बिऱ्या एका दमात इशाळगड चढून आला.पहाऱ्यावरील हशमांची पापणी लवायच्या आता बिऱ्या तिरागत गडात घुसला.तसं बिऱ्याला हटकनारंतरी होणं म्हणा.कारण बिऱ्याचा महिमा काय वर्णावा.बिऱ्या मंझी नुसत वादळ.संताजीराव घोरपड्यांच्या गोटातला अनं खास मर्जीतला.संताजींचा हेर खात्याचा प्रमुख.लहान पणापासून भाळवणीच्या मातीतला संताजीरावांचा खेळगडी बिऱ्याच्या बापा पासून बिऱ्याच घर घोरपड्यांच्या सेवेत हुतं.बिऱ्याचा बाप बी लय धाडशी.हत्यार चालवाया लय पठाईत.संगमेश्वरात शेख निजामा बरोबरच्या झुंजीत पडला.तवा पासून संताजीरावांनी बिऱ्याला कदी अंतर दिलं नाय.अनं बिऱ्या नी बी संताजीरावांच्या सेवेत कवा कसूर केली नाय.संताजीरावांचे डोळे अनं कान म्हंजी बिऱ्या.
एक-दोन ठिकाणी इचारपूस केल्यावर त्याला आपल्या धन्याचा ठेपा लागला.तसा बिऱ्या लांब डांगा टाकीत शिकलंखाण्या कडं निघाला.बिऱ्यानं सहज इचार केला
कि आपलं धनी अनं शिकलखाण्यात काय करत्यात
आता शिरून बगतुय तर संताजीराव दाम्या लव्हारा मोहरं जातीनं उभारून आपल्या खास दख्खनी माठाच्या धोप
तलवारीला शिकलं लाऊन घेत हुतं.शिकल लाऊन झाल्यावर दाम्यानं त्याला घासून-पुसून स्वच्छ केल्यावर त्याची झळाळी समद्याच्या नजरत भरत हुती. खास कर्नाटक प्रांतातील कोप्पळ गावच्या कारागीरा कडून संताजींनी त्या हत्याराच्या पात्यावर उत्कृष्ट नमुन्याच नक्षीकाम करून घेतलं होतं.त्याची मूठ ही नखा पासून ते तोटी पर्यंत सोन्यानं मडवली होती.तिच्या परज,कटोरी आणि गजात उत्कृष्ट अशे मौल्यवान हिरे,मानकं जडवले होते.लाल रंगाची मखमली गादी आणि जरीकोऱ्यांनी गुंफून घेतलेली मुसकल ही नजरेत भरत होती.सगळं टाकटीक झाल्यावर दाम्यानं अदबीनं ते हत्यार संताजींच्या मोहरं धरलं.मनाजोगी धार लागली का नाय हे पारखून संताजींनी आपला उजवा अंगटा सर्रकन त्या धारेवर ओढला.त्या हत्यारांला रक्त अभिषेकाचा मान देऊन हत्यार म्यांबध केलं अनं कपाळी भिडवून म्यांनाचे वाद कमरे भोवती आवळे.
त्या शिकलं लावलेल्या हत्यारा कडं बघीत बिऱ्याच्या डोसक्यात सहज इचार आला.काय नामी हत्यार हाय
आजपातूर कित्येक दुष्मनांच्या गरधणी या हत्यारानं उतरवल्या असतील.कित्येकांची छाताडं फाडीत उरात
आरपार झालं असलं.हर एक लढाऊ आसामीच्या भाग्यात नियतीनं दोन गाठी लिव्हलेल्या असत्यात.पहिली ती कमरंच्या हत्यारा संग मारलेली अनं दुसरी ती भोल्यावर मारलेली.पण आमच्या धन्याचा पहिल्या गाठीवर लय जीव.सदा हायच ते हत्यार उराला चिकटलेलं
( पण बिऱ्याला हे माहीत नव्हतं.कि पहिली गाठ ही नियतीनं सोडवली ती शेवटी कारखेलच्या डोहात.अंघोळ
करता वेळी.म्हणूनच घात झाला.नाहीतर इतिहास अजून मोठा रंजक लिहिला गेला असता..)
