जेव्हा सातारच्या छत्रपतींनी वडील संभाजीराजे यांच्या हत्येचा घेतला बदला!
शंभू महाराजांच्या मृत्यूचा बदला घेऊन दिल्लीवर सत्ता प्रस्थापित करणारे थोरले छत्रपती शाहू महाराज.
अफगाणिस्तानच्या सीमेपर्यंत साम्राज्याचा विस्तार करणारे थोरले शाहू महाराज म्हणजे मराठ्यांचे सर्वात ताकदवान छत्रपती. इसवी सन 1719 मध्ये मराठ्यांच्या छत्रपतींनी दिल्लीवर स्वारी करायचे ठरवले. मुघलांच्या कैदेत असलेल्या आपल्या मातोश्रींना, ‘येसूबाईराणीसाहेबांना’ सोडवून स्वराज्यात परत आणण्यासाठी थोरल्या शाहूंनी ही सर्वात मोठी मोहीम राबवली होती.
यासाठी आपले निष्ठावंत सरदार खंडेराव दाभाडे, शंकराजी मल्हार, खंडो बल्लाळ, केरोजी आणि तुकोजी पवार, राणोजी भोसले, संताजी भोसले यांच्या नेतृत्वाखाली 35 हजारांची फौज दिली.
यावेळेस शाहू छत्रपतींनी एक सुंदर राजकारण केले. औरंगजेबाचा मेलेला नातू जिवंत आहे आणि तो मराठ्यांच्या आश्रयास आहे, अशी अफवा उठवली. त्या ‘तोतया’ नातवाला हत्तीवर बसवून मराठ्यांनी सैन्याच्या अग्रभागी तो हत्ती नेमला. झाले. सर्वत्र हाहाकार उडाला. कारण, दिल्लीच्या तख्तावर बसलेला बादशाह फारुखसियार ऐवजी मुईनुद्दीनचा गादीवर हक्क प्रस्थापित होत होता. मुघलांची सहानुभूती या तोतया नातवाकडे झुकली आणि साताऱ्याहून निघालेली 35 हजारांची फौज दिल्लीला जाईपर्यंत एक लाखाच्या जवळपास पोहोचली होती.
राजमाता येसूबाईंची सुटका केली तर ठीक, नाहीतर फारुखसियारला बाजूला करावे असा ठराव मंजूर करण्यात आला. मराठ्यांना याकामी हसन अली आणि हुसेन अली या सय्यद बंधूंनी संपूर्ण सहकार्य दाखवले.
फेब्रुवारी 1719 मध्ये मराठे दिल्लीत पोचले आणि त्यांनी दिल्ली शहराचा ताबा घेऊन दिल्ली च्या किल्ल्याला वेढे दिले. शंकराजी मल्हार आणि हुसेन अली ने शाहूराजांच्या मागण्या बादशहा समोर मांडल्या, त्या बादशाह ने अमान्य केल्या. त्यावेळी तिथे दोन्ही बाजूंमध्ये अश्लील शिवीगाळ झाली. दरम्यानच्या काळात दिल्लीमध्ये बादशहा समर्थकांनी मोठी दंगल घडवून आणली. या दंगलीत 2000 मराठे मारले गेले ज्यात सेनापती संताजी भोसले सुद्धा होते.
या गोष्टीमुळे मराठे चवताळले. बादशाह ऐकत नाही हे बघून मराठ्यांनी दुसरा पर्याय निवडला.
बादशहाला हटवण्याचे निश्चित झाले.
लाल किल्ल्यातली सगळी बादशाही फौज आणि पहारेकरी हटवण्यात आले. मराठे आणि हुसेन अलीने स्वतःची माणसे नेमली. दुसऱ्या दिवशी हरम (शयनकक्षात) मध्ये लपलेल्या फारुखसियर बादशाह ला पकडून दरबारात आणले गेले. ‘कुतुब उल मुल्क’ सय्यद अलीने बादशहाचे डोळे काढले आणि बादशहाला बंदीखान्यात टाकले.
फारुखसियर ने बंदीखान्यातून बंडाळी चे प्रयत्न केले. दिल्ली शहरातसुद्धा प्रचंड अशांतता माजली होती. बादशाह समर्थकांनी पुन्हा किल्ल्यावर ताबा मिळवला, तर सय्यद बंधू हुसेन अली आणि हसन अलीं यांचे मरण निश्चित होते आणि मराठ्यांची मोहीम सुद्धा फत्ते होणे अशक्य झाले असते.
शेवटी 19 एप्रिल 1719 रोजी बादशाह फारुखसियर चे मुंडके कापून त्याला संपवण्यात आले.
रफीउद्दराजत याला गादीवर बसवले. पण तो आपल्या ऐकण्यात नाही, असे पाहता सय्यद बंधूंनी त्यालाही पदच्युत करून रफीउद्दौला याला बसवले. तोही अल्पावधीत मरण पावला. शेवटी औरंगजेबाच्या एका पणतूला, रोशन अख्तर यास मूहमदशाह हा किताब देऊन गादीवर बसवले. मराठ्यांनी एका वर्षात दिल्लीच्या गादीवर चार बादशाह बदलले.
थोरल्या शाहू छत्रपतींनी आपल्याला हव्या तशा मागण्या मुघलांना मान्य करण्यास भाग पाडले. येसूबाई राणीसाहेबांची सुटका झाली. संपूर्ण भारतात मराठ्यांच्या पराक्रमाचे नगारे वाजत होते. अतिशय भव्य फौजफाट्यासहित मराठे साताऱ्यास परतले.
औरंगजेबाच्या वारसदाराच्या शरीराची चाळण मुघलांच्याच दरबारात करून थोरल्या शाहू छत्रपतींनी आपल्या वडिलांच्या, महापराक्रमी संभाजी महाराजांच्या मृत्यूचा बदला घेतला आणि तिथून पुढील 40 वर्षे थोरल्या शाहू छत्रपतींचे नाव एका झंझावाताप्रमाणे अवघ्या भारतभर गाजत राहीले.
लेखक: अज्ञात (सोशल मीडिया साभार)
No comments:
Post a Comment