सरदार पवार गढी / वाडा, मलठण ता.शिरुर
postsaambhar::
सुरेश नारायण शिंदे
मध्यकालीन इतिहासात महाराष्ट्रातील अनेक घराण्यांनी आपले अतुलनीय योगदान दिलेले आहे, त्यात भोसले, जाधव, शिंदे, पवार, होळकर इत्यादी घराणी अग्रस्थानी आहेत. वरीलपैकी पवार घराणे हे मूळचे माळव्यातील धार येथील परमार घराण्यातीलच असल्याचे इतिहास संशोधनामुळे सिद्ध झालेले आहे. माळवा प्रदेश हा हिंदुस्थानाच्या केंद्रस्थानी असलेला भूभाग असल्यामुळे संपूर्ण हिंदुस्थानातील राज्यव्यवस्थेशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जोडला गेलेला आहे. माळव्यातील मुख्य नगर उज्जयिनी म्हणजे पुराणकाळातील भगवान श्रीकृष्णाने सांदीपनि मुनींकडे विद्याभ्यास केलेली पवित्र भूमी. इसवी सनाच्या सातव्या शतकात कनोज येथे प्रसिद्ध हर्षवर्धन याने राज्यसत्ता स्थापिली होती, त्यात माळवा अंतर्भूत झाला पण आठव्या शतकात त्यांची सत्ता लयास गेल्यावर माळव्यात परमार वंशाची सत्ता प्रस्थापित झाली. आठव्या शतकापासून इ.स.१०५५ पर्यंत परमार वंशाची सत्ता अबाधित होती, पुढे त्यांची सत्ता जाऊन यवनांची सत्ता आली. अठराव्या शतकात मात्र पवार घराण्याने म्हणजेच परमाराच्या वंशंजांनी आपली पैतृक कुलराजधानी धारानगरी पुनः प्राप्त केली हा एक अपूर्व दैवयोगच म्हणावा लागेल.
हे घराणे सतराव्या शतकाचे प्रारंभी अहमदनगर जवळील सुपे पेटा परिसरातील अनेक गावात पाटीलक्या सांभाळून होते. सुपे परगणा ही शाहजी महाराजांच्या जाहगीरीचा भाग होता. हा भाग शाहजींच्या वतीने मोकासा म्हणून बाल शिवबा हे राजमाता जिजाऊसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सांभाळीत होते. दरम्यान त्यांनी स्वराज्य स्थापनेचा श्रीगणेशा केला होता त्यांस बारा मावळातील असंख्य मावळ्यांचा सहभाग होता. तत्कालीन सुपे पेट्यातील पवार घराण्याचा कर्तृत्ववान पुरूष साबूसिंग उर्फ साबाजी पवार हे शिवछत्रपतिंच्या सेवेत दाखल झाले. आपल्या शौर्य व पराक्रमामुळे नावलौकिकास आलेल्या साबूसिंग पवार यांनी आपल्या सुपे गावात कायमचे ठाणे करून त्या सुपे गावचे नामांतरण 'सुखेवाडी' असे केले. छत्रपतिंच्या सेवेत असलेल्या साबूसिंगचा होणारा उत्कर्ष हा सुखेवाडी ( सुपे) गावाजवळील हंगे या गावातील दळवी यांना पाहवत नव्हता व दळवी त्यांचा द्वेष करून झगडा काढीत होता. त्यांच्या वादातून अनेकवेळा लहानमोठा संघर्ष घडत होता. एके रात्री हंगे व सुपे ह्या गावांच्या दरम्यान असलेल्या जांभुळ ओढ्यात दळवी दबा धरून बसला होता तर साबूसिंग बेसावधपणे येत असताना, रात्रीच्या अंधारात छापा घालून साबूसिंगास ठार केले. इर्षा व वतनाच्या लालसेतून हे अघोरी कृत्य हंगे गावच्या दळवींने केले होते. साबूसिंगाचा एकुलता एक मुलगा कृष्णाजी लहान असल्याने त्यास प्रतिस्पर्ध्याकडून काही दगा फटका होऊ नये म्हणून साबूसिंगाच्या पदरच्या लोकांनी त्याला त्याच्या मातेसह आजोळी म्हणजेच संगमनेर येथे पोहचविले.
