मित्रानो, आज आपण एका वेगळ्या विषयाकडे वळणार आहोत. हा विषय आहे महादजी शिंद्याकडे असलेले इंग्रज वकील आणि त्यांच्या उचापत्या. इंग्रज वकील हे मुळातच धूर्त व मराठ्यांच्या विस्ताराला पायबंद कसा घातला जाईल याची काळजी घेणारे होते. वेळ प्रसंगी नमते धोरण घ्यावे तर कधी कधी धाडशीपणा किंवा आक्रस्ताळेपणा दाखवावा असे त्यांचे वागणे होते. जेव्हा गरज पडेल तेव्हा रुसवा फुगवा दाखवीत आपला मतलब साधून घ्यावा अशी त्यांची वर्तणूक असे. परंतु महादजी शिंदे देखील वेळ पाहून ‘ठकासी ठक, तर उद्धटासी उद्धट’ असे वागून इंग्रजांची डाळ शिजू देत नसत. महादजी आपल्या हुशारीने व बुद्धी चातुर्याने त्याला पुरून उरत असत. महादजींच्या दरबारातील इंग्रज वकिलांच्या हालचालींचा घेतलेला हा मागोवा!!
अँडरसन बंधू यांची नेमणूक: १७८१च्या ऑक्टोबर महिन्यात कर्नल ग्रेनजर याने महादजी शिंदे आणि इंग्रज यांच्यात तह घडवून आणला होता. त्यानुसार ५नोव्हेबर१७८१ रोजी गव्हर्नर जनरल हेस्टिंग्ज याने बनारसहून डेव्हिड अँडरसन याची महादजीच्या दरबारी आपला वकील म्हणून नेमणुकीवर पाठवले.मराठे लोक त्याला "इंद्रसेन"म्हणून संबोधित. मराठी ऐतिहासिक कागदपत्रात इंद्रसेन याचा उल्लेख अनेक वेळा सापडतो. इंद्रसेनाची नेमणूक करताना हेस्टिंग्जने त्याला गव्हर्नर जनरलच्या आणि सल्लागार मंडळाच्या सगळ्या सत्ता आणि अधिकार बहाल केलेले होते. या अधिकारांचा योग्य तो वापर करून अँडरसन याने बोलणी करून ईस्ट इंडिया कंपनी आणि मराठयांची केंद्रित सत्ता यांच्यात एक समझोता घडवून आणावा अशी त्याला आज्ञा केलेली होती.डेव्हिड अँडरसन बरोबर त्याचा सख्खा भाऊ लेफ्टनंट जेम्स अँडरसन याला त्याचा मदतनीस म्हणून पाठवण्यात आलेले होते. अशा तऱ्हेने १७मे १७८२ रोजी मराठे व ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात उत्तर मराठेशाहीतील प्रसिद्ध असा 'सालबाईचा तह' करण्यात आला. नाना फडणीस यांनी बऱ्याच कालावधी नंतर पेशव्यांच्या बाजूने या तहाला २०डिसेम्बर१७८२ रोजी मान्यता दिली.या काळात डेव्हिड अँडरसन हा महादजींचा कट्टर समर्थक झाला होता आणि ज्या ज्या वेळेस गव्हर्नर जनरलकडून एखाद्या प्रकरणाची चौकशी करण्यात येत असे, त्या त्या वेळी महादजींच्या समर्थनार्थ तो आपले मत किंवा सल्ला देत असे. त्याच्या अशा वर्तणुकीमुळे महादजी शिंद्यांनादेखील त्याच्याबद्दल ममत्व वाटू लागले होते.
इंद्रसेनाची जहागिरी: (१७८३ ते १७८६) इंद्रसेनाने महादजीकडे येऊन दीड वर्षे वाटाघाटी करून सालबाईचा तह घडवून आणण्यात मोलाची भूमिका बजावली. तेव्हा त्याच्या कामावर प्रसन्न होऊन महादजीने इंद्रसेनास बक्षीस म्हणून दोन लक्ष रुपयाची जहागिरी देण्याची सूचना पेशवे दरबारास केली. इंग्रज वकिलास हिंदुस्थानात जहागिरी देण्याचा हा बहुधा हिंदुस्थानातील पहिलाच प्रसंग असावा. असा प्रस्ताव पुण्यास पसंत पडला नाही.माझ्या मते ‘इंद्रसेन हा शेवटी पडला परदेशस्थ माणूस. त्याचा काय भरवसा. उद्या त्यानेच मराठ्या विरुद्द उठाव केला तर अवघड पडेल’. जहागिरी नाकारण्यामागे असा विचार असावा. काही कालपरत्वे हा प्रस्ताव शेवटी बारगळला.
