विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 6 September 2021

मर्द मावळे, मुत्सद्दी मराठे

 


मर्द मावळे, मुत्सद्दी मराठे
मित्रानो, आपल्या मागच्या एका लेखात ( फिरंगी वकील दरबारी, उचापत्या करिती भारी) आपण एक इंग्रज वकील विल्यम कर्कपॅट्रिक याबद्दलची माहिती घेतली होती. त्या लेखामध्ये महादजी शिंदे आणि कर्कपॅट्रिक यांचे दिल्ली दरबारात वारंवार कसे खटके उडत असत आणि त्यातून त्यांच्यात गैरसमजूतीचा प्रक्षोभ उसळत असे हे आपण पहिले. त्यात भर म्हणजे कर्कपॅट्रिक स्वभावतः आपल्याला हिंदुस्थानी लोंकापेक्षा श्रेष्ठ समजणारा होता. त्यामुळे मराठ्यांचा प्रत्येक बाबतीत विरोध करायचा हे त्यांच्या कारकिर्दीचे सूत्र झाले होते. त्यातून अनेक भानगडी निर्माण होत आणि प्रत्येक वेळी मामला कर्कपॅट्रिकचा साहेब गव्हर्नर जनरलकडे जात असे. अशाच एका घटनेची माहिती येथे घेणार आहोत ज्या मध्ये कर्कपॅट्रिकच्या आडमुठेपणामुळे एका क्षुल्लक घटनेचा 'राईचा पर्वत' केला त्याच्या फळस्वरूप या प्रकरणात कर्कपॅट्रिकवर नामुष्की येऊन त्याला आपल्या वकिलाच्या पदावरून पायउतार व्हावे लागले. इंग्रज वकील संधी साधून कांगावा करण्यात हुशार होते, परंतु मराठयांनी मुत्सद्देगिरीने त्यांच्यावर कुरघोडी केली त्याची ही कथा !!
मराठे व इंग्रज सैनिकाचे भांडण: कर्कपॅट्रिक याच्या सततच्या विचित्र वागण्याने नाराज होऊन महादजींनी ईस्ट इंडिया कंपनीच्या गव्हर्नर जनरलकडे या आधीच लिखित स्वरूपात तक्रार नोंदवली होती. त्यानंतर दिल्लीमध्ये एक प्रकरण अचानक असे उद्भवले की त्याचे आणीबाणीच्या संकटात कसे परिवर्तन झाले हे कळलेच नाही. कर्कपॅट्रिक याचे सरंक्षक दलातील शिपाई व मराठ्यांचे काही सैनिक यांच्यात एका किरकोळ कारणावरून जोराचे भांडण लागले.त्यावेळेस मराठ्यांच्या दिल्लीतील सैन्याचे नेतृत्व महादजी शिंदे यांचा जावई लाडोजी शितोळे देशमुख यांच्याकडे होते.एके दिवशी त्यांच्या फौजेतील एक शिपाई यमुनेच्या तीरावर आपले कपडे धूत होता.त्याच वेळेस कर्कपॅट्रिक याच्या सरंक्षक दलातील एक शिपाई तेथे स्नान करण्यासाठी आला. त्याप्रसंगी त्याने मराठ्यांच्या सैनिकाला कपडे धुण्यास मनाई केली.त्यावरून त्या दोघांत जोरात बाचाबाची झाली. क्षणातच त्या बाचाबाचीचे पर्यावसान हातापायी मध्ये झाले आणि इंग्रजांकडील त्या शिपायाने मराठ्यांच्या शिपायाच्या डोक्यात जोरात काठी हाणली.तेव्हा झालेला आरडाओरडा ऐकताच आजूबाजूचे मराठी सैनिक तेथे लागलीच जमा झाले. त्यांनी त्या इंग्रजांकडील शिपायाला पकडले आणि त्याची चांगली धुलाई केली. त्याला एव्हढा बेदम मार दिला की त्याच्या हातापायाचे हाड मोडले. इंग्रजांकडील इतर शिपायांनी आपल्या सहकार्याला वाचवून सरळ तेव्हाचा इंग्रज वकील कर्कपॅट्रिककडे आणले आणि आपल्याला मराठ्यांच्या विरुद्ध तक्रार करीत न्याय देण्याची जोरदार मागणी केली.
