भाग १५
अशीही मराठा साम्राज्याचा विस्तार करिता उदाजीरावांनी इ.स.1709 पासुन केलेल्या खटपटी ची अगदी त्रोटक माहिती आहे.
यावरून उदाजीरावांच्या कर्तबगारीची व पराक्रमाची चांगली कल्पना येते; माळवा व गुजरात या ठिकाणी आरंभी मराठ्यांचा जम उदाजीरावांनीच बसविला .उदाजीरावांचे अंगी विलक्षण नाडस, शौर्य , हाती घेतलेली कामगिरी मोठ्या हिमतीने व चिकाटीने पुर्ण करण्याची हातोटी इत्यादी गुण अलौकिक होते. त्यामुळेच ते मराठ्यांच्या काळात फार चमकत होते, बादशाही मुलखात तर त्यांचा दरारा इतका बसला होता की त्यांचे नाव एकताच मुसलमान अधिकाऱ्यांची अगदी गाळण उडून जाई व त्यामुळे ते घाबरून सैरावैरा पळत सुटत .उदाजीरावास ते जातील तेथे विजय मिळेलच अशी त्याकाळी त्यांची प्रसिद्धी होती व त्यामुळेच माळवे प्रांतात त्या संबंधाने "जीधर उदा उधर खुदा" अशी अन्वर्थक म्हण प्रचाराथ आली.
उदाजीरावांच्या असाधारण पराक्रमाविषयी बखरकारांनी जे उद्गार काढलेले आहेत त्यामध्ये वरील म्हणजे प्रतिबिंब स्पष्ट उमटते. ब्रह्मेंद्रस्वामी यांच्या पत्रावरून ही गोष्ट अधिक स्पष्ट होते, उदाजीरावांची ब्रह्मेंद्रस्वामीनवर फार निष्ठा असून स्वामींचे उदाजीरावांवर पराकाष्ठेचे प्रेम होते. ब्रह्मेंद्रस्वामींच्या पत्रातून उदाजीरावांच्या पराक्रमा विषयी मोठ्या गौरवाचा उल्लेख असून संकटसमयी त्यांना धीर देऊन योग्य उपदेशही स्वामींनी केला आहे ; व प्रसंगी पाठ थोपटून उत्तेजन नाही दिले आहे. स्वामींनी उदाजीरावांना लिहिलेली दोन पत्रे रा.ब. पारसनीस यांनी आपल्या ब्रह्मेंद्रस्वामींच्या चरित्रात दिली आहेत. (लेख 305-306 ) त्यातील एकात "क्षत्रियकुलावंतस रणधीर उदाराम पवार" व दुसऱ्यात " सहस्रायु चिरंजीवी विजयी रणधीर रणशूर अर्जुनतूल्य उदाजी पवार "असा मायना स्वामिंनी लिहिला आहे .इतका गौरवून मायना दुसर्या कोणत्याही सरदारास स्वामींनी लिहिलेला दिसत नाही. यावरून उदाजीरावांच्या पराक्रमाविषयी स्वामींच्या मनात केवढा आदर व अभिमान वसत होता हे लक्षात येते.
छत्रपती शाहू महाराजांजवळ ही उदाजीरावांचे फार वजन होते व शाहू महाराजही उदाजी रावांना फार चाहत असत. बाजीराव पेशव्यांच्या मनात उदाजीरावांच्या पराक्रमाविषयी कशी जाणीव होती हे मल्हाराव होळकरांकडून शेंदव्याच्या घाटात बाजीराव व उदाजीराव यांचा समेट घडवुन आणण्याचा जो प्रसंग होळकर कैफियतींत वर्णिला आहे त्यावरून लक्षात येणार आहे .
मुंबई येथे व्हिक्टोरिया गार्डन मधील आजबखान्यात एक साडेपाच फूट लांबीची पितळी तोफ ठेवली आहे, त्या तोफेवर उदाजी पवारांचे नाव कोरलेले आहे. उदाजीराव कोकणातील मोहिमांवर होते त्यावेळी त्यांनी ही तोफ लढाईत जिंकून आणली असावी. लढाईत पराक्रम करून मिळालेले विजय चिन्ह म्हणून त्यांनी तोफेवर आपले नाव कोरून ठेवले हे उघड आहे. या तोफेवर ती तयार झाली त्या वेळची दुसरे ओतिव नाव आहे .त्यावरून ती मूळची डच किंवा बलंदेजी यांची असावी असे वाटते. एकंदरीत उदाजीराव हे खरोखर मोठे शुर ,कर्ते व
तेजस्वी पुरुष असून मराठ्यांच्या दळात त्यावेळी प्रमुख म्हटले जात होते .परंतु ते स्वभावाने फार तापट ,अत्यंत मानी व आग्रही असल्यामुळे व पेशव्यांशी न जुळवुन घतल्यामुळे त्यांच्या उत्कर्षासास 1736 नंतर पुढे आळाच घातला गेला.
उदाजीराव पानिपतच्या प्रसंगापूर्वी एक वर्ष आधी म्हणजे इसवी सन सतराशेसाठ मध्ये मरण पावले असे दिसते.( इचलकरंजीरांचा इतिहास ले.40)
संग्रहण -
*महेश पवार व अनिल पवार*
इतिहास माहिती प्रसारक व
सोशल मिडिया प्रमुख ,
*राजे धार पवार युवा संघटना*
*अध्यक्ष सुर्यजीत पवार*, महाराष्ट्र राज्य
(अनमोल सहकार्य :- गडप्रेमी श्री.बाळासाहेब पवार)
No comments:
Post a Comment