जेम्स अँडरसनची नेमणूक:१७८३च्या अखेरीस डेव्हिड अँडरसन यास आधीच्या गंभीर आजारपणामुळे आलेल्या शारीरिक अशक्तपणामुळे युरोपात स्वगृही जाण्यास उद्युक्त केले.त्यांनतर डिसेंबर १७८३ नंतरच्या काळात डेव्हिड चा भाऊ जेम्स अँडरसन याने कारभार हाती घेतला आणि वकिलाचे काम तो करू लागला. परंतु वॉरेन हेस्टिंग्जच्या विनंतीला मान देऊन डेव्हिड याने आपले युरोपला प्रयाण काही काळ पुढे ढकलले. पुढे मार्च १७८४ मध्ये गव्हर्नर जनरल याच्या उत्तरेतील औन्धच्या नबाबाच्या भेटीच्या वेळेस डेव्हिड अँडरसन हा त्याला सामील झाला.याला कारण म्हणजे अँडरसनच्या आता पर्यंतच्या कामगिरीमुळे हेस्टिंग्जच्या मनात डेव्हिड अँडरसनबद्दल चांगले मत होते. अशा प्रकारे हेस्टिंग्ज बरोबर राहून त्याच्या समवेतच २७ऑगस्ट१७८४ला त्याने कलकत्याला जाण्यासाठी लखनौचा निरोप घेतला. त्यानंतर मात्र जेम्स अँडरसन पूर्णवेळ महादजीकडे इंग्रजांच्या वकिलाचे काम पाहू लागला.
जेम्स अँडरसनची दिल्लीत बदली: मेजर ब्राऊन हा मार्च १७८३ पासून इंग्रजांचा दिल्लीच्या बादशहाच्या दरबारात वकील म्हणून कर्तव्य बजावत होता. दोन वर्षानंतर कंपनीचा त्यावेळचा तात्पुरता गव्हर्नर जनरल मॅकफर्सन याने मेजर ब्राऊन याला कलकत्याला बोलावून घेतले आणि जेम्स अँडरसन याला दिल्लीमध्ये वकिलाचे काम पाहण्याची आज्ञा दिली. दिल्लीची सत्ता त्यावेळी दस्तुरखुद्द महादजी शिंदे सांभाळत होते, त्यामुळे महादजीचा वकील या नात्याने दिल्लीत काम करणे गव्हर्नर जनरलच्या दृष्टीने योग्यच होते. १९एप्रिल१७८५ रोजी मेजर ब्राऊन याने सम्राट शहा आलम२ चा निरोप घेतला. ब्राऊनच्या पत्रव्यहारात त्याने महादजींची बरीच निंदा नालस्ती केल्याचे दिसते, महादजी एक शीघ्र कोपी आणि अत्यंत अविश्वासू होते असे त्याने आपल्या पत्रातून स्पष्ट म्हंटलेले होते.
चार्लस मॅलेटची पुण्यात वकील म्हणून नेमणूक:चार्लस मॅलेट याना हेस्टिंग्जने पुण्याला कंपनीचा वकील म्हणून नेमलेले होते परंतु या नेमणुकीसाठी महादजींच्या मान्यतेची गरज होती. मॅलेटकडे दिलेले महत्वाचे काम म्हणजे कर्नाटकच्या टिपूविरुद्ध मराठ्यांच्या सहकार्याची मोट बांधण्याचे होते.पुण्याला जाताना वाटेत त्याने शिंद्यांची भेट घ्यावी असा त्याला गव्हर्नर जनरलचा हुकूम होता.१७मे१७८५ रोजी मथुरेच्या जवळ असलेल्या महादजींच्या लष्करी तळावर तो पोचला आणि जेम्स अँडरसनकडे त्याने मुक्काम केला. २० मे १७८५ रोजी त्याने महादजींची भेट घेतली आणि त्यानंतर ५ जून १७८५ ला तो मोंगल सम्राटाला भेटला. या भेटीमागे मॅलेटला पुण्याला वकिली सुरु करण्याची परवानगी मिळावी हा हेतू होता.महादजींनी अशी परवानगी देण्यास सुरुवातीला आढेवेढे घेतले कारण पुण्याच्या वकिलाचे मुंबईच्या कंपनीबरोबर सरळ संबंध प्रस्थापित झाले तर इंग्रज व मराठे यांच्यातील त्याची महत्वाची मध्यस्थाची भूमिका धोक्यात येणार होती.परंतु अँडरसनच्या चातुर्यामुळे आणि कौशल्यामुळे महादजींनी आपला होकार दर्शविला.