भांडखोर कर्कपॅट्रिक अशा संधीची वाटच पाहत होता आणि त्याने मराठ्यांकडील त्या गुन्हेगाराला ताबडतोप पकडून आणण्याची आपल्या शिपायांना आज्ञा केली. इंग्रज शिपाई मराठ्यांच्या शिपायाला पकडण्यास आले तेव्हा वातावरण अधिकच गरम झाले.त्याचे पर्यवसान म्हणून मराठे सैनिक तलवार उपसून लढाई करायला सज्ज झाले. आपल्या सहकार्याला ते असे सहजासहजी इंग्रजांच्या ताब्यात थोडेच देणार होते. हा तर मराठ्यांच्या अभिमानाचा आणि अस्मितेचा प्रश्न होता. तेव्हा तेथील उद्भवलेली स्फोटक परिस्थिती बघून कर्कपॅट्रिकने विचार बदलला आणि दिल्लीतील मराठयांचे प्रमुख सरदार शितोळे देशमुख याना पत्र पाठवून त्या गुन्हेगाराला आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली. कर्कपॅट्रिक याचे म्हणणे होते की मारामारी करणाऱ्या गुन्हेगाराला आमच्या ताब्यात द्या, ब्रिटिश न्यायव्यवस्थेला अनुसरून आम्ही त्याची चौकशी करून योग्य ती शिक्षा फर्मावू. अर्थातच मराठ्यांना ही गोष्ट कदापि पटणारी नव्हती. शितोळे देशमुखांचा कारभारी मुरारी राव म्हणून होता त्याने आपण या प्रकरणाची चौकशी करून मारामारी करणाऱ्या माणसाला चौकशी अंती पकडून देतो असे मोघम उत्तर इंग्रजांना दिले.
शिंद्याकडून असे मोघम उत्तर मिळताच कर्कपॅट्रिक याचा रागाने जळफळाट झाला व त्याने निषेध म्हणून सफदरजंगमधील आपला निवासी शामियाना सोडून तेथून ६ मैल अंतरावरील नबाबच्या थडग्याजवळ आपले वास्तव्य केले. दुसरे दिवशी मुरारी राव याने हे प्रकरण सामोपचाराने मिटवण्यासाठी व्यक्तिशः कर्कपॅट्रिकची भेट घेतली.परंतु हट्टी कर्कपॅट्रिक आपल्या मागणीवर अडून बसला. दुसरीकडे इंग्रजांच्या अशा वागण्याने मराठ्यांच्या भावना चेतावल्या गेल्याने आपल्या सहकार्याचे रक्षण करण्यास ते शत्रू पक्षाशी दोन हात करण्यास ते सज्ज झाले.
अशा प्रकारचे स्फोटक वातावरण बघून प्रकरण शांत व्हावे म्हणून कर्कपॅट्रिकने काही दिवस जाऊ दिले आणि एके दिवशी तो स्वतः घोड्यावरून शिंद्याच्या लष्करी तळावर पोचला आणि त्याने गुन्हेगारास शिक्षा करण्याची मागणी लावून धरली. लाडोजी देशमुख यांनी त्याकडे फारसे गंभीरता पूर्वक लक्ष दिले नाही आणि उलट गव्हर्नर जनरल यास वकिलांविरुद्ध अनेक तक्रारींची यादी पाठवली.कर्कपॅट्रिक याने महिनाभर व्यर्थ वाट बघितली आणि निषेध नोंदवण्याचा हेतूने तो आपली जबाबदारी आपल्या सहकार्यावर सोपवून हताशपणे फरुकाबादकडे इंग्रजांच्या नजीकच्या तळावर निघून गेला.
