दौलतीचे कर्ज भाग -१
छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा विस्तार थोरले बाजीराव पेशव्यांच्या काळात थेट दिल्लीपर्यत झाला. बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशव्यांच्या काळात हा विस्तार अटकपर्यत झाला. मात्र जेव्हा आपण याकाळाचा सखोल अभ्यास केला तर जाणवते की , एवढे भले मोठे साम्राज्य असूनही अगदी थोरले बाजीरावांपासून माधवरावांपर्यत दौलतीचे कर्ज सतत वाढत होते. आणि या कर्जाची काळजी प्रत्येक पेशव्यांना सतावत होती. आजचा लेख या विषयावर प्रकाश टाकण्यासाठी आहे. मराठीत म्हण आहे मनुष्याला "सर्व सोंग करता येतात पण पैशाचे सोंग करता येत नाही." कोणतेही काम करण्यासाठी हाती पैसा लागतो. पैशाविना मनुष्य हतबल होतो. थोरले बाजीरावांच्या काळात नर्मदा नदी ओलांडून मराठ्यांच्या मोहिमा निघू लागल्या. आता कोणतीही मोहिम काढायची असल्यास त्यासाठी पैसा ही आवश्यक बाब होती. मराठा मंडळाचे प्रमुख म्हणून जरी पेशवे असले तरी राज्यकर्ते हे छत्रपती शाहू महाराजच होते हे विसरुन चालणार नाही. त्यामुळे एखाद्या नवीन क्षेत्रावर मोहिम काढायची असली आधि छत्रपती शाहूची पूर्वपरवानगी लागत असे. त्यानंतर मोहिम काढणारे प्रमुख पेशवे म्हणून पेशव्यांना मोहिमेचा सर्व खर्च करावा लागत असे. पैसा कसा उभा करावा हा मोठा प्रश्न पेशव्यांसमोर होता. त्यांतून पेशव्यांनी एक मार्ग काढला . थोरले बाजीरावांपासून अनेक पेशव्यांनी विवाह करताना सावकारांशी सोयरीक केली. त्यांचे कारण म्हणजे सावकारांशी सोयरीक असली तर कमी व्याजाने पैसा मिळत असे तसे परतफेडीचा अवधी सुध्दा वाढून मिळत असे. उदा - थोरले बाजीरावांची पत्नी काशीबाई या महादजीपंत जोशी या सावकारांची मुलगी होती. तर नानासाहेबांची पत्नी गोपिकाबाई या कोकणातील गुहागार येथील प्रसिद्ध सावकार रास्तेची कन्या होती. एवढेच नव्हे तर पानिपतच्या युध्दाच्याकाळात सदाशिवभाऊंनी पैशाची मागणी केल्यावर हाती पैसा नसताना तो उभा कसा करावा हा नानासाहेबासमोर मोठा पेच होता. आधिचे मोठे कर्ज असल्याने संबंधित सावकार पैसा देण्यास नकार देत असताना इच्छा नसतानाही पैठणचे सावकार नारायण नाईक वाख-यांची कन्या राधाबाईशी २७ डिसेंबर १७६० यादिवशी हिरडपूर येथे नानासाहेबांनी विवाह केला. ज्यांचे वर्णन पानिपातकार विश्वास पाटील यांनी भलतेच करुन टीका केली. या सोयरीकीतून मिळालेल्या पैशातून नानासाहेब पानिपतच्या दिशेने निघाले. मात्र ते माळव्याजवळ असताना पानिपतच्या पराभवांची बातमी हाती आली.
क्रमशः
---- प्रशांत कुलकर्णी मनमाड
संदर्भ --
१.पेशवे घराण्याचा इतिहास -प्रमोद ओक
२. पेशवाई -महाराष्ट्रातील इतिहासातील एक सुवर्णपान - कौस्तुक कस्तुरे
No comments:
Post a Comment