कृष्णाजीने तारुण्यात पदार्पण केल्यावर आपल्या पित्याचा म्हणजेच साबूसिंग उर्फ साबाजी यांचा मृत्यू कसा दग्याने झाला हे आईकडून कळाले तेव्हा कृष्णाजी छत्रपति शिवाजी महाराजांच्या सेवेत दाखल झाले. महाराजांनी त्यांना सुखेवाडी ( सुपे) येथे असलेल्या मोकादमीवर पुनःश्च पाठवून दिले. कृष्णाजीला बुबाजी व केरोजी असे दोन कर्तृत्ववान मुले होती, ती देखील पित्यासह छत्रपतिंच्या आश्रयास राहिली. कृष्णाजीकडे सुपे प्रमाणे वाघाळे येथील देखील मोकादमकी होती तर इ.स.१६९९ मधे मलठणची निम्मी मोकादमी ही खरेदी केली. यावेळी कृष्णाजीचे तिघे पुत्र बुबाजी, केरोजी व रायाजी हे अधिक वैभवास पोहचले होते. कृष्णाजीचे निधन निश्चित कधी व कसे झाले याबाबत कोणता ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही. छ.राजाराम महाराजांच्या कालखंडात बुबाजी, रायाजी व केरोजी यांनी मोठे शौर्य व पराक्रम निश्चितपणे केला असला पाहिजे कारण छत्रपति राजाराम महाराजांनी बुबाजी पवार यांस 'विश्वासराव' हा बहुमान व सरंजाम दिला होता तर केरोजी पवार यांना ' सेनाबारासहस्त्री ' ही बहुमानाची पदवी दिली होती. केरोजीच्या शिक्क्यात "श्री राजाराम चरणी दृढभाव " अशी अक्षरे होती. पुढील काळात बुबाजी, रायाजी व केरोजी या तीन बंधूंची वेगवेगळी तीन घराणी निर्माण झाली, त्यात बुबाजीचे घराण्याचा विस्तार फार मोठा असून धार व देवास संस्थाने निर्माण झाली आहेत. रायाजीचे घराणे वाघाळकर घराणे म्हणून वाघाळे येथे तर केरोजीचे नगर देवळेकर म्हणून खानदेशातील नगर देवळे येथे प्रसिद्ध आहेत. बुबाजीचे दोन पुत्र काळोजी व संभाजी हे होते, काळोजीचा वंश माळव्यात देवास येथे स्थिरावला. बुबाजीचा धाकटा संभाजी हा छत्रपति राजाराम महाराजांपासून छत्रपति शाहू महाराजांच्या कालखंडापर्यंत लष्कर बाळगून मोहीमेवर जात असल्याचा उल्लेख आढळून येतो. संभाजी पवार या दीर्घायू कर्त्यापुरूषाने आपल्या कार्यकाळात मलठण ( ता. शिरुर ) नवीन घर बांधले व मुलांस व नातवांस नवीन पाटीलक्या व वतने खरेदी करून अहमदनगर जिल्ह्यातील निरनिराळ्या ठिकाणी वसविले. या संभाजी पवार यांस उदाजीराव, आनंदराव व जगदेवराव अशी तीन मुले होती. उदाजीरावची लष्करी कारवाई इ.स.१७०९ पासून सुरू झाली असून माळवा व गुजरात वर मोहीमा करून मराठा साम्राज्याची ठाणी वसवून हक्क स्थापित केले. इ.स.१७०९ मधे उदाजीरावांनी माळव्यातील मांडवगड येथे अनेक शतके मालव राजधानीवर मराठ्यांचा विजयी झेंडा रोवला. इ.स.१७१८ मधे छत्रपति शाहू महाराजांनी सय्यद बंधूच्या मदतीने पेशवा बाळाजी विश्वनाथ यांच्या नेतृत्वाखाली जे मोठे सैन्य दिल्लीस पाठवले होते, त्यात खंडेराव दाभाडे, भोसले, मल्हारराव होळकर, बाजीराव बाळाजी व उदाजी पवार यांच्या समावेश होता. माळवा व गुजरातवर अनेक मोहीमात उदाजीरावांचा प्रामुख्याने सहभाग होता. पेशवा थोरला बाजीराव व उदाजीराव यांच्यात १७३१ च्या आधी काही मतभेद झाल्याने ते सेनापति खंडेराव दाभाडे यांच्या पक्षास सामील झाले होते परंतु त्याचवर्षी सेनापति दाभाडे व थोरले बाजीराव यांच्यात डभोई नजीक असलेल्या भीलापुर येथे झालेल्या लढाईत उदाजीराव व चिमणाजी दामोदर यांचा पराभव झाला. त्याचवर्षी पेशवा बाजीराव व उदाजीराव, चिमणाजी यांच्यात समेट झाल्याने पेशव्यांनी दोघांनाहि मानाची वस्त्रे व हत्ती भेट देऊन गौरव केला. इ.