विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 20 April 2022

सरदार पवार गढी - मलठण

 
























सरदार पवार गढी - मलठण  
पोस्तसांभार ::

Saurabh Madhuri Harihar Kulkarni

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मलठण गावात मराठा सरदार पवार यांची मजबूत गढी उभी आहे. मलठण हे पुणे-नगर महामार्गावरील शिक्रापूरपासून २० कि.मी. अंतरावर आहे. गावात प्रवेश करतानाच गढीची भव्य तटबंदी आणि बुरूज दिसतात. गढीचे प्रवेशद्वार सुस्थितीत आहे. आतमध्ये दुमजली वाडा पहायला मिळतो. वाडा सुस्थितीत आहे. वाड्यातील विहीर एकदम वेगळ्याच पद्धतीची आहे. खूप विलक्षण सुंदर अशी विहीर आहे. वाड्यातील दिवाणखाना मोठा आहे. गावात अजून एक तटबंदी असलेली गढी आहे ती जवळजवळ संपूर्ण ढासाळलेला आहे.
उत्तर हिंदुस्थानातून साबूसिंग पवार नावाचे एक रजपूत दक्षिणेत आले. त्यांचे पुत्र कृष्णाजी पवार. कृष्णाजी पवारांचे पुत्र बुवाजी, रायाजी व केरोजी हे छत्रपती शिवाजीमहाराजांबरोबर फौजेनिशी काम करीत होते. ते अत्यंत विश्वासू आणि कर्तबगार असे होते. या घराण्यातील बुवाजी पवार यांना छत्रपती राजाराम महाराजांनी मुलुखाचा बंदोबस्त करावयास सांगितले होते. त्याप्रमाणे त्यांनी अत्यंत विश्वासाने बंडे मोडून काढली, त्यासाठी लढाया केल्या. त्यामुळे छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजीस असताना त्यांना "विश्वासराव" हा किताब दिला. दक्षिण व खानदेश वगैरे भाग त्यांना 'विश्वासराईचा सरंजाम' म्हणून देण्यात आला. त्यानंतर त्यांचे नातू उदाजी पवार यांना शाहूमहाराज व पेशवे यांनी विश्वासराईच्या सरंजामाशिवाय गुजराथ, माळवा, मेवाड, मारवाड, बुंदेलखंड वगैरे प्रांतांतील मोकासे दिले. याखेरीज 'दहकाचा सरंजाम' उदाजी पवार व मानाजी पवार यांना देण्यात आला.
मलठण, सुपे, कवठे यमाई, आमदाबाद, हिंगणी, गणेगाव, चितेगाव, नगरदेवळे इत्यादी ठिकाणी यांची सरंजामी इनामे होती. पवार आपल्या कैफियतीत म्हणतातः "विश्वासराव पदसुद्धा सरंजाम राजशक शके ६२ राक्षसनाम संवत्सरी बुवाजी पवार विश्वासराव यांस दिल्हा. राणोजी पवार यास श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी वस्त्रे देऊन सरंजामाच्या सनदा करून दिल्या. विश्वासराईचे पद आमचे सरदारीस चालत आहे."
छत्रपती राजाराम महाराजांनी दिलेल्या विश्वासराईच्या सरंजामाच्या वाटणीच्या यादीत खालीलप्रमाणे उल्लेख आहेत
१)चौथाई सरंजामात इसम
१) यशवंतराव पवार मलठणकर
१) रामचंद्रराव पवार कवठेकर, माळव्यात आहेत.
४) बळवंतराव पवार आमदाबादकर
१) अवधूतराव पवार चितेगावकर
२) चौथाई सरंजाम शिवराव पवार नगरदेवळेकर
सरदार पवारांच्या वंशावळीचा विचार केला तर उदाजी पवार इ.स. १७०८ ते १७६० हे मलठण शाखेतील असल्याचे दिसते. माळवा गुजराथ या प्रांतातमराठ्यांचा जम बसविण्यास उदाजी कारणीभूत झाल्याचे इतिहास सांगतो. पुढे बाजीराव आणि उदाजींचे पटले नाही. उदाजींनी शाहूकालात इ.स. १७३४ सिद्दी, अंबर अफवाणी याच्याशी सामना देऊन त्याचे शिर कापून आणले. यशवंतराव पवार हे अत्यंत बाणेदार स्वभावाचे असे पुरुष झाले. पवार घराण्यातील लोकांनी दिल्ली काबीज करण्यासाठी बाजीराव पेशव्यांना चांगली मदत केल्याचे दिसते. मराठ्यांच्या इतिहासात पवार घराण्याचे योगदान मोठे आहे.
साभार- डाॕ सदाशिव शिवदे सर
टीम - पुढची मोहीम

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...