पोर्तुगीजांचे कर्दनकाळ
थोर सेनानी चिमाजी अप्पा!
१७ डिसेंबर यांची पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
कोकणातील श्रीवर्धनचे बाळाजी विश्वनाथ भट यांना दोन
सुपुत्र होते. ते म्हणजे थोरले बाजीराव व चिमाजी अप्पा होय. थोरल्या बाजीरावांची तरी थोडक्यात माहिती शालेय पुस्तकात दिली आहे. मात्र चिमाजी अप्पा हे शूर असूनही दुर्लक्षितच राहिले . चिमाजी अप्पा यांचा जन्म १७०६ मध्ये झाला.थोरले बाजीरावांच्या प्रत्येक मोहिमेत चिमाजी अप्पा यांचे महत्त्वाचे योगदान होते. माळव्याची त्यांची यशस्वी मोहीम ऐतिहासिक महत्त्वाची असूनही दुर्लक्षितच राहिली आहे.विशेषतः म्हणजे या मोहिमेत चिमाजी अप्पा यांनी मुघल सेनापती गिरिधर बहादूर याचा स्वतःच्या तलवारीने शिरच्छेद केला होता.तसेच ज्यावेळी निजाम भली मोठी फौज घेऊन पुण्याला आला. त्यावेळी थोरले बाजीराव हे कर्नाटकच्या मोहिमेवर होते. त्यानंतर बाजीरावांनी ज्यावेळी पालखेडच्या लढाईत गुंतले होते. त्यावेळी शाहू छत्रपतीच्या संरक्षणाची पूर्ण जबाबदारी चिमाजी अप्पावर होती. पुरंदर किल्ल्यावर सुरक्षित ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांना ठेवून चिमाजी आप्पा ५००० मराठी सेनेसह उपस्थित होते. त्यामुळे बाजीराव निर्धौकपणे पालखेडच्या लढाईचे डावपेच टाकत होते. तसेच थोरले बाजीराव उत्तरेच्या मोहिमेत गुंतले असताना गोवेकर पोर्तुगीजांनी वसईमध्ये तोंड वर काढले.पोर्तुगीज हे धार्मिक कडवेपणा आणि राजकीय कावेबाजपणा यामुळे जगभर प्रसिद्ध होते. पाश्चात्त्य लोक हे अंजिक्य आहेत. असाच समज किती चुकीचा आहे. हे चिमाजी आप्पा यांनी वसईची मोहिम फत्ते करुन सिद्ध केले. कोकणामध्ये ठाणे आणि वसई याठिकाणी पोर्तुगीजांची केंद्रे होती.भारतीय राजकारणात हस्तक्षेप करण्याचे त्यांचे उपद्व्याप पूर्वीप्रमाणेच चालू होते.कान्होजी आग्रेचे आरमारी वर्चस्वाचा पोर्तुगीज द्वेष करत होते.मात्र सेखोजी आंग्रे यांच्या मृत्यूनंतर मानाजी व संभाजी या आग्रें बंधूमध्ये वैर निर्माण करण्याचा पोर्तुगीज प्रयत्न करत होते. शिवाय पोर्तुगीज वसई-ठाणे भागातील हिंदूवर अत्याचार करत होते.चिमाजी आप्पा यांनी पोर्तुगीजांविरोधात मोठी मोहिम हाती घेतली. मार्च १७३७ मध्ये चिमाजींनी ठाणे जिंकून घेतले. १७३८ मध्ये वसईची मोहिम काढली. ही मोहिम चार महिन्यापेक्षा जास्त काळ चालली. वसईच्या जवळपासची पोर्तुगीजांची ठाणे चिमाजींनी उदध्वस्त केली. त्यानंतर चिमाजींनी वसईच्या किल्ल्याला वेढा दिला.अनेक दिवस मोहिम चालू असताना ही वसईचा किल्ला सर होत नव्हता."