दंडकारण्याचे महाराष्ट्र होताना…
लेखक ::– डॉ. सदानंद मोरे
(सौ .साप्ताहिक सकाळ )
दंडकारण्य कोणते?
परंतु या महाराष्ट्रिकांना दंडकारण्यातील आद्य वसाहतकार म्हणता येईल काय? वैदिक साधनांनाच अनुसरायचे झाल्यास आर्यांच्या दक्षिणेतील वसाहतीचा पहिला मान निःसंशयपणे अगस्ती ऋषींकडे जातो; परंतु अगस्ती कोणी सत्ताधारी राजेमहाराजे नव्हते. वाल्मिकी रामायणानुसार इक्ष्वाकू कुळातील दंडक नावाचा राजा दक्षिणापथात राज्य करीत होता. त्याच्यावरूनच या प्रदेशाला “दंडकारण्य’ हे नाव पडले.
पण एका राज्याचे रूपांतर अरण्यात कसे झाले?
हा दंडक इक्ष्वाकूच्या शंभर पुत्रांपैकी तिसरा. इक्ष्वाकूने त्याला विंध्याद्री व शैवल पर्वत या दोहोंमधील प्रदेशाचे राज्य दिले. या प्रदेशातील मधुमंत नावाची नगरी त्याने आपली राजधानी केली. वस्तुतः वसिष्ठ हा इक्ष्वाकूचा पुरोहित. इक्ष्वाकूचा दुसरा पुत्र निमि याने वसिष्ठालाच आपला पुरोहित नेमले. दंडकाने भृगूच्या कुळातील एका ऋषीस आपले पौरोहित्य दिले. एकदा त्याने कामातुर होऊन आपल्या गुरूच्या अरजा नावाच्या कन्येवर बलात्कार केला. त्यामुळे क्रोधाविष्ट होऊन त्या भार्गव पुरोहिताने दंडकाला बल, कोश इ. राज्यांगांसह शापाने भस्मसात केले. तेव्हापासून त्याच्या राज्याच्या चारशे योजनांचा प्रदेश उजाड झाला. त्याला “दंडकारण्य’ असे नाव पडले. (इकडे निमि आणि वसिष्ठ यांनीही एकमेकांना वेगळ्या कारणांमुळे शाप देऊन नष्ट केले.) पुढे इक्ष्वाकू वंशातीलच दाशरथी राम आपली पत्नी सीता आणि बंधू लक्ष्मण यांच्यासमवेत वनवासाला गेला, तेव्हा त्याच्या वनवासाचा बराच काळ याच दंडकारण्यातील जनस्थान नामक भागात व्यतीत झाला. दंडकारण्य त्या वेळी लंकाधिपती रावणाच्या राज्याचा भाग बनला होता. रावणाने तो आपली विधवा बहीण शूर्पणखा हिला देऊन आपला सावत्र भाऊ खर यास सेनापती दूषणासह तेथे ठेवले होते.
दंडकारण्याच्या संबंधी एका वेगळ्या मताचीही येथे नोंद घ्यायला हवी. जैन परंपरेतील आचार्य विमलसुरींच्या “पउमचरियं’ या ग्रंथात (शूर्पणखेऐवजी?) चंद्रनखा नावाच्या स्त्रीचा उल्लेख आहे; परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे त्यानुसार दंडक नावाचा पर्वत होता व त्या पर्वतावर दंडक याच नावाच्या एका महानागाचे वास्तव्य होते. त्यामुळे या प्रदेशाला दंडकारण्य हे नाव प्राप्त झाले.
दंडकारण्य शब्दाची व्युत्पत्ती काहीही असो. महाराष्ट्राचा व त्याचा संबंध आजही इतका दृढ आहे, की कोणत्याही वैदिक कर्माचा संकल्प सांगताना आपण राहतो त्या प्रदेशाचा उल्लेख “दंडकारण्य’ असाच केला जातो. मध्ययुगीन दानपत्रांमधून दान दिलेल्या भूमीच्या वर्णनात दंडकारण्याचा उल्लेख अनेकदा येतो. उदाहरण म्हणून डॉ. ब्रह्मानंद देशपांडे यांच्या “शोधमुद्रा’ (खंड 1) मध्ये प्रसिद्ध झालेल्या वसमतजवळील रांजणा येथील नृसिंह मंदिरातील शके 1139 मधील आमणदेवाचा शिलालेख घेऊ. या लेखातील स्थलाचा उल्लेख “भारत वर्षे जंबुद्वीपे दंडकारण्ये’ असा झाला आहे.
राजवाड्यांच्या मते वऱ्हाड, नागपूर, उत्तर कोकण, आंध्र प्रदेश, गोदातीर या दंडकारण्याच्या भागात आर्यांच्या वसाहती प्रथम झाल्या. नाणे मावळातील 168 गावांच्या नावांचा अभ्यास करून त्यांनी असा अंदाज बांधला, की दंडकारण्यातील हा “”मावळ प्रांत अरण्याच्या अगदी गाभ्यात व सह्यपर्वताच्या कुहरात असल्यामुळे यात वसाहती बऱ्याच उशिरा झाल्या असाव्यात.”
मावळातील ग्रामनामांच्या संस्कृतोद्भवतेवर बोट ठेवून राजवाडे सांगतात, की आधी हा भाग निर्भेळ अरण्य होता. तेथे मनुष्यवस्ती अजिबात नव्हती. पहिल्यांदा तेथे राक्षस अवतरले. (राक्षस ही माणसांचीच एक जात). मग नाग (हाही मनुष्यवंशच) आणि मग आर्य. ते असेही मान्य करतात, की “”ग्रामनामांवरून दिसते, की सनातन धर्म नाणेमावळात असून, शिवाय बौद्ध धर्माची छाया या मावळावर बरीच दाट पडली होती.”
No comments:
Post a Comment