४ डिसेंबर १७८४ दिवशी मोंगल सम्राट शहाआलम २ याने महादजींना दिल्ली सल्तनतचा सर्वात मोठा ‘वकील इ मुतलक’चा 'किताब दिला, तेव्हा अँडरसनची परिस्थिती नाजूक झाली. कारण या हुद्द्यामुळे इंग्रजांकडून बादशहाच्या वतीने बंगाल, बिहार व ओरिसाच्या प्रदेशाचा चौथाई कर गोळा करणे महादजींना बंधनकारक होते. ज्यावेळेस इंग्रजांनी या प्रदेशाची बादशहाला चौथाई देण्यास नकार दिला तेव्हा अँडरसनची स्थिती अगदीच बिकट झाली. त्या वेळेस पातशाहाने भर दरबारात इंग्रजांच्या बद्दल काढलेले उद्गार अँडरसन याला आवडले नाहीत आणि त्याने या घटनेसाठी शिंद्यांना जबाबदार धरले कारण त्यावेळेस शहा आलम सम्राट महादजींच्या आश्रयाखाली होता. या घटनेमुळे महादजी व इंग्रज वकील यांच्यात अढी निर्माण झाली.त्याकाळात टिपू सुलतान हा हिंदुस्थानातील सर्वात त्रासदायक शत्रू होता व तो मराठ्यांच्या आणि इंग्रजांच्या डोळ्यात एकाच वेळेस खुपत होता.शिंद्यांचा वकील भाऊराव बक्षी याने अँडरसन व इतरांशी बोलणी करून शिंदे व इंग्रज यांच्यात होऊ घातलेला दुरावा येऊ दिला नाही.
शिंद्यानी पातशाहाच्या उद्गारामागे आपला हात नाही असे सांगून काही काळ घालवला. पण शिंदे व अँडरसन मधले वाद संपला नाही. शेवटी त्याची परिसीमा एके दिवशी झाली ज्या दिवशी अँडरसन रागावून शिंद्यांच्या तळावरून दूर निघून गेला. तो दिवस होता २ मार्च १७८६. त्यामागे घडलेली कहाणी अशी होती. फकीर खैरुद्दीन आणि त्याचा बंधू सालीहाउद्दीन हे दोघे अँडरसनच्या हाताखाली काम करणारे कारकून होते. हे दोघे आपल्या पश्चात महादजींना बातम्या पुरवतात अशी शंका आल्याने अँडरसनने दोघांना नोकरीवर काढून टाकले. तेव्हा महादजींनी त्यांना आश्रय देऊन आपल्याकडे नोकरीवर ठेवले.याचा स्वाभाविकच अँडरसनला संताप आला व त्या रागाच्या भरात तो निघून गेला. शेवटी महादजींनी नमते घेण्याचे ठरवले व त्या दोघांना नोकरीवरून कमी केले. त्यावेळेस अँडरसनचा राग शांत झाला व नंतर २५ मार्च १७८७ पर्यंत तो शिंद्यांच्याकडे दरबारात थांबला.