पोर्तुगीजांना एक नेस्ताबूत करेल अन्यथा माझे मस्तक तरी उडवेल ." एवढ्या जिद्दीला ते पेटले होते. अखेर वसईच्या किल्ल्यावर अनेक ठिकाणी सुरंग लावून वसईचा किल्ल्याच्या तटाला खिंडार पाडले. चिमाजी अप्पांनी वसईची मोहीम यशस्वी केली. त्यावेळी पोर्तुगीजांच्या अनेक सुंदर स्त्रीया या किल्ल्यात होत्या. मात्र त्या सर्व स्त्रीयांना मानाने गोव्यात पाठवण्याची व्यवस्था चिमाजी अप्पांनी केली. पोर्तुगीजांची पाळेमुळे पार खणून काढले. वसईच्या यशामुळे वरसोवापासून दमणपर्यतचा अडीच लाखाचा मुलुख मराठ्यांच्या ताब्यात आला. पोर्तुगीजांच्या प्रचंड पराभवामुळे मुंबईकर इंग्रज सावध झाले. या युध्दाच्या नेत्रदीपक यशानंतर चिमाजी अप्पाने छत्रपती शाहू व बाजीरावांना पत्र लिहून कळवले की," यामागे युद्धे बहुत जाहली , परंतु या युद्धास जोडा नाही.,..." वसईच्या विजयांचे वर्णन शाहीर तिवारींनी मोठ्या सुंदर शब्दांत केले आहे.
" शोर्याची शर्थ जहाली ,बावटढा तटावरी चढला ! जय नादाने वसईचा , दिक् प्रांत अहा दुमदुमला ! पोर्तुगीज किल्लेवाला, अप्पांच्या शरणी आला.! वसईच्या किल्ल्यात अनेक मोठ्या घंटा होत्या. महाराष्ट्रात ठिकठिकाणच्या देवळांमध्ये टांगलेल्या घंटा , ही वसई-विजयाची स्मरणचिन्हेच आहेत.नाशिकच्या नारोशंकरची घंटा त्यातीलच एक होय. चिमाजी आप्पाचे १७ डिसेंबर १७४० रोजी पुण्यात निधन झाले. वसईच्या किल्ल्यामधील चिमाजी अप्पा यांचा स्मरणार्थ उभारलेला पुतळा त्यांच्या शौर्याचे सदैव स्मरण करतो.
थोरले बंधू बाजीराव पेशवे यांच्या झगमगत्या कारकीर्दीत चिमाजीआप्पांनी सदैव त्यांना सावलीसारखी साथ दिली. या जोडीचा निर्देश काही वेळा ‘राम-लक्ष्मण’ असा केला जातो, अर्थात लक्ष्मण हा कितीही गुणी व कर्तृत्ववान असला तरी रामाच्या कर्तृत्वापुढे त्याचे कर्तृत्व काहीसे झाकोळून जाते, तसेच चिमाजींबाबत घडले आहे. मराठ्यांच्या राजकारणाला उत्तराभिमुख बनवून मराठा साम्राज्यविस्ताराला चालना देण्यात बाजीराव पेशव्यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते. आणि चिमाजींचे सारे जीवितकार्य त्याला पूरक होते. आपल्या बंधूंप्रमाणेच राजकारण आणि रणकारण यांचा उत्तम मेळ त्यांनी साधला. मात्र एवढा पराक्रमी सेनापती असूनही चिमाजी अप्पा इतिहासात दुर्लक्षितच राहिले.
--- प्रशांत कुलकर्णी मनमाड
संदर्भ-
* मराठ्यांचा इतिहास खंड-२
*पेशवे घराण्याचा इतिहास - प्रमोद ओक
* प्रतापी बाजीराव - श्री.म.दिक्षित
* पेशवाई इतिहासातील सुवर्णपान - कौस्तुभ कस्तुरे
No comments:
Post a Comment