विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 26 January 2022

राजे भोसलेंची वावी

 




राजे भोसलेंची वावी
पोस्तसांभार : -रमेश पडवळ, नाशिक
ऐतिहासिक नोंदी अभावी विस्कटू लागलेले इतिहासाचे धागे कधी कधी अज्ञात पैलूंचा उलगडा करून देतात. असे पैलू न कधी ऐकलेले असतात न कधी पाहिलेले. पण त्यांच्या अज्ञातपणातही एक मोठा इतिहास दडलेला असतो. गावागावात जमीनदोस्त होत असलेल्या ऐतिहासिक वास्तू हा इतिहास कुरवाळून उभ्या असतात. यादवकाळाशी ऋणानुबंध सांगत छत्रपतींच्या घराण्यांची वंशावळ उलगडणारे सिन्नरमधील वावी हे गाव वरद परशरामाच्या समृद्ध लोककलेचीही ओळख करून देते. मन प्र‌सन्न करणारा हा प्रवास आपल्याला इतिहासाच्या पानांपलीकडे घेऊन जातो.
वावीतील राजे भोसले घराण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्याशी असलेला संबंध वावीची ऐतिहासिक गूढता वाढव‌ितो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचे दक्षिणेत येण्यापासून ते पणजोबा बाबाजी भोसले यांच्यापर्यंतचा प्रवास वावी उलगडताना दिसते. अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडवर स्वारी केली. यानंतर घडलेल्या अनेक घडामोडीनंतर सजनसिंह आणि त्याचा पुत्र दिलिपसिंह बहामनी राज्याची स्थापना करणाऱ्या हसन बहामनीकडे आले. याच दिलिपसिंहापासूनच‌ी १३ वी पिढी म्हणजे बाबाजी भोसले, असे संदर्भ मराठी रियासत, शिवछत्रपती समज-अपसमज व क्षत्रियकुलावतंस छत्रपती श्रीशिवाजी महाराज या पुस्तकात म‌िळते व वावीतील राजे भोसले घराण्यातील वंशजही त्यास दुजोरा देतात. बाबाजी भोसलेंकडे आठ गावाची पाटीलकी होती. त्यांना मालोजी राजे व विठोजी राजे अशी दोन मुले होती. दोघेही निजामशाहीत वेरूळ-घृष्णेश्वर भागात पराक्रमी व उत्तम प्रशासक होते. पुढे मालोजींना पुणे व सुपे जहागिरी मिळाली तर विठोजी भोसलेंना मुंगी, पैठण, हिरडी, बेरडी, जिंती, वेरूळ, वांबोरी व वावी ही गावे मिळाली. विठोजींनी आपल्या आठ मुलांना प्रत्येक गाव दिले. यात नागोजी यांना वावी हे गाव मिळाले अन् वावी राजे भोसलेंची म्हणून ओळखली जाऊ लागली. दुसरीकडे विठोजींचे भाऊ मालोजींना शहाजी व शरीफजी ही मुले झाली. यामागेही एक कथा आहे. मालोजीराजे भोसलेंनी शहाशरीफ नावाच्या नगरजवळील पिरास पुत्र व्हावा म्हणून नवस केला होता. पुत्र झाल्यावर शहाशरीफ या पिराचे नाव दोन्ही मुलांना शहाजी व शरीफजी असे ठेवले. शहाजी राजांचा सुपुत्र शिवाजी महाराज हे पुढे सुरत लुटीतून परतताना विश्रामगडावर असताना वावीत आपल्या नातलगांना भेटण्यासाठी आल्याचे वावीतील राजे भोसले घराण्याचे वंशज विठ्ठल राजे भोसले व सागर राजे भोसले सांगतात. मालोजींचा दुसरा मुलगा शरीफजी नगर येथील भातवडी (भातोडी) येथील लढाईत ऑक्टोबर १६२४ रोजी धारातीर्थी पडला. हा इतिहास पाहिल्यावर वावीमध्ये भोसले घराणे कसे आले याचा उलगडा होतो. मात्र वावीचा प्रवास येथेच थांबत नाही तर येथून सुरू होतो.