स.१७३५ मधे छ.शाहू महाराज हे उदाजीरावांवर नाराज झाले होते परंतु धावडशीचे ब्रम्हेंद्रस्वामींनी काही दिवसांतच महाराजांची नाराजी दूर करून पुन्हा उदाजीरावांना दौलतीच्या सेवेत घेतले. माळवा व गुजरात येथे सुरूवातीला मराठ्यांचे वर्चस्व स्थापन करण्यात उदाजीरावांचे योगदान फार मोठे आहे. आपल्या अंगच्या धाडसाने, रणशौर्याने बादशाही मुलुखात त्यांचा दरारा निर्माण झाला होता. माळवा प्रांतात उदाजीरावांच्या पराक्रमाचे वर्णन करणारी म्हण प्रचारात आली ती म्हणजे, " जिधर उदा उधर खुदा." ब्रम्हेंद्रस्वामींनी उदाजीराव पवार यांना लिहलेला पत्राचा मायना त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करणारा आहे. स्वामी लिहतात," सहस्त्रायु चिरंजीव विजयी भव रणधीर रणशूर अर्जुनतुल्य उदाजी पवार."
सरदार पवार गढी / वाडा, मलठण ता.शिरुर
सरदार पवार गढी / वाडा, मलठण ता.शिरुर
शिक्रापूर ते मलठण सुमारे वीस कि.मी. अंतर आहे. वाटेत गणेगाव खालसा या गावाच्या हद्दीत रस्त्याच्या डाव्या बाजूला समाधि सदृश्य बांधकाम असलेल्या दोनतीन प्राचीन वास्तू दृष्टीस पडल्या मात्र त्याबाबत माहिती मिळाली नाही. दुपारी १२ वाजताच्या दरम्यान आम्ही मलठण गावात प्रवेश केला. गावात प्रवेश करतानाच भव्य तटबंदी व बुरूज दृष्टीस आल्याने प्रवासाने आलेली काहीशी मरगळ दूर होऊन शरीरात नवचैतन्य आले.
सुमारे १०० फूट रंदी व १०० फूट लांबी असलेला, चारहि कोपऱ्यावर चार बुरूज असलेल्या वाड्याच्या प्रथम दर्शनीच सरदार पवार यांच्या तत्कालीन वैभवाची जाणीव होते. सुमारे १५ फूट उंचीच्या दगडी बांधकामातील तटबंदीवर दोनतीन फूट पक्क्या भाजक्या वीटांचे चुन्यातील बांधकाम आहे. वाड्याच्या बाहेरील भागात मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला अंतर्गत भाजक्या वीटांनी बांधकाम केलेली गोलाकार विहीर असून उत्तरेस पाण्याचा रहाट आहे. याच विहिरीत उतरण्यासाठी पूर्वेस भुयारी वाट असून ती काही दगडी पायऱ्या उतरून गेल्यावर दक्षिणेकडे म्हणजे विहिरीच्या हौद्यात घेऊन जाते. ही विहीर पूर्वीच्याकाळी मलठण येथील स्थानिकांच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागवित असणार. मुख्य दरवाजाचे वरील भागात पाच फूटी उंचीच्या तीन कमानी नगारखाना पडझड झालेल्या अवस्थेत आहे. भव्य वाड्यात प्रवेश करताना दोन्ही बाजूला दगडी बांधकामातील प्रशस्त सुरक्षा रक्षकांच्या देवड्या आहेत तर डाव्या बाजूच्या देवडीतून नगारखान्यात जाण्यासाठीचा दगडी पायरी मार्ग आहे. पेशवाई कालखंडात बहुतांश सरदारांच्या वाड्याच्या प्रवेशद्वारांची सुरक्षा अरब जमातीच्या रक्षकांकडे असायची त्यामुळे पूर्वीच्याकाळी येथे देखील अरब पहारेकरी असावेत असे वाटते.
