सेनासाहेब सुभा श्रीमंत चतुरसिंग राजे भोसले सेनापती वावीकर यांचे मराठा स्वराज्यासाठीचे प्रयत्न. दुसरा बाजीराव पेशव्याने त्यांना त्रिंबकजी डेंगळे करवी अनितीने कैद करून कांगोरीच्या किल्ल्यावर बंदिवासात ठेवले होते. पण त्यांचा मूळ स्वभाव क्रांतिकारक असल्याने त्यांना स्वस्थ बसून राहणे कधी जमलेच नाही. कैदेत असतांना देखील त्यांनी त्यावेळेस चा इंग्लिश अधिकारी एल्फिस्टन याला २५ जानेवारी १८१८ ला पत्र लिहून दोन पलटणे पाठवण्याची मागणी केली होती. सगळ्या गोष्टी पत्रात सांगता येणार नाही म्हणून गोविंदराव गायकवाड यांना सविस्तर बोलण्यासाठी पाठवले. बोलणे झाल्यानंतर दोन पलटणे पाठवून द्या आणि त्यानंतर आपण भेटून तुमच्या आमच्या विचाराने पुढे काय करायचे हे ठरवू, असं श्रीमंत चतुरसिंग राजे म्हणतात.
या पत्रात श्रीमंत चतुरसिंग राजे म्हणतात, '' बाजीराव पेशवे यांनी आमच्या राज्याचा बंदोबस्त करून आम्हास कैदेत ठेऊन कारभार करीत आहेत. हाली पाठवून नाना प्रकारचे उपद्रव आम्हास करीत आहेत. या प्रकारे आमची अवस्था आहे म्हणोन तुम्हास पत्रे पाठवली होती. तरी या समई आम्हास कुमकेस दोन पलटणे पाठवून द्यावी म्हणजे इकडून बंदोबस्त करीत येतो. भेटणीनंतर बोलणे होऊन तुमचे आमचे विचारे जे करणे ते करावयासी येईल. येविसी गोविंदराव गायकवाड पाठविले आहेत. मुखजबानी सविस्तर बोलतील ते समजून पलटण रवानगी करावी. चित्तात कोणयेक अंदेशा आणू नये. ''
श्रीमंत चतुरसिंग राजे यांच्या या पत्राचा काळ हा जानेवारी १८१८ म्हणजे इंग्रज आणि मराठा यांच्यासाठी खूप धामधुमीचा होता. म्हणून कदाचित एल्फिस्टन या इंग्रज अधिकाऱ्याने श्रीमंत चतुरसिंग राजे यांना प्रतिसाद दिला नसावा.
कदाचित हे पत्र श्रीमंत चतुरसिंग राजे यांचे अखेरचे पत्र असावे कारण या नंतर तीन महिन्यांच्या आतच १५ एप्रिल १८१८ ला स्वराज्याच्या सेनापतींचे दुःखद निधन झाले.
No comments:
Post a Comment