विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 23 March 2022

सुभेदार तानाजी मालुसरे....!! भाग दुसरा

 

सुभेदार तानाजी मालुसरे....!!




असा धारकरी होणे नाही..!!
Tanaji the great worrir
भाग दुसरा
पोस्त साम्म्भर ::इंद्रजीत खोरे
चार वर्षांच्या दिर्घावधीनंतर.म्हणजेच विश्रांतीनंतर पुन्हा एकदा छत्रपतींनी मोगली मुलखावर आपल्या भवानी
तलवारीचं टोक रोखलं होतं.त्यासाठी सर्वा सरदारांना गड दाखल होण्याची आज्ञा देण्यात आली होती.(इ.१६७० जानेवारी प्रारंभ ).
आज राजगडाची सदर मानकऱ्यांनी सजली होती.विविध रंगी पोशाख करून, आभूषणे परिधान करून हर एक सरदार आसामी सदरेसी हजर होता.पासलकर देशमुख, मरळ देशमुख,शिळमकर देशमुख,कोंडे देशमुख,पायगुडे देशमुख,शितोळे देशमुख,जेधे देशमुख,खोपडे देशमुख
बांदल देशमुख,ढमाले देशमुख,धुमाल देशमुख, थोपटे, सरकार ,कोकाटेसरकार,बलकवडे सरकार,गोळेसरकार
सणस,काकडे सरकार व इतर न्यात-अज्ञात मानकरी असे सर्वच हजर झाले होते.छत्रपतींच आगमन होताच सगळी
सदर लपकन कमरेत झुकली.अदब मुजरे रुजू झाले.
छत्रपतींनी बैठक घेताच आपला हातपंजा उचला.तशी सगळी मंडळी आसनस्थ झाली.सरनौबत प्रतापराव गुजर
मोरोपंत,अण्णाजी,बाळाजी,येसाजी कंक,निळोपंत व इतर मंडळी अदब धरून उभे राहिले.
समोर उपस्थित असलेल्या आपल्या जाण कुर्बान मावळी सारदारांकडे छत्रपतींनी अभिमानाची नजर फिरवली.एक
क्षण छत्रपतींच्या मनात विचारांचा फेर येऊन गेला की शिगो-शिगी भरून जरी आपण ही उभी दवलत या समोर असलेल्या हर एक आसामींवर उधळली तरी ती थिटीच आहे.असा मर्दना मिळणे म्हणजे जगदंबेची कृपाच..!!
राज्यांनी बाळाजी आवजींना नजर देताच पंत अदबीनं पुढे झाले.आणि सदरेचा मायना खुला केला.
" आई जगदंबेच्या कृपेने व मातु:श्री आऊसाहेबांचे कृपाप्रसादे करोन खासा सरकार स्वामींनी मोगलाई प्रदेश व मोगलाई गडकोट फेर हस्तक करण्याकारणे मोठा मानसुभा मनी आखला आहे.मोगली प्रदेश अहमदनगर,
बागलाण,वऱ्हाड,खानदेश,नाशिक ऐशी मोहिमा मुकर केल्या आहेत.शेलका पाऊलोक,घोडाईत आपल्या दीमतीस देत आहोत.घोडदळाचे सरनोबत मा.श्री प्रतापरावजी गुजर व पाऊलोक सरनोबत येसाजीराव कंक यांच्या दीमतीस ...!! प्रत्येक मानकरी सरदारांचे नावे
घेण्यात सुरवात झाली.हरएक सरदारास आपल्या कमगिऱ्या नेमून देण्यात आल्या.प्रतापराव गुजर,येसाजी कंक,मोरोपंत पिंगळे व इतर सरदारांच्या बरोबरीनं ही जमलेली मंडळी आपल्या जमावणीशी मोहीमे साठी उतरणार होती.
