्व संस्कृती या नदीकिनारी अथवा पाणी उपलब्ध असणाऱ्या ठिकाणी विकसित झाल्या.त्याला आपलं श्रीगोंदा अपवाद कसे असेल.श्रीगोंदा अपरिसरातील अनेक बारवा या वेगवेगळ्या कालखंडात खोदल्या गेलेल्या आहेत.प्रत्येक बारवेचा वेगळा इतिहास आहे,काही आख्यायिका आहेत.भव्य बारव या महत्वाच्या ठिकाणी आहेत.त्यातील महत्वाचे ३ प्राचीन राजमार्ग श्रीगोंदा नगरातून जात होते.त्यामुळे त्या मार्गावर्ती बारव आहेत.पर्यटक ,व्यापारी अथवा सैनिक आवकजावक करत असत.
समृद्धतेकडे वाटचाल करत असताना मूळ सांकृतिक व ऐतिहासिक वारसा मात्र दुर्लक्षून चालणार नाही. शहराच्या भौतिक विकासासोबतच संपन्न परंपरेचे जतन व संवर्धन करणे गरजेचे आहे कारण इतिहासातून शिकूनच वर्तमानातून भविष्य घडवता येते.आपल्या पूर्वजांनी जो महान वारसा आपल्यासाठी दिला आहे त्याचे संवर्धन करण्यासाठी, स्वतःची अस्मिता जपण्यासाठी नागरिकांना एकत्र यावेच लागेल.
धन्यवाद....
संशोधन व लेखन
प्रा.राजेश बाराते
श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय,
श्रीगोंदा
No comments:
Post a Comment