चोहोबाजूची भक्कम तटबंदीच्या आतील भागात बरोबर मध्यवर्ती भागात दुमजली व दोन चौकाचा सरदार पवारांच्या राहत्या वाड्याचे अवशेष दिसून येतात. आतील वाड्याच्या उजव्या बाजूची दुमजली इमारत असल्याची भव्य भिंतीचा विशिष्ट भाग व सागवानी तुळई तत्कालीन वैभव कथन करण्यास पुरेसे आहेत.दोन्हीहि बाजूच्या भिंतीतील दर्शनी भागात जमिनीपासून सातआठ फूट उंचीवर घडीव दगडीतील लहान कोरीव कमानीचे देवकोष्टक असावीत. बरोबर मध्यावर प्रवेशद्वाराचे घडीव दगडी जोते असून दक्षिण - उत्तर दिवाणखान्याच्या सोप्यावर जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. पहिल्या चौकात दोनतीन फूट खोलीचा आयताकृति घडीव दगडींचे जोते व दगडी फरसी बांधकाम चुन्याच्या मिश्रणात केलेला असून त्यांचे सांधे अशा पद्धतीने सांधलेले आहेत की हा सर्व हौदा एकाच दगडात युगशिल्पी कारागीराच्या कसबी हातांनी बनविला आहे असा निश्चित भास झाल्याशिवाय राहात नाही. त्यानंतर दुसरा चौक देखील पहिल्या सारखा असून याचे मध्यभागी तुलसी वृदांवन आहे. तीनही बाजूच्या भिंतीत कमानी रचनेचे पक्क्या वीटांचे नानाविध कोनाडे आहेत. या वाड्यात नक्कीच तत्कालीन काळात शौचकूप असावेत असे काही अवशेषांवरून वाटते परंतु निश्चितपणे सांगणे अवघड आहे. दोन्ही चौकांचे दरम्यान असलेल्या ठिकाणी एक भुयारी मार्ग असून तो काही स्थानिकांच्या म्हणण्यानुसार मलठणपासून सुमारे नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या कवठे यमाई येथील यमाई देवीच्या मंदिरात जातो तर काहींच्या मते तटबंदी बाहेरील विहिरीत निघतो.आतील दुमजली वाड्यातील अवशेषांत सर्वात जास्त लक्ष वेधून घेतात ते तेथील जागोजाग असलेले भव्य लाकडी स्तंभाचे तळखडे.