प्रत्येकाला छत्रपतींने निरोपांचे विडे दिले.फक्त एकच मानाचा विडा छत्रपतींनी मुदामून राखून ठेवला होता आणि तो म्हणजे कोंढाण्याचा.सदरेचे कामकाज उरकताच छत्रपती उठले.जातानाच त्यांनी तानाजीरावांना संध्याकाळी बालकिल्यावर भेटण्याची सूचना केली.सर्व मंडळी आता गड उतरू लागली.सगळी सदर मोकळी झाली.दिवस मावळतीकडे झुकला.सुभेदार छत्रपतींसमोर
हजर झाले.मुजरा करून अदबीनं उभे राहिले.सुभेदारांना
बघताच छत्रपतींचा जीव बालकिल्या एवढा झाला. छत्रपतींनी सहज म्हणून सवाल केला.काय ताना झाली का कोंढाण्याची तयारी..? व्हय जी. सूर्याजीला इकडं येतानाच कर्यात धाडलाय म्या..!! जेधे अनं शितोळ्यांचा
जमाव बी घेतलाय दीमतीस.सगळा मिळून पाचशेचा जमाव हाय.जमावाचा आकडा कानी पडताच राजे विचारात पडले.राजे उतरले अर ताना पाचशे काफी होतील का..!! व्हय जी..!!मोठ्या आत्मविश्वासनं सुभेदारांनी उत्तर दिलं.सगळ्या बारीकसारीक गोष्टी सुभेदारांनी राजांच्या कानी घातल्या.छत्रपतींनी पुन्हा सवाल केला.यलगाराचा दिवस कोणता ठरवलाय..?
आज मंगळवार हाय तर शुक्रवारीच्या रातीला बेत करावा म्हतुय म्या.( माघ वद्य नवमी शुक्रवार दि ४ फेब्रुवारी १६७० ) ही रात्र मुकर्र करण्यात आली.
त्यादिवशी सुभेदारांनी राजाच्या बरोबर भोजन केलं अनं
गडावरच मुक्काम केला.दुसऱ्या दिवशी जिजाऊआई साहेबांची भेट घेऊन ते राजांच्या भेटला गेले.नित्य पूजेच्या शिवलिंगावर बेल फुले वाहून राजे नुकतेच उठते झाले होते त्यावड्यात सुभेदार दालनात प्रवेश करते झाले
या सुभेदार..!! म्हणत राजांनी सहज आवाज दिला. मुजऱ्यासाठी सुभेदार वाकणार तेवड्यात राजांनी त्यांना थोपवून धरलं आणि थेट त्यांनी उरभेट घेतली.सुभेदारांना
अगदी भरून आलं.कारण छत्रपती,दोस्त,सखा-सोबती,
सुभेदार याही पलीकडचं त्या दोघांनच नात होतं कुणाला
न कळून येणार.राजांनी चांदीच्या ताटात ठेवलेली नित्य वापराची आपली चौष्ठ कवड्याची आई भवानीची माळ
सुभेदारांच्या गळ्यात घातली.आपल्या हातातील सोन्याची सलकडी कडून ती सुभेदारांच्या हाती चढवली.
सुभेदारांना निरोप देताच राजांच्या उर भरून आला.
सुभेदारांनकडे बघत राजे म्हणाले ताना यश देणारी जगदंबा थोर आहे.स्वराज्याचा सर्व भार तिच्याच शिरावर आहे.तीच सर्व मनोरत पूर्ण करेल.फत्ते होताच आम्हाला
सांगावा धाडा.आम्ही जातीनं येऊ गडावर.या..!!जरा जपून असा..!! सुभेदारांनी राजांना मुजरा करून गड सोडला.फक्त त्या जगदंबेलाच ही कल्पना होती.की ही भेट शेवटची.हा स्वराज्याला आणि राजांना केलेला शेवटचा मुजरा होता.म्हणजेच अखेरचा हा तुला दंडवत..!!
सुभेदारांनी गड उतरून कानदखोऱ्याची वाट धरली.
लगोलग सूर्याजीला निरोप धाडला.कर्यातून सूर्याजीराव आले.मंडळी जमली खल करून सूर्याजीला सुभेदारांनी कल्याण या परिसरात तीनशे लोक घेऊन दबाधरून बसण्याच सांगण्यात आलं.सुभेदार खामगाव मावळच्या
बेचक्यात उतरले.तोपर्यंत शुक्रवारचा दिवस उजाडला होता.पंधरा-वीस खबरगिरांचं पथक आता सूर्याजीराव आणि सुभेदारांनच्या मध्ये समनव्य राखून होतं.हर घडीला हे हशम ये-जा करणार होते.खास गड चडणी साठी लागणारी पाच-पन्नास तरणीभांड पोरं सुभेदारांनच्या समोर उभा होती.त्यांचा मोरख्या म्हणजे
रामा कोळी.सुभेदारांना बघताच रामानं वाकून जुहार केला.सुभेदारांनी रामाला सगळं समजून सगीतलं.दिवस मावळताच ही पोरं गडाच्या घेऱ्यात घुसणार होती.