कुणीतरी खाखरल्यागत झाल्यावर बिऱ्यानं इचारांची कबुतरं हाणून लावली अनं बिऱ्या भानावर आला.
संताजीरावांणी आपला भक्कम हात बिऱ्याच्या खांद्यावर टाकला अनं राहत्या वाड्याची वाट धरली तसा बिऱ्या दबक्या आवाजात आणलेली खबर आपल्या धन्याला पेश करू लागला.तशी संताजीरावांची कळी खुल्ली.कारण खबर बी तशी नामी हुती.बिऱ्या दहा-पंधरा दिस साताऱ्याच्या इलाख्यात हुता.रस्तुमखानाच्या छावणीची खडानखडा माहिती बिऱ्यानं उचलली हुती.त्याला बी हे माहीत हुतं.आपला धन्याला खबर एकदम पक्की लागते.कारण एकवार डावात उतरलं कि कुस्ती कशी चीतपटच झाली पाहिजे असा शिरास्त हुता.समदं बायजवार कथन केल्यावर.संताजीरावांनी जरुरी त्या सूचना केल्या तेवढ्या वाडाआला.आपल्या
उजव्या हाताला विटा डाव्या हाती घेत कमरशेल्यात खवले लकुटा बिऱ्यानं हळूच उपसला अनं संताजीरावांच्या हाती देत बहिर्जीमालकांचा हाय कालच्या वारी जिंजीसनं आला म्हणत हाती दिला.जातु म्या म्हणत मुजरा करून बिऱ्या निघाला.तोच संताजींनी त्याला थांबवला.आधी घास भर खा आमच्या बरोबर अनं मंगच गड उत्तर अशी आज्ञा केली.जेवत जेवत जुजबी बोलणं झालं आणि शेवटी वर्णाच्या आमटीच वाढग भातावर रिकाम करीत संताजींनी हाळूच बिऱ्या सगीतलं..बिरुबा साताऱ,राजगडा,प्रतापगड अनं जावळी पातूरचा इलाख्या आपल्या नजरंच्या टप्यात ठीउ.हाती असलेला माणूस मेळ त्या भागात पेरून ठीउ.लवकरच आपल्या तिकडे उतरायचं हाय.मोठ्या दाबजोर मोहिमेचा मनसुभा दिसतुय धन्याचा असा इचार करीत.. व्हय जी म्हणत बिऱ्या ताटावरून उठला.
ऊनं कलतीला लागल्यावर बिऱ्या गडउतरणीला लागला.बिऱ्या संगं त्याच्या पथकातील पाच-पंचवीस तरणा गडी गडाच्या पायत्याला बिऱ्याची वाट बघत हुता.बिऱ्याच पथक म्हंजी समंध गडी अगदी जीवातलं हुतं.समंधी पोरं घरातलीच.ह्या मागचा हेतू म्हंजी खबर फूटता कामानय.कारण संताजीराव घरोपडे म्हणलं की जोखीम आलीच.अनं जोखीम म्हणल्यावर खबर पक्की आली.अनं अशा जोखमीच्या कामाची जर खबर फुटायची म्हणाल तर मोठी हानी होण्याचा संभव त्या मुळं बिऱ्यानंसमदी माणसं पारखून आपल्या हेर खात्यात भरती केली हुती.त्या पंचवीस जणांपैकी दहा-बार जणांना त्यानं विशाळगड ते साताऱ्या पातूर धावनीची वाट पक्की करून हुशार राहण्यास सगीतलं.त्यांना त्यांच्या कामावर पिटाळून बिऱ्यानी उरलेल्या हशमांना बरोबर मलकापूरची
छावणी गाटायसाठी घोडयाला टाच दिली.
त्या काळी मलकापूरात खास छत्रपती संभाजी महाराजांच्या सांगण्यावरून कवी कुलेशांनी नऊ-दहा हजार जातवान घोड्यांची पागा उठवली होती.देशोदेशीचे जातवान जनावरं छत्रपतींनी मोठ्या आवडीनं जतन केली होती.अरबी,मारवाड,पंजाबी,काठेवाड या आणि अशा विविध जातीच्या जनावरं त्या पागेत ठाणबद्ध होती.याच
ठिकाणी मराठयांची मुख्य छावणी होती.संताजीराव विशाळगडी असल्यानं छावणीची मुख्य जबाबदारी ही राणोजी घोरपडे आणि शंभुसिंग जाधवराव यांच्या वर होती.
