पुण्याजवळ रायरीजवळ उत्रवळी नावाच्या गावचे खंडोजी खोपडे हे परंपरागत देशमुख होते. कारीच्या जेधे देशमुखांची व बांदल देशमुखांची वतने त्यांच्या वतनाला लागूनच होती व तिघांमध्येही कमालीचे परंपरागत वैर होते. इतके वैर की एकमेकांची लग्नाची वह्राडे कापून काढण्यापर्यंत त्यांची मजल जात असे. लहान मुलांना पण सोडत नसत.
पुढे, जेव्हा बाल शिवाजी, जिजाबाई साहेब हे पुणे प्रांती परत आले, तेव्हा पुन्हा पुणे वसवणे आवश्यक होते. त्यांच्या वतीने दादोजी कोंडदेव हे कारभार बघत होते. त्यांना शहाजी महाराजांनी स्वराज्याचा कानमंत्र देऊनच पाठवले होते. त्या दृष्टीनेच त्या तिघांचा कारभार सुरू झाला होता. पुढे भावी स्वराज्याचा पाया आताच भक्कम रोवायचा तर या सगळ्या देशमुखांमधली भाऊबंदकी संपवून त्यांना शिवबाच्या मायेत आणणे आवश्यक होते.
त्या दृष्टीने पंतांनी साम-दाम-दंड-भेद इत्यादी सर्व मार्ग वापरून बहुतेक सर्व देशमुखांना भोसले घराण्याच्या मायेत आणले होते. सर्व देशमुखांमध्ये कारीचे कान्होजी जेधे हे सर्वात वजनदार होते. ते आधीपासूनच तीर्थरुप शहाजी राजांच्या सेवेत होते. त्यांना शहाजी राजांनीच गुप्त कानमंत्र देऊन बंगळुरातून पुण्याला पाठविले होते. बाकी सर्व देशमुख पाटील त्यांच्या ऐकण्यात होते. दादोजींनी व शिवबांनी सर्व देशमुखांमधील शत्रुत्व इतक्या हद्दीपर्यंत संपवले होते की पुढे जेव्हा खोपड्यांच्या घरी उत्पन्नाच्या वाटणी वरुन भांडणं झाली तेव्हा कान्होजी जेधे यांनी स्वतः जाऊन वडीलकीच्या नात्याने वाटण्या केल्या. अशा प्रकारे शिवबा, कान्होजी, दादोजी यांनी खंडोजी खोपडे यांना इतके प्रेम व महत्त्व दिले होते.
पुढे जेव्हा महिषासुर अफजलखान स्वराज्यावर चालून यायला निघाला तेव्हा त्याने स्वतः व अली आदिलशहाने या सर्व देशमुखांना दमदाटीची फर्माने धाडली होती. त्यानुसार त्या सर्वांनी शिवाजीराजांची व स्वराज्याची साथ सोडून अफजलखानाला सामील होऊन तो सांगेल त्याप्रमाणे काम करणे आवश्यक होते. नाही तर त्या सर्वांचे घरादारासकट तळपाट उडवण्याची धमकी होती. त्या फर्मानात आमिषही दाखविले होते.
त्या अमिषाला बळी पडून खंडोजी खोपडे व मसूरचे सुलतानजी जगदाळे हे स्वराज्याचा झेंडा सोडून सरळ खानाला सामिल झाले. पण कान्होजी व इतर देशमुखांनी स्वराज्याच्या व शिवबांच्या पायी आपले इमान वाहिले. पुढे सर्वांनीच अफजलखानाचा वध करून व त्याच्या फौजेची दाणादाण उडवून पार परिस्थितीच उलटून टाकली. त्या वेळेच्या प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेल्या कत्तलीतून जावळीच्या मोय्रांचे भाईबंद व खंडोजी खोपडे हे निसटले.
पुढे सिद्दी जौहर, विशाळगड, बाजीप्रभू हे प्रकरण झाले. त्या नंतर हा खंडोजी खोपडे जिवाच्या आशेने अंधारातून भयाण जंगलातून लपतछपत वाट काढत धडपडत चालला होता. आगोदर त्याला स्वराज्याशी, महाराजांशी दगाबाजी करताना काही भय वाटले नाही. पण पुढे जेव्हा अफजलखानाचे पारिपत्य झाले, तेव्हा त्याचे दिवसच फिरले. आधी तो जावळीच्या जंगलात लपून राहिला. नंतर दूरच्या जंगलात दडून राहिला.