कोंढाणा चारही बाजूंनी बंदिस्त होता.फक्त डोणागिरीचा कड्या कडची बाजू जरा मोकळी होती.सुभेदारांनी नेमकी ही जागा हेरली होती.कड्याच्या बरोबर खाली अगदी दाट रान माजल होतं.भरपुर झाड-झुडपं उठली होती.त्यामुळं
इत कुणाच लक्ष असणार नव्हतं.आणि त्यात घेरा आणि मेट आधीच सुर्यजींनी गुप्त रीत्या काबीज केला होता.
दिवस मावळताच रामा कोळ्याला सुभेदारांनी निघण्याचा
हुकूम केला.तसा रामा अनं बरोबरीचे हशम निघून गेले.
खबरगीरापाशी सुभेदारांनी सुर्यजींनसाठी निरोप पाठवला.की आम्ही वर जाताच आधी कल्याण दरवाजा
काबीज करू.इशारत होताच वर येणे.इकडं रामा पार कड्याला भिडला होता.खंडोबाच्या नावानं एक मुठ बंडारा त्यानं आधी उधळला.दुसरी मुट त्यांनी कातळ देवतेला व्हायली.बघत बघत दहा-बारा जण कड्याला चिकटली.सांधी-कपारीत हात घालून ती वरती सरकू लागली.
अंधार पडताच रामा कोळ्यानं निरोप धाडला. सुभेदारही आपला दोनशेचा जमाव घेऊन जलद गतीने ठरलेल्या ठिकाणी आले.रामानं आपलं काम चोक बजावलं होतं.वीस-पंचवीस दोर त्यानी वर लोखंडी मेखा मारून जाम केले होते.रामा आणि बरोबरचे हशम जसे बाजूला झाले तस सुभेदारांनी दोराला हात लावला.दोराला जोरात हिसका दिला.उमराठ्याचा मारुतीला स्मृन त्यांनी कड्याला आपला डावा पाय लावला आणि वर निघाले.बघत बघत दोनशे लोकं सपाटीवर आले आणि दम खाऊन जरा हुशार झाले.थोड्यावेळेतच दोनशे तलवारी आपल्या म्यांनातून सर्रकन बाहेर पडल्या.आता सुभेदारांनी शंभर शंभरच्या दोन फळ्या केल्या.एक फळी कल्याण दरवाजा काबीज करून तो उघडणार होता.आणि दुसरी फळी किल्ल्यावरून जर कोणी दरवाज्याच्या दिशेनं आला तर त्याला थोपणार होते.इकडं सूर्याजी,शेलार मामा आणि तीनशेचा जमाव जवळ जवळ गडाची निम्ही चढण चढून कल्याण दरवाज्या पाशी म्हणजे हाकेच्या अंतरावर येऊन कड्याला चिकटून काळ्या घोगड्या पांघरून दबा धरून बसले होते.
सुभेदारांनी आधीच सर्वाना घाई करून कापाकापी करण्याची सूचना केली होती.सुभेदारांनी वाट आढवताच शंभर मावळा दरवाज्याकडे धावला.मुदामून कुणीही हर हर महादेवची घोषणा दिली नाही.मावळ्यांच्या तलवारींनी आता भलताच जोर पकडला होता.दरवाज्यापाशी पोहचेपर्यंत मावळ्यांनी सत्तर-ऐंशी राजपुती मुडदा पाडला होता.आता मात्र कालव्याला सुरवात झाली होती.दरवाजा उधडताच एका मावळ्यान नरड्याची घाटी फुलवली.हर हर महादेवचा जय घोष केला...!! ती सुर्यजींसाठी खुणेची हारकी होती.जय घोष कानी पडताच सूर्याजीं सकट सर्वांनी पांघरलेल्या घोगड्या फेकून दिल्या आणि दरवाजा गाठला.दरवाजा काबीज होताच सुभेदारांनी गडावर चाल केली.मराठ्यांच्या आरोळ्यानी आता सगळा गड हादरून गेला.दऱ्याखोऱ्यातून हर हर महादेवचा प्रतिध्वनी उमटत होते.