विल्यम कर्कपॅट्रिक, निवासी वकील व त्याची शिंदयाबरोबर कश्मकश: २० डिसेंबर १७८६ रोजी विल्यम कर्कपेट्रिक याने अँडरसन कडून वकिलीची सूत्रे ताब्यात घेतली. कर्कपॅट्रिक हा अतिशय बुद्धिमान होता, पर्शियन भाषेवर त्याचे प्रभुत्व होते, जमाखर्चाच्या बाबीत तो निष्णात होता आणि तो समाजात काय चालले आहे याच्या बातम्या तो चौकसपणे ठेवायचा. त्यांनी खगोलशास्त्रात प्राविण्य मिळवले होते. त्याच्या आगमनानंतर निवासी वकिलाच्या आवाजाचा सूर बदलला.या पूर्वी कर्कपॅट्रिक याने दिल्लीमध्ये पातशाहाच्या दरबारात इंग्रजांच्या वकिलाचे काम केलेले होते. महादजी शिंदे व कर्कपॅट्रिक यांच्यात बेबनाव होण्यास कारण म्हणजे महादजींना इस्माईल बेग विरुद्ध लढाई करायची होती तेव्हा कर्कपॅट्रिक याने त्यांना विरोध केला. कर्कपॅट्रिक हा कट्टर साम्राज्यवादी होता. हिंदुस्थानातील स्थानिक राजांची भरभराट त्याला सहन होत नसे. महादजींच्या राजसत्तेला तो नेहमी कमी लेखत असे व वेळप्रसंगी त्यांचा अपमान करायला पुढे मागे पाहत नसे. एकंदरीत एतद्देशीय लोकांना हीन लेखण्यात तो धन्यता मानत असे. एका स्वतंत्र सत्तेच्या दरबारातील तो एक केवळ वकील आहे याचा त्याला विसर पडायचा, एव्हढेच नव्हे तर महादजी शिंदे व इंग्रज हे त्या काळातील तोलामोलाची सत्ताकेंद्रे होती याचे त्याला भान नव्हते.हिंदुस्थानातील वेगवेगळ्या दरबारात त्याने आपले गुप्तहेर पेरलेले होते, जी गोष्ट या आधीच्या अँडरसन याने पूर्णपणे टाळली होती. ज्या दिवशी दिल्ली दरबारात तो आला, त्या दिवसापासून त्याचे व शिंद्यांचे बिनसले.परंतु गव्हर्नर जनरल लॉर्ड कॉर्नवालिस हा सचोटीने वागणारा व पारदर्शक स्वभावाचा होता. तेव्हा त्याने कर्कपॅट्रिक याला नियंत्रणात ठेवले होते. कर्कपॅट्रिक याचे महादजी बरोबर संबंध अजूनच बिघडत गेले आणि महादजींनी इंग्रज वकिलाबद्दल तक्रार करणारे पत्र थेट गव्हर्नर जनरल पाठवले. नवा आलेला इंग्रज वकील हा स्वीकारार्ह नाही असे त्याने ठासून त्या पत्रातून कळविले. त्या नंतर एक किरकोळ घटना घडली ज्यामुळे कर्कपॅट्रिक याची उचलबांगडी करण्याची वेळ आली. दिल्लीमध्ये सर्वत्र ज्याचा हुकूम चालतो अशा महादजीशी दिल्लीमध्ये पंगा घेणे कर्कपॅट्रिक याला महागात पडले आणि कॉर्नवॉलिस याने त्याची बदली करून टाकली. प्रस्तुत लेखामध्ये जागे अभावी या घटनेबद्दल तपशीलवार लिहिणे शक्य नाही. तेव्हा फिरंगी माणसाने मराठी माणसाशी पंगा घेणाऱ्या या घटनेची हकीकत पुढच्या एखाद्या लेखात सविस्तरपणे घेऊ.
त्या सुमारास कॉर्नवॉलिस याला टिपू विरुद्धच्या लढाईचे वेध लागलेले होते आणि अशा प्रसंगी मराठ्यांशी दुश्मनी ओढवून घेणे त्याला परवडणारे नव्हते. कर्कपॅट्रिक याने आपल्या कृतीची सफाई देणारे पत्र कॉर्नवॉलिस याला पाठवले खरे, पण त्याचा काही उपयोग झाला नाही आणि अशा तऱ्हेने कर्कपॅट्रिकला ऑक्टोबर १७८७मध्ये दिल्ली दरबारातील वकिलाची जागा रिकामी करावी लागली.