इकडं विशाळगडी सकाळच्या वकती रामचंद्रपंतांच्या वाड्यावर पंतांनी बैठकिच आयोजन केलं हुती.सर्वांना
निरोप धाडण्याआले.पंतांची आपल्या खासगीतले कारभारी रंगाबापूंना खास संताजीरावांना पाचारण करण्यासाठी धाडलं.शनिवार असल्यानं संताजीराव मारुतीच्या मंदिरात अभिषेक पूजा करून नुकतेच घुमटी बाहेर पडले होते.बापूंनी वाकून नमस्कार केला आणि पंतांची वर्दी दिली.काकांनी दिलेला गुळ-खोबऱ्याचा प्रसाद ओठाआड केला अनं रखमाजी मोहिते,सुभानजी काटे,जावजी पारटे या आसामींना बरोबरीनं घेत,आपल्या दहा पट्टेकरी रक्षकांच्या घेऱ्यात बापुंबरोबर हलकेचं बोलत पंतांच्या वाड्याकडे निघाले.
वाडा आला.पहाऱ्या वरील हशमांचे मुजरे आपले करीत
संताजीराव बैठक खोलीत प्रवेश करते झाले.सर्वांना राम राम करीत अनं सर्वांचे स्वीकारत संताजीराव बैठकीत बसले.धनसिंगराव जाधव,रामचंद्रपंत अमात्य,शंकराजी नारायण-सचिव,मानाजी मोरे,विठोजी चव्हाण आणि इतर सरदार मंडळी जमली होती.इकडची-तिकडची चर्चा झाल्यावर रामचंद्रपंतांनी मुख मुद्दा उपस्थित केला.की
राजाराम महाराजांनी कर्नाटक प्रांतातून केशवपंत पिगळ्यां सोबत भला मोठा फौज फाटा आणि एक लक्ष
होनांचा खजिना पाठवत असल्याचं पत्र आलं.तेवड्यात संताजीराव जरा नाराजींच्या स्वारात म्हणाले.पंत फौजेची पैशाअडक्याची मदत आपण महाराजांकडे पाठवणार होतो.त्याऐवजी तिकडचा मामला थाटून त्यांनीच उपराळा
केला.हे चांगलं झालं नाही.संताजींच्या बोलण्यात तथ्य आहे हे जमलेले सरदार नाकारू शकत नव्हे.
शंकराजी नारायण सचिवांनी पुण्यात ठाण मांडून बसलेल्या गाजीउद्दीन खानाचा मुद्दा समोर पेश केला.
त्यांचं म्हणणं होतं की खानानं पुणे ते राजगडपातूरचा मुलूख टाचेखाली आणलेला आहे.तरी आधी खानाचा काटा उपटला तर बर अस सचिवांच मत पडलं. प्रतापगड,वाईच्या गडकऱ्यांची अनं सारदारांची पत्र होती की मोठा जमाव करून या प्रांती उतरावं म्हणून.सर्वच गोष्टिंचा खल झाला.शिखर- शिंगणापूरच्या ठिकाणी पूर्वी थोरल्या स्वामींनी भविष्याचा वेद घेऊन एक मोठा लष्करी तळ उभारण्याचा विचार केला होता.स्वामींचा तोच विचार पुढे नेहून तिथं लष्करी तळ उभारण्याचं एकमुखाने सहमत झाले.
तेवढ्यात रंगाबापू हाती लखोटा घेऊन खोलीत प्रवेश करते झाले.हंबीरराव मोहित्यांचा खलती आहे म्हणत रामचंद्रपंतांच्या हाती दिला.पंतांनी खलिता उगडून एकादमात खलिता वाचून कडला.आणि खाली ठेवला.
