दंडकारण्याचे महाराष्ट्र होताना…
लेखक ::– डॉ. सदानंद मोरे
(सौ .साप्ताहिक सकाळ )
राजवाड्यांचा वर्चस्ववाद
राजवाड्यांचे असे मत आहे, “”फक्त ब्राह्मण व मराठे यांच्या दृष्टीला राष्ट्राचा ऱ्हास झालेला दिसेल. अन्य कोणाच्याही दृष्टीला ऱ्हास दिसणार नाही. कित्येक तर प्रगती चाललेली आहे, असेच म्हणतील. … दोन्ही प्रश्नमालिकासंबंधाने फक्त ब्राह्मण व मराठे यांची बरीच एकवाक्यता होईल. इतरांचे हितसंबंध, आकांक्षा, भविष्य व उमेद अगदी निराळी. त्यांची उत्तरे ब्राह्मणमराठ्यांच्या उत्तराहून अगदी उलट येणार, यात संशय नाही. खंगले कोण? तर ब्राह्मण-मराठे. स्वराज्य व साम्राज्य गेले कोणाचे? तर ब्राह्मण मराठ्यांचे. पोटभर भाकरी मिळत नाही कोणाला? तर ब्राह्मण मराठ्यांना. शरीराने क्षीण कोण? ब्राह्मण मराठे. धंदा नाही कोणाला? ब्राह्मणमराठ्याला. रेल्वेवरती हरघडी पाणउतारा होतो कोणाचा? तर ब्राह्मण मराठ्यांचा. धर्म गेला कोणाचा? तर ब्राह्मण मराठ्यांचा. मराठी मंडळ कोणाचे? ब्राह्मण मराठ्यांचे. सर्वतोपरी ऱ्हास भासतो कोणाला? ब्राह्मण मराठ्यांना. प्रस्तुत ऱ्हासाचा प्रश्न काढला कोणी? ब्राह्मण मराठ्यांनी. उन्नतीचे उपाय हवेत कोणाला? ब्राह्मण मराठ्यांना. विशेष नीच लुच्चे व धर्मभ्रष्ट कोण? तर ब्राह्मण मराठे. धर्मसचोटी व शील वाढवावेसे “वाटते’ कोणाला? तर ब्राह्मण मराठ्यांना. महाराष्ट्र बुडविला कोणी? ब्राह्मण मराठ्यांनी. महाराष्ट्रावर निःसीम प्रेम कोणाचे – प्रिय महाराष्ट्रातील ब्राह्मण मराठ्यांचे, असा हा ब्राह्मणमराठ्यांचा आजपर्यंतचा प्रश्न आहे.”
उतारा काहीसा लांबलचक असला तरी राजवाड्यांचा दृष्टिकोन समजण्यासाठी आवश्यक आहे. महाराष्ट्र हा ब्राह्मण आणि मराठा या दोन राज्यकर्त्या अभिजनांचा असल्याचे राजवाड्यांचे मत आहे. महाराष्ट्र सर्वांचा आहे, जे राजारामशास्त्री भागवतांचे मत होते, त्याच्या अगदी विरोधी असा हा राजवाड्यांचा वर्चस्ववाद आहे. या दोन विद्वानांची यथायोग्य तुलना राजवाड्यांचे वारसदार मानल्या गेलेल्या दत्तोपंत पोतदारांनी अत्यंत समर्पकरीत्या केली आहे. पोतदार लिहितात- “”राजारामशास्त्र्यांची राजवाड्यांशी पुष्कळ बाबतीत तुलना करता येईल. दोघेही नैरूक्तिक होते. दोघेही इतिहासपंडित होते. दोघेही लोकांना विक्षिप्त वाटत. दोघेही सडेतोड व बाणेदार होते. मऱ्हाटी व मऱ्हाटे यांचा जाज्वल्य अभिमान दोघांच्या ठायी उत्कट होता. दोघांची भाषासरणी व विचारसरणी स्वतंत्र होती. साधी राहणी व उच्च विचारसरणी या कोटीत दोघेही पडतात. दोघांचेही जगाशी पटत नसे… एकास ब्राह्मण्याचा उत्कट अभिमान होता, तर दुसरा ब्राह्मणी काव्याच्या कल्पनांनी व्याप्त झाला होता. एकास युरोपियनांचे वावडे असे, तर दुसऱ्यास मिशनऱ्यांच्या सहवासात व सेवेत आयुष्य कंठणे परवडले… दोघेही समकालीन असून, “भेटी नाही जन्मवरी’ असा प्रकार होता. एकाच पर्वताच्या एकाच सोंडेमुळे दोन अंगाला बनलेल्या दोन खोऱ्यांतून दोन स्वतंत्र प्रवाह निघावेत आणि दोन्ही एकाच दिशेने; परंतु एकमेकांस स्पर्श न करता समुद्रास मिळावेत, असा काहीसा प्रकार या दोन जबरदस्त विद्वानांच्या लेखनप्रवाहासंबंधाने झाला, असे म्हटले असता उचित दिसेल.”
No comments:
Post a Comment