पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील जगताप पिंपळे या गावात सयाजीराव गायकवाडांचे विश्वासू सरदार जगताप यांची अभेद्य गढी उभी आहे. गढीची तटबंदी, बुरूज प्रवेशद्वार आजही मजबूत स्थितीत उभे आहे. प्रवेशद्वार भव्य आहे आणि त्यावर कमलपुष्प कोरलेले आहे. गढीत जाण्यासाठी दोन प्रवेशद्वार आहे. गढीच्या आत दोन भाग केलेले दिसतात. अर्धा भागात पुर्वीचा दुमजली वाडा आहे आणि उरलेल्या भागात पडझड झालेली दिसते. गढीच्या तटबंदीवर जाण्यासाठी पायरीमार्ग आणि संपूर्ण तटबंदीवर गढीला फेरी मारता येते. गढीसमोरच नवनाथांपैकी एक धर्मनाथांचे मंदिर आहे. मंदिराच्या भिंतीवर एक शिलालेख कोरलेला आहे त्यावर राघोजी रत्नोजी पाटील मुकादम जगताप व सयाजीराव गोविंदराव गायकवाड शके १७०६ असा उल्लेख आहे.
ही गढी म्हणजे सयाजीराव गायकवाड यांचे धान्य कोठार होते. जगताप पाटलांना पिंपळे गावच्या पाटीलकीचे वतन बडोदा गायकवाडांकडून आंदण म्हणून मिळाले होते. गावची पिढीजात पाटीलकी अजून या घराण्याकडे चालत आहे. पूर्वी गावची वसुली न्यायनिवाडे इ. सर्व बाबी जगताप वाडयात होत असत. धामारी हे गावसुद्धा त्यांच्याकडे इनाम होते. बडोदेकर गायकवाडांशी तसेच कोल्हापूरकर छत्रपतींशी या घराण्याचे सोबर संबंध आहेत. अशा प्रकारचे एक मातब्बर घराणे गेली काही शतके या गावात एका राजेशाही वाड्यात गावचे मुकादम पाटील म्हणून नांदत आहे.
या गावाचे नाव आपल्या कलेच्या जोरावर महाराष्ट्रभर पोचविणारे गणपतराव माधवराव जगताप पाटील हा वगसम्राट तमासगीर या गावचेच सुपुत्र होय. महाराष्ट्रातील मोठमोठ्या गावांच्या जत्रांमध्ये जगताप पाटील पिंपळेकर यांचा तमाशाचा फड भव्य तंबूत अनेकांनी पाहिला आहे. जगताप पाटलांची 'धर्मवीर संभाजी या वगातील संभाजीची भूमिका विशेष गाजली होती.
साभार - डाॕ सदाशिव शिवदे सर
टीम - पुढची मोहीम