काय म्हत्यात हंबीरराव धनसिंगरावांनी सहज पंतांना प्रश्न केला.रावांनी लवकरात लवकर साताऱ्याच्या किल्ल्या भोवताली पडलेला खानाचा शह मारून काढावा म्हणून लिहल आहे.आता बैठकीत परत कुणाच्या इलाख्यात फौजेबंद होऊन उतरायचं याच्यावर खल सुरू झाला.कुणीही नाराज नको म्हणून संताजींनी आणि धनसिंगरावांनी मध्य काढला.संताजीराव सर्वांना उद्देशून म्हणलं.आधी हंबीररावांना मोकळ करून. पंत सचिवांच्या मावळखोऱ्यात उतरून गाजीउद्दीन खानाचा पुरता नक्षा उतरवू मग जवळी आणि वाई इलाखा पटाखाली घेऊ.या विचाराला सर्वांनी एकमुखानं संमती दर्शवली.
साताऱ्याचा पट आधीच संताजींनी मांडून ठेवला होता याची माहिती फक्त धनसिंगरावांच्या कानावर घातली होती.संताजीरावांनी बिऱ्यानं सांगितलेली हकीकत अनं
स्वतः बांधलेल्या अंदाजावर स्वतःच्या डोक्यात साताऱ्याची लढाई आधी खेळून बघीतली होती.त्याच्या
योजनेप्रमाणे विजय हा नक्कीच होता म्हणूनच बैठकीत त्यांनी पहिली चाल ही साताऱ्यावरच करू अस सगीतलं
आणि मोगली सैन्य हे मोठ्या प्रमाणावर जिंजीच्या इलाख्यात असल्यामुळं सध्यातरी पुण्याच्या गाजीद्दीन खान अनं साताराच्या रुस्तुमखानाच्या मदतीला कुणीही येणार नव्हतं याची त्यांना खात्री होती.आणि त्यामुळं संताजींनी ही तोड काढली होती.
रामचंद्रपंत अमात्यांचा चेहरा या निर्णयानंतर थोडा उतरला पण त्याला इलाज नव्हता.कारण पंतांची आणि सचिवांची भिस्त ही धनसिंगराव अनं संताजीरावांवरच
होती.रामचंद्रपंतांना हे माहीत होतं की नुसतं हुकूमतपन्हा
असून चालत नाही आणि नुसत्या हुकुमांचा हमामा खेळून
विजयाची हौस पुरी होत नाही.त्यासाठी एक विचारानं तजविज केल्या पाहिजेत.संताजींनी दाखवलेली लष्करी चमक पंतांच्या नजरे भरली होती.मोगलांवर मात करणारे
त्यांचे हुकुमी डावपेच,शत्रूला मैदानात खेचून त्याच्या फौजा बुडवण्याचा त्यांचा करामती करीना स्वराज्याला पुन्हा नवसंजीवनी देईल हा विश्वास त्यांना वाटत.त्यांच्या
दमदार,बलशाली बाहुत फत्ते करण्याची ताकद होती. ढगात वीज कडाडावी तसे त्यांनी मिळवलेले विजय पंतांना प्रभावीत करून गेले.त्यामुळेच पंत गप्प होते.
जोतिबाला साक्षी ठेवून सर्वांनी गुलाल कपाळी लावला
पंतांनी सर्व मानकऱ्यांना निरोपाचे विडे दिले.सर्वांनी
आपल्या पदरी असलेला जमाव घेऊन पाटणखोऱ्यात
शुक्रवारच्या रातीला जमण्याची कडक समज धनसिंगरावांनी समद्यासनी दिली.अनं बैठक उठली.
दुसऱ्या दिवशी दिवस फुटीला संताजीराव गड उतरले
गडाच्या पायत्याला दोनशे जिनकस घोडा उभा होता.आपल्या आवडत्या आबलक मारवाड जातीच्या
नरावर मांड जमवून संताजीरावांनी इशारतीसाठी आपला
हातपंज्या उचला तस त्या दोनशे घोडाईतांनी संताजीरावांना मध्यभागी घेऊन भरधाव वेग पकडला.
मलकापूरच्या दिशेनं ती जनावरं शेपटीचा गोंडा उडवत उधळत होती....!!
लेखन समाप्त.
पुढील भाग नंतर...!!
प्रस्तुत लेखन सेवा सरसेनापती संताजी घोरपड्यांच्या चरणी अर्पण....!!
(इंद्रजीत खोरे)
No comments:
Post a Comment