सिन्नरपासून शिर्डीरोडवर वीस किलोमीटरवर वावी हे गाव लागते. उजव्या हाताच्या दिल्ली दरवाजातून गावात प्रवेश केल्यावर पहिला प्रश्न पडतो तो म्हणजे वावी म्हणजे काय? असा. सिन्नर परिसर हा यादवांची राजधानी. यादवकालीन शिलालेखातून वावी हा शब्द बारवेसाठी (विहीरीसाठी) उपयोगात आणलेला दिसतो. असाच उल्लेख चक्रधर स्वामींच्या साहित्यात सापडतो. त्यांनी वावी पोखरणी (विहिर खणणे) असे म्हटल्याने वावी म्हणजे बारव. याला वावीतील वैजेश्वराच्या मंदिरासमोर असलेल्या यादवकालीन बारव दुजोरा देते. या बारवेतून लग्नासाठी भांडी बाहेर येतात, अशी अख्यायिका ग्रामस्थ सांगतात. पाण्याने काठोकाठ भरलेली ही बारव त्यात साचलेल्या कचऱ्यामुळे आज उपेक्षित आयुष्य जगताना दिसते. वाल्ह्याकोळ्याची वावी अन् वैजेश्वर महादेव मंदिरामुळे गावाला वावी म्हटले जात असावे, असेही ग्रामस्थ सांगतात. या विहिरीसमोरच तटबंदीतील महादेवाचे वैजेश्वर मंदिर आहे. मंदिराच्या गाभाऱ्याचे दगडी प्रवेशद्वार सुंदर नक्षीकामाने सजलेले आहे. मंदिरातील शिलालेखाची हेळसांड झाल्याने हा इतिहास अज्ञात आहे. याच मंदिरासमोरील बारवे शेजारी उभा असलेला प्राचीन मंदिराचा दगडी स्तंभ वावीत आणखी काही आखीवरेखीव मंदिरे असावीत याची साक्ष देतो. वैजेश्वर मंदिराचे पुजारी दत्तात्रेय शिंदे-गुरव यांच्या घरी महादेवाचा पंचमुखी मुखवटा आहे. हा वारसा पेशवाईपासून त्यांनी जपला आहे. हा सोहळा अनुभवून थोडे पुढे गेल्यावर राजे भोसले घराण्याच्या तीन मोठाल्या वाड्यांचे अवशेष दिसतात. त्यातील एकच वाड्याचे अवशेष थोडेफार शिल्लक आहेत. वाड्याचा उंच बुरूज कणा ताट करून वावीतील भोसले घराण्याचे महत्त्व आजही सांगताना उभा असल्याचा दिसतो. वावीतील राजे भोसले घराण्याने साताऱ्याची छत्रपतींची गादी चालविण्यासाठी वावीतून शाहू राजे दुसरे (आबासाहेब, मूळ नाव विठोजी त्र्यंबक भोसले, वावी) दत्तक म्हणून गेले. हा विठोजींच्या घराण्याचा गौरवशाली इतिहास मात्र अंधारात राहिला. हा वाडा पाहताना वावीतील राजे भोसले घराण्याचे ऐश्वर्य डोळ्यापुढे उभे राहते. वाड्याच्या आजूबाजूला पडलेले अनेक दगडी अवशेष, वाड्यातील भुयार अन् भिंतींवरील देवळींचे लहानमोठे नमुने पाहताना हा वाडा पुन्हा उभा राहिला तर अनेक अज्ञात पैलू पुढील शेकडो वर्ष भोसले घराण्याचा इतिहास सांगत राहतील, असे वाटायला लागते. शहाजी राजांकडून वावीतील घराण्याला मिळालेली तलवार विष्णूच्या दशावताराने सजली आहे. तर दुसऱ्या तलवारीची मूठ सोन्याची आहे. मात्र हे वैभव आता वावीत नाही. राजे भोसले घराण्याचा इतिहास संग्रही करण्याचीही गरज आहे.
