रणराज यशवंतराव होळकर!
३ डिसेंबर यशवंतराव होळकरांची जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
उत्तर पेशवाईच्या काळात विशेषतः महादजी शिंदेच्या मृत्यूनंतर रणबहादूर म्हणून नाव घ्यावे असे व्यक्तीमत्व म्हणजे यशवंतराव होळकर हे होते. यशवंतराव हे तुकोजी होळकरांचे पुत्र होते. यशवंतरावांनी वयाच्या बाराव्या वर्षीच रणांगणात समशेर चालवली. निजामाविरुद्धच्या खर्ड्याच्या लढाईत यशवंतरावांनी शौर्य गाजवले होते. पेशव्यांचे दोन आधारस्तंभ असलेल्या होळकर आणि शिंदे यांच्यात वाद निर्माण झाला. यशवंतरावांना आपली इंदौरची गादी मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला . मध्यंतरीच्या काळात ब्रिटिशांनी मोठ्या हुशारीने देशभर पसरलेल्या मराठेशाहीच्या सरदारांना संपवून टाकण्याचा धडाका लावला. शिंदे व भोसले हे पराभूत झाले.व त्यांनी तैनाती फौजेचा स्वीकार केला. सर्वाचा पराभव केल्यानंतर ब्रिटिश यशवंतराव होळकराकडे वळले. यशवंतरावांनी जीवाच्या आकांताने महाराष्ट्रापासून पार पंजाबपर्यंत सर्वच एतद्देशीयांना एकजुट करण्याचा प्रयत्न करत होते. पण एकी झालीच नाही.
पेशवे, शिंदे, होळकर, भोसले, निजाम सगळेच एकत्र झाले असते तर ब्रिटिशांना भारताबाहेर हुसकावून लावणे सहज शक्य झाले असते. मात्र ब्रिटिशांनी सर्वाच्या पायात तैनाती फौजेची बेडी अडकवली होती. त्यामुळे ते शक्य झाले नाही. देशातील सर्वच राज्यकर्ते संख्येने, शौर्याने, गुणाने वरचढ होते. पण ब्रिटिशांच्या एकेकाला बाजूला काढण्याच्या, फूट पाडण्याच्या षड्यंत्राला ते बळी पडले आणि हा खंडप्राय देश परकीयांच्या हातात गेला. परंतु, ‘घोड्याचे जीन हेच माझे सिंहासन’ असे मानणार्या यशवंतरावांनी प्रतिकार सुरूच ठेवला. देशभर सार्यांनी ब्रिटिशांच्या ताकदीपुढे मान टाकली, पण यशवंतराव होळकरांच्या कहाणीचे वेगळेपण हेच आहे की, इतरांना ब्रिटिशांनी जसे सहज नमवले तसे यशवंतरावांबाबत करता आले नाही. जनरल लेक व कर्नल मॉन्सन यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश फौजेने यशवंतरावांच्या प्रदेशावर हल्ले सुरु केले. यशवंतरावांची झुंज देण्याची कुवत असामान्य होती. ते गनिमी काव्यात विशेष पारंगत होते.१८०४ मध्ये यशवंतरावांनी मॉन्सनचा पराभव करुन इंग्रजांना चकित केले. मथुरा ब्रिटिशांकडून जिंकून दुसरा धक्का दिला. पुढे यशवंतरावांना दिल्ली जिंकण्याची इच्छा होती. मात्र ते स्वप्न त्यांचे पूर्ण झाले नाही .फर्रुखाबाद येथे यशवंतरावांचा पराभव झाला .तथापी हिंमत न हारता यशवंतराव जाट राजा रणजितसिंग यांची मदत घेऊन ब्रिटिशांना प्रतिकार करत होते. पुढे रणजितसिंग ही इंग्रजांना जाऊन मिळाला. त्यामुळे यशवंतराव एकाकी पडले. शेवटी २४ डिसेंबर १८०५ रोजी यशवंतरावांनी ब्रिटिशांबरोबर राजघाटचा तह केला. या तहाबरोबरच मराठेशाहीचा शूर-वीर शिलेदारांची झुंज संपली. फेब्रुवारी १८०६ मध्ये यशवंतरावांनी व्यंकोजी भोसले यांना लिहिलेल्या पत्रात म्हणतात ," स्वराज्यातील ऐक्यता बहुत,येणे करुन आजपोवतो व्यंग न पडता एकछत्रीच अंमल फैलावला. हल्लीच्या आपसातील बदचाली पाहून सर्वास आपापले घर संरक्षण करुन मांडलिकीने असावे हेच प्राप्त झाले."यशवंतरावांना राजघाटावरील ब्रिटिशांशी करावा लागलेला तहाने मनस्वी यातना झाल्या.यशवंतरावांची एकाकी झुंज मराठेशाहीच्या इतिहासात विलक्षण चटका लावणारी ठरली. वयाच्या अवघ्या ३०व्या वर्षी २८ अॉक्टोबर १८११ रोजी त्यांचा मृत्यू झाला. ब्रिटिश इतिहासकारांनी त्यांचा उल्लेख भारतीय नेपोलियन असा केला होता.
--- प्रशांत कुलकर्णी मनमाड