श्रीमंत बळवंतराव राजेभोसले सेनापती वावीकर उर्फ बाळासाहेब सेनापती
इसवी सन १७७७ मध्ये श्रीमंत छत्रपती रामराजे महाराज यांच्या वारसाचा शोध वावी येथे येऊन संपला. मराठा स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे चुलत आजोबा असलेल्या श्रीमंत विठोजी राजेंचे वंशज असलेल्या वावीकर राजेभोसले घराण्यातून सरदार त्रिंबकजी राजेभोसले यांचे ज्येष्ठ सुपुत्र विठोजी राजे यांना दत्तक घेण्यात आले. त्यांचे नाव बदलून शाहू (धाकटे) असे ठेवण्यात आले. त्यांचे लहान बंधू चतुरसिंग राजे आपल्या भावासमवेत म्हणजेच श्रीमंत छत्रपती शाहू धाकटे यांच्या समवेत सातारा येथे राहू लागले.
श्रीमंत छत्रपती शाहू (धाकटे) यांचा विवाह नारायणजी मोहिते हंबीरराव माजगावकर यांच्या कन्या लक्ष्मीबाई साहेब यांच्यासोबत झाला. महाराणी लक्ष्मीबाई साहेब यांच्या लहान बहीण बबईबाई साहेब यांचा विवाह सोहळा श्रीमंत चतुरसिंग राजे यांच्यासोबत २६ नोव्हेंबर १७८९ ला सातारा येथे पार पडला. श्रीमंत चतुरसिंग राजे हे मराठ्यांच्या इतिहासातील एक क्रांतिकारक व्यक्तिमत्व. ते मराठा साम्राज्याचे सेनापती झाले होते. श्रीमंत चतुरसिंग राजे भोसले वावीकर आणि बबईबाई साहेब यांना १८ जुलै १७९८ ला पुत्ररत्न प्राप्त झाले. त्यांचे नाव श्रीमंत बळवंतराव राजे. त्यांच्या जन्माचा मोठा उत्सव श्रीमंत छत्रपती शाहू (धाकटे ) महाराज आणि श्रीमंत चतुरसिंग राजे यांनी केला. श्रीमंत बळवंतराव राजे हे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (धाकटे) यांचे पुत्र श्रीमंत प्रतापसिंह राजे, रामचंद्र राजे आणि शहाजी राजे यांच्यासमवेत वाढू लागले.
श्रीमंत चतुरसिंग राजे यांना आपले बंधू छत्रपती शाहू (धाकटे) महाराज यांना होणारा त्रास असह्य वाटू लागला होता. मूळच्या क्रांतिकारक विचारांचे असल्याने श्रीमंत चतुरसिंग राजे मराठा सरदारांचे पाठबळ मिळविण्यासाठी इसवी सन १८०३ मध्ये साताऱ्यातून बाहेर पडले. श्रीमंत चतुरसिंग राजे यांनी छत्रपतींसाठी, मराठा साम्राज्यासाठी आपल्या पाच वर्षाच्या मुलाचा, कुटुंबाचा कुठलाही विचार न करता भारतभ्रमंती सुरु केली. श्रीमंत चतुरसिंग राजे यांच्या क्रांतिकारक विचाराना अटकाव घालण्यासाठी दुसरा बाजीराव पेशवे याने त्यांची पत्नी बबईबाई साहेब आणि त्यांचे चिरंजीव श्रीमंत बळवंतराव राजे यांना कैद करून पुण्यात आणलं आणि ओलीस ठेवले.
श्रीमंत छत्रपती शाहू (धाकटे) यांच्यानंतर श्रीमंत प्रतापसिंह महाराज छत्रपती झाले. मे १८११ मध्ये दुसरा बाजीराव पेशवे याने त्रिंबकजी डेंगळे यांच्याकरवी श्रीमंत चतुरसिंग राजे यांना कैद करून कांगोरीच्या किल्ल्यात बंदिवासात ठेवले. त्यानंतर श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी बबईबाई साहेब आणि श्रीमंत बळवंतराव राजे यांना सोडवून साताऱ्यात आणले.
