विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 24 March 2022

माहूरगडाची रायबागण भाग १

 

माहूरगडाची रायबागण
पोस्तसांभार ::सतीश राजगुरे


भाग १
'वाशीम'चे राजे उदाराम देशमुख हे 'माहुर'चे जहागिरदार होते. अकबरानेच उदाजींना माहूरच्या किल्ल्याची किल्लेदारी आणि वाशिमची वतनदारी दिली होती. इ.स. १५९५-९६ मध्ये अकबराने 'वऱ्हाड' जिंकून घेतले. त्यात 'माहूर' हे एक अत्यंत महत्त्वाचे ठाणे होते.
त्याकाळी निजामशाही आणि मुघल यांच्यात 'वऱ्हाड' सुभ्यासाठी (Berar Subah) सतत संघर्ष सुरू असे. त्यात माहूर कधी निजामशाहीच्या अंमलाखाली तर कधी मुघलांच्या अंमलाखाली असे. त्यामुळे वऱ्हाडात अराजकता माजली होती. इ.स. १६०० मध्ये चाँद बिबीचा खून झाला. निजामशाही मलिक अंबरच्या अधिपत्याखाली आली. त्यानंतर उदाजींनी मुघलांची नोकरी सोडून निजामशाहीत प्रवेश केला. हळूहळू उदाराम निजामशाहीचे चार हजारी मनसबदार बनले.
निजामशाहीतील बलाढ्य सरदार लखुजी जाधवराव यांच्याशी उदाराम यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. उदाराम हे एक अत्यंत हुशार, कार्यकुशल, प्रजाहितदक्ष पण कारस्थानी सरदार होते. दानधर्मामध्ये ते दख्खनमधील सरदारांच्या अग्रभागी असत. लखुजी जाधवरावांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी बऱ्याच लढाया लढल्या. पैठण पासून मेहकरपर्यंत लखुजी जाधवरावांच्या तर मेहकर पासून माहूरपर्यंत उदाराम यांच्या जहागिरीचा मुलुख होता.
राजे उदाराम देशमुख यांचा १६३२ मध्ये दौलताबादच्या किल्ल्याजवळ मृत्यू झाला. त्यांची पत्नी म्हणजे 'पंडिता सावित्रीबाई,' जिला 'रायबागन' किंवा 'रायबाघन' म्हटले जायचे. ती माहूरची शासक झाली व मोगलांच्या सेवेत पतीच्या जागेवर रुजू झाली. तिच्याकडे वऱ्हाडातील मोठ्या जहागिरीमध्ये पुसद, उमरखेड, वाशीम, मालेगाव व माहुरचाही समावेश होता.
या जहागिरीसाठी हरचंदरायने माहूरवर आक्रमण केले, तेव्हा त्याला सावित्रीबाईने प्रतिकार केला.
आपल्या भाल्याला चोळी बांधून रायबागन लढण्यास सज्ज झाली. तिने तिच्या सैन्याला लढण्याचे आवाहन केले, "मी माझी चोळी निशाण म्हणून घेऊन युद्धाला निघाली आहे. तुम्ही तर पुरुष आहात. तेव्हा तुम्ही माझ्यापेक्षा नक्कीच अधिक शूर असणार! सर्व शक्ती पणाला लावून शत्रूचा पराभव करा, युद्ध जिंका आणि या बहिणीची लाज राखा!" या विरश्रीपूर्ण आवाहनाने प्रेरित होऊन रायबागनचे सैन्य प्राणपणाने लढले व त्यांनी हरचंदरायचा पराभव केला.
ही घटना इ.स.१६३२ ते १६३७ च्या दरम्यान घडली. लढाईत सावित्रीबाई स्वतः लढली होती. या घटनेमुळे सावित्रीबाईंच्या शौर्याची खबर सर्वत्र पसरली. पुढे मुलगा जगजीवनरावच्या मृत्यूनंतर रायबागनने 'बाबुराव' नामक नातवासह एवढी मोठी जहागिरी सांभाळली.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...