आता गडावर राजपुतांची धावाधाव सुरू झाली.मशाली पेटल्या गेल्या.तोपर्यंत सुर्यजींचा जमाव सुभेदारांच्या जमावाला येऊन चिकटला होता.मराठ्यांचा अजून जोर वाढला.राजपुती मुडदे पडतच होते.तोपर्यंत निमाअर्धा किल्ला मराठ्यांनी जेर केला होता.चार-पाचशे राजपूत
मराठ्यांनी कायमचे झोपवले होते.उदय भान गर्दीत उतरला होता.आता लढाईचा केंद्र बिंदू कोंढाणेश्वराच्या
मंदिर परिसराकडे सरखला होता.आरोळ्यानी वातावरण भरून गेलं होतं.मराठ्यांच्या समशेरी निर्धाराने वेड्यापिश्या होऊन विजेगत फिरत होत्या.शत्रू सैन्य अफाट असूनही मावळ्यांच्या तलवारीच्या धारेखाली राजपुती मुंडकी सपासप उडत होती.
राजगडी बालकिल्यावरून राजे मात्र चिंतातुर होऊन
एक सारखे कोंढाण्यावर लक्ष ठेऊन होते.त्यांना चिंता होती ती सुभेदारांनची अनं मावळ्यांनची.ताना आहे म्हणल्यावर फत्ते होणारच यात तिळमात्र शंका नव्हती.
पण राजांच मन राजांना स्वस्त बसू देत नव्हतं.खुणेच्या
ज्वाला कदी आकाशी भिडतात असं राजांना झालं होतं
अधून मधून जिजाऊआईसाहेब देखील राजांपाशी येऊन जात.जणू काय बारा मावळ आणि उभा राजगड हे कोंढाण्यावर लक्ष ठेवूनच होते.
आता लढाई ऐन रंगात आली होती.मोगलशाहीची आणि शिवशाहीची कोंढाण्यासाठी अटीतटीची झुंज लागली होती.राजपुतांनी सुद्धा उत्तरेत बऱ्याच लढाया केल्या असतील.पण मराठ्यांच्या तलवारीचे पाणी आज ते प्रथमच चाकत होते.आज प्रथमच उदय भान सुभेदारांन
समोर उभा टाकला होता.उदय भानला बघताच सुभेदार चवताळून उठले.उंच उडी घेत सुभेदारांनी पहिला वार उतरवला.तो उदय भानानं आपल्या ढाली वर घेतला.
अटीतटीचा कडाका सुरू झाला.धरणी हादरून उठली.
जणू दोन प्रचंड गिरीशिखरे एकमेकांवर कडाडून कोसळलीं.तलवारींचे भयंकर घाव एकमेकांवर थडकूं लागले.
दोघेहि पुरते पेटले होते.प्रत्येक घावा सरशी ढाल तलवारीतून ठिणग्या पडत होत्या.एकाला गड घ्यायचा होता.तर दुसऱ्याला तो घेऊं द्यायचा नव्हता.पण तेवड्यात
घात झाला.उदय भानाचा वरमी घाव सुभेदारांच्या ढालीवर बसला.घाव बसताशनीच ढाल निखली..!
कवच निखळं..! ढाल तुटलेली बघताच उदय भानाला
अवसान चढलं.त्यानी एका पाटोपाट एक घाव घालण्यास सुरवात केली.अशा बाक्या प्रसंगी दुसरी ढाल कोठून येणार.त्यावेळीच सुभेदारांनी प्रसंग ओळखला.आपली
घटिका भरली म्हणून.शरण जाणार तो वीरपुरुष नव्हता.आपण तर जाणार आहोतच..!!पण ह्याला पण ठेवायचा नाही..!!या निर्धारानं सुभेदारांनी डोईचा पाघोटा काडून आपल्या डाव्या हाती गुंडाळून घेतला..!! दोघेही
एकमेकांवर तुटून पडले.दोघांच्याही शरीरावर आता जखमांना जागा उरली नव्हती.जखमांमुळे सुभेदारांना ग्लानी येऊ लागली होती.दोघेही योद्धे मरणाच्या दारात
उभे होते.तेवड्यात सुभेदारांचा एक वरमी घाव उदय भानाच्या छातीवर बसला.तसा तो कोसळला.उदय भानाला पाडल्याचं समाधान सुभेदारांच्या चेहऱ्यावर दिसत होतं.पण सुभेदारांची शुद्ध आता हरपू लागली होती
दमसास घेण्यासाठी म्हणून सुभेदार खाली बसले खरे
पण अखेरची घटिका डळमळली.आता स्वाशाची गती मंद होऊ लागली.अधूनमधून ते डोळे उघडून राजगडाकडे बघ.एका मावळ्यानं येऊ सुभेदारांच्या डोक्या खाली आपली मांडी दिली.पण सुभेदार कदी शेवटच्या प्रवासाला निघून गेले हे त्या मावळ्याला पण कळालं नाही.
