#मराठा_साम्राज्यात_पवारांची
भाग १९
उदाजीरावांचे दुसरे बंधू जगदेवराव यांच्याकडेही मराठ्यांचे लष्करात सरदारकीचा अधिकार असून ते ही मोहीमांवर जात असत परंतु , हल्लीच्या उपलब्ध साधनांमध्ये त्यांचा स्वतंत्रपणे उल्लेख फारसा कोठे आढळत नाही. इसवीसन 1731 ऑक्टोबरांत धार नजिक तिरला गावाजवळ बादशाही सुभेदार दयाबहाद्दर याच्याशी जी लढाई झाली त्यात जगदेवराव हजर असून त्यांनी हत्तीवर चढून दयाबहाद्दरचे शिर उडवले असा उल्लेख चितेगावकर पवारांच्या कैफियतीत आहे . (मावजी कै.पृ.72 )
धार येथील शाखेचे संस्थापक आनंदराव पवार यांच्या मागे त्यांचे पुत्र यशवंतराव हे उदयास आले. मराठी राज्याचा माळव्याबाहेर विस्तार होण्यासाठी मुख्यत्वे करून ज्या सरदारांनी महत्वाच्या कामगिर्या बजाविल्या व त्यास साम्राज्याचे स्वरूप आणले त्या सरदारात यशवंतराव पवार , मल्हारराव होळकर , राणोजी शिंदे व पिलाजी जाधव हे प्रमुख होते.
यशवंतराव पवार हे आपल्या वडिलांच्या हयातीत कधी त्यांच्या बरोबर तर कधी स्वतंत्रपणे मोहिमांवर जाऊ लागले होते . इसवीसन सतराशे पंचवीस-सव्वीस साली ते गुजरातेत आनंदाराव पवारां बरोबर उदाजीरावांच्या मदतीला गेले असल्याचे आयर्व्हिनने नमूद केले आहे. परंतु यापुढील सहा-सात वर्षातील त्यांच्या कामगिरीचे स्पष्ट दाखले उपलब्ध नाही, तथापि या सालात देखील ते मोहीमांवर गेले असावेत असे अनुमान करण्यास जागा आहे.
पुढे 1734 च्या जून-जुलैत राणोजी शिंदे , मल्हारराव होळकर यांच्या बरोबर यशवंतराव पवार व देवासचे तुकोजी पवार माळव्यात मोहिमेवर होते.( राजवाडे खंड 6 ले. 95-97) यशवंतरावांचे वडील आनंदराव पवार नुकतेच दक्षिणेत परत गेले होते.( धार दरबार दप्तर अप्रकाशित) या माळव्यातील मोहिमेत त्रिवर्ग पवार , शिंदे व होळकर सरदारांनी तमाम गिराशी यांचा बंदोबस्त केला.पठारीस ठाणे बसविले लालगडवाला लुटला , वगैरे कामगिर्या बजावून छावणी सोंदवाड्यांत व अागर परगण्यात केली होती.याशिवाय या सरदारांची यावेळी दिल्ली येथील वकिलामार्फत बादशहाकडून चौथाईच्या सनदा व स्वारीचा खर्च व माळव्याच्या सुभ्याची मिळविण्याची खटपट चालली होती.
संग्रहण -
*महेश पवार व अनिल पवार*
इतिहास माहिती प्रसारक व
सोशल मिडिया प्रमुख ,
*राजे धार पवार युवा संघटना*
*अध्यक्ष सुर्यजीत पवार*, महाराष्ट्र राज्य
(अनमोल सहकार्य :- गडप्रेमी श्री.बाळासाहेब पवार)
No comments:
Post a Comment