विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 19 August 2021

राघोभरारीच्या नेतृत्वाखाली अटकेपार भगवा झेंडा.......

 राघोभरारीच्या नेतृत्वाखाली अटकेपार भगवा झेंडा.......

ब्रिटिशांचा वसाहतवादी इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या  बुद्धीवंताना हा भारत देश एक राष्ट्र  कधी वाटला नाही. अर्थात इतिहास हा कोणाला काय वाटते याचा अजिबात  विचार करत नाही. भारताच्या इतिहासाचा ऐतिहासिक  दस्ताऐजवानूसार विचार  केला असता भारत देश हा सिंधूपासून कन्याकुमारीपर्यत भौगोलिक दृष्टीने  एकसंघ तीन वेळा होता. प्राचीनकाळी मौर्य घराण्यातील  चंद्रगुप्त मौर्याच्याकाळात त्यानंतर  गुप्त घराण्यातील समुद्रगुप्तच्या काळात व त्यानंतर १७५६- १७५७ मध्ये मराठा साम्राज्यतील पेशव्यांच्या काळात ! छत्रपती शिवाजी महाराजांनी  हिंदवी स्वराज्यांची निर्मिती  केली. शिवरायांच्या मृत्यूनंतर  धर्मवीर संभाजी महाराजांनी , राजाराम महाराज , महाराणी ताराबाई यांच्या  नेतृत्वाखाली  औरंगजेबाला चिवट लढत दिली. अखेर महाराष्ट्राच्या  मातीतच औरंगजेबाचा मृत्यू  झाला. या २७ वर्षाच्या लढाईमुळे मुघल साम्राज्याचे कमकुवत बाजू मराठ्यांनी  चांगलीच हेरली. त्यामुळे पुढे श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या  काळात मराठा साम्राज्याने थेट दिल्लीपर्यत धडक दिली. मुघल सत्ता  खिळखिळी करण्याचे मुख्य  काम मराठा साम्राज्याने केले. पुढे अफगाणिस्तनाचा अब्दाली व रोहिल्यापासून संरक्षण  करण्याची जबाबदारी  मराठा साम्राज्यावर येऊन पडली. दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र  माझा....ही उक्ती सत्यांत उतरली. १७५२ माध्ये मुघलांशी मराठ्याचा अधिकृत  तह झाला. त्यानंतर   अब्दालीने दिल्लीवर आक्रमण  करुन लुटालूट  सुरु केली. अर्थात स्थानिक  रोहिल्यांची त्यांना  मदत होती. अब्दालीने बनारस येथे येऊन तीर्थक्षेत्राची नासधूस केली. मुंडक्यांची रास लावली .ही बातमी समजल्यावर नानासाहेब  पेशव्यांनी  रघुनाथराव  पेशव्याच्या नेतृत्वाखाली  मोठी मराठा फौजेला अब्दालीच्या सैन्याचा सामना करण्यासाठी  पाठवले.  मराठा फौज दिल्लीच्या दिशेने येत आहे हे समजल्यावर अब्दाली अफगाणिस्तानच्या वाटेला निघाला. रघुनाथरावांबरोबर

 मराठा फौजेत त्यावेळी मानाजी पायगुडे, गंगाधर बाजीराव रेठरेकर, गोपाळराव गणेश, तुकोजी खंडोजी कदम, नरसोजी खंडोजी कदम, नरसोजी पंडित, साबाजी शिंदे, तुकोजी होळकर अशी मातब्बर सरदार मंडळी होते . पेशवे दफ्तर २७/२१८ यामध्ये याबाबतचे अस्सल पत्र उपलब्ध आहे. मराठा सैन्याने दिल्लीच्या पुढे अब्दालीचा पाठलाग सुरु केला.सन १७५८ मध्ये मराठ्यांनी सरहिंद, लाहोर, जिंकले अहमदशहा अब्दालीचा मुलगा तैमुर आणी सरदार जहानखान यांनी लाहोर सोडून पळ काढला. परंतु त्यांच्याजवळील अवजड तोफखाना व खजिना आणि  दिल्ल्तीतील लुटीचा खजिना त्यांनी तेथेच सोडून दिला .  तहमासखानाने मुक्त झाल्यामुळे लाहोरच्या वेशीचे दरवाजे उघडले याच दरम्यान मराठा सरदार वीर मानाजी पायगुडे यांनी १० एप्रिल १७५८ रोजी लाहोरमध्ये पहिले पाऊल  टाकले.तहमासखानाने आपल्या आत्मचरित्ररुपी "तहमासनामा" या ग्रंथात ही घटना स्पष्टपणे लिहून ठेवली  आहे.अब्दालीच्या सैन्याचा पाठलाग मराठ्यांनी चालूच ठेवला होता .  सतलज ,झेलम या मोठ्या नद्याहि ओलांडल्या मराठ्यांनी रावळपिंडीही सर केले मराठा फौजा सिंधू नदीच्या काठावर येऊन पोहचल्या नदीच्या पलिकडच्या काठावर अटक किल्ला आहे सध्या हा किल्ला पाकिस्तानात आहे . मराठी सैन्याने सिंधू नदीच्यावेगवान प्रवाहाचा अंदाज घेतला व नदीवर होडीचा पूल तयार करण्यात आला. मराठा फौज होडीच्या पुलावरून सिंधू नदी पार करून अटक किल्ल्यावर आल्या किल्ल्यावर हल्ला करून अटक मराठ्यांनी काबीज केला मराठा सैन्यानं अटकेपार भगवा झेंडा रोविला. मराठा साम्राज्याच्या इतिहासात हा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदला गेला. १० ऑगस्ट १७५८ ! पुढे मराठ्यांचा जाण्याची इच्छा  होती. मात्र चिनाब नदीच्या ओलांडणे कमी तापमानाने शक्य झाले नाही. रघुनाथरावांची काबूल व कंदाहार हा भाग जिंकण्याची इच्छा  होती. त्यासंदर्भात रघुनाथराव  आपल्या पत्रात स्पष्ट  म्हणता की," काबुल ,कंदाहार हा आपला भाग आहे तो विलायतेस का द्यावा ." एवढेच नव्हे इराणचा बादशहाने मराठ्यांना पत्र लिहून कळविले होते की," तुम्ही त्याबाजूने पुढे या व इराणच्या बाजूने येतो. आपण अब्दालीला साफ बुडवू".मात्र त्यावेळच्या नैसर्गिक  परिस्थितीमुळे ते शक्य झाले नाही.आणि  सर्वात महत्त्वाचे  म्हणजे  अब्दालीला मदत करणाऱ्या स्थानिक  रोहिला नजीबखानाचा पूर्णपणे  बंदोबस्त  त्यावेळलाच झाला असता तर पानिपतचे शल्य हाती आले नसते. मात्र अटकेपार भगवा झेंडा लावणारे मराठा साम्राज्य  भारतात किती प्रबळ होते हे यातून सिद्ध  होते. 


-- प्रशांत  कुलकर्णी  मनमाड 


संदर्भ  -

    मराठ्यांचा इतिहास खंड -२

   पेशवे घराण्याचा इतिहास  -श्री.ओक


No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...