विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 11 October 2021

दीपाऊसाहेब बांदल

 मराठ्यांच्या इतिहासात अनेक व्यक्तिमत्त्वांचे कर्तृत्त्व अजूनही म्हणावे तितके प्रकाशात आलेली नाही. आजही अनेक व्यक्तिमत्त्व काळाच्या उदरात बंदिस्त आहेत.


दीपाऊसाहेब बांदल यांचही असंच एक व्यक्तिमत्त्व.

सन १६६० च्या जुलै महिन्यात शिवाजी महाराज पन्हाळगडावरून सिद्धी जोहार सलाबत खानाच्या वेढ्यातून ६०० पदाती घेऊन निसटले! विशाळगडावर पोहोचले! सिद्धीची फौज पाठीवर आली म्हणून पांढर पाण्याजवळ महाराजांनी निम्मे मावळे शत्रूस थोपवण्यासाठी ठेवले. या सैन्याने जोहारच्या सैन्याचा लोंढा आडवला. महाराजही खासा लढाई करून विशाळगडाचा वेढा फोडून गडावर चढले. महाराज आणि स्वराज्य वाचले! या सगळ्या राेमहर्षक लढाईत महाराजांनी भरवसा ठेवला तो बांदल सैन्यावर. बांदलांची शेकडो माणसे धारातीर्थी पडली पण हटली नाहीत. महाराजांचा विश्वास बांदलांवर होता त्याचे कारण दिपाई बांदल होत.
दिपाई बांदलांचा इतिहास हा त्यागाचा आणि कर्तृत्वाचा इतिहास आहे. दादोजी कोंडदेवाने कृष्णाजी नाईक बांदलांना विश्वासघात करून मारले. दिपाई बांदलांना स्वत:चे गाव सोडून कोकणात परागंदा व्हावे लागले. दिपाईने काही काळानंतर बाजी बांदलास शहाजी महाराजांकडे पाठवले. बाजी बांदलांनी शहाजी महाराजांचे सैन्यात "राहून तलवार केली". शहाजी महाराजांनी बाजी बांदलांच्या 'सिरी हात ठेवला' त्यांचे ऊर्जित केले. दिपाई बांदल पुन्हा मावळात वतनावर आल्या. यानंतर दिपाई बांदलांनी बांदलांचा जमाव पोक्त केला. या लढाऊ सैन्याचे नेतृत्व दिपाई बांदलांनी खासा हातात घेतले.
शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. दिपाई आवा खुद्द महाराजांना सामील झाल्या. शिवाजी महाराजांची आदिलशहा बरोबरची समोरासमोरची पहिली लढाई झाली पुरंदरच्या पायथ्याला खळद -बेलसर गावात. या लढाईत दिपाई आवाने खासा बांदल सैन्याचे नेतृत्व केले. पुढे महाराजांनी चंद्ररावाची जावळी मारली. त्याही युद्धात दिपाई आवाने पराक्रम केला. जावळीच्या बंदोबस्ताची जबाबदारी महाराजांनी रूपाजी आदटराव बरोबर दीपाई बांदलांच्यावर ही दिली. अफजलखानाच्या स्वारीच्या वेळीही दीपाई बांदलांनी खासा बांदलांच्या जमावाचे नेतृत्व केले.
महाराजांना पुरंदरच्या तहाप्रमाणे आग्राला जावे लागले. त्यावेळी महाराजांनी दिपाई बांदलांना राजगडावर जिजाऊसाहेबांबरोबर राज्यकारभार पाहण्यासाठी बोलावून घेतले. यानंतर दिपाई आवा जिजाऊसाहेबांच्या बरोबर सावलीसारख्या राहिल्या. १७ जून १६७४ रोजी जिजाऊंचे निधन होईपर्यंत दिपाऊ जिजाऊंबरोबरच होत्या. जिजाऊंच्या निधनानंतर त्या पुन्हा वतनावर आल्या.
महाराज दक्षिण दिग्विजयाला गेले. इकडे मोगलांबरोबरच्या एका लढाई लढाईत दीपाऊंचा नातू रायाजी बांदल ही धारातीर्थी पडला. स्वत:चा पती, मुलगा व नातू अशा व्यक्तींचे बलिदान दीपाऊंनी नजरेने पाहिले. रायाजी बांदलचे निधनाचे दु:ख दीपाऊच्या जिव्हारी लागले त्या आजारी पडल्या. अशाही परिस्थितीत त्यांनी स्व:मुखाने आपल्या नातसुनांत वतनाची वाटणी करून दिली, सर्व व्यवस्था करून त्यांनी प्राण सोडला.
स्वराज्यासाठी पुरुषच काय स्त्रिया पण लढल्या याचे उदाहरण म्हणून दीपाऊ बांदलाचा इतिहास साक्षी आहे.
टिप- दिपाई आवांचें अस्सल छायाचित्र तसेच समाधीचा फोटो उपलब्ध नाही. त्यामुळे आमच्या खंडागळे पाटलांच्या देवघरातील एक स्त्री टाकाचा फोटो देत आहे. सोबतचे छायाचित्र प्रतिकात्मक आहे.
डॉ. देविकाराणी पाटील
10 ऑक्टोबर 2021
कोल्हापूर
Indrajeet Khore

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...