१४ डिसेंबर १८१७ ला इंग्रज अधिकारी पेशवाईच्या विरोधात चालून आले. श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी इंग्रजांशी संधान साधू नये म्हणून बाजीरावाने त्यांना कुटुंब कबिल्यासह सिद्धटेक येथे लष्करी छावणीत बोलावून घेतले आणि त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबाची प्रचंड फरपट केली. काही दिवसातच बाजीराव छत्रपतींना सोडून पळून गेला. तेव्हा श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या समवेत मातोश्री माईसाहेब, महाराजांचे भाऊ श्रीमंत रामचंद्र राजे आणि श्रीमंत शहाजी राजे आणि श्रीमंत बळवंतराव राजेभोसले वावीकर हे होते. त्या कठीण प्रसंगी श्रीमंत बळवंतराव राजे, खंडोजी शिंदे, राघोजी भोसले, सदोबा खलतकर, खंडोजी भोसले, बागाजी मुसळे, बापू जाधव हे छत्रपतींभोवती कोट करून उभे होते. त्यानंतर छत्रपती आणि इंग्रज भेट होऊन ११ मार्च १८१८ ला श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचे पुन्हा राज्यारोहण करण्यात आले. त्यानंतर श्रीमंत चतुरसिंग राजे यांचे आणि काही काळानंतर बबईबाई साहेब यांचे दुःखद निधन झाले.
इसवी सन १८२३ च्या विजयादशमीच्या दिवशी श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी श्रीमंत बळवंतराव राजेभोसले वावीकर यांची सरलष्कर पदी नेमणूक केली. सन १८२४ च्या नाशिक त्रिंबक भेटीच्या वेळेस देखील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या सोबत श्रीमंत शहाजी राजे आणि सरलष्कर श्रीमंत बळवंतराव राजेभोसले हे सावलीप्रमाणे होते. सन १८२५ मध्ये श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी श्रीमंत बळवंतराव राजेभोसले वावीकर यांना सेनापती पद देऊन त्यांचा मोठा गौरव केला. श्रीमंत चतुरसिंग राजे हे मराठा साम्राज्याचे सेनापती होते. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र श्रीमंत बळवंतराव राजेभोसले वावीकर हे सेनापती झाले होते.
मराठी रियासतकार म्हणतात, '' चतुरसिंगचा कर्तृत्ववान पुत्र बळवंतराव सेनापती मराठ्यांचा अत्यंत अभिमान बाळगणारा होता. छत्रपती प्रतापसिंह महाराज, बळवंतराव सेनापति, बळवंतराव चिटणीस हे सर्व तरुण व होतकरू पुरुष एकविचाराने वागून बदललेल्या परिस्थितीत राज्याची व समाजाची उर्जितावस्था करण्यास अत्यंत आतुरतेने झटू लागले.'' ६ ऑक्टोबर १८३३ ला गव्हर्नर लॉर्ड क्लेअरने छत्रपती प्रतापसिंह महाराज यांची भेट घेऊन बळवंतरावांविषयी लिहून ठेवले, '' काही प्रसंग ओढवल्यास लोकांचे डोळे बाळासाहेब सेनापतीकडे लागतात, कारण तो हुशार व तरतरीत आहे.''
श्रीमंत बळवंतराव राजे सेनापती हे अतिशय कर्तृत्ववान होते. १८३९ मध्ये इंग्रजांची एक पलटण साताऱ्यावर चालून आली. श्रीमंत बळवंतराव राजे सेनापती यांचा विचार होता कि त्यांच्यासोबत लढाई करून शर्थ करावी. दोघांच्या लढाईत शहर लुटले जाईल म्हणून छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी त्यांना रात्रभर जाऊ न देता त्यांची तलवार काढून त्यांना काठी देऊन आपल्याजवळ ठेवले. कारण तो शूर सेनापती प्रसंग प्राप्त झाल्यास कोणत्याही साहसास कचरणारा नव्हता. मृत्यू पर्यंत श्रीमंत बळवंतराव राजे सेनापती यांनी श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांची सावली बनवून हनुमानाप्रमाणे त्यांची सेवा केली.
