विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 17 March 2022

हिंदनृपती #कथा_शंभुपुत्राची शाहुपर्व_भाग_पहिला

 

#3"एप्रिल1680 चैत्र पौर्णिमा शालिवाहन शके 1602 हनुमान जयंती चा तो दिवस. पुराणातील एका निष्ठावंत भक्तांचा जन्मदिवस सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत होता.किल्ले रायगडावर मात्र भर दुपारी काळजीचं काळं ढग जमा झाल होत.छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रकृती गंभीर होती.सारा रायगड अठरा कारखाने आणि रयत काळजीत होती.शिरकाई देवीला जागर चालू होता.काहीही करून राजाला बरं वाटलं पाहिजे म्हणून माणूस ना माणूस त्या देवीला प्रार्थना करत होता.महाराणी पुतळाराणींनी तर देव पाण्यात ठेवून, 'आपलं सारं पुण्य महाराजांच्या वाट्याला दे अन त्यांना बरं वाटू दे' म्हणत त्या शंभू महादेव आणि तुळजा भवानी ला साकडं घातलं होत.
"तुका म्हणे सायासाचे फळ,सोडून जाय काळ वेळ दोन्ही" तुकोबांच्या उक्तीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज पृथ्वीवरच आपलं कार्य पूर्ण करून वयाच्या अर्धशतकातच स्वराज्य पोरकं करून गेले. अंगणातल्या तुळशींनी माना टाकल्या,गोठ्यातल्या गाई आणि पागेतली घोडी सुद्धा रडू लागली.वाराही काही काळ शांत झाला असेल या शांत वातावरणात रायगडावरील आक्रोशान मात्र आसमंताला धडकी भरली असेल.शूर आबांचा पराक्रमी छावा शंभूराजे या वेळी पन्हाळगडी होते.शंभुराजे आणि कारभारी मंडळी यांच्यात राज्यकारभारावरून नेहमी वाद व्हायचे म्हणून महाराजांनी मुद्दाम त्यांना पन्हाळगडी ठेवलं होतं.काही दिवसांपूर्वी महाराजांनी भेटून संभाजीराजांना लवकर रायगडावर बोलावू म्हणून सांगितलं होतं.शंभुराजे म्हणजे साक्षात #स्वराज्याचा_कर्ण.दिलेल्या वचनांसाठी सत्व हरवलेला.आपल्या अंगी असामान्य पराक्रम आणि मनगटात प्रचंड ताकद,छातीत बुलंद हिम्मत पण आपल्या पित्याच्या शब्दापुढं सारं विसरून शांत राहिलेला महान योद्धा. काळानं वेळ साधली होती,वेळेनं डाव टाकला होता आणि शंभूराजे आणि राजाराम यांना पोरकं करत बाप नावच छत्र नाहीस झालं होतं.जेव्हा ही बातमी शंभुराजांच्या कानी पडली तेव्हा सह्याद्रीच्या एखाद्या कातळ दगडात सुरुंग फुटून दगडांचे लाखो तुकडे चहुबाजूंना अस्थव्यस्त पसरावे तशी अवस्था शंभुराज्यांच्या मनाची झाली होती.त्यातच त्यांच्या अनुपस्थितीत सगळी कार्य उरकली होती त्यामुळे संतापाचा ज्वालामुखी त्यांच्या काळजात अवतरला होता.बलाढ्य पहाडाच्या छातीचा शंभूराजा खचला होता.आबांच्याआठवणीनं पुरता गुरफटला होता.आपल्या वडिलांचा पराक्रम,शौर्य,धैर्य,साहस आणि वडिलांच्या सोबत वयाच्या सातव्या वर्षी अनुभवलेली दिल्लीपती औरंग्याची कैद ते आजवर घडलेले असंख्य प्रसंग आठवत शंभूराजे तडफडत होते. शंभूराजांनी भरारी घेतली आणि महाराजांचे संकल्पित पूर्णत्वास नेण्यासाठी पाय रोवले.स्वराज्याची धुरा आपल्या 23 वर्षाच्या कोवळ्या पण पराक्रमी खांद्यावर पेलवित स्वतःला 16 जानेवारी 1681 ला राज्याभिषेक करून घेतला.32मणाच सुवर्ण सिंहासन पुन्हा एकदा रयतेच्या डोईवर सुखाच छत्र धरायला सज्ज झालं.दिल्लीचा बादशहा औरंगजेब मात्र हादरला होता.शिवाजी भोसले संपला म्हणजे पूर्ण दक्खन प्रांत त्याच्या ताब्यात येईल असं त्याला वाटायचं पण संभाजी राजांच्या राज्याभिषेकाच्या बातमीने त्याच्या स्वप्नांना चुराडा झाला होता.राजमाता जिजाऊ यांच्या मृत्यू पासूनच औरंग्यांन दक्षिणेत हालचाली वाढवल्या होत्या.निम्म्याहून अधिक सैन्य हळू हळू दक्षिणेत गुप्त पणे उतरत होत.शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी राजांनी गादीवर पकड मजबूत केली होती.संभाजी लहान आहे,वय कमी आहे त्याला पकडून संपवायचं आणि दक्षिण जिंकून पूर्ण हिंदुस्थान आपल्या अमलात आणायचा म्हणून स्वतः औरंगजेब आपलं उरलं सुरेल सैन्य घेऊन दक्षिणेत उतरला.हा औरंगजेब मोठा धूर्त होता. तितकाच कपटी होता सत्तेसाठी त्यानं आपला बाप कैद करून भावांच्या कत्तली घडवल्या होत्या,मुलांना सुद्धा कैद केले होते.छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला त्याला भेटायला गेले तेव्हाच कैद करून त्यांना संपवायचा बेत त्यानी केला होता,पण दक्षिणेतून त्याला खबर मिळाली होती की शहाजी ची पत्नी शिवाजीची आई आपल्या सर्व फौजेसहित युद्ध करायला सज्ज आहे आणि वेळ पडली तर मराठे उत्तरेत आक्रमण करायला माग पुढं पाहणार नाही.त्यात शिवाजी च्या केसाला जरी धक्का लागला तरी अखंड हिंदुस्थानच राजकारण बदलणार होत.त्या मूळ औरंगजेब मनात असूनही शिवाजीराजांना कैद सोडून काहीच करू शकला न्हवता.
