श्रीमंत गायकवाड घराण्याचा दैदिप्यमान शौर्याचा इतिहास
पोस्तसांभार : © सुरेश नारायण शिंदे, भोर
श्रीमंत गायकवाड घराणे हे मुळचे पुणे शहराच्या लगतच असलेल्या मुळशी तालुक्यातील भरे या गावचे. या घराण्यातील ज्ञात असणारा मुळ पुरुष नंदाजीराव गायकवाड हे भरे गावात उत्तम शेती करून राहत होते. शेतीवाडी करून आनंदाने राहणाऱ्या नंदाजीराव यांच्या नातवाचे म्हणजेच दमाजींचे मुलूखगिरी करून क्षत्रिय धर्माचे पालन करण्याचे विचार होते. पुढे दमाजी हे तळेगाव दाभाडे येथील सेनापति त्र्यंबकराव दाभाडे यांच्या सैन्यात शिपाईगिरी करु लागले. दमाजी हे अंगच्या शौर्यधैर्यादि गुणांमुळे लवकरच नावलौकिकास आले. त्यांचे पराक्रम, शौर्य व कर्तृत्व पाहून छत्रपति शाहुमहाराजांनी समशेरबहाद्दर हा किताब त्यांना दिला व स्वराज्याच्या दुय्यम सेनापति म्हणून अधिकार बहाल केला. मात्र असा पराक्रमी शूरवीर लवकरच निधन पावला. दमाजीच्या निधनामुळे गायकवाड घराण्याला छत्रपतींनी दिलेला अधिकार आता कोणाला मिळणार हा प्रश्न होता, मात्र दमाजींच्या भावाचा मुलगा पिलाजी हा देखील त्यांच्यासारखाच बुद्धिमान, हिम्मतदार होता. छत्रपतींनी दमाजींचे सर्व अधिकार पिलाजीस दिले. पिलाजी गायकवाडांनी खानदेशातील नवापूर येथे काही काळ वास्तव्य केले, मात्र लवकरच त्यांनी स्वतः सोनगड येथे किल्ला बांधून राहण्यास सुरूवात केली. इ.स. १७२४ मधे गुजरातच्या नायब सुभेदार हमीदखान यांस पिलाजींनी सैन्य मदत केली व त्याच्या बदल्यात महीनदीच्या पूर्वेकडील मुलूखात चौथाई घेण्याचा हक्क मिळविला. पेशवा बाजीराव बाळाजी भट व सेनापति त्र्यंबकराव दाभाडे यांच्या सैन्याचा इ.स.१७३१ मधे रणसंग्राम डभई येथे झाला, तेव्हा दाभाडेंच्या बाजूने लढताना पिलाजींचा एक मुलगा कामी आला तर स्वतः पिलाजी जखमी झाले. या युद्धात सेनापति त्र्यंबकराव दाभाडे यांना वीरमरण आले. पुढे छ.शाहुमहाराजांनी उमाबाईसाहेब यांचे सांत्वन केले व यशवंतराव दाभाडे ह्यांस सेनापतींची वस्त्रे व अधिकार दिले. त्याचवेळी सेनापति यशवंतराव यांचे मुतालिकपदी पिलाजींस कायम ठेवून, सेना खासखेल हा आणखी दुसरा किताब दिला. गुजरात प्रांतावर मराठ्यांच्या वतीने दाभाडे व गायकवाड यांच्या पूर्ण अमल बसला पण हे जोधपूरच्या अभयसिंगास रुचले नाही. तो यांच्याशी समोरासमोर लढण्यात कमी असल्याने त्याने विश्वासघात करून पिलाजींचा खून केला.
पिलाजींच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा दमाजी ( द्वि.) हा कारभारी झाला. आपल्या वडिलांचा कपटाने खून करणाऱ्या अभयसिंगाचा प्रतिशोध घेण्यासाठी दमाजीने बडोदा किल्ल्यात राहणाऱ्या अभयसिंगावर हल्ला केला. दोन्ही सैन्यात घनघोर रणसंग्राम झाला व शेवटी दमाजी सैन्याला बडोदा किल्ल्याचा ताबा मिळाला मात्र अभयसिंग जीव वाचवून पलायन करण्यात यशस्वी झाला. दमाजींच्या सैन्याने अभयसिंगास जोधपूर गाठता नाकीनऊ आणले. या वेळापासून गायकवाड घराण्याकडे बडोदा हे राजधानीचे शहर म्हणून कायमच राहिले. इ.स.१७४४ मधे दमाजी साता-यास छत्रपतींच्या भेटीसाठी गेले होते.
इ.स.१७४९ मधे छत्रपति शाहुमहाराज कैलासवासी झाल्यावर सातारची गादी प्राप्त करण्याचा प्रयत्न महाराणी ताराराणीसाहेब यांनी सुरू केला. तिने अनेक युक्त्या लढवून दमाजीस आपल्या पक्षात ओढून घेतले. पुढे पेशवा नानासाहेब ( बाळाजी बाजीराव) यांनी दमाजीस १७५२ मधे कैद केले. दोन वर्षे कैदेत राहिल्यावर पेशव्यास रोख रक्कम भरुन व एकनिष्ठ राहण्याचे वचन देऊन दमाजींने आपली मुक्तता करून घेतली. इ.स.१७५५ मधे राघोबादादाबरोबर ते अहमदाबाद मोहिमेवर गेले व यश संपादिले.
१४ जानेवारी १७६१ ला मराठ्यांचा व अहमदशाह अब्दाली यांच्यात पानिपत येथे रणसंग्राम झाला तेव्हा दमाजी गायकवाड हे मराठा सैन्यात रणांगणावर होते. पानिपतहून परतल्यावर दमाजींनी ब-याच मोहिमा करून मुलूख जिंकला तर १७६३ साली निजामाशी झालेल्या तादुंळजाच्या युद्धात तरवार गाजवली. सतत ३५ वर्षे दमाजींनी तरवार गाजवून गुजरात मधे गायकवाड घराण्याचा कळस चढविला. अशा या पराक्रमी नरवीराने १७६८ रोजी आपला देह ठेवला.
संदर्भ
१)क्षत्रिय घराण्यांचा इतिहास - भाग १
लेखक - सीताराम रघुनाथ तारकुंडे (१९२८)
२) मराठी रियासत - गो.स.सरदेसाई
विनंती - मी लिहलेली खालील पुस्तके अवश्य वाचावी.
१) ऐतिहासिक भोर ः एक दृष्टीक्षेप
( ऐतिहासिक )
२) पासोडी ( ललित लेखसंग्रह)
३) आगामी - आडवाटेचा वारसा
( ऐतिहासिक पर्यटन संदर्भग्रंथ )
No comments:
Post a Comment