गव्हर्नर जनरलची भूमिका: गव्हर्नर जनरल कॉर्नवालिस याला येऊ घातलेल्या टिपू विरुद्धच्या लढाईत मराठ्यांचे सहकाऱ्याचे वेध लागले होते आणि त्यामुळे मराठ्यांना तो किंचितही दुखवू इच्छित नव्हता. त्यामुळे त्याने या प्रसंगी कर्कपॅट्रिक याला समज देणारे खरमरीत पत्र पाठविले आणि वागणूक सुधारली नाही तर वकिलीच्या पदावरून हाकलून देऊ असे बजावले. १६ मार्च १७८७च्या पाठवलेल्या आपल्या लांबलचक उत्तरात कर्कपॅट्रिक याने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न जरूर केला. या पत्रात आपला राजीनामा देण्याची मोघम तयारी सुद्धा त्याने दाखवली आणि गव्हर्नर जनरलने ती ताबडतोप स्वीकारली. नवीन वकील पाठवण्यास अनेक महिन्याचा विलंब झाला तरी कर्कपॅट्रिकचा राजीनामा मात्र लगेच स्वीकारला व पर्यायी व्यवस्था होईपर्यंत या काळात कर्कपॅट्रिक निमूटपणे शिंद्यांच्या लष्करात परतला व नवा वकील येईपर्यंत काम पाहू लागला.या काळात कर्कपॅट्रिक याने लखनौमधील एक वरिष्ठ इंग्रज वकील जॉन शोअर यांच्याकडून आपली पाठराखण करणारे पत्र कलकत्याला पाठवले,परंतु कॉर्नवालिस याने कर्कपॅट्रिकची इच्छा पूर्ण करण्यासाठीच त्याचा राजीनामा घेतल्याचे त्याला कळविले.
नव्या इंग्रज वकिलाची नेमणूक: अशा रीतीने काही महिन्यात गव्हर्नर जनरलने नव्या वकिलाची नेमणूक करून कर्कपेट्रिकची शिंद्यांच्या वकिलाच्या पदावरून हकालपट्टी केली. २०ऑक्टोबर१७८७ ला विलियम पामर याने कर्कपॅट्रिककडून वकिलीची सूत्रे हातात घेतली आणि महादजी बरोबर आपले संबंध जाणीवपूर्वक सुधारले. मराठ्यांशी कोणत्याही प्रकारचा संघर्ष त्याने टाळला व सौहार्दाचे वातावरण निर्माण केले.
तात्पर्य: या घटनेचे तात्पर्य काय तर इंग्रज वकील कर्कपॅट्रिक जो बुद्धिमान पण आढ्यताखोर होता त्याचे मराठ्यांच्या पुढे काही चालले नाही, त्याच्या आगाऊ व हट्टीपणाच्या वर्तणुकीमुळे त्याची बदली मात्र झाली. अशा रीतीने मराठ्यांनी आपल्या हिकमतीने व मुत्सद्देगिरीने इंग्रज वकिलांवर कुरघोडी केली.एक काळ असा होता की उत्तर हिंदुस्थानात मराठी सैनिकांशी कोणी पंगा घेऊ शकत नव्हता. शेकडो मैलावर आपले घरदार सोडून आलेले हे मराठे आपल्या न्यायासाठी व हक्कासाठी सदैव लढण्यास तयार असत. स्वतःच्या सामर्थ्यावर त्यांचा अतूट विश्वास होता. म्हणून गंमतीने म्हणावे वाटते की त्या काळी जर फ्लेक्स लावायची सोय असती तर मराठ्यांनी दिल्लीत इंग्रज वकिलातीसमोर फ्लेक्स लावला असता, "मराठी माणसाचा नाद करायचा नाही!!!"
संदर्भ: British Records of Maratha History, Part I by Sir Jadunath Sarkar
संकलन व लेखन: प्रमोद करजगी

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...