सुभेदार पडल्याचं कळताच मावळे हबकले.मावळ्यांचा जोश जागच्याजागीच जिरला.एक क्षणासाठी तलवारीची
खणाखणी थांबली.पण सूर्याजी पुढे झालेत.त्यांनी मावळ्यांना ओरडून सगीतलं अर ताना पडला म्हणून काय झालं...!! राजांच्या रूपानं एक ताना अजून जिवंत हाय..!! लढा माझ्या वाघांनु..!! बोला हर हर महादेव..!!
तस म्हणताच पुन्हा मावळे पेटून उठले.आता मात्र मावळ्यांनी राजपुतांची रासच लावली.उदय भान पडल्याचंही राजपुतांना कल्पना आली.आता त्यांची पळापळ उठली.जे मावळ्यांना गवसले ते मेले.हजार-बाराशे राजपूत कामी आला.काही जण पुणे दरवाजून निसटले.दोन-एकशे शरण आले.शे-सव्वाशे मावळे कामी
आले होते.
रणचंडी प्रसन्न झाली होती.पण कित्येक बळी तिने घेतले होते.राजांचा अनमोल हिरा तिन्ह गिळकृत केला होता.
गड फत्ते झाला होता.राजांना इशारा म्हणून सुर्यजींनी
गंजीखाना पेटवण्याचा हुकूम दिला.राजगडी खबर धाडण्यात आली.पहाटेच्या प्रहरी जासूद राजगडी हजर झाला.राजांसमोर त्याला हजर करण्यात आलं.
जासुदान जुबानी बातमी पेश केली.
" तान्हाजी मालुसरे यांनी मोठे युद्ध केले.उदेभान किल्लेदार यासी मारिलें आणि तान्हाजी मालुसरेही पडले."
हि खबर कानी पडताच राजांचे डोळे भरून आले.
मोरोपंतांना करडी आज्ञा झाली.पंत आम्हाला आताच्या आता निघणे आहे.आम्ही कोंढाण्यावर जाणार आहोत.
हजारभर घोडा कोंढण्याच्या पायत्याला दाखल झाला.
राजांना कशाचेच भान राहिले नव्हते.त्यांना ओढ होती ती
त्यांच्या प्राणप्रिय तानाची.घोड्यावरून खाली उतरताच राजे पाई गड चढू लागले.पालखी आणि सोबतीचे भोई
हे बाजूलाच होते.पण राजांना आपल्याच विचारात गड
चडणीला लागले.कल्याण दरवाजा येताच रात्रीच्या दंगलीच्या खाणाखुणा स्पष्ट दिसत होत्या.सगळी फरसबंदी नुसती रक्तानं माकली होती.दरवाज्या पासून ते अमृतेश्वराच्या मंदिरापर्यंत खस्त झालेल्या राजपूत हशमांचा नुसता खच पडला होता.जिकडे बघावे तिकडे
ती समर भूमी लालेलाल झाली होती.
गडावर सगीलीकडे शांतता पसरली होती.प्रथम सूर्याजी
राजांच्या सामने आले.सुर्यजींना बघताच राजांनी फक्त
ताना एवढेच शब्द उचारले.जिथे सुभेदारांचा देह ठेवण्यात आला होता तिथे सुर्यजी राजांना घेऊन आले.एक बुलंद तोफ थंडावली होती.राजांचा सखा सोबती,लहानपणीचा
खेळ गडी,नजाणो राजांबरोबर कित्येक मोहिमांनमध्ये
सहभागी असलेला यार दोस्त आज एकदम शांत होता.
सुभेदारांना बघताच राजांना आपली आसवे आवरणे कटीन झाले.भरल्या डोळ्यांनीच राजांनी सुभेदारांचे
अंतिम दर्शन घेतले.राजांनी स्वतःच्या कमरेचा दुशेला सोडून तो सुभेदारांवर पांघरला.सुर्यजींचे त्यांनी सांत्वन केले.सबुरीचे चार शब्द सांगून त्यांना ढालकाठी बुरुजावर
घेऊन गेले आणि सुर्यजींच्या हस्ते त्यांनी गडावर पुन्हा
भगवा ध्वज फडकावला....!!
लेखन समाप्त.
प्रस्तुत लेखन सेवा सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या चरणी अर्पण करतो.या वीर पुरुषाला मानाचा मुजरा..!!
।। जय जिजाऊ ।।
।। जय शिवराय ।।
। जय रौद्र शंभू ।।
( इंद्रजीत खोरे )
तमाम शिवभक्तांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...