विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 20 April 2022

सरदार पवार गढी - आमदाबाद

 

सरदार पवार गढी - आमदाबाद  
पोस्तसांभार ::
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील घोड नदी तीरावर असलेल्या आमदाबाद या गावात मराठ्यांचे शूर सरदार साबूसिंग पवार यांच्या वंशजांची गढी आहे. आमदाबाद हे गाव पुणे -नगर महामार्गावरील रांजणगावापासून ११ कि.मी अंतरावर आहे. सद्यस्थितीत गढीची एक तटबंदीची बाजू आणि बुरूज शिल्लक आहे. प्रवेशद्वार पण आहे. बाकी संपूर्ण सपाट आहे आणि शेती केली जाते. गढीच्या बरोबर समोरच घोड नदीतीरावर पवार घराण्यातील वीरांच्या दोन समाधी म्हणजे छत्री आहेत. तिथूनच जवळ नदीवर एक घाट आहे. तो खूप छानप्रकारे बांधलेला आहे. त्या घाटावरील अश्वशिल्प विलक्षण सुंदर आहे.
उत्तर हिंदुस्थानातून साबूसिंग पवार नावाचे एक रजपूत दक्षिणेत आले. त्यांचे पुत्र कृष्णाजी पवार. कृष्णाजी पवारांचे पुत्र बुवाजी, रायाजी व केरोजी हे छत्रपती शिवाजीमहाराजांबरोबर फौजेनिशी काम करीत होते. ते अत्यंत विश्वासू आणि कर्तबगार असे होते. या घराण्यातील बुवाजी पवार यांना छत्रपती राजाराम महाराजांनी मुलुखाचा बंदोबस्त करावयास सांगितले होते. त्याप्रमाणे त्यांनी अत्यंत विश्वासाने बंडे मोडून काढली, त्यासाठी लढाया केल्या. त्यामुळे छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजीस असताना त्यांना "विश्वासराव" हा किताब दिला. दक्षिण व खानदेश वगैरे भाग त्यांना 'विश्वासराईचा सरंजाम' म्हणून देण्यात आला. त्यानंतर त्यांचे नातू उदाजी पवार यांना शाहूमहाराज व पेशवे यांनी विश्वासराईच्या सरंजामाशिवाय गुजराथ, माळवा, मेवाड, मारवाड, बुंदेलखंड वगैरे प्रांतांतील मोकासे दिले. याखेरीज 'दहकाचा सरंजाम' उदाजी पवार व मानाजी पवार यांना देण्यात आला.
मलठण, सुपे, कवठे यमाई, आमदाबाद, हिंगणी, गणेगाव, चितेगाव, नगरदेवळे इत्यादी ठिकाणी यांची सरंजामी इनामे होती. पवार आपल्या कैफियतीत म्हणतातः "विश्वासराव पदसुद्धा सरंजाम राजशक शके ६२ राक्षसनाम संवत्सरी बुवाजी पवार विश्वासराव यांस दिल्हा. राणोजी पवार यास श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी वस्त्रे देऊन सरंजामाच्या सनदा करून दिल्या. विश्वासराईचे पद आमचे सरदारीस चालत आहे."
छत्रपती राजाराम महाराजांनी दिलेल्या विश्वासराईच्या सरंजामाच्या वाटणीच्या यादीत खालीलप्रमाणे उल्लेख आहेत
१)चौथाई सरंजामात इसम
१) यशवंतराव पवार मलठणकर
१) रामचंद्रराव पवार कवठेकर, माळव्यात आहेत.
४) बळवंतराव पवार आमदाबादकर
१) अवधूतराव पवार चितेगावकर
२) चौथाई सरंजाम शिवराव पवार नगरदेवळेकर
सरदार पवारांच्या वंशावळीचा विचार केला तर उदाजी पवार इ.स. १७०८ ते १७६० हे मलठण शाखेतील असल्याचे दिसते. माळवा गुजराथ या प्रांतातमराठ्यांचा जम बसविण्यास उदाजी कारणीभूत झाल्याचे इतिहास सांगतो. पुढे बाजीराव आणि उदाजींचे पटले नाही. उदाजींनी शाहूकालात इ.स. १७३४ सिद्दी, अंबर अफवाणी याच्याशी सामना देऊन त्याचे शिर कापून आणले. यशवंतराव पवार हे अत्यंत बाणेदार स्वभावाचे असे पुरुष झाले. पवार घराण्यातील लोकांनी दिल्ली काबीज करण्यासाठी बाजीराव पेशव्यांना चांगली मदत केल्याचे दिसते. मराठ्यांच्या इतिहासात पवार घराण्याचे योगदान मोठे आहे.
साभार- डाॕ सदाशिव शिवदे सर
टीम - पुढची मोहीम

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...