वावीत भटकंती करताना अनेक मंदिरे पहायला मिळतात. गावात दोन मारूती मंदिरे आहेत. गावात पिराचे ठाण अन् साती आसराही पहायला मिळते. वावीचे वारकरी संत रामगीरी महाराजांची समाधीही येथे आहे. गावाला चार दरवाजे होते. दिल्ली दरवाजा सोडला तर इतर वेशी आता नाहीत. मात्र दिल्ली दरवाजा व पुणे दरवाजा सोडला तर इतर वेशीच्या आठवणीही आता शिल्लक नाहीत. आखाडात बोहाड्यात सोंगे मिरविण्याची परंपरा वावीकरांनी जपली आहे. वावीचा प्रवास वरदी परशरामांची वावी या ओळखीशिवाय पूर्ण होत नाही. परशराम आपल्या वेगळ्याशैलीत सांगतात की,
विठू परशराम येशूचे तोंड अति गोड रसिकरंग भरून/
रामकृष्ण रामाचे छंद ऐकती चतुर जिवी धरून/
वावी नांव गांव धनवटात आडा जबरू
कोणी विरळा एकादा राहील सांभाळून अबरू/
इषकाचे पायी सजण मारिला गबरू/
वरदी परशराम यांचा जन्म (जन्म १७५४- मृत्यू १८४४)मध्ये सिन्नर-शिर्डी मार्गावरील वावी या गावात झाला. देवपूरच्या भागवतबाबांनी त्यांना अभंग करण्याऐवजी आताच्या समाजाचे लावण्यांमाध्यमातून प्रबोधन करण्याचा सल्ला दिला. त्यामुळेच त्यांच्या अनेक लावण्या पौराणिक कथांवर व आध्यात्मिक विषयांवर असून, त्यावर संतकाव्याची छाया आहे. तत्कालीन समाजस्थितीचे उत्कृष्ट चित्रण त्याच्या कवनांत आढळून येते. पेशवाईच्या काळात तमाशा ही लोककला बहरली. वरदी परशराम यांनी आपल्या लावणीनं महाराष्ट्रात आपला ठसा उमटवला. पेशवे तसेच इंदोरचे होळकर व बडोद्याचे गायकवाड घराण्याने त्यांच्या कलेचा गौरवही केला. परशराम यांची `आध्यात्मिक लावणी' हे त्यांचं वेगळेपण अनेकांना भावल्याने त्यांना वरदी परशराम म्हटले जाऊ लागले. आपले गाव असलेल्या वावीबद्दलचा अभिमान वरदी परशरामाच्या शाहिरीतून ओथंबून वाहताना दिसतो. म्हणून ते म्हणतात...
वावी गाव तेथे परशराम येसू वर्णी हरीच्या गुणा/
रमारंगे श्रीरंगे अभंगे तारि-तारि मज..//
लोककलेतील एक अनोखी संस्कृतीनिर्माण करणारा हा कवी व कुटुंबिय अज्ञात आहेत. त्यांची परंपरा निष्ठेने पुढे घेऊन जाण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नांची गरज आहे. मात्र वावीत परशरामाचे मंदिराशिवाय काहीच नाही. असे म्हणतात की, मरणापूर्वी वरदी परशरामाने आपल्या मृत्यूची वार्ता आईला कळविली होती व मृत्यूपूर्वी चार दिवस आधी त्यांनी वावीतून कोपरगाव येथील गोदाकाठचे मंजूर या गावी प्रस्थान केले. त्यांनी सांगितलेल्या दिवशीच कवने करताना त्यांनी प्राण सोडले. ‘वरदी’ नावाला शोभावी अशी त्यांच्या मृत्यूबद्दलची अख्यायिका आजही गावात सांगितली जाते.
वैजेश्वराचे सान्निध्य, बारवेचा गारवा, बोहाड्यांची परंपरा, मंदिरांचा साज, राजे भोसले घराण्याचे ऐश्वर्य अन् परशरामाची अध्यात्मिक काव्यभक्तीने वावी मंत्रमुग्ध झालेली दिसते. दुष्काळी परिसर असला तरी हा ऐतिहासिक गारवा वावीची सफर आनंददायी करतो.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...