मुख्य वाड्याच्या दक्षिणेकडील आग्नेय - नैऋत्य तटबंदीत मुख्य दरवाजाखेरीज दुसरा दरवाजा असल्याचे दिसून येते मात्र तो दरवाजा दगडी बांधकामाने भरून तटबंदी समाविष्ट केला आहे. आग्नेयकडील बुरूजाच्या आतील भागात उत्तराभिमुख दुमजली सागवानी इमारत सुस्थितित असून स्थानिकांच्या म्हणण्यानुसार तो दिवानखाना आहे. पूर्वी या वास्तूवर खापरी नळीची कौले होती ती हटवून सध्यस्तितित लोखंडी पत्र्याचे आच्छादन केले आहे. सागवानी नक्षीदार खांबांच्या वरील भागात नक्षीदार कमानी लक्ष वेधून घेतात. या वास्तू शेजारीच वाड्यातील पाण्याची गरज भागविणारी बारादरी नावाची गोलाकार पक्क्या वीटांमधे चुन्याच्या मिश्रणात बांधलेली विहीर / बारव आहे. हीचे पाणी काढण्यासाठी पश्चिमेस रहाट आहे तर आत उतरण्यासाठी उत्तरेकडून बंदिस्त दवाजातून काही दगडी पायऱ्या उतरल्यावर काटकोनात पश्चिमेकडे विहिरीच्या पाण्याकडे घेऊन जाणाऱ्या पायऱ्या आहेत. या विहिरीच्या अंतर्गत बांधकामात गोलाकार सहा कमानी असून आतील भागातून गोलाकार वास्तूच तयार केली आहे. याच्या खालील भागात देखील सहा कमानीची गोलाकार विहिरीतील वास्तू पाण्याखाली असल्याचे तेथील कर्मचारी सांगतो. विहिरीतील हा भाग म्हणजे सैनिकांचे गुप्त स्थान असावे किंवा अन्य उपयोग होत असावा. हि बारादरी म्हणजे तत्कालीन स्थापत्यशैलीचा अजोड नमुना यात दुमत शक्यच नाही. मुख्य तटबंदी व आतील राहता वाडा यांच्या दरम्यान असलेल्या मोकळ्या जागेत विविध प्रकारची शोभेची व फुलझाडे मनस्वी सांभाळली असल्याने एक प्रकारचे सौंदर्य प्राप्त झाले आहे.
सरदार पवार यांच्या वाड्यामधून बाहेर आल्यावर वाड्याच्या उत्तरेला काही अंतरावर सरदार पवार यांच्या घोड्यांची पागा असलेल्या इमारतीचे काही अवशेष दिसून आले. पूर्वी वाड्यासमोरच असलेली चुन्याचा घाणा व दगडी चाक काळाच्या ओघात इतरत्र मातीत लुप्त झाले आहे. मलठण गावचे ग्रामदैवत असलेल्या मल्लिकार्जुन मंदिरात जाऊन दर्शन घेतले. दुपारी श्री.भोसले यांनी अगत्याने आम्हाला भोजन केले तर तेथील ग्रा.वि.अधिकारी श्री.गायकवाड यांनी त्यांचे निवासस्थानी चहापान केले. कधीकाळी दुष्काळाच्या छायेत असलेल्या या परिसरात गावात बागायती शेती केली जाते कारण डिंभे व चास या धरणाचे कालवे गेलेले आहेत
मलठणचे सरदार पवार घराण्याचा वंशवेल
१) साबूसिंह / साबाजी पवार
l
कृष्णाजी
|
----------------------------------------------------------------
| | |
१)बुबाजी २)राणोजी (रायाजी) ३) केरोजी
(सुपेकर) (वाघाळकर) (नगर देवळेकर)
|
----------------------------------------------------------------
|
१)काळुजी २)संभाजी
|
-------------------------------------------------------------------
| | |
१)उदाजीराव १) आनंदराव जगदेवराव
(मलठण) ( धार ) ( चित्तेगाव )
|
-------------------------------------------------------------------
| | | |
२)दार्कुजी मैनारावजी गोविंदराव चंद्रराव
|
३) मल्हारराव
|
४) यशवंतराव
( दत्तक )
|
------------------------------------------------------------------
| | |
मल्हारराव अनिरुद्धराव ५) संभाजीराव
(दत्तक धार) (दत्तक धार ) |
|
|
---------------------------------------------------------------
| | |
६) यशवंतराव भागुजीराव सेतुरामसिंह
| ( दत्तक धार ) |
७)धैर्यशीलराव |
|
-----------------------------------------------------------------
| |
विक्रमसिंह जगदेवराव
( दत्तक धार )
संदर्भ - १) धार संस्थानचा इतिहास
( अर्वाचीन काल )
लेखक - काशिनाथ कृष्ण लेले
शिवराम काशीनाथ ओक
इतिहास कचेरी संस्थान धार इ.स.१९२६
२) मराठी रिसासत - गो.स.सरदेसाई
®© सुरेश नारायण शिंदे, भोर
shindesn16@gmail.com
No comments:
Post a Comment