विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 25 March 2022

दंडकारण्याचे महाराष्ट्र होताना…भाग १

 

दंडकारण्याचे महाराष्ट्र होताना…
लेखक ::– डॉ. सदानंद मोरे
(सौ .साप्ताहिक सकाळ )

भाग १
“”मानव्य, हैहय, भोज, यादव, नल, कदंब, मौर्य, चालुक्य इत्यादी शेकडो गोत्रांचे रट्ट दंडकारण्यात वसत्यर्थ शिरले. शहाण्णव कुळींच्या रट्टांवरून व महारट्टांवरून सबंध देशाला महरट्टांचा देश ऊर्फ महाराष्ट्र ही संज्ञा पडली. मराठ्यांचा इतिहास म्हणजे या शहाण्णव कुळींच्या कर्तृत्वाचा दंडकारण्यातील प्रवेशाच्या आदीपासून आतापर्यंतचा इतिहास.”
इतिहासाचार्य राजवाडे राष्ट्रवादी असले तरी त्यांच्या राष्ट्रकल्पनेची व्याप्ती हिंदुस्थानशी समकक्ष नसून, महाराष्ट्रापुरती मर्यादित होती. मराठ्यांनी हिंदुस्थानभर साम्राज्य स्थापणे, हे त्यांना नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नसे. युरोपभर आपले साम्राज्य (एाळिीश) करू इच्छिणारा नेपोलियन त्यांना “बदनजरेचा पाजीतला पाजी राक्षस’ वाटे. ज्युलियस सीझर, तैमूर इत्यादींसारख्या अशाच साम्राज्येच्छूंचा त्यांना तिटकारा होता. इतकेच नव्हे, तर श्रीरामदास व श्री शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापिल्यावर बाजीरावादी मंडळींना सर्व हिंदुस्थानभर नव्हे, तर संपूर्ण दुनियेपर्यंत एाळिीश स्थापण्याची दुष्ट व अन्याय्य बुद्धी झाली,” असे म्हणत त्यांनी मराठ्यांचीही निंदा केली.
राजवाड्यांना संघराज्याच्या – णपळींशव डींरींशी चा पर्याय न्याय्य वाटे. मराठ्यांना “णपळींशव डींरींश स्थापण्याची न्याय्य बुद्धी झाली नाही. त्यामुळे रजपूत, रांगडे, पंजाबी, गुजराती, काठी, कानडी, तेलगू, मल्याळम, मुसलमान अशी हिंदुखंडातील सर्व राष्ट्रे व लोक मराठ्यांच्या विरुद्ध होऊन पानिपत येथे भिकार अबदालीकडून रेच मिळाला.” अशी त्यांची पराभवमीमांसा होती.
राजवाडे भाषावार आणि संस्कृतीवार राष्ट्रांच्या निर्मितीचे पुरस्कर्ते असून, अशा राष्ट्रांची लीग, कॉन्फिडरसी वा युनियन व्हायला त्यांची हरकत नाही. महाराष्ट्राने राष्ट्र व्हावे आणि हिंदुस्थानच्या संयुक्त संस्थानांचे धुरीणत्व करावे, अशी त्यांची कल्पना दिसते. त्यांच्याच शब्दांत त्यांचे स्वप्न सांगायचे झाल्यास, “”मनात येते, की एखादा सर्वज्ञ, धर्मनिष्ठ व महाराष्ट्रनिष्ठ संस्थानिक निर्माण व्हावा, त्याच्या मनात महाराष्ट्राला राष्ट्र बनविण्याचा सद्‌हेतू उतरवावा, त्याच्या पदरी नीतिनिपुण मुत्सद्दीमंड जमावे, त्यांच्या सल्ल्याने राजाने राष्ट्राच्या ऱ्हासाची कारणे निर्मलान्तःकरणाने शोधून काढणारे एखादे कमिशन नेमावे आणि त्या कमिशनने केलेल्या शिफारसी राजाने अमलात आणाव्यात.”
“”असा काल्पनिक राजा निर्माण झाला व असले काल्पनिक कमिशन नेमले गेले, तर पहिले प्रश्न विचाराकरिता जे निघतील, ते हे – सध्या म्हणजे आजमितीस महाराष्ट्राचा खरोखरच ऱ्हास झाला आहे की काय? महाराष्ट्र म्हणजे कोण?”
हे प्रश्न दोन स्वतंत्र प्रश्न दिसत असले तरी राजवाड्यांच्या मते ते एकमेकांशी निगडित आहेत. पहिल्या प्रश्नाचे उत्तर दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरावर अवलंबून आहे. या मुद्‌द्‌याचा विस्तार त्यांच्याच शब्दांत… “”इंग्रज, अंग्लोइंडियन्स, पारशी, ज्यू, लिंगायत, मानभाव, महार, शूद्र, मराठे, कातकरी, मुसलमान, गुजराथी, मारवाडी, जैन, ब्राह्मण व सुधारक यांपैकी महाराष्ट्र कोणाचे? एकेकाचे की साऱ्या मिळूनचे? साऱ्या मिळूनचे म्हटले तर उत्तर एक येणार नाही. एकेकाचे म्हटले तरी उत्तर एक येणार नाही, हे ठरलेलेच.”
याही पुढे जाऊन राजवाडे असे विधान करतात, की “”बहुतम व जुनाट जे हिंदू त्यांचे महाराष्ट्र म्हटले तत्रापिही ही एकच एक उत्तर येणे अशक्य आहे.”
याचा अर्थ असा होतो, की सर्वसाधारण हिंदूला महाराष्ट्राच्या ऱ्हासाची जाणीव होईलच, असे नाही. म्हणजेच राजवाडे शिवसेनेप्रमाणे महाराष्ट्रीयत्व आणि हिंदुत्व यांच्यात अनिवार्य संबंध मानायला तयार नाहीत.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...