विल्यम पामर, इंग्रजांचा महादजीकडील निवासी वकील आणि त्याचे सलोख्याचे धोरण:मेजर विल्यम पामर याने कर्कपॅट्रिककडून वकिलीची सूत्रे ऑक्टोबर १७८७मध्ये हाती घेतली. तो अतिशय विनम्र स्वभावाचा होता आणि महादजी शिंद्यांशी त्यांनी सामंजस्याचे धोरण आखले. पामर हा कॉर्नवॉलिस याचा अत्यंत विश्वासू आणि आतल्या गोटातील माणूस होता. पामर आणि महादजी यांचे संबंध इतके चांगले होते की १७९२ मध्ये जेव्हा महादजी दक्षिणेत पेशव्यांच्या भेटीस निघाले होते, तेव्हा पामर याने आपल्या सोबत यावे अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली होती. या मागे इंग्रज वकील पामर आणि त्याचे शिपाई बरोबर असल्याने पुण्यामध्ये महादजीची प्रतिष्ठा अजून वाढली असती असा त्याचा होरा होता.परंतु त्यावेळेस पुणे दरबारी इंग्रजांचा वकील मॅलेट हा आधीपासून नियुक्त होता, त्याने पामरने पुणे दरबारी येण्यास हरकत घेतली. पुण्यात इंग्रजांचा एक वकील असताना दुसरा येण्याने गोंधळ होईल असे सांगत त्याने कॉर्नवॉलिस याचे मन वळवून पामरला पुण्यात येण्यास प्रतिबंध केला. त्यामुळे पामर महादजी शिंदे उत्तर हिंदुस्थानात उपस्थित नसताना देखील त्यांच्या दरबारी राहिला. या काळात एके ठिकाणी स्वस्थ न बसता त्याने आग्रा, मथुरा,ग्वाल्हेर,उज्जैन इत्यादी महादजींच्या ताब्यातील शहरांना भेटी दिल्या आणि तेथील परिस्थितीचा अभ्यास केला. महादजी यांचा दुर्दैवी मृत्य पुण्यात १२ फेब्रुवारी १७९४ मध्ये होईपर्यंत तो दिल्ली भागातच राहिला.
सारांश: मित्रानो, अशा रीतीने महादजी शिंद्यांच्या दरबारात इंग्रजांचे चार वकील होऊन गेले. त्यापैकी प्रत्येकाची काम करायची पद्धत वेगळी होती. प्रत्येकाचा खाक्या वेगळा, होरा वेगळा. त्यांच्या स्वभावाच्या छटा विविध ढंगी होत्या. काही जण मवाळ होते, तर कर्कपॅट्रिकसारखे काही जहाल वृत्तीचे होते. परंतु एक गोष्ट प्रकर्षाने दिसून येते ती म्हणजे यापैकी प्रत्येक जण इंग्रजांच्या हिताची पुरेपूर काळजी घेणारा होता. दिल्लीमध्ये इंग्रजांना कसा पाय रोवता येईल व त्यानंतर संपूर्ण हिंदुस्थान आपल्या वर्चस्वाखाली आणता येईल यासाठी प्रत्येकजण धडपडत होता. कंपनी सरकारचा गव्हर्नर जनरल देखील वेळ बघून त्याप्रमाणे अनुरूप योग्य अशी व्यक्ती वकिलाच्या हुद्द्यावर पाठवत असे. इंग्रजांचा पहिला वकील डेव्हिड अँडरसन हा महादजीचा खास विश्वासातील माणूस होता आणि ते दोघे ही एकमेकांचे हित जपणारे असे होते. डेव्हिड अँडरसन याने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्याला गुजरातमध्ये जहागिरी द्यावी अशी शिफारस महादजींनी पेशवे दरबारी केली होती. दुसरा जेम्स अँडरसन व तिसरा कर्कपॅट्रिक यांचे महादजीशी कमी अधिक प्रमाणात संघर्ष झाले. परंतु या साऱ्या घटनाक्रमांमध्ये एक गोष्ट मान्य करावीच लागेल ती म्हणजे महादजींचा या सर्व वकिलांवर वरचष्मा राहिला आणि त्यांनी आपल्या मनाप्रमाणे त्यांना वागवून घेतले यात संशय नाही.
_______________________________________________________________________
संदर्भ: English Records of Maratha History Part I by Sir Jadunath Sarkar, मराठी रियासत, खंड ७ लेखक गो. स.सरदेसाई
संकलन व लेखन: प्रमोद करजगी
No comments:
Post a Comment