श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी ७ डिसेंबर १८३९ ला काशीला प्रयाण केले. तेव्हा त्यांच्यासोबत त्यांच्या दोन महाराणी, कन्या गोजराबाई साहेब, श्रीमंत बळवंतराव राजे सेनापती, त्यांची पत्नी गुणवंताबाई साहेब , सेनापतीचे काका - श्रीमंत छत्रपती शाहू महाराज धाकटे यांचे लहान बंधू श्रीमंत परशराम राजे भोसले वावीकर, महाराजांना मानणारे सर्व आप्तेष्ठ होते. तेव्हा श्रीमंत बळवंतराव राजे सेनापती यांची पत्नी गुणवंताबाई साहेब या गरोदर होत्या. त्याचा कोणताहि विचार मनात न आणता श्रीमंत बळवंतराव राजे सेनापती हे आपल्या पत्नी गुणवंताबाई साहेब यांच्यासमवेत काशीस निघाले. या प्रवासात खान्देशात सांगवी मुक्कामी १२ जानेवारी १८४० रोजी गुणवंताबाई साहेब प्रसूत होऊन त्यांनी एका मुलाला जन्म दिला. त्याचे नाव त्रिंबकजी असे ठेवण्यात आले. जंगलात जन्म झाल्याने त्यांना जंगली महाराज हे नाव पडले. त्यांच्या जन्माचा कुठला उत्सव तर सोडा साधा आराम सुद्धा न करू देता इंग्रज अधिकाऱ्याने भोयांना पालखी उचलण्याचा इशारा केला. पालख्या काशीच्या दिशेने मार्गस्थ झाल्या. याच त्रिंबकजी उर्फ जंगली महाराज यांना श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी दत्तक घेऊन त्यांचे नाव ठेवले श्रीमंत शाहू उर्फ शहाजी महाराज.
या प्रवासात श्रीमंत बळवंतराव राजे सेनापती यांना ताप येऊ लागला होता. इंग्रज अधिकाऱ्याने त्यांच्यावर कुठलाही औषधोपचार करू दिला नाही. ज्वर वाढत गेला. मुलगा झाल्यानंतर अवघ्या १५ दिवसांनी २७ जानेवारी १८४० ला स्वराज्याचे सेनापती आपल्या तान्ह्या मुलाला परकं करून, गुणवंताबाई साहेब यांना विधवा करून इहलोकी गेले. मध्य प्रदेशातील महू जवळील तिकुराई येथे स्वराज्याच्या सेनापतींचे श्रीमंत बळवंतराव राजे सेनापती उर्फ बाळासाहेब सेनापती यांचे निधन झाले. प्रबोधनकार ठाकरे आपल्या रंगो बापूजी आणि प्रतापसिंह महाराज या पुस्तकात बाळासाहेब सेनापती यांचे निधन आमांशाने म्हणजे अतिसाराने झाले आहे असं मांडले आहे.
मराठी रियासतकार म्हणतात, "श्रीमंत चतुरसिंग राजे यांच्या पश्चात त्यांचा पुत्र श्रीमंत बळवंतराव सेनापती यांनीही छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या सेवेत आपला देह खर्चिला. उभयतां बापलेकानी एकनिष्ठपने छत्रपतींची सेवा मारुतीसारखी केली. मराठा साम्राज्यासाठी कष्ट मेहनत करून फार लढाया केल्या. प्राणानिशी खर्च झाले. या पितापुत्र राजे भोसलेनी चाकरी करून नमक अदा केले. आपले इनाम कायम राखले."
त्रिंबकजी उर्फ जंगली महाराज यांच्या दत्तकविधानानंतर लगेचच गुणवंताबाई साहेब यांनी संताजी राजेभोसले शेडगावकर यांचे कनिष्ठ चिरंजीव तात्याबा यांस दत्तक घेऊन त्याचे नाव दुर्गासिंह ठेवले. श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी त्यांना दुर्गासिंह सेनापती असे संबोधले.
मराठा साम्राज्याची आणि श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांची अखेरपर्यंत सेवा करणाऱ्या श्रीमंत बळवंतराव राजेभोसले सेनापती वावीकर उर्फ बाळासाहेब सेनापती यांच्या १८२ व्या पुण्यस्मरणानिमित्त विनम्र अभिवादन.
© श्रीमंत राजेभोसले वावीकर
No comments:
Post a Comment