आता जिजाऊ न्हवत्या,ना शिवाजी राजे होते उरला होता मराठ्यांचा 23 वर्षाचा कोवळा राजा,तो आपल्या सैन्यापुढे किती वेळ टिकणार अस समजून औरंगजेब महाराष्ट्रात आला होता.मुघलांची छावणी पडली तर 5 मैलाचा परिसर व्यापून जायचा एवढी बलाढ्य सेना. लाखो सैन्य,लाखो जनावर,हजारो व तोफा,हत्ती,घोडे,बैल असंख्य.दक्षिणेत आलमगीर आला खरा पण इथं आल्यावर मात्र त्याच्या स्वप्नांचा पुरता चुराडा झाला होता.
क्षत्रिय कुळाच धगधगत,उसळणारं लालबुंद रक्त ज्यांच्या धमन्यांमधून वाऱ्याच्या वेगानं धावत होत ते बलशाली,काटक,चिवट मराठे,आपल्या कुस्तीच्या आखाड्यात कमावलेल्या बलदंड बाहुंमध्ये धार लावून तळपत्या पातीच्या समशेरी घेऊन सज्ज झाले.सरसेनापती हंबीरराव मोहिते,महलोजी बाबा घोरपडे यांच्या सारखी शांत डोक्याची आणि गनिमी काव्यात प्राविण्य असलेली जेष्ठ मंडळी तर संताजी घोरपडे,धनाजी जाधव,विठोजी चव्हाण,जोत्याजी केसरकर,कवी कलश यांच्या सारखी तरुण रक्ताची बेधुंद लढणारी गरम डोक्याची आणि रगील स्वभावाची वाघरं सोबत घेऊन संभाजी राजांनी औरंगजेबाची सेना सळो की पळो करून सोडली होती.
काळ वेळ धोक्याची होती.कधीही हल्ले, प्रतिहल्ले होत होते.आशा काळात संभाजी राजांची छावणी माणगांवच्या जवळच गांगवली परिसरात होती.शृंगारपूर हुन निघालेली येसूराणी साहेब यांची पालखी रायगडावर येणार होती.येसूबाई म्हणजे संभाजी राजांच्या पत्नी."श्री सखी राज्ञी जयती"अशा शिक्क्यासह संभाजी महाराजांच्या अनुपस्थितीत कारभार चालवणारी महान स्वराज्याची महाराणी.येशुराणीं ची तब्येत ठीक न्हवती,येसूबाई गरोदर होत्या,त्यातच त्यांना प्रसव वेदना जाणवू लागल्याने त्यांची पालखी गांगवली गावात उतरवली.गांगवली हे येसूबाईच आजोळ होतं त्यामुळे माणस आपलीच होती.
असह्य होणाऱ्या प्रसववेदना येशुराणींना इतिहासात घेऊन जात होत्या,असाच शत्रू पाठीवर होता,थोरले महाराज शहाजीराजे अदिलशाही सोबत झुंज देत होते.जिजाऊंना लोकाच्या घरी ठेऊन शहाजीराजांनी कर्नाटक स्वारी केली होती.असा आवतरला होता आणि आबासाहेब शिवाजी राजांचा जन्म झाला होता.येसूबाईंची अवस्था जिजाऊंच्या सारखी होती.क्रूर औरंग्या नावाचा शत्रू सहयाद्रीच्या वाघाला संभाजी राजांना संपवून स्वराज्य गिळायला तयार होता.पण येसूराणी खचली न्हवती शांत होती.मन घट्ट करत परिस्तितीला झुंज देत होती.राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संस्कारात आणि छत्र छायेत येसूबाई आणि संभाजी राजे लहानाचे मोठे झाले होते.शंभूराजे जर 'तळपती धारदार तलवार असतील तर त्या तलवारीला शांत करणारी म्यान' म्हणजे येसूराणी होत्या.दोघांची प्रीती आणि एकमेकाप्रती ओढ दृष्ट लागण्या सारखी होती.