रोहिडगडाच्या परिसरात उत्रवळी, नाझरे इ. खंडोजीची देशमुखीची गावे होती. तेथेच पुढे तो वर्षभर लपून छपून राहिला. पुढे जेव्हा महाराज विशाळगडावरून राजगडास परत आले तेव्हा त्याच्या मनात वेगळेच काही विचार घुमू लागले व त्याने त्याचे जे जावई शिळमकर होते, त्यांच्या घरी जाऊन पोचला. त्याने शिळमकरांना त्याच्यावतीने महाराजांचा अभय मागण्याची विनंती केली. पण शिळमकरांना महाराजांपुढे 'असला' प्रस्ताव घेऊन जाण्याची हिंमत होत नव्हती म्हणून शिळमकर कान्होजींकडे गेले. कान्होजींनापण हे ऐकून पेच पडला की महाराजांपुढे हा विषय कसा काढावा? कान्होजी कसेबसे महाराजांपुढे गेले व बोलले की " महाराज, खंडोजी खोपड्यास अभय द्यावे."
यावर महाराज भडकून म्हणाले की "असल्या हरामखोराची चौ धडे चौ मार्गी टाकावीत!" तरीपण कान्होजी रदबदली करू लागल्यावर महाराज म्हणाले की "नाईक, तुमच्या भीडेकरीता मान्य करतोय." त्यावर खूश होऊन नाईक खंडोजीस मुजय्राकरता गडावर घेऊन आले. खंडोजीचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याउप्पर तो दररोज गडावर महाराजांपुढे मुजय्रास जाऊयेऊ लागला. त्याला वाटले आता सर्व ठीक झाले आहे, आता सर्व पूर्ववत झाले आहे.
असेच एकदा तो महाराजांपुढे मुजय्रास आला होता. त्या वेळी अचानक महाराजांची दबलेली आग उफाळून आली. इतके दिवस त्यांचा खंड्यावरचा दाबलेला राग एकदम उफाळला.
खंड्याने मान वरती करून बघीतले, एकच क्षण त्याची महाराजांच्या नजरेला नजर भिडली अन् तो प्राणांतिक दचकला. आग उसळली होती, नुसती आग, महाराजांच्या डोळ्यात!
महाराज एकदम कडाडून ओरडले: "गिरफ्तार करा या इसमाला!" खंडोजी हादरला. महाराजांच्या ढालाईतांनी खंडोजीस अटक केली. महाराजांनी हुकूम सोडला की याचा उजवा हात व डावा पाय कलम करा. खंडोजीने खूप विनवण्या केल्या, पण महाराजांनी एक ऐकले नाही. खंडोजीच्या विनवण्यांनी व महाराजांच्या हुकमांनी गड हादरुन गेला. पण शेवटी खंडोजीचा उजवा हात व डावा पाय तुटलाच.
ही खबर गडाखाली कान्होजींना गेल्यावर ते रागे रागे गडावर आले व महाराजांपुढे गेले व म्हणाले की "रदबदली करून शास्ता केली, आमच्या रदबदलेची किंमत काय राहिली?" त्यावर महाराज गोडीने कान्होजींना म्हणाले की "तुम्ही म्हणालात म्हणून खंडोजीस जीवे मारला नाही. तो ज्या पायाने चालत गनीमापाशी गेला तो पाय कापला व ज्या हाते स्वराज्याविरूद्ध तलवार धरिली तो हात कापला. नाही तर त्याची चौ धडे चौ मार्गी टाकावीत!"
"स्वराज्याशी बेइमानी करणाय्रास अशीच कडक शिक्षा झाली पाहिजे. नाही तर लोकांना वाटेल की कोणी पण केव्हा पण उठु शकतो, शत्रूस सामील होऊ शकतो व माफीनामा लिहून परत स्वराज्यात सामील होऊ शकतो. अशाने आताशी नुकतेच आकार धरू लागलेल्या स्वराज्यात शिस्त राहणार नाही."
कान्होजींना हे मनापासून पटले. खंडोजी सारख्या नादान गद्दारासाठी आपली रदबदली वाया घालवू नये. स्वराज्यात शिस्त पाळली गेली पाहिजे.
समाप्त
संदर्भ: राजा शिवछत्रपती: बाबासाहेब पुरंदरे
No comments:
Post a Comment