दंडकारण्याचे महाराष्ट्र होताना…
लेखक ::– डॉ. सदानंद मोरे
(सौ .साप्ताहिक सकाळ )
खरे महाराष्ट्रिक कोण?
राजवाड्यांची महाराष्ट्रातील आर्य वसाहतीकरणाची कथा खूप गुंतागुंतीची आहे. ते नेमके केव्हा झाले, हे त्यांना सांगता येत नसले तरी ज्या अर्थी अशोकाच्या शिलालेखात रस्टिकांचे नाव अवतीर्ण होते, त्या अर्थी रस्टिक किंवा राष्ट्रिक किंवा रट्ट हे तेव्हा येथे येऊन स्थिरावले असणार, हे उघड आहे. या रट्टांनी वसाहतीकरणात पुढाकार घेतल्यामुळे, खरे तर ते उत्तरेत असल्यापासूनच त्यांच्याकडे प्रादेशिक किंवा स्थानिक अधिकारपदे असल्यामुळे, पाटील, देसाई, देशमुख ही पदे त्यांच्याकडे आपोआपच आली व पिढीजात किंवा वंशपरंपरागत झाली. ते वर्णाने क्षत्रिय व पेशाने देशाधिकारी. त्यांच्यापेक्षा उच्च दर्जाच्या क्षत्रिय अधिकाऱ्यांना सरपाटील, सरदेशमुख, सरदेसाई असे म्हणण्यात येई. पण ही पदे सांभाळणारे साधे राष्ट्रीक किंवा रट्ट नसून महाराष्ट्रिक होत. महाराष्ट्रिक याचाच अपभ्रंश महरट्ट व महरट्ट याचा अपभ्रंश मऱ्हाट. “”हे रट्ट जी संस्कृतोत्पन्न अपभ्रष्ट भाषा बोलत ती दंडकारण्यातील राजमान्य, लोकमान्य व कविमान्य महाराष्ट्री ऊर्फ महरट्टी व पुढे कालांतराने मराठी भाषा सर्व प्राकृत भाषांत प्रकृष्ट म्हणून प्रख्या पावली… रट्ट व महरट्ट हे वर्णाने व जातीने क्षत्रिय, दर्जाने देशाधिकारी आणि सत्तेने राष्ट्राधिकारी, देशाधिकारी व ग्रामाधिकारी पडल्यामुळे, मुलखातील सर्व प्रकारचे पुढारपण यांच्याकडे आले होते. आणि असले हे सर्वतो प्रकारे उच्चस्थानापन्न लोक जो अपभ्रंश बोलत तो सर्व अपभ्रंशांत श्रेष्ठतम ठरावा यात नवल कोणते? भारत वर्षातील काश्मीरपासून कुमारीपर्यंत जे जे संस्कृतप्राकृत नाटककार होऊन गेले, त्यांनी उच्च दर्जाच्या पात्रांच्या तोंडी महाराष्ट्री भाषा घातलेली जी आढळते, तिचे कारण ही महाराष्ट्री भाषा द्रव्यबल, मनुष्यबल व सत्ताबल अशा विविध बलांनी समलंकृत अशा उच्चवर्णाच्या क
्षत्रियरट्टांची भाषा होती.”
राजवाडे असाही तपशील सांगतात, “”मानव्य, हैहय, भोज, यादव, नल, कदंब, मौर्य, चालुक्य इत्यादी शेकडो गोत्रांचे रट्ट दंडकारण्यात वसत्यर्थ शिरले. शहाण्णव कुळींच्या रट्टांवरून व महारट्टांवरून सबंध देशाला महरट्टांचा देश ऊर्फ महाराष्ट्र ही संज्ञा पडली. मराठ्यांचा इतिहास म्हणजे या शहाण्णव कुळींच्या कर्तृत्वाचा दंडकारण्यातील प्रवेशाच्या आदीपासून आतापर्यंतचा इतिहास.”
अर्थात या रट्टांबरोबर “”निरनिराळ्या दीडशे प्रकारचे लोक दंडकारण्यात भारतवर्षाच्या नाना प्रदेशांतून शिरले. परंतु या सर्व लोकांचे पुढारपण रट्ट व महारट्ट यांजकडे असे. – हे लोक यद्यपि भिन्नप्रांतीय, भिन्नजातीय व भिन्नवृत्तीय होते. तत्रापि, रट्टांचे तेज सर्वांवर पडून त्या सर्वांना कालांतराने महाराष्ट्रीय ऊर्फ मऱ्हाटा ही संज्ञा प्राप्त झाली.”
No comments:
Post a Comment