शालिवाहन शके 1604 वार गुरुवार वैशाख वद्य सप्तमीचा म्हणजे 18 मे 1682 चा तो दिवस,सूर्य मावळतीकडं जातं होता.सूर्यास्ताच्या किरणांनी सारा आसमंत भगवा झाला होता.पूर्वेला कुठं तरी चंद्र आपलं ओझरत दर्शन देत हळूहळू वर सरकत होता.आशा प्रसंगी येसूबाईंच्या शरीरात प्रसव वेदनांचा अग्नी उफाळून आला होता.भयानक,असह्य वेदना सहन करत येसूबाईंच्या चेहऱ्यावर हास्य फुलवत बाळाचं रडक बोल कानी आलं आणि एकच आनंदाची बातमी चौफेर उधळली,बाळराज जन्माला आलं.एकच आनंदोत्सव साजरा होऊ लागला.स्वराज्याला युवराज आले होते.छत्रपती संभाजी राजांचा वारस आला होता.चंद्र सूर्याच्या उपस्थितीत जन्म झाला म्हणजे चंद्र सूर्य असेपर्यंत ज्यांची कीर्ती अजरामर राहिलं अस एक नवं चैतन्य जन्माला आल होत.शंभुराजांना तर आपले आबासाहेब पोटी आले असा भास होऊन त्यांनी त्या मुलाचं नाव शिवाजीराजे ठेवले. तो छोटासा शिवाजी रायगडावर हळूहळू मोठा होत होता.संभाजी राजे मुघली सेनेची दाणादान उडवत होते.येसूबाई आपल्या पुत्राला त्याच्या पूर्वजांच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगत त्याच्या मनात देव-देश आणि धर्माबद्धल आदर आणि प्रेम निर्माण करत होत्या.हा छोटासा युवराज आपल्या काकांसोबत राजाराम राजे यांच्या सोबत जास्त काळ असायचा.राजाराम त्या वेळी तरुण होते,देखणे रुबाबदार होते पण लहानपणापासून जबाबदारी अंगावर नसल्याने ते निवांत होते.दोघा चुलता पुतण्याला एकमेकांशिवाय करमत नसे.
काळाच कालचक्र फिरलं,एके दिवशी दृष्ट मुघली सैन्याने संगमेश्वरला एकट पडलेल्या संभाजी राजांना कैद करून अतिशय वेगाने बहादूरगड म्हणजे पेडगावच्या किल्ल्यावर औरंगजेबाच्या समोर हजर केलं.संभाजी राजांचा क्रूर पद्धतीने छळ करून त्यांची हत्या घडवली गेली.धर्मासाठी आणि स्वराज्यासाठी संभाजीराजांनी भीमा इंद्रायणी तीरी मरण पत्करलं पण ते शरण गेले नाही.संभाजी राज्यांच्या स्वाभिमानी रक्तानं ते तुळापूर आणि ती भीमा इंद्रायणी पवित्र झाली. तुळापूर म्हणजे पूर्वीच नागरगाव.त्या नागरगावच्या टेकडीवर असलेला नागरमल खंडोबा आजही नागरगावच नाव लक्षात आणून देतो.शहाजी राजे आणि मलिक अंबर याचा तळ पूर्वी या गावात पडला होता.मलिक अंबर च्या मनात आलं आपल्या हत्तीची तुला करावी.पण हत्तीची तुला कशी करायची यावर शहाजी राजांनी युक्ती शोधून तुला करून घेतली.म्हणून त्या गावाचं गाव तुळापूर ठेवलं.तिथं संगमेश्वर महादेवाचं मंदिर बांधले.तोच संगमेश्वर महादेव आज शंभूराज्यांच्या रक्ताच्या अभिषेकान पावन झाला होता.कठीण प्रसंगात क्षणाचा विलंब न लावता जुल्फिकारखान यान रायगडला वेढा दिला.असा वेढा की लाख प्रयत्न करून तो वेढा मराठयांना तोडता आला न्हवता. संभाजी राजांच्या शोकसागरात सारा मुलुख बुडालेला असताना रायगडला वेढा ह्या संकटाने अखंड महाराष्ट्र नव्हे पुरा दक्खन हादरला होता.रायगडावरच पूर्ण भोसले कुटुंब वेढ्यात अडकलं होत.सात वर्षाचा छोटासा बालशिवाजी आपल्या आईच्या कुशीत रडत रडत आपल्या बापाचा चेहरा आठवत होता.बापाचा सहवास जास्त लाभला न्हवता पण बापाची कमी मात्र त्याला आज जाणवत होती.
क्रमशः
✒️#मंगेश_गावडे पाटील
संदर्भ:शेडगावकर भोसले घराण्याची बखर
चिटणीसाची बखर
थोरले शाहू महाराज यांचे चरित्र

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...