विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 4 April 2022

श्रीमंत सरदार जयाप्पा शिंदे

 

श्रीमंत सरदार जयाप्पा शिंदे
पोस्तसांभार ::
~ अंबरीश राजे शिंदे फाकडे

 
श्रीमंत सुभेदार राणोजी शिंदे यांच्या मृत्यूनंतर शिंदे घराण्याची सूत्रे त्यांचे सर्वात जेष्ठ पुत्र श्रीमंत जयाजी शिंदे यांच्याकडे आली. ते इतिहासात जयाप्पा दादासाहेब म्हणून सुप्रसिद्ध आहेत.
श्रीमंत जयाप्पा शिंदेंची कारकीर्द १७४० अगोदर पासून सुरु होते, राणोजींनंतर मराठा साम्राज्य उत्तरेत वृद्धिगंत करण्याचे मोठे काम त्यांनी केले, दक्षिणेतील मोहिमांमध्येदेखील त्यांचा सहभाग होता.
१७५२ मध्ये जेव्हा शाह वलीउल्लाहच्या जिहादी प्रेरणेने अब्दालीने पहिली स्वारी केली. दुसऱ्या स्वारीच्या वेळीस सफदरजंगाने पातशहाच्या वतीने मराठ्यांशी अहदनामा (तख्ताच्या रक्षणाचा करार) केला ह्या सगळ्या घडामोडीचे जयाप्पानी नेतृत्व केले, जयाप्पा शिंदे यांनी होळकरांच्या साथीने दिल्लीचा वजीर सफदरजंग याच्या मदतीसाठी गंगा-यमुना यांच्या दुआबात जाऊन धर्मांध, कडवट अश्या रोहिल्यांची खोड मोडली आणि मराठ्यांच्या यशोवैभवाचा झेंडा रोहिलखंडांत उभारला. तत्कालीन पेशवा बाळाजी बाजीराव ह्यांनी जयाप्पा दादांचा जो गौरव केला आहे, तो केवळ अपूर्व आहे.
"शाबास तुमच्या हिंमतीची व दिलेरी रुस्तुमीची; व शाबास लोकांची ! आमच्या दक्षिणच्या फौजांनी गंगायमुनापार होऊन, रोहिले पठाणांशी युद्ध करून, आपण फत्ते पावावे, हे कर्म लहान सामान्य न झाले. तुह्मीं एकनिष्ठ, कृतकर्म सेवक, या दौलतीचे स्तंभ आहां !! चित्तावर धरितां, ते घडून येते !" पेशव्याची जयाप्पाना लिहिलेली इतरही काही पत्रे उपलब्ध आहेत त्यावरून त्यांचे राजकीय महत्व अधोरेखित होते.
बादशाहशी झालेल्या करारामध्ये मराठ्यांना उत्तर हिंदुस्थानातील काही प्रदेश व काही प्रदेशांचे वसुली अधिकार मराठ्यांना बहाल केले. याच कामगिरीवर जयाजी शिंदे राजपुताना आणि मारवाड मोहिमेवर आले. पराक्रमी रणझुंजार रजपूत वीरांना देखील हे देखील त्यांनी ‘दे माय धरणी ठाय' करून सोडिलें. मारवाडावरील मराठ्यांच्या स्वारीवर, राजस्थानांतील भाटांनी जीं कवित्ते रचलीं आहेत, त्यांत, जयाप्पा शिंद्याच्या रणपटुत्वाचे विस्मरण रजपूत लोकांस कधीही होणार नाही, असे ध्वनित केले आहे. टॉड यांनी लिहिलेल्या राजस्थानच्या इतिहासांत पुढील पद्य दिले आहे:-
"याद घणा दीन आवेशी, हाप्पा वाला हेल। भागा तीनो भूपति, माल खजाना मेल ॥ १ ॥" ह्याचा तात्पर्यार्थ असा की, “आप्पाच्या रणप्रसंगाची आठवण लोकांस पुष्कळ दिवस राहील. रणांत पाठ न दाखविणारे मारवाड, बिकानीर, व रूपनगर येथील तीन भूपति देखील रणांगणांमध्ये आपले सर्व सामानसुमान व जडजवाहीर टाकून पळून गेले ! " जयाप्पा शिंद्यांच्या शौर्य, कर्तृत्वाचा परिचय यामध्ये नक्कीच येतो.
ही मोहीम अंतिम टप्प्यावर असताना जोधपूरच्या विजयसिंग राठोडला जयाजींनी नागोर येथे वेढा घालून अगदी जेरीस आणला, पराभव निश्चित आहे म्हणून त्याने तहाची बोलणी सुरु केली, बोलणी सुरु असताना एके दिवशी आपल्या वकिलाबरोबर वेष बदलून मारेकरी पाठवले गेले. या मारेकऱ्यांनी प्रातः समयी श्रीमंत जयाप्पा हे स्नान आटोपून ईश्वरसाधना करत असताना बेसावध अशा परिस्तिथीमध्ये हल्ला करून विश्वासघाताने त्यांची हत्या केली गेली (२५ जुलै १७५५), क्षत्रियत्वाला काळिमा फासणारे कृत्य केले गेले. आणि मराठ्यांचे व शिंदे घराण्यातील एक नररत्न हरपले.
जयाप्पांचे कनिष्ठ बंधू श्रीमंत दत्ताजी शिंदे सुदधा ह्या मोहीमध्ये उपस्थित होते, त्यांनी शोक बाजूला सारून प्रयत्न व वीरतेचा कस लावत बिजेसिंगाला धूळ चारली. संपूर्ण मारवाडवर वर्चस्व स्थापन करत त्याचा तिसरा हिस्सा मराठा साम्राज्यात सामाविष्ट केला. शिवाय ५ कोटींपेक्षाही अधिकची खंडणी वसूल करून मराठ्यांच्या खजिन्यात जमा केली.
श्रीमंत जयाप्पा शिंदेंची कारकीर्द अतिशय यशस्वी राहिली. उत्तरेच्या राजकारणची आणि लष्करी परिस्तिथीची उत्तम जाण असणाऱ्या जयाजींनी मराठा साम्राज्याला उत्तर हिंदुस्थानात बळकटी दिली.
अशा ह्या पराक्रमी वीराच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन आणि मानाचा त्रिवार मुजरा !!! 🙏💐
~ अंबरीश राजे शिंदे फाकडे

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...